SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Wednesday, 23 March 2016
MEDICAL NUTRITION IN NAXAL AFFECTED AREAS- वनवासी कल्याण आश्रमाचे काम-डॉ. राम आणि सुनीता गोडबोले-गौरी रमेश वझे
आज मला या बस्तर परिसरात येऊ न जवळजवळ दीड वर्ष झाले. पण आहाराच्या आणि आरोग्याच्या अजून बऱ्याच समस्या इथे आ वासून उभ्या आहेत. त्या सोडवण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. आजच्या तरुण वर्गाने जर आपल्या आयुष्याची काही वर्षे या लोकांसाठी दिली, तर या लोकांच्या महत्त्वाच्या समस्यांवर आपण उपाय सुचवू शकतो, असे मला वाटते. इथे येऊन निसर्गाच्या सान्निध्यात राहून एक-दोन वर्षे काम करण्याचा अनुभव काही वेगळाच आहे!
अन्न व पोषणशास्त्र या विषयाचा रीतसर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्या शिक्षणाचा, आपण आहारतज्ज्ञ असल्याचा उपयोग अशा लोकांसाठी करावा की ज्यांना त्याची खरी गरज आहे असा मला सतत वाटायचे. आदिवासी लोक, शहरात राहणारे गरीब लोक, समाजातले दुर्लक्षित लोक - ज्यांना पैसे देऊन आपला डाएट प्लान विकत घेता येत नाही, अशा लोकांना आपण डाएट प्लान करून द्यावा, याच विचाराने मी अशा एका संधीच्या शोधात होते, जी मला गरजू लोकांपर्यंत पोहोचवेल. डिसेंबर 2014च्या अखेरीस ती संधी चालून आली. वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्या सुनीता गोडबोले यांच्या बस्तरमधील ग्रामीण आरोग्यविषयक प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला. या कामाने प्रभावित होऊन मी थेट बस्तर गाठण्याचा धाडसी निर्णय घेतला.
छत्तीसगढ राज्याच्या बस्तर परिसरातील दंतेवाडा जिल्ह्यात बारसूर या छोटयाशा गावात डॉ. रामचंद्र गोडबोले आणि त्यांची पत्नी सुनीता गोडबोले यांच्याबरोबर माझ्या जीवनप्रवासाचा नवा अध्याय सुरू झाला. डॉ. राम आणि सुनीता गोडबोले ही जोडगोळी गेली वीस वर्षे छत्तीसगढच्या आदिवासी भागांमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे काम करत आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या राम गोडबोलेंनाही सुरुवातीपासून आदिवासी किंवा समाजातील दुर्लक्षित लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती आणि त्यांनी 1990मध्ये आपल्या पत्नीबरोबर समाजसेवेचा हा सुंदर प्रवास सुरू केला. त्या वेळी या भागातल्या आदिवासी लोकांचे कुपोषण, अनारोग्य, गरिबी, अंधश्रध्दा इ. समस्यांची स्थिती भयावह होती. अशी परिस्थिती पाहता त्या वेळी आदिवासींना तर डॉ. राम गोडबोले व सुनीताताई यांच्या रूपात साक्षात देवच भेटला. 1990पासून ते आजपर्यंत डॉ. गोडबोले अगदी मनापासून त्यांची सेवा करत आहेत. आदिवासी समजासाठी ते आता त्यांचे लाडके डॉक्टरभैय्या आणि भाभी झाले आहेत.
कुपोषणाची भीषणता
बस्तरमध्ये कुपोषण, मलेरिया आणि टीबी या रोगांची तीव्रता आपल्या महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त आहे. या क्षेत्रात काम करताना आहाराच्या खूप मूलभूत समस्या आहेत असे मला जाणवले. सर्वप्रथम आपण जे अन्न खातो, ते निकृष्ट व निम्न स्तराचे असल्यामुळे आपण सदैव कुपोषित राहतो, याचे आदिवासी लोकांना भान नाही. त्यांची आहाराची समज जेमतेमच आहे. आपले मूल कुपोषित आहे, आपल्या परिवारात कोणीतरी आजारी आहे याचा अर्थ आपल्या परिवाराबरोबर जादूटोणा केला आहे हाच विचार एका सामान्य आदिवासी माणसाच्या मनात येतो. त्यामुळे आपण जर आपला आहार बदलला, तर या सर्व समस्या दूर होतील हे त्यांना समजावणे खूप कठीण आहे.
पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे जन्मापासूनच इथे कुपोषण आढळून येते. याच कुपोषित मुली जेव्हा पुढे आई बनतात, तेव्हा त्यांच्या कुपोषित अवस्थेमुळे त्यांचे जन्माला येणारे मूलही कुपोषित जन्माला येते. हे सत्र असेच पुढे चालू राहिल्यामुळे कुपोषण कधी संपतच नाही. मुळातच आदिवासी समाजाच्या खाण्या-पिण्याच्या सवयी चुकीच्या असल्याने वर्षानुवर्षे या समाजाच्या पिढया कुपोषित आहेत. आपण शहरामध्ये जेवण करतो, तसे पोळी, भाजी, आमटी, भात या लोकांना माहीतच नाही. जेवणामध्ये फक्त भात आणि एखादी रस्सा-भाजी इतकाच यांचा आहार. भाजी या प्रकारामध्ये या भागामध्ये मुबलक प्रमाणात मिळणारी व प्रत्येक आदिवासी माणसाची आवडीची अंबाडीची भाजी किंवा चिंचेची आमटी असते. डाळीच वापर या भागात अगदीच कमी प्रमाणात होतो. गावात मिळणाऱ्या तेलबियांपासून काढलेल्या तेलाचा उपयोग जेवणात कधीतरी करतात. प्रथिने, ऊर्जा व पोषणमूल्ये या सगळयांच्या अभावामुळे इथे कुपोषण दिसून येते. उन्हाळयामध्ये तर फक्त भाताची किंवा कणसाची पेज पिऊन दिवस-दिवस आदिवासी लोक काम करायला जातात. अशा परिस्थितीमध्ये शरीराला लागणारी ऊर्जा कुठून मिळणार? आणि त्यामुळे कुपोषणाची समस्या इथे सर्वत्र आढळते.
आरोग्यविषयक अंधश्रध्दा
दुसरी तीव्रतेने आढळणारी समस्या मलेरियाची. रोग आणि त्यावर घेतले जाणारे औषध याबद्दल असलेल्या अज्ञानामुळे मलेरिया इथून जायलाच तयार नाही. मलेरिया झाला की आपल्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे हाच विचार एखाद्या सामान्य आदिवासी माणसाच्या मनात येतो. त्यावर उपाय म्हणून गावात असलेल्या सिरहा किंवा गुनिया म्हणजे भोंदूबाबाकडे जाणे आणि भूत उतरवणे, एखाद्याला वश करणे असे अघोरी उपाय हे लोक सतत करतात. त्यानंतर मलेरिया अगदी अंगलट आला की डॉक्टरकडे जाण्यावाचून पर्याय न उरल्यामुळे डॉक्टरकडे जातात. अशा वेळी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली असते की डॉक्टरही त्या रोग्याला मदत करू शकत नाही आणि मग डॉक्टरवरचा आधीच कमी असलेला विश्वास आणखी कमी होतो. याच परिस्थितीमुळे बस्तरमध्ये वाचवता येण्यासारखे कितीतरी निष्पाप जीव आजवर मृत्यूला सामोरे गेले आहेत. टीबी रोगाचीही हीच परिस्थिती आहे. अर्धवट व दिलेल्या सूचनांनुसार न घेतलेल्या औषधांमुळे टीबीची तीव्रता टप्याटप्याने वाढत जाते आणि शेवटची पायरी म्हणजे मृत्यू.
जनजागृती हाच दीर्घकालीन उपाय
गेली वीस वर्षे या भागामध्ये दवाखाना चालवून डॉ. गोडबोले आणि सुनीताताई यांच्या असे लक्षात आले की या समस्यांवर कुठल्यातरी दुसऱ्या पध्दतीने उपाय केला पाहिजे. इथले आदिवासी लोक त्याच त्याच समस्या घेऊन पुन्हा पुन्हा दवाखान्यात येत आहेत. उदा. आठवडा झाला की परत ताप आला, सर्दी झाली, मलेरिया झाला... चक्र चालूच. असे किती दिवस चालणार? या लोकांना आपल्या आहाराविषयी व आरोग्याविषयी प्रशिक्षण देणे व या लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा एक चांगला परीणामकारक उपाय असू शकतो, असे जाणवले आणि यातूनच 'मितानीन प्रशिक्षण शिबिरा'ची सुरुवात झाली. मितानीन ही व्यक्ती गावातल्याच लोकांनी निवडली असल्यामुळे त्यांच्यामार्फत लोकांपर्यंत आरोग्य व आहार याबद्दलची जागृती करण्याचे काम दुसरे आणखी कोण चांगले करू शकेल?
सुनीताताई गोडबोलेंनी नव्याने हाती घेतलेल्या याच मितानीन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यापासून बस्तरमधील माझा प्रवास चालू झाला. महाराष्ट्रात व इतर राज्यांमध्ये ज्यांना आशा कार्यकर्ती (ASHA - Accredited Social Health Worker) म्हणतात, अशा आरोग्यसेविका म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना छत्तीसगढ राज्यामध्ये 'मितानीन' म्हणतात. छत्तीसगढी भाषेमध्ये 'मितानीन'चा अर्थ 'मैत्रीण' असा होतो. दंतेवाडा जिल्ह्यातील तीन आरोग्य उपकेंद्रातील (संकुल) 65 मितानीन सेविकांची निवड या कामासाठी करण्यात आली. आमचा हा मितानीन शिक्षण कार्यक्रम जानेवारी 2015पासून सुरू झाला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडयात दिवसभराच्या सत्रात या सर्व 65 मितानीन महिलांना आरोग्यविषयक नवनवीन माहिती देणे आणि सत्राच्या शेवटी त्यांना एक पौष्टिक पदार्थ शिकवणे अशी या कार्यक्रमाची ढोबळ रूपरेखा होती. महिन्यात प्रत्येक मितानीन एका विशिष्ट दिवशी हा सगळा कार्यक्रम आपल्या पाडयात करत असत. पाडयामधील सर्व आदिवासी महिलांना गोळा करून आपण प्रशिक्षणात शिकलेली माहिती त्याच तक्त्याद्वारे महिलांना समजावणे आणि नवीन शिकलेला पौष्टिक पदार्थ बनवून खायला घालणे, असा हा आमचा कार्यक्रम चालात असतो.
भाषिक अडथळा ओलांडण्याची कसरत
मितानीन सेविकांमधील बऱ्याच सेविका अशिक्षित असल्यामुळे जास्तीत जास्त माहिती चित्रामार्फत देण्याचे आम्ही ठरवले. त्यासाठी सोप्या हिंदी भाषेत वेगवेगळे तक्ते आम्ही तयार केले. मितानीनला शिकवण्यासाठी अशा विषयाची निवड केली की जे अगदी सहज-सोपे पण खूप महत्त्वाचे आहेत - उदा. आपले शरीर व आंतरिक अवयव, शारीरिक स्वच्छता व परिसर स्वच्छता, इथे जास्ती प्रमाणात आढळणारे आजार (मलेरिया, कावीळ, टी.बी, ऍनीमिया) कुपोषणाचे प्रकार व पौष्टिक आहार, प्रथमोपचार इत्यादी. तसे पाहायला गेले तर अगदी सोप्पे असे हे विषय मितानीन सेविकांना समजावताना खूप अवघड वाटायचे. हिंदी समजू शकणाऱ्या, पण बोलू न शकणाऱ्या मितानीनला आपले शरीर आतून कसे असते? हे समजावणेही खूप कठीण वाटायचे. तरीही मी सोप्या हिंदी भाषेत आणि सुनीताताई गोंडी भाषेत असे आम्ही दोघी मिळून त्यांना हे सगळे समजावत असतो.
आपण आधी शिकलेल्या सर्व विषयांबद्दल नवी माहिती जाणून घेताना मितानीनचा उत्साहही आमच्यासाठी प्रेरणादायी होता. गावात कार्यक्रम करताना मला अडथळे आले, कारण मला गोंडी किंवा हलबी येत नसल्यामुळे आणि गावात अजून निरक्षरता असल्यामुळे त्यांच्याशी कसे बोलावे हा खूप मोठा प्रश्न होता. गावातील लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क नसल्यामुळे त्यांच्यासाठी कितीतरी गोष्टी खूप नवीन होत्या. याच कामामध्ये आम्हाला गावातल्या चार हौशी मुलींची साथ मिळाली. प्रत्येक संकुलाची संकुल समन्वयक म्हणून आम्ही त्यांना नियुक्त केले. त्यांच्याबरोबर प्रत्येक पाडयात जाणे, मितानीनच्या मदतीने मी हिंदीतून सांगणे व तिने आपल्या भाषेतून सांगणे असे करत आम्ही कार्यक्रम केले. मी, संकुल समन्वयक आणि मितानीन अशा तिघींनी मिळून गावातील कार्यक्रम करणे हा आमचा नित्यक्रम सुरू झाला.
स्थानिक उपलब्ध पदार्थांपासून पोषक आहार निर्मिती
कुपोषणाची असलेली तीव्रता व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी लक्षात घेऊन, मितानीन प्रशिक्षण शिबिरामध्ये आम्ही दर वेळी एक नवा पोषक पदार्थ मितानीनना शिकवला. हा पदार्थही आम्ही असा निवडला की ज्यात वापरले जाणारे घटक एखाद्या आदिवासी माणसाच्या घरात अगदी सहजासहजी उपलब्ध असतील - उदा. नागली, भात, बेसन, डाळ इत्यादी. यापासून बनवलेले पदार्थ म्हणजे नागलीचा गोड शिरा, नागलीचा उपमा, तांदळाची उकड, मिश्र धान्याची भेळ, भाजीचा पराठा, खिचडी, बेसन, नागलीच्या आणि गव्हाच्या पिठाचे थालीपीठ इत्यादी. आपल्या घरात हे सर्व सामान असून आपल्याला हे पदार्थ माहीत नव्हते, असे प्रत्येक मितानीनला जाणवायचे. इतक्या सोप्या पदार्थांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते, या गोष्टीचेही त्यांना आश्चर्य वाटले.
अशा एक वर्षाच्या मितानीन प्रवासात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आदिवासी लोकांचे निरनिराळे प्रश्न, आरोग्य समस्या अगदी जवळून पाहण्याचा योग आला. मितानीन प्रशिक्षण शिबिराव्यतिरिक्त डॉ. गोडबोले यांच्या रुग्ण तपासणी शिबिरातही मी अनेकदा सहभागी होत असे. वेगवेगळया आदिवासी गावामध्ये अशी शिबिरे आयोजित करून ज्या रुग्णांना मदतीची खूप गरज आहे अशा लोकांना शोधून काढणे आणि त्यांना पुढील आरोग्यसेवा मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम यातून होते. या तपासणी शिबिरात प्रकर्षाने जाणवलेले दोन प्रश्न म्हणजे कुपोषण आणि ऍनीमियाचे प्रमाण. 3 ते 4% हिमोग्लोबिन असलेल्या बायका व मुली-मुले इथे मोठया प्रमाणावर आढळतात. ऊर्जा व प्रथिने यांच्या अभावामुळे दिसून येणाऱ्या कुपोषणाचे इथे मोठे प्रमाण आहे. अशा तपासणी शिबिरात आढळलेल्या काही निवडक मुलांसाठी मी एक माल्ट तयार केले. माल्ट आणि पोषक आहार यामुळे आम्हाला थोडयाच दिवसात या मुलांच्या वजनामध्ये लक्षणीय बदल आणि आरोग्यामध्ये सुधारणा दिसून आल्या. या शिबिरांमुळे आदिवासी लोकांपर्यंत व्यापक प्रमाणात पोहोचण्याची संधी आम्हाला मिळाली आणि कामाचा अनुभव वाढत गेला.
आज मला या बस्तर परिसरात येऊन जवळजवळ दीड वर्ष झाले. पण आहाराच्या आणि आरोग्याच्या अजून बऱ्याच समस्या इथे आ वासून उभ्या आहेत. त्या सोडवण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. आजच्या तरुण वर्गाने जर आपल्या आयुष्याची काही वर्षे या लोकांसाठी दिली, तर या लोकांच्या महत्त्वाच्या समस्यांवर आपण उपाय सुचवू शकतो, असे मला वाटते. इथे येऊन निसर्गाच्या सान्निध्यात राहून एक-दोन वर्षे काम करण्याचा अनुभव काही वेगळाच आहे! सामान्य माणसांना नक्षलवादाचा त्रास होत नसल्याने इथे येऊन काम करण्याचे धाडस करण्यात वेगळेच आव्हान आहे. आपल्या उरलेल्या आयुष्यासाठी, इथे येऊन मला एक सुखद अनुभव मिळाला याचे मला मनोमन समाधान वाटते. इतर सर्वांनी एकदातरी तसाच अनुभव अवश्य घ्यावा, असे सुचवावेसे वाटते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment