Total Pageviews

Friday, 3 June 2011

POLLUTED RIVERS

प्रदूषणाच्या लढाईचेही जणू व्यापारीकरण झाले आहे. ब्रrांड गिळू पाहणार्‍या या प्रदूषणाने आईचा बळी घेतला तरी आणखी किती जणांच्या आयांचा बळी गेला याची आकडेवारी आम्ही जमवत बसू. त्यांचा अहवाल करून सेमिनार गाजवू; पण आमच्या डोळ्य़ातून कदाचित एक अश्रूही टपकणार नाही. कारण आम्ही नदीला कुठे आमची आई मानतो? मध्यंतरी दोन बातम्या लागून आल्या. महाराष्ट्राच्या तब्बल 28 नद्या अतिप्रदूषित असल्याचे जाहीर झाले. त्यात उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडय़ाला भिजवत जाणारी गोदावरी आहे. खान्देशला पोहोचणारी तापी आहे. महाराष्ट्राच्या छोटय़ा - मोठय़ा प्रदेशांचे भरण पोषण करणार्‍या भीमा, गोदावरी, मुळा, मुठा, पौना, पंचगंगा, पाताळगंगा, इंद्रायणी, कोयना, कुंडलिका, काळू, कन्हान, कोलार, मिठी, गिरणा, नीरा, वैनगंगा, वर्धा, कृष्णा, पूर्णा, चंद्रभागा, वेणा, उल्हास, रंगावली आणि भातसा देखील या यादीत आहेत. या नद्या अतिप्रदूषित झाल्याचे वृत्त आमच्या मनावर किंचित देखील तरंग उठवू शकले नाही. कारण कोणताही प्रश्न आपल्याकडे चटकन लढाईचे साधन बनतो आणि अर्थात साध्य असतो पैसा.

महाराष्ट्राच्या नद्यांचे मरण आपण उघडय़ा डोळ्य़ांनी पाहत आहोत. 28 नद्या अतिप्रदूषित असताना केंद्राकडे नावे जातात ती फक्त 4 नद्यांची ! परिणामी जेथे किमान हजार कोटी रुपये मिळायला हवे होते तेथे जेमतेम 108 कोटी मिळाले. अर्थात केंद्राचा निधी आला म्हणून नदीचे मरण थांबते काय? कोटय़वधी रुपये खर्च होऊनही जिथे साक्षात गंगेला मरणाच्या वेणा सहन कराव्या लागतात, तिथे महाराष्ट्राच्या या आईबहिणींची काय कथा? विठ्ठलाशिवाय पंढरपूर, साईशिवाय शिर्डी शक्य तरी आहे काय? असेच नाते गंगेचेही काशी तथा वाराणसी या पवित्र शहरांशी आहे. काशीविश्वनाथ खुद्द विराजमान असूनही काशी ओळखली जाते ती अखंड वाहणार्‍या गंगामाईच्या पाण्यात पाय बुडवून बसलेल्या घाटामुळेच! आणि ताजी बातमी अशी की, साक्षात गंगा आता हे घाट सोडून निघाली आहे. तिने काशी सोडली आहे.

पुराणकथा असे सांगते की, भगवान शंकरासाठी गंगा अवतरली तेव्हा काशीचे पवित्र घाट सोडून कधीही जाणार नाही, असे वचन तिने दिले होते. कारण काशीत साक्षात शंकराचा वास आहे. पण आज गंगेने वचनभंग केला, तो आम्हा माणसांमुळे. गंगेची ही कहाणी वाचली की वाटते, माणूस देवापेक्षाही ताकतवर ठरला. परमेश्वराने निर्माण केलेली जीवसृष्टी विनासायास नष्ट करण्याची योजनाच त्याने बनवलेली दिसते. गंगेचा वचनभंग या योजनेतूनच निर्माण झाला. काशीच्या दाससवा मेघ घाटापासून गंगा 9 फूट दूर गेलेली आहे. राजेंद्रप्रसाद घाट, राजघाट आणि अस्सी घाटांपासून गंगामाई अनुक्रमे सात, चार आणि पाच फूट अंतर ठेवून वाहते आहे. म्हणजे या प्रत्येक घाटाची शेवटची पायरी कोरडीच आणि ती तहानलेल्या नजरेने सोडून चाललेल्या गंगेकडे बघत आहे.

गंगा वाचविण्यासाठी हाती घेतलेल्या गंगा अ‍ॅक्शन प्लॅनमधील शास्त्रज्ञ सांगतात, गंगेच्या पात्रात ठिकठिकाणी ओतली जाणारी माणसांची घाण आणि साफसफाईचा अभाव यामुळे गंगेला काशीला जोडून वाहणे कठीण झाले आणि तिने आपला प्रवाहच बदलला. शिवाय गंगेवर ठिकठिकाणी अनेक धरणे आणि बराजेस बांधले गेले. तिचे पाणी शेतीसाठी आणि अन्य कामांसाठी वळविले गेले. उदा. गंगेचे 9 टक्के पाणी भीमगौडा बराजसाठी वळविण्यात आले. याचाही परिणाम गंगेने काशी सोडण्यात झाला.

आधी म्हटले तसे आपल्याकडे कोणत्याही प्रश्नाचा आणि तो सोडविण्यासाठी हाती घेतल्या जाणार्‍या योजनेचा धंदाच होऊन बसतो. गंगा वाचवा. ही हाक नक्कीच दांभिक नव्हती. पण या हाकेला ओ देत जे धावले ते या हाकेशी इमान राखू शकले नाहीत. मग त्यात एनजीओवाले असू शकतात आणि केंद्र-राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारीदेखील. गंगा वाचविण्यासाठी आजवर किती रक्कम खर्च झाली असेल? तब्बल 36 हजार 448! आणि एवढा प्रचंड खर्च करूनही गंगेचे पवित्र तीर्थ म्हणजे अनेक विषांचे कॉकटेल बनले आहे. त्यात काय नाही? वाराणसीचे मलमूत्र विसजर्न आहे, रोजचा साचणारा कचरा आहे, रोज बाहेर पडणारी घाण आहे, उद्योग धंद्याचे प्रदूषित पाणीही जणू गंगेत पवित्र होते. माणसांचे पाप धुताधुता गंगेचे आयुष्य धोक्यात आले. तिलाही तर जगण्याचा हक्क आणि विचार असू शकतो. म्हणूनच काशीपासून, काशीच्या घाटांपासून दूर राहिलेले बरे, असा विचार तिने केला असावा. आता गंगा काशी सोडून निघाली आहे. तिला रोखणारी हाक द्यावी, अशी ताकद कुणात आहे? खुद्द काशीविश्वनाथही आपल्या तहानलेल्या घाटांकडे आणि दूर निघालेल्या गंगेकडे हताशपणे बघत असावेत.

टोच्या र्‍

आपले पाणी आता तीर्थ राहिलेले नाही, हेदेखील तिला कळले असणार. आज गंगेचे पाणी जिवंतपणी तोंडात घेण्याची सोय नाही. बरे झाले मेल्यानंतर गंगेचे पाणी तोंडात टाकण्याची परंपरा आपण निर्माण केली

No comments:

Post a Comment