रामदेव बाबांचा योग दुर्धर मानल्या जाणाऱ्या रोगांवर हमखास इलाज ठरत असल्याचा दावा असला, तरी दुस-याला मिळालेले महत्त्व वा प्रसिद्धी यामुळे होणाऱ्या पोटदुखीवर त्याची मात्रा चालत नसावी! त्यामुळेच लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या उपोषणात सहभागी होऊन दुय्यम स्थान स्वीकारण्या-ऐवजी रामदेव यांनी वेगळी चूल मांडली. उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचारासाठी लोकपालाची स्वायत्त यंत्रणा अस्तित्वात आणणे हा मुद्दा अण्णांनी उचलल्यामुळे, काळा पैसा हा मुद्दा रामदेव बाबांनी आपलासा केला. त्यासाठी त्यांनी उपोषणाची केलेली घोषणा प्रत्यक्षात येवो अगर न येवो, सरकारला आपणही नाचवू शकतो, हे दाखविण्याचा त्यांचा उद्देश साध्य झाला आहे. हे दोन्ही मुद्दे सामान्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचे. शिवाय दोन्हीसाठी केवळ राजकीय सत्ताधाऱ्यांकडे (किंवा नि:पक्षपातीपणाचा आव आणण्यासाठी सर्वच 'राजकारण्यां'कडे) बोट दाखवून, लोकांसमोर एकमताचा 'खलनायक' उभे करणेही सोपे. स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल स्पर्धा, आदर्श ही घोटाळ्यांची माध्यमांत गाजणारी आयती प्रतिके हाती लागल्यामुळे, स्वयंसेवी संघटनांचे काम अधिकच सोपे झाले. अण्णा हजारे यांना देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरकारनेही लोकभावनेपुढे झुकण्याचा धोरणीपणा दाखवीत त्यांची मागणी मान्य केली. मात्र ही मागणी प्रामुख्याने विधेयकाचा मसुदा ठरविण्याच्या प्रक्रियेतील सहभागाची असल्यामुळे, ठोक होती आणि ती मान्य करण्यात घटनात्मक मूल्यांशी प्रतारणाही नव्हती. परंतु बाबा रामदेव यांच्या मागण्या परदेशातून 'काळा पैसा' परत आणावा, देशातील काळ्या पैशाला आळा घालावा, या सबगोलंकारी स्वरूपाच्या आहेत. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द कराव्यात तसेच भ्रष्टाचाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, यासारख्या मागण्या ठोस असल्या तरी त्यामागील अर्थशास्त्रीय वा न्यायशास्त्रीय पाया ढिसाळ आहे. बाबा रामदेव योगातील तज्ज्ञ असतीलही, पण देशाच्या अर्थव्यवस्थेला काळ्या पैशाच्या झालेल्या कॅन्सरवर उपाय सुचविण्यासाठी त्यांच्या या तज्ज्ञतेवर विसंबून राहण्याइतका देशात अभ्यासकांचा अजून दुष्काळ झालेला नाही. दुदैैर्वाने देशातील सर्वच सत्ताधाऱ्यांचे वर्तन आणि पक्षांची कार्यपद्धती यामुळे लोकांमध्ये राजकीय प्रक्रियेविषयीच असलेल्या नाराजीचे रूपांतर तिरस्कारात करण्याचे बिगरराजकीय संघटना व व्यक्तींचे प्रयत्न असून, या पोकळीत बाबा रामदेव व तत्सम पुराणमतवादी प्रवेश करू पाहत आहेत. अण्णा हजारे व बाबा रामदेव यांच्यात मूलभूत फरक आहे. समाजासाठी आपले आयुष्य वाहण्याच्या प्रेरणेतून अण्णांनी काम सुरू केले. त्यांची कुवत व समजशक्ती यानुसार ते त्यांना योग्य वाटते ते काम करीत आले आहेत. विवेकानंद व महात्मा गांधी यांच्या प्रभावाचा दाखला ते देतात. आजवर त्यांनी सांप्रदायिक विचारसरणीची भलामण जाणीवपूर्वक केल्याचेही दिसलेले नाही. त्यांचे राहणीमान साधे आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील भ्रष्ट व माजोरड्या पुढाऱ्यांनी त्यांच्या बदनामीचे प्रयत्न करूनही लोकांमध्ये त्यांची प्रतिमा सत्प्रवृत्त अशीच राहिली आहे. उलट बाबा रामदेव हा आता एक पंथ झाला आहे. योगशिक्षणाचा प्रसार करून, 'आरोग्य स्वावलंबना'ची दिशा सर्वसामान्यांना दाखविण्याचे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मात्र केवळ समाजकार्य यापुरतीच ते आता मर्यादित राहिलेले नाही. योग आणि ते बनवित असलेली 'औषधे' यांचा अब्जावधी रुपयांचा बहुराष्ट्रीय उद्योग झाला आहे. खुद्द रामदेव यांनी या उद्योगाची उलाढाल १५०० कोटींच्या घरात असल्याचे सांगितले असले, तरी काळ्या पैशाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या या बाबांच्या शब्दावर डोळे मिटून विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. त्यामुळेच हा उद्योग १५ हजार कोटींच्या घरात असल्याची चर्चा होते! योगशिक्षणाच्या प्रसारासाठी रामदेव यांनी केलेली संघटनात्मक आखणीही गावोगावांत त्यांचा 'पंथ' पोचविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच केली आहे. याला टीव्हीवरील त्यांच्या योगशिक्षण कार्यक्रमांची जोड दिली जात आहे. आज रामदेव यांचे मन वळवण्यासाठी केंदातील ज्येष्ठ मंत्री पायघड्या पसरीत आहेत, ते त्यांच्या संघटनात्मक बांधणीची ताकद ओळखूनच. अशा पंथांत गुरूच्या शब्दाचा विनाविचार स्वीकार करण्याची मानसिकता प्रथमपासूनच रुजविली जात असते. भारतीय लोकशाही गेल्या साठ वर्षांत बऱ्यापैकी प्रगल्भ झाली आहे. अशा बाबा-गुरूंना त्यांची स्वतंत्रपणे राजकीय ताकद निर्माण करण्याचे धाडस अद्याप झालेले नाही. उलट सर्वच पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांना आशीर्वाद देत ते आपले प्रस्थ वाढवीत असतात. त्यामुळे बाबा रामदेव राजकारणात थेट येण्याचा धोका पत्करतीलच असे नाही, पण शक्तिप्रदर्शन करून स्वत:च्या साम्राज्याकडे वाकडी नजर करण्याची हिंमत राजकीय सत्ताधाऱ्यांना होऊ नये एवढी काळजी घेतील! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबा रामदेव यांच्या आंदोलनात घुसखोरी करण्याचा चालविलेला प्रयत्न आणि सत्तेसाठी उतावीळ झालेल्या भारतीय जनता पक्षाचे रामदेवपूजन पाहता, देशात त्यांना अपेक्षित असलेल्या भगव्या क्रांतीसाठी अवतारी पुरुष अखेर सापडलेला दिसतो! बाबा रामदेव यांच्यासारख्या पुराणमतवाद्यांचा प्रभाव वाढल्यास, देशातील उदारमतवादी, आधुनिक लोकशाहीवरही 'राम' म्हणण्याची पाळी येईल
No comments:
Post a Comment