रामदेवांचा रामबाण
बाबा रामदेव यांनी भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत उपोषणाची घोषणा केल्यापासून त्यांची मनधरणी करण्यासाठी केंद्र सरकारची जी काही त्रेधातिरपीट उडालेली आहे, ती पाहिल्यास नैतिकतेचे बळ किती असू शकते व त्यातून भल्या भल्यांची भंबेरी कशी उडते ते देशाला दिसून आले. काहीही करून रामदेवांना थोपवायचे यासाठी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जंग जंग पछाडले. बाबा रामदेव यांनी पुकारलेले हे देशव्यापी आंदोलन भ्रष्टाचाराविरोधी जरी असले, तरी गेल्या काही महिन्यांत जनतेसमोर आलेले संपुआ सरकारमधील अब्जावधीचे घोटाळे लक्षात घेता, हे घोंगावते वादळ आपल्यावरच येऊन आदळेल हे नेत्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बाबांना थांबवा असे फर्मान सुटले आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांची रांग लागली. देशामध्ये मातलेल्या भ्रष्टाचाराचे पाणी आता गळ्यावरून वाहू लागल्याने मूल्यविवेक मानणार्या जनतेमध्ये विलक्षण अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेला, असंतोषाला प्रकट उद्गार देणार्या चळवळींना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बुद्धिवाद्यांनी याकामी घेतलेला पुढाकार, प्रसिद्धी माध्यमांचा सक्रिय सहभाग आणि तरुणाईमध्ये आजच्या घाणेरड्या राजकारणाविषयी असलेली प्रखर चीड यामुळे भ्रष्टाचारविरोधी चळवळीला धार आलेली आहे. मात्र, लोकप्रतिनिधींच्या निर्वाचनामध्ये प्रमुख भूमिका बजावणारा जो तळागाळातील बहुसंख्य समाज आहे, त्याला जागवू शकेल, त्याच्यात परिवर्तन घडवू शकेल, स्वतःच्या स्वार्थापलीकडे पाहण्याची आणि आमिषांना न बधण्याची दृष्टी त्याला प्राप्त होईल अशा प्रकारचे वातावरण अजूनही निर्माण झालेले नाही. हे वातावरण निर्माण करणे आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवणे, या भारताच्या खेडोपाडी नेणे यासाठी जी मोजकी मंडळी प्रयत्नशील आहेत, त्यामध्ये बाबा रामदेव यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. योगजागृतीचे त्यांचे कार्य तर ऐतिहासिक स्वरूपाचे आहेच, परंतु आता त्यापलीकडे जाऊन ‘भारत स्वाभिमान’च्या माध्यमातून त्यांनी देशाची ‘हे असेच चालायचे’ ही नकारात्मक मानसिकता बदलण्याच्या दिशेने अथक प्रयत्न चालविले आहेत. अर्थात या चळवळीला आता राजकीय रूप देण्याचा त्यांचा विचार असल्याने पडेल, बनेल, मतलबी मंडळीही या चळवळीत ठिकठिकाणी घुसू पाहात आहे. त्यांना कसे रोखले जाईल त्यावर या चळवळीचे यश अवलंबून असेल. स्वप्न आणि वास्तव यामध्ये अंतर पडले की भल्या भल्या चळवळी फसतात हे आजवर अनेकदा प्रत्ययास आले. महात्मा गांधींनी पाहिलेले रामराज्याचे स्वप्न कुठल्याकुठे विरून गेले. जयप्रकाश नारायणांनी हाक दिलेली संपूर्ण क्रांती येता येता कुठे गडप झाली. सामाजिक न्यायाची बात करत पुढे झालेल्या साम्यवाद्यांनीच भांडवलदारांची तळी उचलत दीनदुर्बलांवर अन्याय केला, जनतेचे राज्य आणू पाहणार्या जनता पक्षाची शकले उडाली, ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणत आशा जागवत आलेल्या भाजपाच्या कमळाखालील चिखलाने त्यालाच बरबटून टाकले... भारतीय समाजाच्या अपेक्षा जागवणारी प्रत्येक चळवळ कालांतराने मातीमोल झाली हा आजवरचा इतिहास असल्याने आजच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळींबाबतही आम जनता साशंक आहे. अण्णा हजारेंनी बुद्धिवाद्यांच्या चळवळीचे नेतृत्व स्वीकारले तेव्हा ‘इंडिया’ आणि ‘भारत’ ची सांगड घडू शकेल का अशी अपेक्षा जागली, परंतु अण्णांच्या शिडीवरून वर जाण्यासाठी भलतीच मंडळी आतुर आहेत हे थोड्याच दिवसांत कळून आले. बाबा रामदेव यांच्या आंदोलनाबाबत तरी असे होऊ नये अशी जनतेची मोठी अपेक्षा आहे. शेवटी भ्रष्टाचार हा विषय काही केवळ एखाद्या सरकारपुरता किंवा राजकीय पक्षापुरता सीमित नाही. खालपासून वरपर्यंत प्रत्येक पातळीवर, प्रत्येक क्षेत्रातया वाळवीने शिरकाव केला आहे. बाहेरून आलबेल वाटत असले तरी आतून व्यवस्था पोखरल्या जात आहेत. हे थांबवायचे आहे. रामदेवांचा ‘रामबाण’ ही तर नुसती सुरुवात आहे. फक्त या लढाईचे लक्ष्य केवळ केंद्रातील विद्यमान सरकार असून चालणार नाही. स्वच्छ करायची आहे ती संपूर्ण व्यवस्था. त्यासाठी स्वच्छ, प्रामाणिक माणसे प्रत्येक क्षेत्रात सक्रिय व्हावी लागतील. त्यांना जागावे लागेल, देश जागवावा लागेल
No comments:
Post a Comment