Total Pageviews

Sunday, 6 March 2016

फुकट प्रसिद्धी! Monday, March 07th, 2016 कन्हैया पुढे व सरकार मागे असे विचित्र चित्र निर्माण झाले

फुकट प्रसिद्धी! Monday, March 07th, 2016 कन्हैया पुढे व सरकार मागे असे विचित्र चित्र निर्माण झाले. त्याचीही जबाबदारी कुणाला तरी घ्यावीच लागेल. असे तरुण राष्ट्रद्रोही की राजद्रोही ते ठरवून त्यांच्या जिभा कापणारे व त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचे आदेश देणारे देशाला अराजकाच्या खाईत ढकलत आहेत. कन्हैयाने आव्हान उभे केले आहे ते फुकट प्रसिद्धीचे. अन्न, पाणी, औषधे महाग झाली तरी प्रसिद्धी फुकट आहे. फक्त ती दुसर्‍यांना मिळू नये हाच वादाचा विषय दिसतोय. कन्हैया पुढे, सरकार मागे फुकट प्रसिद्धी! ‘जेएनयू’तील राजद्रोही प्रकरणांमुळे झोतात आलेला कन्हैया कुमार राजकारण्यांसारखा पोपटपंची करू लागला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफझल गुरूची पुण्यथिती साजरी केली, त्या कार्यक्रमात देशविरोधी नारे देण्याच्या आरोपाखाली कन्हैया कुमारला अटक झाली व त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला (तो देशद्रोह नसून राजद्रोह असल्याची व्याख्या कन्हैया करतो), पण आता जामिनावर सुटलेला कन्हैया जहरील्या नागासारखा रोज डंख मारीत आहे व फणा हलवून भाजप आणि त्यांच्या इतर मंडळींना घाबरवून सोडत आहे. कन्हैयावर देशद्रोहाचा आरोप आहे याचे भान न ठेवता तुरुंगातून सुटताच त्याचे विरोचीत स्वागत झाले. जेएनयू परिसरात त्याने पत्रकार परिषद घेतली व सहजसोप्या भाषेत तो बरेच काही सांगून गेला. त्याचे हे सांगणे म्हणजे राज्यकर्त्यांना विखारी वाटणे साहजिक आहे. कारण अण्णा हजारे, केजरीवाल यांच्यानंतर एका नवख्या तरुणास ‘मीडिया’ने हीरो करून डोक्यावर घेतले. कन्हैया कुमार याला फुकटची प्रसिद्धी मिळत आहे असा टोला व्यंकय्या नायडू यांनी मारला. विद्यार्थ्यांनी शिकावे, आंदोलने व राजकारण करू नये असे नायडू यांनी म्हटले आहे. कन्हैया यास फुकटची प्रसिद्धी मिळते असे नायडू यांचे म्हणणे असेल तर त्यास कोण जबाबदार आहे? सध्या आपल्या देशात काहीच फुकट मिळत नाही व लहानसहान गोष्टींचीही जबर किंमत मोजावी लागते. मजूर वर्ग, कामगार वर्गाच्या कष्टाच्या ‘प्रॉव्हिडंट फंडा’च्या पैशांवरही सरकारने आता कर लावला. म्हणजे थोडक्यात देशासाठी राबणार्‍या श्रमिकांच्या घामावरही कर लावून ‘फुकट काही नाही’ हेच सरकारने दाखवून दिले. पुन्हा प्रसिद्धी माध्यमातही जे विकते तेच पिकवले जाते. कन्हैया याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आहे व तरीही त्यास फुकट प्रसिद्धी देण्याची स्पर्धा सुरू असेल तर सरकारने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी व देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही मि. कन्हैया कुमार हे इतक्या लवकर जामिनावर सुटले कसे? गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचे आंदोलन चालविणारे हार्दिक पटेल यांच्यावरही देशद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला. त्यांच्याकडून अनवधानाने तिरंग्याचा अपमान झाल्याचे हे काहीसे प्रकरण आहे, पण हार्दिक पटेल यांना अनेक महिने झाले तरी जामीन नाही. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासारख्यांना जामीन नाही, पण जेएनयू प्रकरणाचा इतका गाजावाजा होऊनही देशद्रोहाचा आरोपी दहा-पंधरा दिवसांत जामिनावर सुटतो व बाहेर येऊन सरकारच्या टोप्या उडवतो हा काय प्रकार आहे? कन्हैयास जास्त काळ आत ठेवल्याने सरकारला जड गेले असते व अनेक प्रश्‍नांना तोंड द्यावे लागले असते असे म्हणतात ते खरेच मानावे काय? नायडू म्हणतात त्याप्रमाणे कन्हैया फुकट प्रसिद्धी घेत आहे व त्यास आपली यंत्रणा व व्यवस्था जबाबदार आहे. कन्हैयाची जीभ कापून आणणार्‍यास व कन्हैयाचे मुंडके उडवणार्‍यास पाच-दहा लाखांची बक्षिसे लावली गेली आणि त्यामागे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असल्याचे बोलले जाते. या उठवळ प्रकारांमुळे कन्हैया कुमार हा जास्तच ‘हीरो’ झाला आहे. पुन्हा क्रिकेटपटू सुरेेश रैना, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासारखे लोक कन्हैयाचे समर्थन करतात हा नक्की काय प्रकार समजायचा? सोशल मीडियावरदेखील या कन्हैया कुमारचा सध्या बोलबाला आहे. अर्थात कन्हैयाचा ‘हीरो’ म्हणून उद्घोष करणार्‍यांना सणसणीत चपराक देणारा एक संदेशदेखील सोशल मीडियावर फिरत आहे. ‘एक भाषण से हीरो बन सकते है, पागल थे सरहदपे खून बहा दिया’ हा तो संदेश. अत्यंत मार्मिक आणि कन्हैया प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर समर्पक. कारण कन्हैयासारख्याला जर केवळ एका भाषणाच्या जोरावर ‘हीरो’ केले जात असेल तर सीमेवर देशासाठी रक्त सांडणारे, प्रसंगी हौतात्म्य पत्करणारे आमचे जवान ‘वेडे’ नाही का ठरणार? देशासाठी बलिदान करणारे आमचे जवान खरे हीरो की भाषणबाजी करणारी कन्हैयासारखी मंडळी हे ठरविण्याची वेळ आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही ‘‘सध्याच्या तरुणांना देशभक्ती शिकवावी लागते, ‘भारतमाता की जय’ असे वदवून घ्यावे लागते,’’ अशी खंत अलीकडेच व्यक्त केली. बंदुकीत दारू ठासून भरावी अशी देशभक्ती ठासून भरता येत नाही हे खरे असले तरी या देशात कन्हैयासारख्या माथेफिरू(?) तरुणांची पैदाईश का वाढली आहे याचे काही चिंतन होणार आहे की नाही? देशातले वातावरण झपाट्याने बदलत आहे. निवडणुका लढवणे व येनकेन मार्गाने त्या जिंकून सत्ता स्थापन करणे हेच एकमेव ध्येय बनले आहे. निवडणुकीआधी दाखवलेली स्वप्ने हवेत विरून जातात व शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी त्याच वैफल्यग्रस्ततेचे शिकार होतात. युवा शक्तीचे नैराश्य हे असेच वाढू लागले तर पाकिस्तानमधून अतिरेकी न घुसताही स्वदेशात ‘स्फोट’ वाढू लागतील. अशा तरुणांचा राजकीय वापर, गैरवापर करून त्यांना घोड्यावर बसवणारे आपल्याकडे कमी नाहीत. कन्हैया कुमार आज ‘मी राजकारणी नसून विद्यार्थी असल्याचा दावा’ करीत असला तरी प. बंगाल, केरळच्या निवडणुकीत लालभाईंचा हस्तक म्हणून तो प्रचारात उतरेल व त्यास फुकटची प्रसिद्धी तेव्हाही मिळेल. एका कन्हैयावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना स्वतंत्र यंत्रणा दिल्लीत उभारावी लागली. कन्हैया पुढे व सरकार मागे असे विचित्र चित्र निर्माण झाले. त्याचीही जबाबदारी कुणाला तरी घ्यावीच लागेल. असे तरुण राष्ट्रद्रोही की राजद्रोही ते ठरवून त्यांच्या जिभा कापणारे व त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचे आदेश देणारे देशाला अराजकाच्या खाईत ढकलत आहेत. कन्हैयाने आव्हान उभे केले आहे ते फुकट प्रसिद्धीचे. अन्न, पाणी, औषधे महाग झाली तरी प्रसिद्धी फुकट आहे. फक्त ती दुसर्‍यांना मिळू नये हाच वादाचा विषय दिसतोय. - See more at: http://www.saamana.com/sampadkiya/fukat-prasidhi-2#sthash.lPeT8XyT.dpuf

No comments:

Post a Comment