Total Pageviews

Saturday 4 June 2011

OVER USE CELL PHONE CAUSES CANCER

सेलफोनचा धोका ऐक्य समूह
Saturday, June 04, 2011 AT 12:47 AM (IST)
Tags:

editorial सेलफोन-मोबाईलवर तासन्‌तास बोलणाऱ्यांना मेंदूच्या कर्करोगाच्या विकाराला बळी पडावे लागेल, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेच्या फ्रान्समध्ये झालेल्या जागतिक बैठकीत हा नवा निष्कर्ष जाहीर केला. चौदा देशातल्या 31 कर्करोग तज्ञांनी गेली चार वर्षे याबाबतचं मूलभूत संशोधन केल्यावर हा निष्कर्ष काढताना सेलफोनचे वाईट परिणामही सांगितले आहेत. सातत्यानं सेलफोनवर बोलणाऱ्यांनी सावध रहावं अन्यथा काही वर्षांनी त्यांना मेंदूच्या कर्करोगाला सामोरं जावं लागेल, असा इशारा देताना, त्याची कारणंही वैद्यकीय तज्ञांनी दिली आहेत. दिवसातून दररोज तीस मिनिटांपेक्षा जास्त सेलफोनचा वापर करणाऱ्यांना दहा वर्षांनी मेंदूच्या कर्करोगाची लागण होऊ शकेल, अशी लक्षणं या संशोधनात आढळली आहेत. अलीकडच्या काळात सेलफोन हे जलद संपर्काचं आणि अत्यावश्यक असं साधन झालं असलं तरी, त्याचा वापर योग्य त्यावेळी आणि हवा तेवढाच करण्यापेक्षा तासन्‌तास गप्पा मारण्यासाठी होतो. आपण बोलताना किती वेळ बोलतो, याचं भानही सेलफोनवर गप्पा ठोकणाऱ्यांना राहत नाही. भारतात वीस वर्षांपूर्वी सेलफोनचं युग सुरू झालं तेव्हा राजधानी दिल्लीसह काही महानगरातच ही सुविधा उपलब्ध होती. सेलफोनवर संभाषणाचे दरही प्रचंड होते. प्रति मिनिट पन्नास रुपये असा दर प्रारंभी होता. केंद्र सरकारच्या उदारमतवादी धोरणामुळं खाजगी कंपन्यांना सेलफोनचं तंत्र वापरायला परवानगी मिळाली. अनेक मोठ्या कंपन्या सेलफोनच्या व्यवसायात उतरल्या. काही वर्षातच या कंपन्यांनी देशातल्या सर्व राज्यात आपल्या संपर्क यंत्रणेचं जाळं विणलं. सेलफोनच्या वापराचे दर अत्यंत कमी झाले. सुरुवातीच्या काळात सेलफोनच्या जोडणीसाठी या कंपन्यांनी 500 हजार रुपये उकळून ग्राहकांची लूट केली. संभाषणाचा दरही प्रति मिनिट तीन ते पाच रूपये असा होता. पण परवानेधारकांची संख्या वाढताच, हे दर कमी झाले. बघता बघता मोबाईलच्या संभाषणाचे दर प्रति मिनिट एक रुपयापर्यंत खाली आले. मोबाईल वापरणं हे काही वर्षांपूर्वी प्रतिष्ठेचं लक्षण होतं. आता मोबाईल वापरणं ही काही अपूर्वाईची बाब राहिली नाही. 110 कोटी लोकसंख्येच्या भारतात दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्या कुटुंबांना वगळता बाकी सर्वांच्याकडं आणि घरोघर सेलफोनचे संच आहेत. देशात सेलफोन धारकांची संख्या 70 कोटीच्यावर गेली. सेलफोन हा अत्यावश्यक संपर्कासाठी आहे, याचा विसर बहुतांश सेलफोनधारकांना केव्हाच पडला. सेलफोन केव्हा वापरायचा आणि केव्हा वापरायचा नाही, यालाही काही धरबंध राहिलेला नाही. सेलफोनच्या संचांची किंमतही 800 ते 1000 रुपयांपर्यंत कमी झाल्याने सामान्य आणि गरीब माणसांनाही सेलफोन घेणं परवडतं. त्याच्या जोडणीसाठी काही पैसेही लागत नाहीत. त्यामुळंच सेलफोन वापरणं हे आता भारतीयांना सहज शक्य झालं आहे. दुर्गम भागापर्यंत मोबाईल टॉवर्सचं जाळं उभारलं गेल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातही मोबाईलद्वारे आपणाला हव्या त्या व्यक्तीशी क्षणार्धात संपर्क साधता येतो. दूरसंचार माध्यमानं घडवलेली ही संपर्क क्रांती अपूर्व असली तरी, आता ती मानवी आरोग्यालाच घातक ठरते आहे, या गंभीर बाबीची जाणीव सेलफोन वापरणाऱ्या बहुतांश लोकांना नाही. सेलफोनची गुलामगिरी
परदेशात आपल्या आधी इंटरनेट, -मेल, सेलफोन या संपर्काच्या साधनांचा झपाट्यानं प्रसार झाला. भारतात राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर कॉम्प्युटर आणि दूरसंचार प्रणालीतलं जुनाट तंत्र बदलायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. सॅम पिट्रोदा यांच्या नेतृत्वाखाली दूरसंचार यंत्रणेत झपाट्यानं प्रगती झाली. देश संपर्काच्या क्षेत्रात जगाशी जोडला गेला. उपग्रह संदेशवहन यंत्रणेतही भारताने यश मिळवल्यानं, भारताच्या ट्रान्सस्पॉडरद्वारे दूरसंचार क्षेत्रात विविध सुविधा उपलब्ध झाल्या. देशातली बहुतांश खेडी या संदेश यंत्रणेनं जोडली गेली. कधी काळी ट्रंककॉल केल्यावर पन्नास किलोमीटर दूरच्या गावात आठ-दहा तासांनी तो कॉल लागत असे, ही बाब इतिहासजमा झाली. टेलिफोन खात्याच्या जुन्या तार यंत्रणेचं संपर्काचं महत्व इतिहासजमा झालं. नव्या पिढीला तार नावाची यंत्रणा अस्तित्वात होती, हेही माहिती नाही. पुढं सेलफोनच्या संपर्क क्रांतीमुळं लॅंडलाईन फोनचं महत्वही कमी झालं. लॅंडलाईन धारकांची संख्याही घटत गेली. टेलिफोन प्राधिकरणाच्या स्थापनेमुळं सेलफोनचे जाळे विणणाऱ्या खाजगी कंपन्यांवरही नियंत्रणे आली. ग्राहकांची लूट थांबली. स्पर्धेमुळं खाजगी कंपन्यांनी कमी वेळात जास्त बोलायची सुविधा उपलब्ध करून दिली. उपग्रह वाहिन्यांवरून आणि जाहिरातींद्वारे सेलफोनवर जास्तीत जास्त बोला, अशी मानसिकता वाढवायसाठी ग्राहकांवर मोहिनी घातली गेली. परिणामी सेलफोनचा वापर अमर्याद वाढला. अगदी शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनीपर्यंत सेलफोन आले. सेलफोनवर खूप बोलायचंच असतं आणि वाट्टेेल ते बोललं तरी चालतं, असा समज बळावला. आपल्या मुलांना आपण सेलफोन कशासाठी घेऊन देतो आहोत, याचा विचार पालकांनीही केला नाही. शाळकरी, महाविद्यालयीन, युवक-युवतीही सेलफोनचा वापर करताना, वेळेच्या मर्यादा फारशा पाळत नाहीत. मोटारसायकल, मोटर चालवताना सेलफोन वापरण्यावर कायदेशीर बंदी असली तरीही, ती सहसा कुणी पाळत नाही. मान वाकडी करुन मोटारसायकल चालवणारे आणि त्यातलेच काही अवधान सुटून रस्त्यावर आपटणारे मोटारसायकलस्वार दिसतातच! सेलफोनवर बोलण्याच्या नादात मोटारीवरचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याच्या घटनाही देशात शेकडोेंनी घडलेल्या आहेत. सेलफोनवर कमीत कमी बोलावं, असं भारतीय सेलफोन धारकांना वाटत नाही. उलट रस्त्यानं जातानाही सेलफोनवर गप्पा मारत चालणाऱ्या युवक, युवती दिसतात. सेलफोन हे साधन आपल्या उपयोगाचं आहे आणि त्याचा वापर योग्य त्या वेळीच, हवा तेवढाच करायला हवा, याचं भान नव्या पिढीला आणि त्यांना सेलफोन घेऊन देणाऱ्या पालकांनाही राहिलेले नसल्यानं, सेलफोनचा गैरवापर करणाऱ्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे. सेलफोनवरनं धमक्या देणं, अश्लिल एसएमएस क्लिप काढणं, त्या पाठवणं, असे विकृत चाळेही खूप वाढले. सायबर गुन्हेगारीबरोबर सेलफोन गुन्हेगारीचं प्रमाणही वाढतं आहे. मुंबई, दिल्ली, बंगलोर, कोलकाता या महानगरांसह रस्त्यावरून चालताना सेलफोनवर बोलत राहिल्यानं झालेल्या अपघातात आतापर्यंत हजारो युवक, युवतींचे बळीही गेले आहेत. महानगरी मुंबईत तर सेलफोनवर बोलत रेल्वेचे रुळ ओलांडताना दर महिन्याला दहा-पंधरा युवक-युवतींचे बळी जातात. आपल्यासाठी सेलफोन आहे, सेलफोनसाठी आपण नाही, याचं भान भारतीय सेलफोन ग्राहकांना राहिलेले नाही. आता जागतिक आरोग्य संघटनेनं सेलफोनवर सतत बोलण्यानं मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असल्याच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेऊन भारतीयांनी सावध व्हावं, सेलफोनची गुलामगिरी सोडावी, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आणखी काही वर्षांनी भारतात सेलफोन अति वापरल्यानं कर्करुग्णांची संख्या वाढेल, हे नक्की!

No comments:

Post a Comment