Total Pageviews

Friday 12 December 2014

संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली

संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील हे एक गौरवशाली पान आहे. मानवी उत्कर्षासाठी कैक शतकांपूर्वी या देशामध्ये विकसित झालेल्या एका उज्ज्वल परंपरेचा हा यथार्थ सन्मान आहे. भारतीय योगसाधना हा केवळ एक व्यायामाचा प्रकार नाही, तर तो मनुष्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग आहे. शतकांमागून शतके उलटली तरी योगाचे महत्त्व कमी तर झालेले नाहीच, उलट आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर त्याची अधिकाधिक निकड भासू लागलेली आहे. अवघ्या जगाला भारतीय योगाचे महत्त्व पटलेले आहे हेच भारताने मांडलेल्या यासंबंधीच्या ठरावाला ज्या उत्साहाने विविध देशांनी पाठिंबा दिला, त्यावरून दिसून येते. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य व विदेश धोरण विभागामध्ये हा जो ठराव भारताच्या वतीने मांडण्यात आला, त्याला त्यांच्या आमसभेच्या १९३ देशांपैकी १७५ देशांनी अनुमोदन दिले आहे. अशा प्रकारच्या एखाद्या ठरावाला एवढ्या मोठ्या संख्येने अनुमोदन मिळण्याची संयुक्त राष्ट्रांतील ही पहिलीच वेळ आहे. विविध देशांच्या गट आणि उपगटांनी आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या पाच स्थायी सदस्य देशांनी भारताच्या या ठरावाला पाठिंबा दिला, यावरून योग आणि एकूणच भारतीय पारंपरिक ज्ञानाप्रती जगाला किती आस्था आहे आणि जग भारताकडे कोणत्या अपेक्षेने पाहते आहे हे कळून चुकते. खरे तर गेल्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर अवघ्या नव्वद दिवसांच्या आत हा प्रस्ताव मूर्त रूपात येणे हेही ऐतिहासिक आहे. भारतीय योगसाधनेची पहिली ओळख जगाला स्वामी विवेकानंदांनी करून दिली होती. त्यानंतर अनेक भारतीय योगप्रसारकांनी विविध देशांमध्ये योगरूचीचे रोपटे लावले. योगगुरू बी. के. अय्यंगारांपासून बाबा रामदेवांपर्यंत अनेकांनी जगाला योगाच्या फायद्यांची ओळख करून दिली. चंगळवाद बोकाळत चाललेल्या आजच्या जगात नानाविध व्याधी विकारांचा विळखा नित्य आवळला जात असताना योगासारख्या साध्या, सोप्या स्वयंसाधनेच्या पद्धतीतून शारिरिक व मानसिक तंदुरुस्तीची गुरूकिल्ली देशोदेशी पोहोचली. अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही योगामध्ये रुची निर्माण झालेली आहे. त्यांच्या व्हाईट हाऊसमध्ये दरवर्षी ईस्टर एग रोल नावाची मोठी मेजवानी दिली जाते, त्या १३५ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक समारंभात ओबामांच्या पत्नीने २००९ सालापासून योगाचा अंतर्भाव केलेला आहे. नरेंद्र मोदी अलीकडेच अमेरिकेला गेले तेव्हा त्यांचा नवरात्राचा कडक उपवास सुरू होता. केवळ गरम पाण्याखेरीज त्यांनी अन्नाचा कणही त्या काळात घेतला नव्हता. इतके असूनही अत्यंत दगदगीचा दौरा त्यांनी लीलया पार पाडला होता, हे ओबामांनी प्रत्यक्ष पाहिले. व्हाईट हाऊसमधील मेजवानीच्या वेळी त्याबाबतचे कुतूहल त्यांनी मोदींपाशी व्यक्त केले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षालाही एकीकडे आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमात काही वेळ योगासाठी द्यावासा वाटतो आणि आपण मात्र आपल्याच या पारंपरिक स्वयंसाधनेची उपेक्षा करतो ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. स्वामी विवेकानंद सार्ध शतीच्या निमित्ताने जी सामूहिक सूर्यनमस्कार मोहीम राबवली गेली, तिच्यावर झालेली टीका आठवा. आपल्याकडील चांगल्या गोष्टी पाश्‍चात्त्यांनी प्रशंसिल्या तरच चांगल्या म्हणायच्या का? संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दरवर्षी ११८ दिवस साजरे होतात. योग दिवसाच्या निमित्ताने जगभरामध्ये त्याविषयी जनजागृती होईल. योगाचे महत्त्व पटलेले लोक योगसाधनेकडे वळतील. साहजिकच योगशिक्षक, योगविषयक साहित्य यांची जगाला जरूरी भासेल. भारताला या उभरत्या संधीचा उपयोगही करून घेता आला पाहिजे, अन्यथा योगावरची चिनी पुस्तके उद्या बाजारात आली तरी आश्चर्य वाटू नये. वसुधैव कुटुंबकम् ही आपली संस्कृती आहे. आपण भारतीय अवघी वसुधा ही आपलेच एक कुटुंब मानतो. त्यामुळे जे जे आपणासी ठावे, ते ते सकळांसी सांगावे ही आपली वृत्ती आहे. त्यामुळे भारतीय प्राचीन परंपरेतील योग, आयुर्वेद, भगवद्गीतेसारख्या तत्त्वज्ञानाचे नवनीत जगभरामध्ये जायला हवे. त्यातून भारताची महत्ता जगाला उमजेल

No comments:

Post a Comment