Total Pageviews

Wednesday 3 June 2015

NARENDRA MODI BANGLADESH VISIT

पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ६ आणि ७ जून असे दोन दिवस बांगलादेशच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्यांचा हा बांगलादेश दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. आपल्या या दौर्‍यात पंतप्रधान मोदी हे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची भेट घेणार आहेत. या भेटीतून दोन देशांमधील संबंध आज आहेत त्यापेक्षा सुधारतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन देशांमधील संबंधांमध्ये आलेली कटुता कमी होईल आणि एका नव्या पर्वाचा प्रारंभ होईल, असे मानले जात आहे, ते योग्यच म्हटले पाहिजे. १९७१ च्या भारत-पाक लढ्यात बांगलादेशचा उदय झाला. भारताने पाकिस्तानचा पराभव केला नसता, तर बांगलादेश कधीच मुक्त झाला नसता, हा इतिहास बांगलादेशीयांच्या नसानसात भरला आहे. त्यावेळी भारतात आलेल्या लक्षावधी शरणार्थींच्या मदतीसाठी भारताने २० पैशाचे रेव्हेन्यू तिकीट काढले होते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्‍याला ऐतिहासिक असे महत्त्व आहे. हा काही सामान्य दौरा नाही. बांगलादेशची निर्मिती होत असताना दोन्ही देशांतील नागरिकांनी आणि सैनिकांनी एकाच उद्देशासाठी रक्त सांडविले असल्याने दोन्ही देशांतील संबंध हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानी सैनिक अतिशय क्रूरपणे वागले, आपल्या क्रौर्याचे भयंकर दर्शन त्यांनी घडविले. कोणाचाही संताप व्हावा अशा प्रकारचे वर्तन पाकी सैनिकांनी केले अन् त्यामुळे भारत व बांगलादेशच्या सैनिकांनी सडेतोड प्रत्युत्तर देत पाकला नामोहरम् केले होते. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. बांगलादेश नामक एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. पाकिस्तानी सैनिकांनी क्रौर्याची परिसीमा गाठली असताना त्या सैनिकांना चारीमुंड्या चीत करून जेव्हा भारतीय सैन्याने विजय मिळविला होता, तो क्षण परमोच्च आनंदाचा होता. आजही बांगलादेश त्या क्रूरकर्म्यांना फासावर लटकवत आहे. त्यामुळेच भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशांमधील परस्पर संबंधांना अतिशय महत्त्व प्राप्त होते. १९७१ च्या युद्धात भारत आणि बांगलादेशकडून जे लढले आणि शहीद झाले, त्या शहीदांनी शांतता, समृद्धी, मानवीय मूल्य आणि दोन्ही देशातील येणार्‍या पिढीसाठी आपले बलिदान दिले होते, याचा विसर आपल्याला पडता कामा नये. दोन्ही देशांतील शहीदांनी केलेल्या बलिदानामुळेच भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. आजपासून ४४ वर्षांपूर्वी तेव्हा साडेसात कोटी लोकसंख्या असलेल्या बंगलादेशवासीयांच्या मनात आजच्यासारखा सीमावाद कुठे नव्हताच. त्यावेळी भारतही एक गरीब देशच होता. पण, भारताचे हृदय हे विशाल होते, माऊंट एव्हरेस्टसारखे मोठे मन होते भारताचे अन् भारवासीयांचे. भारतीयांनी बांगलादेशवासीयांना कधीही अंतर दिले नव्हते. त्यांच्या सुखदु:खात आम्ही सहभागी झालो होतो आणि आमच्या सुखदु:खात ते. अशाप्रकारे दोन देशांमधील संबंध अतिशय मैत्रीपूर्ण होते. बांगलादेशची जी मुक्तिवाहिनी होती, ती आपलीच आहे, असे मानून भारताने तिला सर्वतोपरी मदत केली होती. बांगलादेश मुक्त व्हावा असे भारत सरकारला हवे होतेच, पण संपूर्ण भारतीय जनता त्यावेळी बांगलादेशच्या निर्मितीसाठी खंबीरपणे उभी होती, हे बांगलादेशने विसरू नये. म्हणूनच बांगलादेशच्या उदयानंतर दोन्ही देशांमधील संबंध अतिशय मधुर होते. बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा ते एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र होते. पण, निर्मितीनंतर काही वर्षे गेली अन् बांगलादेशने स्वत:ला निधर्मी राष्ट्र म्हणविणे बंद केले. त्यांनी स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केले. दुर्दैवाने बांगलादेशसोबत असलेले आपले मधुर संबंध बिघडत गेले. बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी वाढली. आज कोट्यवधी बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरीत्या घुसले आहेत आणि इथेच स्थायिक झाले आहेत. बांगलादेशी घुसखोरीमुळे भारतासमोर वेगळी समस्या उभी ठाकली आहे. आसामसारखे राज्य बांगलादेशी मुस्लिमबहुल होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. बांगलादेशातील हिंदू बांधवांवर क्रूर अत्याचार केले जात आहेत. बांगलादेशात हिंदूंची घरे लुटली जात आहेत, हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले जात आहेत. हिंदूंवर अन्याय केला जात आहे. बांगलादेश जर आपल्या वर्तनात बदल करणार नसेल अन् दिवसेंदिवस त्या देशातील राज्यकर्त्यांची हिंदू समाजाबद्दलची भूमिका क्रूरतेकडेच वाटचाल करणार असेल, तर भारतानेही वेगळा विचार करायला हवा. १९७१ च्या युद्धाच्या वेळी कुठेही सीमेचे बंधन नव्हते. पण, आता ते बंधन आले आहे. रॅडक्लिफ लाईन नावाची सीमारेषा दोन देशांमध्ये आखली गेली आहे. सीमेवर दोन्ही देशांकडून कडक पहाराही ठेवला जातो. भौगोलिक सीमेसोबतच मानसिक सीमारेषाही आखली गेल्याने दोन देशांमध्ये काहीशी कटुता आली होती. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. बांगलादेशातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जात असतानाच मोठ्या संख्येत बांगलादेशी घुसखोर दररोज भारतात घुसखोरी करीत असल्याने भारताची डोकेदुखी वाढली आहे. बांगलादेशी घुसखोर नुसतेच भारतात घुसले असते तर वेगळी गोष्ट होती. पण, ते दहशतवादी कारवायांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभागी होत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. ही स्थिती बदलणे आवश्यक आहे. दोन्ही देशांमध्ये पूर्वी होते तसेच संबंध स्थापित होणे गरजेचे आहे. बांगलादेशात पूर्वी आजच्यासारखी कटुतेची भावना नव्हती. बांगलादेशी मुसलमान दुर्गोत्सवातही सहभागी होत होते आणि शिखांच्या बैसाखीतही उत्साहाने सहभाग नोंदवत होते. बांगलादेशचे जे राष्ट्रगान आहे, ते तर आपल्या रवींद्रनाथांनी लिहिले आहे आणि आजही तेच राष्ट्रगान गायिले जाते. असे असताना दोन देशांमध्ये कटुता असणे दुर्दैवी ठरते. बांगलादेशच्या आजच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्या कुटुंबीयांनी बांगलादेशसाठी त्याग केला. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी अतुलनीय धैर्य दाखविले अन् देशासाठी बलिदानही दिले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशासाठी स्वत:चे आयुष्य पणाला लावले आहे. मोदींनीही देशासाठी आपल्या कौटुंबिक जीवनाचा त्याग केला आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये अशी समानता असताना दोन देशांमधील संबंध चांगले व्हावेत, असे कुणालाही वाटणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी बांगलादेशात जात आहेत. बांगलादेशात गेल्यानंतर मोदी जेव्हा शेख हसीना वाजेद यांना भेटतील तेव्हा या दोन्ही नेत्यांनी परस्परसंबंध सुधारण्यावर आणि दोन्ही देशांच्या विकासाच्या मुद्यावर चर्चा करून आर्थिक, राजकीय आणि सामरिक मुद्यांवर सर्व राजकीय पक्षांमध्ये दोघांनीही सहमती घडवून आणावी. असे झाले तर दोन देशांमधील संबंध पूर्ववत् होऊन दोन्ही देशांच्या विकासाला चालना मिळेल. त्याचप्रमाणे भारतातून बांगलादेशमार्गे बंगालच्या खाडीपर्यंत पोचणार्‍या सर्व नद्यांच्या पाणीवाटप समस्येवरही दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी तोडगा काढला पाहिजे. या नद्यांच्या पाणीवाटपाबाबत तोडगा काढला गेला, तर दरवर्षी दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागाला जो पुराचा तडाखा बसतो, त्या तडाख्यापासूनही नागरिकांची सुटका होईल. शिवाय, दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांमधील राजकीय नेत्यांनी वक्तव्ये देताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील मीडियानेही योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. कोणत्याही कारणाने दोन देशांमधील संबंध बिघडणार नाहीत, यासाठी प्रयत्न झाले, तर दोन्ही देशांसाठी ते फायद्याचेच ठरणार आहे. भारताच्या तुलनेत आज बांगलादेश बराच मागास राहिला आहे. ही बाब पंतप्रधान मोदी यांनी शेख हसीना यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे. बांगलादेशने आपल्या वर्तनात सुधारणा केली, तर भारताकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळू शकते आणि बांगलादेशचा विकास घडवून आणला जाऊ शकतो, याबाबतही हसीना यांच्याशी चर्चा होऊ शकते. मोदींच्या बांगलादेश दौर्‍याची फलनिष्पत्ती सकारात्मक राहील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही

No comments:

Post a Comment