Total Pageviews

Friday 17 June 2011

STATE OF POLICING IN MUMBAI EDITORIAL SAMANA

‘जे. डे’ यांच्या हत्येनंतर हे कृत्य तेलमाफियांनी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला याचा अर्थ महाराष्ट्रात ‘तेलमाफियां’चे साम्राज्य अभेद्य आहे.

मरणानंतरचा पंचनामा!मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या रहस्यकथेवर विश्‍वास ठेवला तर पत्रकार जे. डे यांचे मारेकरी सापडले आहेत. अर्थात, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि ‘अधिक चौकशीची गरज पडली तर परत बोलावू’ असा पोकळ दम देऊन सोडून दिले. बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका भरगच्च पत्रकार परिषदेत डे यांच्या हत्येमागच्या रहस्याचा उलगडा केला. ‘बडे शहरों में ऐसे छोटे छोटे हादसे होते है’ असे बच्चनछाप डायलॉग मारणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीपेक्षा वेगळी माहिती राज्याचे गृहमंत्री उद्या देऊ शकतात. म्हणजे कॉंग्रेसचे आरोपी वेगळे व राष्ट्रवादीवाल्यांचे वेगळे, पण मरण पावलेले जे. डे मात्र एकच आहेत व त्यांचा दिवसाढवळ्या खून झाला आहे. पोलीस खरेच आरोपी पकडून न्यायासनासमोर हजर करतील यावर आता तसा कुणाचाच विश्‍वास राहिलेला नाही. नगास नग उभा करून पोलीस सत्ताधार्‍यांची इज्जत वाचवतील व नंतर ‘जे. डे’ यांचे हत्याकांड लोक विसरून जातील. रक्त सांडण्याची व माणसे मारण्याची मालिका अखंड सुरूच असते. ‘जे. डे’ हे एक पत्रकार होते म्हणूनच त्यांच्या हत्येचा इतका बोभाटा झाला. मीडियानेही या हल्ल्यास महत्त्व देऊन सत्ताधार्‍यांवर दबाव आणला, मोर्चे काढले, काळा दिवस पाळला म्हणून ‘जे. डे’ यांचे मारेकरी सापडतीलही, परंतु जे. डे यांचे प्राण त्यांच्या कुटुंबीयांना परत मिळणार आहेत काय? जे. डे हे जीवानिशी गेले आहेत. डे यांची हत्या तेलमाफियांनी केली, चंदन तस्करांनी केली की आणखी कोणी केली यावर वेगवेगळ्या कहाण्या प्रसिद्ध होत आहेत. पण छोटा शकीलने त्याच्या दुबईतील एका हस्तकाकरवी सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली असा दावा पोलिसांचा हवाला देऊन करण्यात येत आहे. पोलीस आता काहीही सांगू शकतात व कोणावरही दावा ठोकू शकतात. कुणी एक शकील की फकील हा प्रत्येक वेळेला सुपार्‍या देतो आणि माणसे मारतो. त्या शकीलचे नाव घेणे आता पोलिसांनी बंद केले पाहिजे. शकील मुंबईतले भाडोत्री गुंड वापरून माणसे मारतो. हे मारेकरी पाताळातून किंवा चंद्रावरून येत नाहीत. मुळात अशा भाडोत्री मारेकर्‍यांचा मुक्त वावर मुंबईसारख्या शहरात वाढला आहे व त्यांच्यावर पोलीस किंवा कायद्याचा वचक राहिलेला नाही. कायद्याची दहशत नाही व पोलिसांचा दरारा नाही. पोलीस हे खाकी वर्दीतील शोभेची बाहुली बनले आहेत. मुंबईसारख्या शहरात दिवसाढवळ्या एका पत्रकाराला गोळ्या घातल्या जातात, दरोडे पडतात, वृद्धांचे खून होतात, अतिरेकी घुसतात, गुंड टोळ्यांत गँगवॉरचा भडका उडून एकमेकांवर गोळीबार होतो हे लक्षण कोणत्या कायदा आणि सुव्यवस्थेचे आहे? गुन्हा झाल्यावर आरोपी पकडणे हे नेहमीचेच काम झाले. मुंबईच्या पोलीस खात्यात सुरू असलेल्या टोळीयुद्धाचा हा परिणाम आहे. गुंडांना व त्यांच्या टोळ्यांना खतम करण्यापेक्षा पोलीस अधिकारी एकमेकांना खतम करून राज्यात अराजक निर्माण करीत आहेत. पोलीस खाते एकसंध नाही व गृहखात्याचे नेतृत्व लेचेपेचे आहे. छोटा शकील, दाऊदच्या नावाने इतक्या वर्षांनंतरही ‘गेम’ वाजवले जातात हे त्या गुंडांचे शौर्य नसून पोलीस दलाची नामुष्की आहे. ‘जे. डे’ यांच्या हत्येनंतर हे कृत्य तेलमाफियांनी केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला याचा अर्थ इतकाच की मुंबईसह महाराष्ट्रात ‘तेलमाफिया’ आहेत व त्यांचे साम्राज्य अभेद्य आहे. मग या तेलमाफियांना खतम करण्यासाठी तुम्ही काय केलेत? राज्यकर्ते आणि पोलिसांच्या कृपाछत्राशिवाय कोणतीही माफियागिरी चालू शकेल काय? पोलिसांनी मनात आणले तर चोवीस तासांत या माफियांना गाडले जाऊ शकते. पण त्यांना गाडले तर सरकारला कोट्यवधीचे हप्ते कोण देणार व निवडणूक जिंकून कोण देणार? ज्या तेलमाफियांच्या नावाने सध्या बोटे मोडली जात आहेत त्यांनी मनमाडला यशवंत सोनवणेची हत्या केलीच व हत्या करणारा पोपट शिंदेही त्यात मेला. पण सरकारची पोपटपंची काही थांबत नाही. यशवंत सोनवणेनंतर आता जे. डे! आणखी किती बळी सरकार घेणार आहे? मरणानंतरचे पंचनामे हेच सरकारचे कर्तव्य असेल तर या सरकारचाही पंचनामा करावाच लागेल

No comments:

Post a Comment