Total Pageviews

Friday, 26 July 2019

भारताच्या तरुण, मिसरूडही न फुटलेल्या, 20 ते 35 वर्षांच्या 527 शूर वीरांनी अतिशय प्रतिकूल वातावरणात, हाती असलेल्या शस्त्रांनी लढा देत आपले बलिदान देताना, कारगिलमधल्या 14 ते 17500 फुटांवरील पोस्टवर सफलतापूर्वक कब्जा केला आणि पाक सैनिकांना संपूर्णतः हाकलून लावले होते. कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) -


कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)  
भारताच्या तरुण, मिसरूडही न फुटलेल्या, 20 ते 35 वर्षांच्या 527 शूर वीरांनी अतिशय प्रतिकूल वातावरणात, हाती असलेल्या शस्त्रांनी लढा देत आपले बलिदान देताना, कारगिलमधल्या 14 ते 17500 फुटांवरील पोस्टवर सफलतापूर्वक कब्जा केला आणि पाक सैनिकांना संपूर्णतः हाकलून लावले होते. 
भारतासाठी हा एक ऐतिहासिक विजय होता. पॉईंट 5140 वरील विजयानंतर तत्कालीन सेनाध्यक्ष जनरल व्ही. पी. मलिक यांनी विक्रम बत्रा यांना स्वतः फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि विचारले, की तुला काय हवंय? यावर विक्रम बात्रा उत्तरला, ‘सर, ये दिल मांगे मोअर!आणि हीच त्याची व्हिक्टरी साईन होती. त्याचे हे उत्तर भारताच्या तरुणाईने डोक्यावर घेतले होते.
17 हजार फूट उंचीवर केलेल्या या ऑपरेशनमध्ये एकही जीवहानी न होता, त्या शिखरावर घुसखोरी केलेल्या पाकड्यांना मिशीसुद्धा न फुटलेल्या, या कोवळ्या वीरांनी धूळ चारली. या शिखरावर कब्जा केल्यावर पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्याला तोंड देण्यासाठी विक्रम बत्रा व संजीव जमवालला काही दिवस पॉईंट 5140 वर थांबणे जरुरी होते. तेथे 26 जूनपर्यंत थांबल्यानंतर त्यांची कंपनी पलटण मुख्यालयात रेस्ट अँड रिफिटसाठी आली. त्यानंतर त्यांना पॉईंट 4875 वरील हल्ल्याच्या मदतीला जावे लागले. 5 जुलैला रात्री एक वाजता 13 जॅक अलायनी पॉईंट 4875 हस्तगत केले; पण त्यांच्यावर उत्तरेकडील लांबलचक पाकी पोस्टवरून तुफान फायर होत असल्यामुळे तेथे पाय रोवणे मुश्कील होते. 4875 वर पूर्ण कब्जा करण्यासाठी उत्तरेकडील त्या पाकिस्तानी पोस्टवर कब्जा करणे अत्यावश्यक होते. 6 जुलैपर्यंत तो होऊ शकला नाही. त्यामुळे विक्रम बत्राला त्यांच्या मदतीला पाठवण्याचा निर्णय कमांडिंग ऑफिसरला घ्यावा लागला. 
कॅप्टन विक्रम व त्याची कंपनी तेथे आल्यामुळे पॉईंट 4875 वरील सैनिकांमध्ये नवीन स्फुरण निर्माण झाले. 5140 वरील त्यांच्या पराक्रमाच्या गाथा तोपर्यंत सर्वदूर पसरल्या होत्या. रेडिओ इंटरसेप्शनच्या माध्यमातून पाक चौकीवरील सैनिकांना विक्रम तेथे पोहोचल्याची खबर मिळाली. शेर शाहा, उपर तो आ गये हो, पर वापस नाही जाने देंगे। इन्शाल्हा, उपरही भेज देंगे।, असा संदेश त्यांनी भारतीय पोस्टला दिला. निडर विक्रमनी उत्तर दिले, ‘ठीक समज लो. उपर तो तुम्हे और तुम्हारे साथीयोंको जाना होगा।
6-7 जुलैच्या रात्री विक्रमनी लेजवर हल्ल्यासाठी जाण्याची तयारी केली. प्रचंड थकवा आणि तापामुळे त्याचे डोळे लाल झाले होते. त्याच्या त्या अवस्थेमुळे कमांडिंग ऑफिसरनी त्याला जाण्याची परवानगी दिली नाही; पण विक्रमनी हट्टच धरला. त्याचे वर्तन पाहून स्फुरण पावलेल्या अनेक सैनिकांनी त्याच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. लेजकडे जाताना विक्रमची देहबोली अचानक बदलली. थकलेल्या, आजारी सैनिकाऐवजी एक नवाच, ‘करो या मरोया विचारांनी ग्रासलेला नवा विक्रम त्याच्या कंपनीला लीड करत होता. मश्कोह खोर्‍यातील अती थंड वारे आगेकूच करणार्‍या त्या सैनिकांच्या हाडात खिळत होते. त्यावेळीच बर्फवृष्टी सुरू झाली. आपल्या थकलेल्या सैनिकांमध्ये जोश भरत विक्रम एखाद्या हिमबिबट्यासारखा चपळाईने लेजकडे सरकत असतानाच त्याला मशिनगनची रॅटरॅट ऐकू आली. त्यांच्या समोर जाण्यावर मशिनगन फायरनी अटकाव केला. विक्रमनी तेथील खडकांच्या मागून लपतछपत जात त्या मशिनगनवर हॅन्ड ग्रेनेड फेकून तिला बरबाद केले. त्यानंतर आपल्या एके 47 रायफलनी फायर करत विक्रम शत्रू जवळ पोहोचला. 
इतक्या जवळ रायफल फायर करणे अशक्य असल्यामुळे विक्रमनी रायफलवर संगीन (बायोनेट)चढवून तेथील पाकड्यांवर तडक हल्ला चढवला. एका पाक सैनिकाला त्यांनी संगिनीने भोकसून ठार मारले. त्याच्यावर मागून चाल करून आलेल्या दुसर्‍याला धोबीपछाड मारून खाली पडून त्यालाही भोकसलं आणि  तो लेजवर पोहोचला. तेथील मशिनगन पोस्टमध्ये दोन पाकी त्यांच्या गनला फीड करत होते. एक गन चालवत होता आणि एक यंग ऑफिसर त्यांना सुपरवाईझ करत होता. विक्रमनी त्या चौघांनाही गोळ्या घातल्या खर्‍या; पण तोही शत्रूच्या गोळ्यांनी जखमी झाला.
तिकडे लेफ्टनंट अनुज नायर लेजवरील इतर बंकर्सचा सफाया करत होता. जखमी विक्रम मशिनगन पोस्टमधून बाहेर आला असता त्याने स्फोटात पाय तुटलेल्या लेफ्टनंट नवीन अमबरूला पाहिले आणि तो त्याच्या मदतीला जाऊ लागला. त्याच्याबरोबर असलेल्या सुभेदारांनी तुम्ही जखमी आहेत, तुम्ही जाऊ नका, मी जातोअसे म्हटले असता कॅप्टन विक्रमनी त्याला हुकूम दिला, ‘तू बालबच्चेदार है, हट जा पीछेअसे म्हणत त्यांनी अनुजला ओढत खडकामागे आणले; पण हे करत असतानाच त्याच्या छातीला शत्रूच्या गोळ्यांनी घायाळ केले आणि भारतमातेच्या या वीरसुपुत्राने त्याच जागी आपला देह ठेवला. कॅप्टन विक्रम बत्राला त्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल परमवीरचक्र (मरणोत्तर) प्रदान करण्यात आले.
कारगिलहून परत आल्यावर कॅप्टन विक्रम बत्रा आपली बालपणीची मैत्रीण डिम्पल चिमाशी लग्न करणार होता; पण त्याआधीच त्याला देवाकडे जाव लागले. त्याच्या बरसीला आपल्या मित्राबद्दल असलेल्या भावना प्रकट करताना मिस चिमा म्हणतात, ‘नॉट ए सिंगल डे, आय फेल्ट डिटॅच्ड फ्रॉम यू. आय फील सो प्राऊड व्हेन पीपल टॉक अबाऊट युवर अकम्प्लिशमेंट्स. बट अलॉन्ग विथ दॅट, देअर इज सम रिग्रेट इन द कॉर्नर ऑफ माय हार्ट. यू शुड हॅव बीन हियर; शेअरिंग, लिसनिंग टू स्टोरीज ऑफ युवर ब्रेव्ह डीड्स, ऑफ हाऊ यू आर इन्स्पिरेशन फॉर यूथ ऑफ टू डे. आय नो इन माय हार्ट दॅट वुई आर गोईंग टू मीट अगेन, इट्स जस्ट ए मॅटर ऑफ टाइम.
राजपुताना रायफल्सचा कॅप्टन विजयन्त थापर धारातीर्थी पडला, त्यावेळी केवळ 22 वर्षांचा होता. त्याच्यामुळेच भारताला टोलोलिंगवर तिरंगा फडकवता आला. त्याला त्याच्या अतुल शौर्याबद्दल महावीरचक्र (मरणोत्तर) प्रदान करण्यात आले. त्याचे वडील कर्नल विजेंद्र थापर 2016 मध्ये 16 हजार फुटांवर असलेल्या शिखरावर गेले, जेथे विजयंतनी शत्रूशी लढताना आपला देह देशार्पण केला. युद्धात डोळ्याला इजा झाल्यामुळे आपल्या उजव्या डोळ्यावर हिरव्या रंगाची कापडी झापड लावलेले कर्नल विजेंद्र थापर नेहमी इंग्लिश चलचित्र वाहिन्यांच्या चर्चांमधे दिसतात. आपल्या मुलाबद्दल बोलताना त्यांचे डोळे भरून येतात.  
राजपुताना रायफल्सचे मेजर पद्मपाणी आचार्या टायगर हिलवर लढताना धारातीर्थी पडले, त्यावेळी त्यांची पत्नी गर्भवती होती. 21 जूनला पद्मपाणी आपल्या घरच्यांबरोबर फोनवर बोलले; पण यानंतर त्यांचा आवाज कधीच आपल्या कानी पडणार नाही, याची त्यांच्या कुटुंबीयांना तिळमात्र कल्पना नव्हती. मेजर पद्मपाणी आचार्यांना महावीरचक्र या वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
शीख रेजिमेंटच्या लान्स नायक निर्मल सिंग वीर चक्र यांच्या गणवेशाच्या आधारे त्यांच्या पत्नी, जसविंदर कौर आपले दिवस काढताहेत. टायगर हिलवर निर्मल सिंगनी देशासाठी आपले प्राण द्यायला मागे-पुढे पाहिले नाही. त्यावेळी जसविंदर कौरचे लग्न होऊन केवळ पाचच वर्षे झाली होती. त्यांचा पुत्र निर्जस सिंग फक्‍त तीन वर्षांचा होता. आज तो आर्मीत लेफ्टनंट आहे. जसविंदर कौर निर्मल सिंगच्या गणवेशाला ममतेने कुरवाळत असतात.  
कारगिल युद्धाच्या सुरुवातीला  बटालिक शिखराचे रक्षण करताना मेजर मॅरिअप्पन सर्वांनन वीरचक्रला 29 मे 1999 रोजी वीरगती प्राप्त झाली. कारगिल युद्धातील हा पहिला बळी होता. त्यांना हिरो ऑफ बटालिकम्हणतात. त्याचे पार्थिव एक महिन्यापेक्षा जास्त दिवस बर्फामध्ये पडून होते. भारतीय सैनिक त्याचे पार्थिव घेण्यासाठी काही हालचाल करताच पाकिस्तान फायर करत असे आणि पाकिस्तानने त्यांचे कलेवर नेण्याचा प्रयत्न करताच भारतीय सैनिक फायर करत असत. मृत्यूनंतर 41 दिवसांनी त्यांचे पार्थिव भारताला मिळू शकले. आपल्या मुलाच्या शेवटच्या भेटीची आठवण काढताना त्यांच्या मातोश्री श्रीमती अमिथावल्ली मॅरिअप्पन अत्यंत भावूक होतात.  
18 ग्रेनेडियर्सच्या मेजर राजेश अधिकारी, महावीर चक्रचे लग्न कारगिल युद्धाच्या केवळ दहाच महिने आधी झाले होते. कारगिलला जाण्याचा आदेश मिळाल्यावर त्याला प्रचंड अभिमान वाटला आणि तो उत्साहान सळसळून गेला. आपल्या एका पत्रात त्यांनी पत्नी किरणला लिहिले की, तो परत येईल की नाही, याची खात्री देता येत नाही. किरण त्यावेळी गर्भार होती; पण तिने त्याला उत्तर पाठवले. राजेशला ते पत्र मिळाले तेव्हा तो मिशनवर जाण्याची तयारी करत होता आणि त्यांनी विचार केला, की मिशनहून परत आल्यावर आरामात पत्र वाचू, त्याची पारायण करू; मात्र त्याला ते शेवटचे पत्र वाचायची संधीच मिळाली नाही. किरण त्या पत्रात लिहिते, ‘तू परत आलास, तर मला निश्‍चितच आनंद होईल; पण तू परतला नाहीस तर मी शहीदपत्नी म्हणून अभिमानाने आयुष्याची गुजरान करेन.’ 
अशा अनेक गाथा ऐकताना डोळे पाणावतात व उर भरून येतो. भारताच्या तरुण, मिसरूडही न फुटलेल्या, 20 ते 35 वर्षांच्या 527 शुरवीरांनी अतिशय प्रतिकूल वातावरणात, हाती असलेल्या शस्त्रांनी लढा देत आपले बलिदान देताना, कारगिलमधल्या 14-17500 फुटांवरील पोस्टवर सफलतापूर्वक कब्जा केला आणि तेथे घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैनिकांना संपूर्णतः हाकलून लावले होतं. त्यांच्या या स्फूर्तिदायक स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येक 27 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण होताहेत, त्या निमित्तानं दोन्ही बाजूकडील वीरांना भावपूर्ण आदरांजली. कारण सोल्जर्स नेव्हर डाय, दे जस्ट फेड अवे..


No comments:

Post a Comment