राष्ट्रद्रोह्यांची वकिली
vasudeo kulkarni
Wednesday, March 02, 2016 AT 11:27 AM (IST)
Tags: ag1
लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसदेवर दहशतवाद्यांनी चढवलेल्या महाभीषण हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याचे कृत्य राष्ट्रद्रोहाचे आणि अक्षम्य असल्यानेच, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. त्याने केलेला दयेचा अर्जही राष्ट्रपतींनी फेटाळून लावल्यावर, 2013 मध्ये अफजलला फाशी दिले गेले. त्याच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली तेव्हा केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेवर होते. त्या सरकारमध्ये पी. चिदंबरम तेव्हा अर्थमंत्री होते. त्या आधी 2008 ते 2012 अखेर गृहमंत्री होते. अफजलच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली, तेव्हा गृहमंत्रिपदावर असलेल्या सुशीलकुमार शिंदे, यांनी या शिक्षेचे जोरदार समर्थनही केले होते. अफजलला फाशी दिल्यावर, काश्मीर खोर्यातल्या काही दहशतवादी -फुटीरतावादी राष्ट्रद्रोही संघटनांनी हरताळ पाळून त्या घटनेचा निषेधही केला होता. पण अफजलने केलेला गुन्हा अक्षम्य असल्यानेच, सरकारने त्याच्या सहानुभूतीदारांचे ते तथाकथित आंदोलन मोडून काढले होते. अफजलला फाशी दिल्यावर चिदंबरम यांनी ब्र शब्दही काढला नव्हता. पण आता राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात खुले आम पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा आणि अफजल गुरूला देशभक्त ठरवायसाठी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या घटनेनंतर, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर तथाकथित पुरोगाम्यांनी टीकेची झोड उठवताच, याच चिदंबरम यांना राष्ट्रद्रोही अफजल गुरूचा पुळका आला आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी, यांनी नेहरू विद्यापीठातल्या त्या प्रकरणात कन्हैय्याकुमारसह सात विद्यार्थ्यांना अटक केल्याबद्दल केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आपण राष्ट्रद्रोही कृत्याचे समर्थन करीत आहोत, याचे भान त्यांना राहिलेले नाही. नेहरू विद्यापीठातला प्रा. एस. आर. गिलानी आणि त्याच्या विकृत टोळक्याने विद्यापीठाच्या परिसरातच अफजल गुरूच्या फाशीवर जोरदार टीका करीत चिथावणीखोर भाषणे केली होती. अफजल गुरू हा काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी लढणार्या युवकांचे प्रेरणास्थान असल्याची गरळ ओकली होती. अफजल गुरूच्या राष्ट्रद्रोही कृत्याचे उदात्तीकरण करायची ही घटना, देशाच्या ऐक्य आणि अखंडतेला, कायद्याच्या राज्यालाच आव्हान देणारी आहे, असे तथाकथित पुरोगाम्यांना वाटत नाही. त्यांच्या सुरात सूर मिसळत चिदंबरम, यांनी अफजल गुरूला दिलेली फाशी संशयास्पद असल्याचे मत व्यक्त करीत, केंद्र सरकारने केलेेली कारवाई चुकीचे असल्याबद्दल गळा काढला आहे. आपण सत्तेत असताना, न्यायालयाचा निर्णय चुकीचा होता, असे आपल्याला म्हणता येत नव्हते. पण त्याच्या विरुद्ध सरकारने केलेली कारवाई एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून चुकीची होती, असे त्यांचे म्हणणे आहे. अफजल गुरूच्या खटल्याची सुनावणी योग्यप्रकारे झाली नाही. अफजल गुरूचा संसदेवरच्या हल्ल्यात किती सहभाग होता, हे पण संशयास्पदच होते, असेही ते म्हणाले आहेत. आपल्याच सरकारने राष्ट्रद्रोह्याला दिलेली फाशी चुकीची होती, असे सांगणार्या या उपटसुंभ पुरोगामी संधिसाधू नेत्याचे हे वक्तव्य आगलावे आणि राष्ट्रद्रोह्यांचे समर्थन करणारेच आहे, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आणि लखलखीत असल्याने, या वक्तव्याचे गंभीर परिणाम काँग्रेसलाही भोगावे लागतील.
राष्ट्राशी गद्दारीच
पी. चिदंबरम हे सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे ख्यातनाम कायदेतज्ञ आहेत. कायद्याचा अर्थ त्यांना चांगलाच समजतो. राष्ट्रद्रोह म्हणजे काय आणि या गुन्ह्यासाठी शिक्षा काय हे ही त्यांना माहिती आहे. ते केंद्रीय गृहमंत्रिपदावर असताना काश्मीरमधल्या शेकडो दहशतवादांचे मुडदे सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांनी पाडले होते. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया, सामूहिक हत्याकांडे घडवणारे हे नराधम स्वातंत्र्यसैनिक आहेत, अशी भलावण पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी केली होती. मुशर्रफ पाकिस्तानी आहेत तर चिदंबरम भारतीय आहेत, एवढाच काय तो फरक! ते गृहमंत्रिपदावर असतानाही, अफजल गुरूवरच्या फाशीचे प्रकरण सरकारसमोर होतेच. सत्तेच्या खुर्चीला घट्ट चिकटून बसलेल्या चिदंबरम, यांना त्या राष्ट्रद्रोह्याला फाशी दिली गेली, तेव्हा काही बोलावे वाटले नाही. अफजल गुरूला झालेली फाशीची शिक्षा चुकीची-संशयास्पद होती, असे या तथाकथित स्वतंत्र व्यक्तीला वाटत होते, तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्वोच्च न्यायालयात अफजल गुरूचे वकीलपत्र घ्यायला हवे होते. तो निर्दोष असल्याचे सिद्ध करून दाखवायला हवे होते. तसे त्यांनी केले नाही. सत्ता आणि खासदारकी गेल्यावर आपण पुरोगामी विचारवंत आहोत, अशी जाणीव त्यांना व्हायला लागली आहे. पण त्यांचा हा पुरोगामीपणा म्हणजे शुद्ध ढोंगबाजी आणि राष्ट्राशी गद्दारीच आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये तेव्हा मंत्री आणि ख्यातनाम कायदेपंडित असलेल्या कपिल सिब्बल, यांनीही अफजल गुरूला दिलेली फाशी कायद्यानुसारच असल्याचे आणि काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर असतानाच त्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्याची आठवण, नेहरू विद्यापीठातल्या प्रकरणाला राजकीय रंग चढताच, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना करून दिली. सिब्बल स्वच्छ आणि सत्य बोलले. त्यांनी सत्याची बाजू सत्ता सोडल्यावरही सोडलेली नाही. पण सक्रिय राजकारणातून हकालपट्टी झालेल्या पी. चिदंबरम यांनी मात्र सत्यालाच चूड लावत, सवंग प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह्यांचा कैवार घेत त्यांची वकिली सुरू केली आहे. स्वतंत्रपणे बोलणे, मत व्यक्त करणे, हा काही देशद्रोह नाही. संसदेच्या सार्वभौमत्वावर, पावित्र्यावर घाला घालणारे वक्तव्य, हे देशद्रोही ठरते. नेहरू विद्यापीठातली घोषणाबाजी देशद्रोही नाही, असा निर्वाळाही देत त्यांनी खुलेआम फुटीरतावादी आणि राष्ट्रद्रोह्यांची बेशरमपणे तळी उचलली आहे. संसदेच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे गुन्हा आहे, तर संसदेवर सशस्त्र हल्ला चढवणे, हा गुन्हा आहे, असे मात्र या भंपक वकिलाला वाटत नाही. काँग्रेसने हे अस्तनीतले निखारे काढून टाकले नाहीत, तर ते पक्षाच्या घरालाच आग लावल्याशिवाय राहणार नाहीत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reservediv dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
No comments:
Post a Comment