Total Pageviews

Friday 17 June 2011

POLICE AUTROCITIES IN UTTAR PRADESH

दुर्दैवी कहाणी पोलिसी अत्याचाराची
ऐक्य समूह
Friday, June 17, 2011 AT 01:04 AM (IST)

गुुंडगिरीसाठी प्रसिध्द असलेल्या बिहारचा चेहरामोेहरा पालटत असतानाच पण त्याच वेळी उत्तर प्रदेशची वाटचाल गुंडगिरी आणि अराजकाकडे होऊ लागली आहे. त्यातही पोलीस खात्याकडून होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या एक-एक कहाण्या पुढे येत आहेत. एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण नुकतेच उघड झाले. संतापाची बाब म्हणजे हे प्रकरण दडपण्याचे पध्दतशीर प्रयत्न सुरू आहेत.
देशातील पोलीस यंत्रणा हा मोठाच चिंतेचा विषय झाला आहे. ही पोलीस यंत्रणा गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी स्थापन केली पण ती स्वत:च इतकी गुन्हेगारी मनोवृत्तीची झाली आहे की, गुन्हेगारांशी हातमिळवणी करून जनतेवर अन्याय करू लागली आहे. अशा परिस्थितीत पोलीस यंत्रणेत बदल करून तिला ब्रिटिश राजवटीतील मानसिकतेतून बाहेर काढले पाहिजे. पोलीस हा जनतेचा शत्रू नसून मित्र असतो. तेव्हा पोलिसांनी जनतेशी माणुसकीने वागावे हे शिकवले पाहिजे असे अनेक पोलीस आयोगांनी म्हटले आहे. पण सध्याच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील या यंत्रणेत राज्यकर्त्यांचे इतके हितसंबंध गुंतले आहेत की, ते या यंत्रणेत काहीही सुधारणा करायला तयार नाहीत. परिणामी कर्तव्याची भावना लोप पावत आहे. त्याचबरोबर अधिकाराचा मद चढलेली ही यंत्रणा वरचेवर मग्रूर बनत चालली आहे. या मग्रूरतेचे फटके देशातील सामान्य माणसाला सातत्याने बसत आहेत. देशात दररोज पोलिसांच्या अत्याचाराला कोठे ना कोठे आणि  कोणी ना कोणी बळी पडल्याची बातमी ऐकायला येत आहे.
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीच्या एका पोलीस ठाण्यात 14 वर्षांच्या बालिकेचा पोलिसांनीच खून केला आणि तिचा मृतदेह ठाण्याच्या जवळपासच्याच एका झाडावर टांगला. ही मुलगी एका गरीब कुटुंबातली होती. ती आपल्या घरातल्या शेळ्या राखण्यासाठी गेली असताना बेपत्ता झाली होती. पण पोलिसांनीच तिचा पोलीस ठाण्यातच खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत्यूनंतर माध्यमात गहजब झाला म्हणून हे प्रकरण उघड झाले पण तसे ते झाले नसते तर ही हत्या खपून गेली असती. किंबहुना, पुरेसा बभ्रा होऊनही हे प्रकरण दाबण्याचे काही कमी प्रयत्न झाले नाहीत. या संदर्भात वृत्तपत्रात बातम्या आल्यानंतर मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले. पहिल्या शवविच्छेदनात तिने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. पण तो मान्य झाला नाही म्हणून तिचा पुरलेला मृतदेह उकरून बाहेर काढून दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा मात्र तिला मारहाण झाली असल्याचे, तिचा गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न झाले. थोडक्यात, शवविच्छेदनाचा पहिला अहवाल खोटा असल्याचे सिद्ध झाले. या खोट्या अहवालात मुलीने आत्महत्या केल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेला. तसा खोटा वैद्यकीय अहवाल देण्यासाठी आणि पोलिसांना यातून वाचवण्यासाठी काही तरी देणे-घेणे झालेच असणार.
पोलिसांनी केलेला खून
मुख्य म्हणजे पोलीस तिला मरेपर्यंत मारतील हे संभवत नाही. खरा प्रकार म्हणजे शेळ्या चारल्या जातात अशा ठिकाणी आलेली ही 14 वर्षांची मुलगी पाहून रिकामपणी बसलेल्या पोलिसांच्या कामवासना चाळवल्या आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. भानावर आल्यानंतर आपल्या या अधम कृत्याचा परिणाम काय होतो, याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळेच त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्या मुलीचा खून करून आत्महत्येचा देखावा उभा केला. काही आरडाओरडा झालाच तर शेवटी फिर्याद आपल्याकडेच येणार आहे, तपासही आपणच करणार आहोत, वैद्यकीय अधिकारीही आपल्याच खिशात आहेत तेव्हा होणार काहीच नाही ; मुलीला मारून टाकणे आणि तिचा देह झाडाला लटकवणे इतके हे काम सोपे आहे, अशी त्यांची कल्पना होती.
उत्तर प्रदेशमध्ये असे प्रकार नेहमीच घडत असल्यामुळे पोलिसांनी हे धाडस केले पण प्रत्यक्षात ते त्यांच्या अंगलट आले. आजवर घडलेल्या साऱ्या घटनांमध्ये हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झालेला दिसतोच पण उत्तर प्रदेशातील पोलीस कसे वागतात आणि काय काय करत असतात, हे त्यातून दिसून आले. या दुर्दैवी मुलीच्या आई-वडिलांनी तिचा लटकलेला देह पाहिला तेव्हा पोलिसांनी त्यांना तो पटकन घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तिने आत्महत्या केली आहे तेव्हा पटकन  नेऊन पुरून टाका नाही तर चौकशा सुरू होतील. पोलिसांचा ससेमिरा  तुमच्या मागे लागेल, अशा शब्दात पोलिसांनी त्यांना जवळजवळ धमकावलेच पण हे गरीब जोडपे कमालीच्या धीटपणाने वागले.  पंचनामा झाल्याशिवाय आपण या मुलीच्या मृतदेहाला हातही लावणार नाही असे त्यांनी बजावले.
पुरावा दडपण्याचा प्रयत्न
एरव्ही आपोआपच दडपले जाणारे हे प्रकरण आता दडपता येणार नाही असे लक्षात आले आणि पोलिसांचे धाबे दणाणले. या जोडप्यावर सामोपचाराचा परिणाम होत नाही असे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यांना पाच लाख रुपयांची लाच देऊ केली आणि कसलाही आरडाओरडा न करता तक्रार मागे घ्यावी असे सुचवले पण या जोडप्याने त्यालाही दाद दिली नाही. आता मात्र हे सारे प्रकरण वरपर्यंत गेले आहे. अकरा पोलीस निलंबित झाले आहेत आणि दोघा डॉक्टरांनाही निलंबित करण्यात आले आहे. या मुलीवर बलात्कारच झाला असे तिच्या आई- वडिलांचे म्हणणे आहे. तसा अहवाल अजून हाती आलेला नाही पण त्या शिवाय काहीही झाल्याचे संंभवतच नाही. कारण बलात्काराचे पुरावे नष्ट करण्यासाठी तो प्रकार घडलेली जागा काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ करण्यात आली. म्हणजे प्रकरण केंद्रीय गृहखात्यापर्यंत गेले असूनही पोलीस खाते ते दडपून टाकण्याचाच प्रयत्न करीत होते. आता वरच्या पातळीवरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणातही राजकारण सुरू आहे. कॉंग्रेसचे नेते एरव्ही अशा प्रकारात लक्ष घालत नाहीत पण आता उत्तर प्रदेशात ते फारच सक्रिय झाले आहेत. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रिटा जोशी यांनी या प्रकाराचा निषेध केला.  मानवी हक्क आणि महिला आयोगानेही या संबंधात उत्तर प्रदेशातील मायावती सरकारकडून खुलासा मागितला आहे. राज्यात बसपाचे सरकार आहे आणि येत्या वर्षभरात तिथे निवडणुका होणार असल्याने ही सक्रियता वाढत आहे. त्यामुळे  कॉंग्रेसने या संबंधात केलेल्या टीकेला उत्तर देताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्यांनी त्यांना चोख उत्तर दिले असून दिल्लीत असे प्रकार रोखण्यात तिथल्या शीला दीक्षित यांच्या कॉंग्रेसच्या सरकारला का यश आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. झालेला प्रकार दुर्दैवीच आहे तेव्हा त्यात कोणी राजकारण करता कामा नये हे आता तरी कॉंग्रेसच्या नेत्यांना कळेल असे वाटते.
मायावतींचा प्रतिहल्ला
लखीमपूर खेरीच्या खून प्रकरणाचं राजकीय भांडवल करीत कॉंग्रेस पक्षानं मुख्यमंत्री मायावतींच्या सरकारवर टीका करायची संधी सोडली नाही. उत्तर प्रदेशातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळल्याचा आरोप करीत कॉंग्रेसनं हे प्रकरण सीबीआयकडं चौकशीसाठी द्यायची मागणी केली. मायावतींना घेरायचा हा डाव होता पण, त्यांनी तो पध्दतशीरपणे उधळून लावला. हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी देतानाच, त्याची वाट नोएडाच्या आरुषी हत्त्याकांडासारखी होवू नये, असं त्यांनी सांगून टाकलं. सीबीआयच्या चौकशीवर आपला कसलाही विश्वास नसल्याचं सांगताच त्यांनी, आपल्या सरकारवर हल्ले चढवणाऱ्या कॉंग्रेस पक्षानं राजधानी दिल्लीतल्या वाढत्या खून, बलात्कार, दरोडे, अपहरणं, चोऱ्या, लूटमार यांचीही दखल घ्यावी, असं बजावायलाही त्या विसरल्या नाहीत. विरोधी भारतीय जनता पक्षानंही या संधीचा फायदा घेत मायावतींच्यावर कडाडून टीका केली. कायद्याचे रक्षक असलेले उत्तर प्रदेशातले पोलीसच जनतेचे भक्ष्यक झाल्यानं, जनतेच्या जीविताची परिस्थिती गंभीर  निर्माण झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
    - अरविंद जोशी

No comments:

Post a Comment