स्मार्ट पोलिस अधिकारी22 Jun 2011, 0324 hrs ISTमुंबई पोलिसांपेक्षा गुन्हेगार स्मार्ट आहेत का, अशी चर्चा मध्यंतरी राज्याच्या दोन मंत्र्यांमध्ये रंगली होती. त् यावेळी एका मंत्रिमहोदयांनी मुंबईचे पोलिस गुन्हेगारांपेक्षा नक्कीच स्मार्ट आहेत अशी ग्वाही दिली होती.
पोलिसांचा हा गुन्हेगारांपेक्षा अधिक असलेला स्मार्टपणा नुकताच एका बारमध्ये मद्यपान करीत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने दाखवून दिला आहे. दिलीप सावंत नावाचे एक पोलिस अधिकारी टिळकनगरच्या एका बारमध्ये मद्यपान करीत बसले होते. त्यावेळी त्याच बारमध्ये असलेल्या एका व्यापाऱ्याकडे ते रागाने बघत होते. त्या व्यापाऱ्याने 'आपण माझ्याकडे असे रागाने का बघत आहात' अशी घाबरून विचारणा केली, तेव्हा हे पोलिस अधिकारी महाशय चक्क त्या व्यापाऱ्याच्या तोंडावर थंुकले. पण व्यापारी काही कमी स्मार्ट नव्हता, त्याने या पोलिस अधिकाऱ्याची चक्क कॉलरच धरली. त्यामुळे संतापलेल्या स्मार्ट पोलिस अधिकाऱ्याने आपल्या सव्हिर्स रिव्हॉल्वरलाच हात घातला.
त्यामुळे व्यापाऱ्याने समोर असलेली बियरची बाटलीच त्या पोलिसवाल्याच्या डोक्यावर फोडली. आपल्या अधिकाऱ्याची आणि पोलिस खात्याची आणखी अब्रू जाऊ नये म्हणून पोलिसांनी सावंत यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे त्यांना ३२ टाके घालावे लागले. या घटनेची नोंद कुठेच नाही. अशा घटनांमधील जखमींवर पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याशिवाय हॉस्पिटल उपचार करीत नाहीत. पण ही स्पेशल केस असल्यामुळे असेच 'अनौपचारिक' उपचार करण्यात आले. व्यापारी व पोलिस दोघांनीही एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार न करण्याचा स्मार्टपणा दाखविला. त्यामुळे या घटनेतले पोलिस, गुन्हेगार हे सगळेच आमजनतेपेक्षाही स्मार्ट आहेत हे सिद्ध झाले आहे.
दरम्यान आणखी एक माहिती अशी आहे की, हे दिलीप सावंत नावाचे पोलिस अधिकारी दहशतवादविरोधी पथकाच्या उपायुक्तांचे बंधू आहेत. त्यामुळे सर्वच पोलिस दल हे स्मार्ट आहे आणि त्यांची स्मार्टपणाच्या बाबतीत गुन्हेगारांशी मैत्रीपूर्ण स्पर्धा चालू आहे, असे दिसते. मुंबईत गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस का वाढत आहे आणि पत्रकाराच्या हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याचीच चौकशी का चालू आहे याचे उत्तर पोलिसांच्या या 'स्मार्टपणा'मध्येच दडले आहे असे दिसते
No comments:
Post a Comment