Total Pageviews

Tuesday, 16 December 2014

तोपर्यंत ‘पेशावर’ची पुनरावृत्ती -PESHAWAR TALIBAN ATTACK BRIG HEMANT MAHAJAN

तोपर्यंत ‘पेशावर’ची पुनरावृत्ती पेशावरमधल्या आर्मी पब्लिक स्कूलवरच्या हल्ल्यात शंभरहून अधिक जणांना प्राण गमवावा लागला. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. ‘तेहरिक-ए-तालिबान’सारख्या शेकडो अतिरेकी संघटना पाकिस्तानच्या विविध भागांत स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. या अतिरेकी संघटनांचे ढोबळमानाने तीन भाग पाडतात. पहिला आहे तो भारतविरोधी दहशतवाद्यांचा. यात लष्कर-ए-तोयबा सामील आहे. हिजबुल मुजाहिदीन आहे. जैश-ए-मोहंमद आहे. याच सगळ्या संघटना काश्मिरात काम करतात. २६/११ चा हल्लादेखील लष्करे-तोयबाने घडवून आणला. पाकिस्तानी दहशतवाद्यांचा दुसरा गट जगभर भांडत असतो. जगाचे इस्लामीकरण करण्याचा त्यांचा प्रमुख उद्देश. यात प्रामुख्याने अल-कायदा संघटनेचा उल्लेख करावा लागेल. तालिबानचेही विविध प्रकार, ‘इसिस’सारखी संघटनादेखील याच प्रकारातली. अल-कायदाचे जाळे जगातल्या अनेक देशांमध्ये आहे. भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे शेजारच्या बांगलादेशातही अल-कायदा सक्रिय झालीय. तिसरा प्रकार आहे तो पाकिस्तानी सरकारच्या विरोधात असणा-या दहशतवादी संघटनांचा. पेशावरमधल्या आजच्या हल्ल्याचा सूत्रधार असलेली ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ पाकविरोधी आहे. त्यांना पाकिस्तानात तालिबान्यांची सत्ता आणायची आहे. पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याविरोधात सुरू केलेल्या कारवाया थांबवाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. गेल्या दशकभरात ‘तेहरिक-ए-तालिबान’चे प्रस्थ पाकमध्ये फार वाढले. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील वजिरिस्तान हा भाग ‘तेहरिक’चे बलस्थान मानला जातो. येथे पश्तुनी टोळ्या राहतात. पाक सैन्याने येथे दहशतवादविरोधी कारवाया सुरू केल्या असून तेहरिक-ए-तालिबानदेखील जोरदार प्रत्युत्तर देत आहे. तेहरिक-ए-तालिबानने यापूर्वी पाकिस्तानी नौदलाच्या कराचीजवळच्या तळावर हल्ला चढवला. त्याआधी पाकिस्तानी विमानदलाच्या तळावर हल्ला करून दोन विमाने उद्ध्वस्त केली. काही आठवड्यांपूर्वीच वाघा बॉर्डरवर पाकिस्तानच्या हद्दीत स्फोट घडवून ७०-८० लोक मारले. थोडक्यात पाकिस्तानविरोधी तेहरिक-ए-तालिबान फोफावते आहे. पाकिस्ताननेच इतके दिवस पोसलेले दहशतवादाचे भस्मासुर विक्राळपणे उभे ठाकू लागले आहेत. त्यामुळे संभ्रमित झालेला पाकिस्तान दहशतवाद्यांमध्येदेखील ‘चांगले’, ‘वाईट’ असा भेद करू पाहतेय. अर्थातच चांगले दहशतवादी कोण, तर जे भारतविरोधी कारवाया करतात ते. भारतविरोधी दहशतवादी संघटना पाकिस्तानचे मोठे शस्त्रच आहे. पाकच्या परराष्ट्र धोरणातील महत्त्वाचे हत्यारच जणू. अल-कायदासारख्या संघटनांना जगभरात इस्लामी राज्य आणायचे असल्याने त्यांना फार त्रास द्यायचा नाही, असे म्हणणारा पाकिस्तान "तेहरिक-ए-तालिबान आमच्याविरोधात असल्याने त्यांना आम्ही मारणार,' अशी भूमिका घेताना दिसतो. वास्तविक, दहशतवाद्यांमध्ये चांगले किंवा वाईट असा भेद करता येत नाही. या संघटनांचे एकमेकांशी आतून घट्ट संबंध असतात. कधी ते रक्ताच्या नात्यामुळे, प्रादेशिकतेमुळे किंवा अन्य असतात. त्यांना अलग करता येत नाही. नेमकी हीच चूक पाककडून होतेय. म्हणजे भारतविरोधी भस्मासुर वाढू द्यायचे आणि त्याच वेळी पाकविरोधी दहशतवाद्यांना संपवण्यासाठी संघर्ष करायचा. हे इतके सोपे नाही. त्यातून पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईची पद्धतदेखील चुकीची. देशांतर्गत दहशतवाद्यांना संपवण्यासाठी पाकिस्तान मोठ्या शस्त्रास्त्रांचा वापर करते. तोफखाना, रॉकेट लाँचर्स, हेलिकॉप्टर गनशिप्स, लढाऊ विमाने या मोठ्या शस्त्रास्त्रांमुळे दहशतवाद्यांचे नुकसान कमी होते. स्थानिक रहिवाशांना सर्वाधिक भोगावे लागते. वित्तहानी होते. मृत्यू होतात. पाक सैन्याच्या कारवायांमुळे स्थानिकांमध्ये असंतोष वाढतो. आपल्याकडे एक पौराणिक कथा आहे. राक्षसाच्या रक्ताचा थेंब जिथे पडतो त्यातून नवीन राक्षस जन्माला येतो. पाकिस्तानात हेच घडते आहे. पाक सैन्य दोन दहशतवाद्यांना मारते, तेव्हा चार नवीन जन्माला घालते. यातून चालू राहतो तो सूड, प्रतिसुडाचा कार्यक्रम. दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईचे हे चुकीचे डावपेच पाकने अमेरिकी सैन्याकडून उचलले आहेत. अमेरिकेने हवाई हल्ले करून इराक, अफगाणिस्तानातील दहशतवाद मोडण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी तळांवर प्रचंड हल्ले केले. प्रत्यक्षात अमेरिकेला फार यश आले नाही. इराकमध्ये आज ‘इसिस’ फोफावताना दिसते. अफगाणिस्तानातही तालिबान्यांची ताकद कमी झालेली नाही. या दोन्ही देशांतून अमेरिकी सैन्य पूर्णपणे माघार घेईल, तेव्हा दहशतवादाचा भस्मासुर आणखी पेटून उठेल. चुकीच्या धोरणांमुळे पाकमधला हिंसाचार प्रचंड वाढतोय. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १७ कोटी, तर भारताची १२० कोटींच्या आसपास आहे. २०१४ मधल्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे हजार जणांचा मृत्यू दहशतवादी कारवाया आणि नक्षलवादामुळे झालाय. दहशतवादाला बळी पडलेल्यांची हीच संख्या पाकिस्तानात दहा हजारांपेक्षा जास्त आहे, तरीही पाकिस्तान डोळ्यावर कातडे ओढून बसलाय. अतिरेकी मनोवृत्ती आणि मूलतत्त्ववादी विचारसरणीतून पाकिस्तानात अत्यंत भयानक मिश्रण तयार होत आहे. यातूनच पाकिस्तान जगातला अग्रक्रमाचा धोकादायक देश बनलाय. जगभरातील इस्लामी दहशतवादी पाकिस्तानात स्थिरावू पाहताहेत. जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की तीन-चार महिन्यांनी त्याचे मूळ पाकिस्तानात किंवा अफगाणिस्तानातच सापडून येते. दहशतवादाच्या भयावह स्फोटकांवरच जणू पाकिस्तान बसलाय. या स्फोटात तो कधी बेचिराख होईल हे सांगणे कठीण आहे. मात्र, हिंसाचार सोसण्याची कोणत्याही समाजाची मर्यादा फार नसते. पारंपरिकरीत्या पाकिस्तानचे ८५ टक्के सैन्य भारतीय सीमेवर तैनात असते आणि उरलेले फक्त १५ टक्के सैन्य अफगाण, चीन वगैरे सीमांवर असते. साहजिकच दहशतवादाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानला प्रचंड ताकद खर्च करावी लागेल. तेहरिक-ए-तालिबानच्या शस्त्रधारी अतिरेक्यांची संख्या पंधरा-वीस हजारांपेक्षा जास्त नसल्याचे मानले जाते. अफगाणी सीमेवर त्यांना सर्वाधिक समर्थन मिळते. वजिरिस्तानातील तसेच नजीकच्या आदिवासी, डोंगरी टोळ्यांचा त्यांना पाठिंबा असतो. या दहशतवाद्यांना मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सैन्याला ‘ऑपरेशन’ करावे लागले. यामुळे दहशतवादी अफगाणिस्तानाकडे सरकतील. त्यांचा नायनाट करण्यासाठी पाकला अफगाणिस्तानातही शिरावे लागेल. सध्या दिसते असे की, पाकिस्तानी राज्यकर्ते, सैन्य आणि त्यांचे तज्ज्ञ यांच्यात अद्याप एकमत झालेले नाही. दहशतवाद्यांचा पूर्ण नि:पात करायचा की सोईनुसार वापरत राहायचे, याचा पक्का निर्णय पाकला करावा लागेल. ‘ते आपलेच आहेत,’ अशी भूमिका घेतली जाते. भारतातही असे घडते. माओवाद- नक्षलवाद संपवताना आपल्याकडेही चर्चा झडतात. असाच वैचारिक गोंधळ पाकिस्तानातही आहे. पाक सैन्यदेखील पूर्ण ताकदीने दहशतवादाविरोधात उतरण्यास राजी नसते. राजकीय पक्षांचे दहशतवाद्यांशी भयानक संगनमत आहे. भूमिकांमधला हा गोंधळ मिटल्याखेरीज पाकिस्तान दहशतवादावर नियंत्रण मिळवू शकणार नाही. कारवाई फक्त ‘तेहरिक-ए-तालिबान’वर करून भागणार नाही. शस्त्रास्त्रांची चोरटी आयात-विक्री, अमली पदार्थांचा व्यापार, नकली चलनाचा प्रसार यातून दहशतवादी कारवायांसाठी लागणारा पैसा उभा केला जातो. ‘दहशतवाद’ हा पाकिस्तानातला मोठा उद्योगच होऊन बसलाय. वजिरिस्तानात रस्त्याच्या कडेलासुद्धा शस्त्रनिर्मितीचे कारखाने दिसतात. हे सगळे मुळापासून उखडून टाकण्याची मानसिक तयारी पाक राज्यकर्त्यांमध्ये दिसत नाही. या सगळ्याचा परिणाम अपरिहार्यपणे शेजारी भारतावर होतो. पाकिस्तानी दहशतवादी गट पैसे, माहितीचे आदान-प्रदान, शस्त्रे आदी माध्यमांतून एकमेकांना मदत करत असतात. त्यामुळे त्यांचे अस्तित्व, वाढती ताकद हा भारताच्या दृष्टीने नेहमीच चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानातले अंतर्गत हल्ले, कुरबु-यांमुळे भारतात शांती नांदेल, असे मानण्याचे कारण नाही. पाकिस्तानी सैन्य व्यावसायिक आहे. त्यांनी ठरवले तर ते दहशतवादाचा नायनाट करू शकतात; पण ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते. त्यासाठी सैन्याचे बलिदान आणि प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. भारताचेच उदाहरण घ्या. १९८८ च्या दरम्यान भारताने काश्मीर खो-यातील दहशतवादाविरोधात आघाडी उघडली. आज २५ वर्षांनी काश्मिरातील दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात आपल्याला यश येतेय. जोपर्यंत पाकिस्तानी राज्यकर्ते आणि सैन्याचा निर्धार होत नाही, तोपर्यंत पेशावरची पुनरावृत्ती होतच राहील आणि दुर्दैवाने सध्यातरी पाकिस्तानची मनोवृत्ती दहशतवादाविरोधात असल्याचे दिसून येत नाही.

No comments:

Post a Comment