करतारपूर कॉरिडॉरबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत झालेली सहमती, या दोन देशांत सहकार्याचे नवे पर्व सुरू करताना दोन देशांतील तणावही कमी करू शकेल, असा विश्वास करायला हरकत नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील गृहमंत्रालयाच्या अधिकार्यांत झालेली चर्चा सुखद राहिली आणि भारतातील शीख बांधवांचा, पाकिस्तानातील करतारपूर गुरुद्वारात जाण्याचा मार्ग मोकळा झाला, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल.
भारतीय पासपोर्ट असलेल्या शीख बांधवांना आता करतारपूर गुरुद्वारात जाण्यासाठी पाकिस्तानी व्हिसा घेण्याची गरज पडणार नाही, ही या चर्चेची मोठी उपलब्धी मानावी लागणार आहे. प्रकाश उत्सवाच्या काळात दररोज पाच हजार भारतीय या गुरुद्वारात जाऊ शकतील, प्रकाश उत्सवाच्या महत्त्वपूर्ण दिवसांत हा आकडा दहा हजार करण्याचा आग्रह भारतीय अधिकार्यांनी पाकिस्तानी अधिकार्यांना केला आहे, जो मान्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
करतारपूर गुरुद्वारापर्यंत जाण्यासाठी भारतातून रावी नदीवर एक पूल बांधण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. पाकिस्तानी हद्दीत हा पूल पाकिस्तानला बांधावा लागणार आहे. भारतीय अधिकार्यांच्या आग्रहामुळे या पुलाचा उत्तरार्ध आपल्या देशात बांधण्याची तयारी पाकिस्तानने दर्शवली आहे. आता वेळ कमी असल्यामुळे पाकिस्तानात बांधल्या जाणार्या या पुलासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारीही भारताने दर्शवली आहे.
आधी पाकिस्तानने असा पूल बांधण्याऐवजी बांध घालून रस्ता बांधण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, बांध घालण्यामुळे डेरा बाबा नानक (गुरुदासपूर) परिसरात पूर येण्याची तसेच यात्रेकरूंच्या जिवाला धोका पोहोचण्याची आशंका भारताने व्यक्त केली, त्यामुळे पाकिस्तानला भारताने पूर्वार्धात बांधलेल्या पुलाचा उत्तरार्ध पूर्ण करायला सहमती द्यावी लागली.
डेरा बाबा नानक ते करतारपूर कॉरिडॉरपर्यंत चौपदरी रस्ता बांधण्याचे 50 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम 31 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारताने या चर्चेत दिली आहे. या कामाला आतापर्यंत 120 कोटी रुपये खर्च आला आहे. करतारपूर कॉरिडॉरबाबतची सर्व कामे 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.
करतारपूर कॉरिडॉर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील शीख बांधवांच्या पवित्र स्थळांना जोडण्याचे काम करत आहे. यातील एक गुरुद्वारा भारतातील पंजाबमध्ये, तर दुसरा पाकिस्तानातील करतारपूर येथे आहे. भारताच्या सीमेपासून 4.7 किमी अंतरावर पाकिस्तानमध्ये करतारपूर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बैठकीत, शीख बांधवांच्या सोयीसाठी करतारपूर कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोणत्याही व्हिसाशिवाय भारतातील शीख बांधवांना या ठिकाणी येण्याची अनुमती पाकिस्तानने दिली होती. विशेष म्हणजे तोपर्यंत भारतातील शीख बांधवांना दुर्बीणमधूनच या पवित्र स्थानाचे दर्शन घ्यावे लागत होते.
1504 मध्ये शीख पंथाचे संस्थापक बाबा गुरू नानक यांनी करतारपूर येथे गुरुद्वारा उभारला होता. आपल्या शेवटच्या काळात गुरू नानक यांचे वास्तव्य याच गुरुद्वारात होते. 1539 मध्ये गुरू नानक यांच्या मृत्यूनंतर या गुरुद्वारावर हिंदू आणि शीख या दोघांनीही दावा केला. त्यामुळे या गुरुद्वारामध्ये एक भिंत उभारून त्यात गुरू नानक यांची समाधी बनवण्यात आली. पुढे 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांची रेंगाळणी झाल्यानंतर करतारपूर पाकिस्तानात गेले आणि शिखांसाठी अतिशय पवित्र अशा स्थानात जाणे त्यांना कठीण झाले.
रावी नदीच्या उजवीकडे पाकिस्तानातील शकारगढ तहसीलमध्ये करतारपूर गावात हा गुरुद्वारा आहे; तर रावी नदीच्या डावीकडे भारतात गुरुदासपूर तहसीलमध्ये डेरा बाबा नानक नावाने गुरुद्वारा बांधण्यात आला. गुरू नानक यांचे शेवटच्या काळातील वास्तव्य असणार्या करतारपूर गुरुद्वारात जाऊन दर्शन घेणे, हा शिखांच्या श्रद्धेचा तसेच आस्थेचा विषय आहे.
डेरा बाबा नानकपासून करतारपूरपर्यंत कॉरिडार बनवण्याची शीख भाविकांची जुनी मागणी होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर या मागणीला पाठिंबा दिला. 2018 मध्ये इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानात गेले असता, पंजाब सरकारमधून मंत्रिपदाचा नुकताच राजीनामा द्यावा लागलेल्या नव्जोतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख बाजवांसोबत, करतारपूर कॉरिडॉर 2019 पर्यंत शीख भाविकांसाठी खुले होईल, अशी घोषणा केली होती.
2019 मध्ये शीख धर्माचे संस्थापक बाबा गुरू नानक यांची 550 वी जयंती म्हणजे प्रकाशवर्ष आहे. त्यामुळे या निर्णयाचे शीख पंथातील लोकांसाठी अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. करतारपूर गुरुद्वारात जाऊन दर्शन करणे आता शीख बांधवांना सहजशक्य होणार आहे.
नोव्हेंबर 2018 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करतारपूर कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका पत्रपरिषदेत या निर्णयाची माहिती दिली होती. करतारपूर कॉरिडॉरचा भारतातील शिलान्यास, पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील मान गावात, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला होता.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरवाल जिल्ह्यातील एका गावात करतारपूर कॉरिडॉरचा शिलान्यास, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी पाकिस्तानने हरदीपसिंग पुरी आणि हरसिमरत कौर या दोन केंद्रीय मंत्र्यांना तसेच नवज्योतसिंग सिद्धू आणि गुरजीतसिंग औजला या पंजाब मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना आमंत्रित केले.
या कॉरिडॉरच्या उभारणीचे संपूर्ण श्रेय पूर्ण मोदी सरकारला आणि त्यांच्या मुत्सद्देगिरीला द्यावे लागणार आहे. नरेंद्र मोदी वारंवार परदेश दौर्यावर जाऊन काय करतात, असा प्रश्न विचारणार्यांना करतारपूर कॉरिडॉर हे त्याचे एक उत्तर आहे. आतापर्यंत दुर्बिणीतून ज्याचे दर्शन घ्यावे लागत होते, त्या करतारपूर गुरुद्वारात जाऊन त्याचे दर्शन घेणे, याचा शीख बांधवांना मिळणार्या आनंदाचे शब्दांत वर्णन करता येणे कठीण आहे.
भारतातील शीख बांधवांचा पाकिस्तानच्या हद्दीत सन्मानपूर्वक जाण्याचा मार्ग भारत आणि पाकिस्तान या देशांतील संयुक्त सचिव पातळीवर झालेल्या यशस्वी चर्चेतून खुला झाला आहे. करतारपूर येथे पॅसेंजर टर्मिनल उभारले जाणार आहे. ज्या ठिकाणी दोन हजार यात्रेकरूंच्या बसण्याची तसेच पार्किंगची व्यवस्था राहणार आहे.
विशेष म्हणजे करतारपूर कॉरिडॉरचा उपयोग कोणत्याही भारतविरोधी कारवायांसाठी होणार नाही, या मागणीचे डोजियर भारताने पाकिस्तानला दिले आहे. दहशतवादाबाबत भारताच्या ‘झिरो टॉलरन्स’ भूमिकेचे स्मरणही पाकिस्तानला करून देण्यात आले आहे. या कॉरिडॉरचा उपयोग भारतविरोधी कारवायांसाठी होऊ न देण्याची ग्वाहीही पाकिस्तानने दिली आहे. ही या चर्चेची सर्वात मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे या दोन देशांतील तणाव कमी होऊ शकतो.
करतारपूर कॉरिडॉरचा मार्ग खुला करून मोदी सरकारने देशातील शीख बांधवांना मौल्यवान अशी भेट दिली आहे. ज्याचे महत्त्व त्यांच्यासाठी कधीच पैशात मोजता येणार नाही. मोदी सरकारचे यासाठी अभिनंदन करावे तेवढे कमी आहे!
No comments:
Post a Comment