Total Pageviews

Tuesday 14 June 2011

KILLING GIRL CHILD

परळीतील स्त्रीभ्रूण हत्येमागची संघटित गुन्हेगारी जयंत महाजन Tuesday, June 14, गेल्या आठवड्यात परळी शहर आणि परिसरात दहा-बारा स्त्रीभ्रूण मृत अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. आठ महिन्यांपूर्वी सातारा येथील "लेक लाडकी अभियाना'च्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी परळीत स्टिंग ऑपरेशन करून एका सोनोग्राफी सेंटरचा आणि गर्भपात केंद्राचा पर्दाफाश केला होता; तसेच महसूल, पोलिस आणि आरोग्य खात्याच्या वरिष्ठांकडेही तक्रारी केल्या. त्यानंतर संबंधित सोनोग्राफी सेंटरला सील लावण्यात आले. तीन डॉक्‍टरांसह काही जणांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची फिर्याद दाखल करण्यात आली. प्रकरण न्यायालयात गेले. मात्र आरोग्य खात्याने या प्रकरणात गुंतलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्‍टरवर आठ महिने उलटूनही निलंबनाची कारवाई केलेली नाही. "लेक लाडकी अभियाना'च्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी सांगितले, ""राज्यात 32 ठिकाणी आम्ही या प्रकारचे स्टिंग ऑपरेशन केलेले आहे; मात्र परळीमध्ये सर्वांत स्वस्त 500 रुपयांमध्ये सोनोग्राफी झाली. आम्ही सोबत नेलेल्या पेशंटची सोनोग्राफी झाल्यानंतर परळी वैद्यनाथाला पेढे वाटा, अशा शब्दांत मुलगाच होणार असल्याचे सांगण्यात आले. त्या दिवशी त्या दवाखान्यात औरंगाबाद, जालना, वाशीम, परभणी, पंढरपूर भागातील 90 प्रकरणे सोनोग्राफीसाठी आली होती. परळीतील दहशतीमुळे आम्ही नांदेडला जाऊन बीडच्या पत्रकारांना फॅक्‍सवर सर्व माहिती दिली.''
स्टेट हेल्थ सिस्टिम रिसोर्सेस सेंटर या राज्य शासनाच्या केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात 2009च्या आकडेवारीनुसार शून्य ते सहा वयोगटाच्या एक हजार मुलांमागे मुलींची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे : शिरूर कासार (779), धारूर (789), गेवराई (807), पाटोदा (826), माजलगाव (837), आष्टी (842), केज (843), वडवणी (853), परळी (865), अंबाजोगाई (880), बीड तालुका (895). यामध्ये तालुक्‍यांची शहरे नाहीत आणि बीड शहराचाही समावेश नाही. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अकरा वर्षांत फक्त पाच सेंटरवर कारवाई झालेली आहे. त्याचाच हा परिणाम असावा. 2011 च्या जनगणनेतील बीड जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील एक हजार मुलांमागे मुलींची संख्या 801 आहे. 2001 मध्ये ही संख्या 894 होती. दहा वर्षांत 93 ची घट ही बीड जिल्ह्यासाठी धोक्‍याची घंटा आहे. मराठवाड्यात 2001 मध्ये शून्य ते सहा वयोगटातील एक हजार मुलांमागे मुलींची संख्या 909 होती, ती 2011 च्या जनगणनेनुसार 856 एवढी कमी झालेली आहे. अन्य जिल्ह्यांत शून्य ते सहा वयोगटातील दरहजारी मुलींचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे - औरंगाबाद (848), लातूर (872), उस्मानाबाद (853), जालना (847), परभणी (866), हिंगोली (868), नांदेड (897). राज्याची सरासरी 883 अशी आहे.
मराठवाड्यात केवळ परळीच नव्हे, तर नांदेड, लातूर आणि औरंगाबाद येथेही गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या करणारी केंद्रे जोरात सुरू असल्याचे वैद्यकीय वर्तुळात बोलले जाते. उच्चशिक्षित, प्रतिष्ठित आणि संपन्न कुटुंबांमध्ये स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण वाढले असल्याचे जबाबदार वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पहिली मुलगी असेल तर दुसऱ्या वेळी गर्भलिंग निदानासाठी 60 टक्के, तर दोन मुली असतील तर 80 टक्के दांपत्ये या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात, असे आढळून आले आहे. कायद्यामध्ये 10 हजार ते 50 हजार रुपये दंड आणि तीन वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद असतानाही आरोग्य आणि पोलिस यंत्रणेशी हातमिळवणी करून काही डॉक्‍टरांनी वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासत स्त्रीभ्रूणहत्येची संघटित गुन्हेगारी चालविलेली आहे.
बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही स्त्रीभ्रूण हत्येत गुंतलेल्या काही डॉक्‍टरांना कठोर शासन व्हावे, यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेसच्या श्रीमती रजनी पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रीमती उषा दराडे यांनी या प्रकरणी आवाज उठवला आहे. परळीच्या आमदार श्रीमती पंकजा पालवे यांनी विधिमंडळात हे प्रकरण धसास लावले पाहिजे, अशी लोकभावना आहे. स्त्रीभ्रूणहत्येचे दुष्परिणाम बीड जिल्ह्यात जाणवायला लागले आहेत. त्यामुळे केवळ दिखाऊ कामगिरी करून भागणार नाही. संघटितपणे स्त्रीभ्रूण हत्येचे पातक करणाऱ्या दहा-वीस डॉक्‍टरांना, तसेच मातापित्यांनाही सश्रम कारावासाची शिक्षा झाली, तरच या प्रकारांना आळा बसेल. प्रतिक्रियाOn 14/06/2011 06:43 PM Indrajit Kshirsagar said: अशी चाचणी करणाऱ्या डॉक्टरांची डिग्री रद्द केली पाहिजे. ह्या लोकांवर डॉक्टर आणि चाचणी करून घेणारे लोक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा. स्त्री भरून हत्या करणारे लोक थोडा डोकं लावा आणि विचार करा त्या feutus च्या जागी जर तुम्ही असता तर तुम्हाला आवडला असता का ते आणि तुम्ही ज्या आईच्या पोटी जन्म घेतला ती तर स्त्रीच होती हि बाब मन विषण्ण करणारी आहे.मी १९६९-७४ या कालावधीत तेथे नोकरीनिमित्त होतो.त्या काळात परळीत जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्या एवढे डॉक्टर होते.रजेसाठी खोटे वैद्द्किय दाखले देण्यास ते धजावत नसत.
On 14/06/2011 09:47 AM D.P.Godbole said:
On 14/06/2011 10:21 AM Manjiri Khadkikar said:
 

No comments:

Post a Comment