Total Pageviews

Wednesday, 1 June 2011

POLICE AUTROCITIES IN KUDUWADI

ARTICLE IN LOKSATTA
अरुण करमरकर, बुधवार, १ जून २०११
sahavedana@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कुर्डुवाडी गावापासून चार किलोमीटर अंतरावर काळूराम शिंदे नावाच्या पारधी व्यक्तीच्या शेतातच ही वस्ती आहे. शिंदे कुटुंबाच्या भावकीतलेच सुमारे ३५ पारधी बांधव येथे राहतात. या वस्तीवरच बुधवार, ४ मे रोजी पोलिसांचे पथक चालून आले. तब्बल १५ गाडय़ा भरून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीतून उतरताच वस्तीवरील दिसेल त्याला झोडपायलाच सुरुवात केली. दुपारच्या वेळेला वस्तीवर स्वाभाविकच प्रामुख्याने स्त्रिया आणि लहान मुलेच होती. त्यात चार-पाच जण अपंगही होते. पण कशाचाही मुलाहिजा न बाळगता पोलिसांच्या लाठय़ा बरसत होत्या. वस्तीवर एकच आकांत माजला. कशासाठी ही मारहाण चालू हेही कळत नव्हते की कुणी सांगत नव्हते. त्याच गदारोळात ती भीषण घटना घडली..
गेल्या आठवडय़ात कुर्डूवाडीलगतच्या पारधी वस्तीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या छाप्याचे वर्णन वाचले तर ही पोलिसी कारवाई होती की गुंडांच्या टोळीने केलेला रानटी हल्ला होता असा प्रश्न निर्माण होतो. या हल्ल्याप्रसंगी वस्तीवर उडालेल्या धावपळीत तिथे असलेल्या एकमेव खोपटाने पेट घेतला आणि त्यात भाजलेल्या सहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला अविचाराने केलेली बेदरकार पोलीस कारवाईच जबाबदार आहे असे म्हणणे भाग आहे. म्हणजे एखाद्या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी पोलिसांनी छापा टाकायचाच नाही का? तपासासाठी आवश्यक तो कठोरपणा धारणच करायचा नाही का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कुर्डूवाडीच्या प्रकाराची सविस्तर पाश्र्वभूमी ध्यानात घेतली पाहिजे.
कुर्डुवाडी गावापासून चार किलोमीटर अंतरावर काळूराम शिंदे नावाच्या पारधी व्यक्तीच्या शेतातच ही वस्ती आहे. सुमारे चार एकरचे हे शेत आसपास पसरलेल्या विस्तीर्ण माळरानावर, सपाटीवरच आहे. शिंदे कुटुंबाच्या भावकीतलेच सुमारे ३५ पारधी बांधव येथे राहतात. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या साह्य़ाने याच जागेत त्यांचे अधिकृत आणि स्थायी पुनर्वसन व्हावे यासाठी सरकारदरबारी प्रयत्नही चालू आहेत. या वस्तीवरच बुधवार, ४ मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास पोलिसांचे पथक शब्दश: चालून आले. एकापाठोपाठ तब्बल १५ गाडय़ा भरून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीतून उतरताच वस्तीवरील दिसेल त्याला झोडपायलाच सुरुवात केली. दुपारच्या वेळेला वस्तीवर स्वाभाविकच प्रामुख्याने स्त्रिया आणि लहान मुलेच होती. त्यात चार-पाच जण अपंगही होते. पण कशाचाही मुलाहिजा न बाळगता पोलिसांच्या लाठय़ा बरसत होत्या. वस्तीवर एकच आकांत माजला. कशासाठी ही मारहाण चालू हेही कळत नव्हते की कुणी सांगत नव्हते. त्याच गदारोळात ती भीषण घटना घडली.
उसाच्या पाचरुटाने शाकारलेली आणि काठय़ा-कुटय़ांनीच आडोसा केलेली एक झोपडी. त्यात सहा वर्षांची प्रीती काळे ही छोकरी झोपलेली अन् बाजूलाच चूल पेटवून तिची माय काही शिजवत होती. एकदम गदारोळ उडाल्याने स्वयंपाकात गुंतलेली ती माऊलीही भेदरून उठली. धांदलीत चुलीतली ठिणगी उडाली ती सरपण म्हणून ठेवलेल्या काटक्यांवर. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हाने तापलेल्या काटक्या चटकन पेटल्या आणि उसाच्या चिपाडाचे छप्परही धडाडून पेटले. चहूबाजूंनी भडकलेल्या आगीत झोपेत असलेली प्रीती ४०-४५ टक्के भाजली. तिला कुर्डूवाडी सामान्य रुग्णालयात दाखल केले गेले, पण काही उपयोग झाला नाही. या अपमृत्यूशिवाय आणखी चार महिला पोलिसांच्या मारहाणीत जबर जखमी झाल्या आहेत. आणि एवढी जबर कारवाई करण्यामागचे कारण? या छाप्याच्या दोन-तीन दिवस आधी बार्शी-वैराग परिसरात झालेले लूटमारीचे गुन्हे! पण आश्चर्याची बाब अशी की दीड तास वस्तीवर धुडगूस घालणाऱ्या पोलीस पथकाने तेथे असलेल्या ३५ जणांपैकी एकालाही अटक करून नेले नाही! याबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेश प्रधान म्हणतात की, संशयित आरोपी पळून गेले.
कल्पना करा, ३५ जणांच्या एकत्रित वस्तीवर ७०-८० पोलिसांनी १५ वाहनांतून येऊन धाड घातली. या वस्तीचा परिसर जंगल किंवा झाडांनी वेढलेला नाही, तर सपाट, विस्तीर्ण माळरानाचा आहे. तरीही आरोपी म्हणे गुंगारा देऊन पळून गेले आणि पोलीस मात्र दीड तासपर्यंत मारझोडीचे सत्र चालवत राहिले. एवढय़ा संख्येने आलेल्या पोलिसांना वस्तीला वेढा घालून तपास करणे सहजशक्य होते. त्यातूनही कोणी पळाला असता तर दिमतीला वाहने होती- पाठलाग करून सहज पकडता आले असते. यातले काहीही न करता पोलीस निरपराध बायकामुलांवर आपल्या दंडुक्यांची खाज शमवत राहिले. एवढेच नव्हे, तर हवेत गोळीबारही केला त्यांनी. एका लहानग्या मुलीचा हकनाक बळीही गेला. या प्रकाराला पोलिसी कारवाई म्हणायचे की छटेल गुंडांनी केलेला टोळीहल्ला?
याचा अर्थ एकच- मध्ययुगीन आणि ब्रिटिशकालीन मानसिकतेतून अद्याप पोलीस यंत्रणा बाहेर पडलेली नाही. पारधी म्हणजे गुन्हेगार हे समीकरण त्यांच्या मनात इतके घट्ट रुतून बसले आहे की त्यांना माणसासारखी वागणूक देणेही आवश्यक नाही, ही भावना बाळगूनच ते तथाकथित ‘कारवाई’चा विचार करतात. पारधी समाजाच्या कपाळावर पिढय़ांपासून ठोकली गेलेली गुन्हेगारीची तप्तमुद्रा उखडून टाकण्यासाठी निकराचे प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि (मोजकेच) सरकारी अधिकारी यांनी मोठय़ा कष्टाने दोन पावले प्रगती करावी, तर अशी एखादीच पोलिसी दांडगाई होऊन सारी प्रगती कित्येक अंतर मागे रेटली जाते. सोलापूर जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील गेल्या चार-पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांच्या मागे नेटाने उभे राहून पारधी बांधवांच्या स्थिरीकरणाचे रीतसर प्रयत्न करताहेत. सुमारे आठ हजार पारध्यांच्या रीतसर सरकारी नोंदी करून त्यांना दाखले मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी पार पाडले आहे. सरकारी योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांचे स्थिरवसन करण्याची प्रक्रियाही त्यांनी सुरू केली आहे. पशूहून हीन जीवनाच्या गर्तेतून वर येऊन सन्मानाच्या मार्गावर पावले टाकण्यास पारधी बांधवांनी सुरुवातही केली. एवढेच काय, पारधी जमातीपाठोपाठ अन्य भटक्या जमातींच्या बाबतीतही हीच प्रक्रिया सुरू झालीय. पण या साऱ्याच्या परिणामी, पारधी बांधवांच्या मनात नुकतीच कुठे जन्म घेऊ लागलेली आत्मविश्वासाची, आत्मनिर्भरतेची भावना जोपासून वाढविण्याच्या कामी अन्य समाजघटकांचे- विशेषत: पोलीस यंत्रणेचेही काही कर्तव्य आहे, हे पोलिसी उच्चपदस्थांना कधी कळणार? गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या कारवाईलाही कायद्याच्या चौकटीची मर्यादा आहे.. आणि मानवतेच्या जाणिवेचे भानही आवश्यक आहे, हे पोलीस अधिकाऱ्यांना ठणकावून सांगण्याची नितांत गरज आहे.

या कारवाईबाबत पोलीस प्रमुख काय म्हणतात?
* संशयित आरोपींच्या मोबाइलचा माग ते कुर्डूच्या वस्तीवरच लपले असल्याचे दाखवतो.
* पोलीस वस्तीवर गेले असता पारधी कोयते-कुऱ्हाडी घेऊन त्यांच्या अंगावर धावून आल्याने पोलिसांना लाठय़ा चालवणे भाग पडले.
* जखमी झालेल्या महिला पोलिसी मारहाणीत जखमी झाल्या नसून त्यांनी स्वत:च आपल्या अंगावर जखमा करून घेतल्या.
* प्रीती या सहा वर्षांच्या मुलीला पारध्यांनीच आगीत फेकले. (सामान्य विवेक जागा असणारा कोणीही यावर विश्वास ठेवेल?)

No comments:

Post a Comment