Total Pageviews

Friday, 18 March 2016

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला एकदम क्रांतिकारकांच्या पंक्तीत नेऊन बसवण्यासाठी, त्याला देशाचा नेता ठरवण्यासाठी सध्या तथाकथित विद्वज्जनांमध्ये चढाओढच सुरू आहे

कन्हैयाला नेता म्हणणाऱ्यांसाठी.... March 18, 2016, 3:48 pm IST अमेय गोगटे in कारण की... | राजकारण 332 0 9 जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला एकदम क्रांतिकारकांच्या पंक्तीत नेऊन बसवण्यासाठी, त्याला देशाचा नेता ठरवण्यासाठी सध्या तथाकथित विद्वज्जनांमध्ये चढाओढच सुरू आहे. किंबहुना काहींनी तसा विडाच उचलल्याचं दिसतंय. ‘आम्हाला देशापासून नव्हे तर देशातच स्वातंत्र्य हवंय’, या त्याच्या वाक्याने तर अनेकजण त्याच्या प्रेमात पडलेत. जणू काही ‘संभवामि युगे युगे’ म्हणणारा कन्हैयाच कलियुगात-मोदीयुगात साधुसंतांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी (आता या विद्वानांना अभिप्रेत असलेले दुर्जन कोण हे आपण जाणताच) अवतरलाय असं भासवलं जातंय. त्यामुळे अनेक पक्षांच्या आशा पल्लवित झाल्यात. निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात आपल्या रथाची दोरी या कन्हैयाच्या हाती द्यायचंही काहींनी ठरवलंय. त्यामुळे राजकारण्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू, अर्थात तुमच्या आमच्यासारखे सामान्यजन संभ्रमित झालेत. एकदम देशाचाच नेता होण्यासारखा कुठला पराक्रम या कन्हैयाने केलाय बुवा, हे त्याच्या सामान्य बुद्धीला कळत नाहीए. kanhaiya-kumar विद्यार्थी चळवळीतून नेत्यांचा उदय होणं ही नक्कीच स्वागतार्ह गोष्ट. या नेत्यांचं ‘बेसिक’ पक्कं असल्याने लोकशाहीसाठी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. पण कन्हैया कुमारचा उदय ज्या पद्धतीने झाला, ती चिंतेचीच बाब आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत जेएनयू कॅम्पसपुरता मर्यादित असलेला कन्हैया पुढच्या दोनच दिवसांत जगभरात पोहोचला. आता त्या रात्री तिथे काय झालं, याबद्दल बरेच मतप्रवाह असले तरी देशहिताचं तिथे नक्कीच काही घडलं नव्हतं. जे कुणी तिथे उपस्थित होते, त्यांच्या म्हणण्यानुसार तिथे काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या, अफझलच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या गेल्या आणि विद्यार्थी नेता या नात्याने कन्हैया कुमार त्यात आघाडीवर होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीनंही अहवालात तसं नमूद केलंय. ‘कश्मीर की आझादी तक जंग रहेगी’, ‘भारत तेरे टुकडे होंगे… इंशल्लाह इंशल्लाह’, ‘अफझल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिन्दा है’, अशा घोषणा कॅम्पसमध्ये घुमल्या. त्यांचं समर्थन कसं काय होऊ शकतं? पण दुर्दैवाने ते करण्यात आलं. आमचे विचार, पक्ष वेगळे असले तरी जेव्हा देशाचा विषय येईल, तेव्हा आम्ही एक आहोत, अशा गर्जना करणाऱ्या नेत्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली कन्हैया आणि त्याच्या साथीदारांची चक्क पाठराखण केली. कन्हैयाच्या अटकेचा निषेध झाला, सरकारवर गळचेपीचा आरोप झाला, नेहमीप्रमाणे जात-पात-धर्माच्या तलवारी काढण्यात आल्या आणि दुर्दैवाने पुन्हा राष्ट्रकारणापेक्षा राजकारणच वरचढ ठरलं. हे चित्र नवं नाही. जाती-धर्माचं राजकारण आपल्याकडे वर्षानुवर्षं होत आलंय आणि त्याला सगळेच पक्ष जबाबदार आहेत. जनतेलाही आता त्याची सवय झालीय. पण देशाच्या राजधानीत देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा आणि त्याचं होणारं समर्थन ही म्हणजे हद्दच झाली. ज्या देशात जन्माला आलात, वाढलात, शिकलात, ज्या देशाचं अन्न खाल्लं, त्या देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याची फाशी हा न्यायव्यवस्थेने केलेला खून म्हणणं हा देशद्रोह नाही तर आणखी काय आहे? आश्चर्य म्हणजे, ज्या सरकारने अफझलला फाशी दिली, त्यांच्याच नेत्यांनी कन्हैया कंपनीचा उदो उदो करावा, याला तोडच नाही. देशातल्या अनेक गोष्टी आपल्याला खटकतात, आपले विचार वेगळे असू शकतात, सरकारच्या धोरणांवर आपला आक्षेप असू शकतो. त्याच्याविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार घटनेने प्रत्येक नागरिकाला दिला आहे. अनेकांनी आंदोलनं करून न्याय्य मागण्या मान्यही करून घेतल्यात. सरकारला नवे कायदे करायलाही भाग पाडलंय. अण्णा हजारेंचं ‘लोकपाल’साठीचं उपोषण हे त्याचं आदर्श उदाहरण आहे. पण यांच्यापैकी कुणीच देशविरोधी नारे दिले नव्हते. काश्मीरच्या मुद्दा तर खूप जुना आणि तितकाच क्लिष्ट आहे. भल्याभल्यांना तो सोडवता आलेला नाही. भारतासाठी काश्मीर हा अस्मितेचा विषय आहे. ते भारतापासून तोडण्याची भाषा करणारा, देशाचं नाक कापणारा कन्हैया नेता कसा काय होऊ शकतो? त्यांना पोलिसांनी अटक नाही करायची तर काय सत्कार करायचा का? जामिनावर सुटल्यानंतर कन्हैयानं जेएनयूमध्ये केलेल्या भाषणाने अनेक जण प्रभावित झाले. पण थोडा विचार केल्यास सहज लक्षात येतं की, तो पूर्णपणे राजकीय ‘शो’ होता. आम्हाला भारतापासून नव्हे, भुकेपासून स्वातंत्र्य हवंय, असमानता, सरंजामशाही, जातिवाद, शोषणापासून मुक्ती हवीय, असं तो म्हणाला. पण, हे प्रश्न तर स्वातंत्र्यापासूनचे आहेत. मग, भाजपचं सरकार आल्यानंतरच कन्हैयाला एकदम ही असमानता-असहिष्णुता कशी काय दिसायला लागली? भूकबळी, जातिवाद, शोषण हे प्रश्न नक्कीच गहन आहेत, कुठल्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारेच आहेत. पण ते दोन वर्षांपूर्वीही होते. तेव्हा कन्हैया कुठे होता? तो अचानक आत्ताच अवतरण्याचं कारण सरळ आहे. ते म्हणजे, कम्युनिस्ट पक्षाचं वर्चस्व असलेल्या गावात, त्या विचारसरणीचा पगडा असलेल्या कुटुंबात कन्हैयाचा जन्म झालाय. त्यामुळे संघाची, भाजपची विचारधारा त्याला पटू-पचूच शकत नाही. म्हणूनच त्याला लेनिन, लाल सलाम आठवलाय आणि भाजपविरोधकांनी त्याला सलाम ठोकलाय. कन्हैया आणि त्याच्या साथीदारांनी जे केलं तो देशद्रोह नसून राजद्रोह आहे, असं सांगून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करताहेत. तर, जणू देशाला गुलामीच्या जोखडातून सोडवण्यासाठी कुणी मसिहाच आला असल्यासारखंच राजकीय पंडित भासवताहेत. देशात स्वातंत्र्य हवंय, असं कन्हैयाचं म्हणणं आहे. त्याला नेमकं काय अभिप्रेत आहे. आपल्या देशात हवं ते बोलण्याचं, पाहिजे ते करण्याचं स्वातंत्र्य आहेच की! जे लोक कधीच काही बोलत नव्हते, त्यांनाही असहिष्णुतेच्या मुद्द्यावर बोलताना आपण पाहिलंय की! सरकारच्या कामावर चर्चा, टीका अगदी पारापासून पार्लमेंटपर्यंत आणि वडापपासून विमानापर्यंत होते. हे स्वातंत्र्य नाही तर आणीबाणी आहे का? अर्थात, तुम्हाला देशविरोधी नारे देण्याचं स्वातंत्र्य हवं असेल, तर देशप्रेमी जनतेलाही ते मान्य होणार नाही. कशाला उगाच जनतेशी पंगा घेता? देशाच्या राजकारणात तरुणांनी येणं आवश्यकच आहे. पण, विधायक, विकासाचा दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. जागतिकीकरणाच्या काळात विकास, प्रगती हेच देशाचं प्रमुख उद्दिष्ट असायला हवंय. अशावेळी कन्हैयाला नेता म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. जेएनयूमधील ‘शो’मुळे तो ‘हिरो’ झालाय, नेता नाही. एखादी व्यक्ती जितक्या वेगानं वर जाते, तितक्याच वेगानं ती खालीही येते, याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यात उद्या कन्हैयाचं नाव जोडलं गेलं, तर आश्चर्य वाटायला नको

No comments:

Post a Comment