Total Pageviews

Wednesday, 17 December 2014

सिडनी ते पेशावर-दहशतवादाचे थैमान

दहशतवादाच्या ‘हिरव्या’ संकटाने संपूर्ण जगच व्यापले आहे. सिडनीतील ‘लिंट चॉकलेट कॅफे’वरील हल्ला काय किंवा पेशावरमधील सैनिकी शाळेत तालिबान्यांनी केलेले ‘निरागसते’चे नृशंस हत्याकांड काय, इस्लामी दहशतवादाचे हे थैमान कायमचे संपविण्यासाठी आता जागतिक स्तरावरच एक सूत्रबद्ध आणि निर्णायक कारवाई होण्याची गरज आहे. सिडनी ते पेशावर इस्लामी दहशतवादाचे थैमान-SAMNA EDITORIAL दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरामधील ‘लिंट चॉकलेट कॅफे’मध्ये इस्लामी दहशतवाद्याने केलेले ओलीसनाट्य जगाने पाहिले. त्यापाठोपाठ मंगळवारी तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील पेशावरमध्ये एका सैनिकी शाळेवर हल्ला करून सुमारे शंभरावर निरपराध शाळकरी चिमुरड्यांचे नृशंस हत्याकांड घडविले. ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वजिरीस्तान भागात पाक लष्कराने तालिबानी दहशतवाद्यांविरुद्ध जी धडक कारवाई मध्यंतरी केली त्याचा बदला म्हणून सैनिकी शाळेवर हा हल्ला करण्यात आला असे या संघटनेतर्फे सांगण्यात येत आहे. म्हणजे बदला पाक लष्कराविरुद्ध, पण बळी गेले ते शंभरावर निष्पाप चिमुरडे. मलाला युसूफझाई या पाकिस्तानी मुलीला अलीकडेच शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचाही सूड म्हणून या शाळकरी मुलांचा जीव तालिबान्यांनी घेतला असे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानसारखे इस्लामी दहशतवाद्यांचे पोशिंदे राष्ट्रच आता या दहशतवादाच्या रक्तरंजित आवर्तात अडकले आहे. पेशावरमध्ये तालिबान्यांनी केलेला चिमुरड्यांच्या रक्तामांसाचा चिखल त्याचाच पुरावा आहे. इस्लामी दहशतवादापासून जगातील छोटे-मोठे, इस्लामी-बिगरइस्लामी कोणतेच राष्ट्र मुक्त राहिलेले नाही. अमेरिकेवर हल्ले झाले. ब्रिटन, स्पेन, फ्रान्समध्ये हल्ले झाले. हिंदुस्थानातील मुंबई, दिल्ली, कोलकातासारख्या शहरांवरही भयंकर दहशतवादी हल्ले झालेच आहेत. सगळ्यात सुरक्षित मानल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियातील सिडनी येथेदेखील हल्ला करून इस्लामी दहशतवाद्यांनी आव्हान उभे केले आहे. दिल्लीतील संसद भवनात अतिरेकी घुसले होते. मुंबईच्या ताज, कामा इस्पितळात घुसून कसाब व त्याच्या दहशतवादी टोळक्याने अनेकांना ओलीस ठेवले होते, अनेकांना निर्घृणपणे ठारही मारले होते. तसाच प्रकार सिडनीतील ‘लिंट चॉकलेट कॅफे’मध्ये घडला. शेख हारून मोनीस हा दहशतवादी या कॅफेत घुसला व त्याने ५० जणांना बंदी बनविले. हे ओलीसनाट्य १८ तास चालले हे खरे, पण ऑस्ट्रेलियन पोलिसांनी अत्यंत संयमाने तसेच थंड डोक्याने हे ओलीसनाट्य खतम केले. कारवाईत दोघांचा मृत्यू झाला हे खरेच, पण इतर सर्व ओलिसांची सुटका पोलिसांनी केली. दहशतवादी हारून मोनीसचा खात्मा केला. याच शेख मोनीसने ओलिसांपैकी काही जणांच्या डोक्यावर बंदूक रोखून त्यांना अरबी भाषेत लिहिलेला फलक बाहेर दाखवायला लावला. त्या फलकावर ‘देव नाही तर अल्ला आहे व मोहंमद हा त्याचा दूत आहे’ असे लिहिले होते. अर्थात त्या फलकावर जे लिहिले ते सत्यच मानावे लागेल. अल्ला आहेच म्हणून तर त्या दहशतवाद्याचा खात्मा झाला व पन्नास निरपराध लोकांची सुटका झाली. देव काय किंवा अल्ला, गॉड काय, कोणत्याही ईश्‍वरी शक्तीस अशा प्रकारचे रक्तपात मान्य नाहीत. स्वत:स मुस्लिम धर्मगुरू म्हणवून घेणारा शेख हारून मोनीस हा इराणी शरणार्थी होता व त्याला ऑस्ट्रेलियाने ‘निर्वासित’ म्हणून आश्रय दिला होता. अर्थात याच निर्वासिताने ऑस्ट्रेलियाच्या पाठीत खंजीर खुपसला. म्हणजे ऑस्ट्रेलियाने दूध पाजले तरी आपण जहरच ओकणार व इस्लामसाठी मरणार व मारणार हेच इस्लामी दहशतवाद्यांचे धोरण आहे. ऑस्ट्रेलियात सर्वच धर्मांसाठी मोकळे वातावरण आहे, पण तेथील राज्यकर्त्यांनी मुस्लिमांच्या धर्मांध कारवायांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न केला व तसे इशारे मुस्लिम धर्मगुरूंना दिले. काही वर्षांपूर्वी याच ऑस्ट्रेलियात ‘वंशवाद’ इतका उफाळला होता की, त्यातूनच हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थ्यांवर खुनी हल्ले झाले होते. अद्यापि ही खदखद पूर्णपणे शांत झालेली नाही. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच सिडनीत दहशतवादी हल्ला केला गेला. ऑस्ट्रेलियाने आपले सैन्य अफगाण युद्धात पाठवले होते. तेथे ऑस्ट्रेलियाचे काही सैनिक मृत्युमुखी पडले. त्याच रागातून शेख हारून याने सिडनीतील ओलीसनाट्य घडवून आणले. हे नाट्य तूर्त फसले असले तरी भविष्यात ऑस्ट्रेलियास अधिक काळजी घ्यावी लागेल व इस्लामी धर्मांध तसेच माथेफिरूंना चाप लावावा लागेल. अर्थात त्यांना चाप लावताना सुक्याबरोबर ओलेही जळण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने हे नाहक जळणे नेहमीच हिंदुस्थानींच्या वाट्यास येते. ऑस्ट्रेलियात जे घडले ते भोग हिंदुस्थान वर्षानुवर्षे सहन करीत आहे. अशाप्रसंगी हिंदुस्थानात जो गोंधळ उडतो तसा गोंधळ सिडनीत उडालेला दिसला नाही. तेथे सर्व कारवाई एका शिस्तीत घडली. ऑस्ट्रेलियन राजकारण्यांनी स्वत:चे ‘फोटू’ व ‘नावे’ बातम्यांमध्ये यावीत यासाठी घटनास्थळी धावाधाव केली नाही. पाकिस्तानात तर रोजच कुठे ना कुठे धमाके होत असतात. त्यामुळे पाकड्या राज्यकर्त्यांना अशा ठिकाणी भेट देणे एवढे एकच काम सत्ताधारी म्हणून करावे लागेल. अर्थात यातील गमतीचा भाग सोडला तर दहशतवादाच्या ‘हिरव्या’ संकटाने संपूर्ण जगच व्यापले आहे. सिडनीतील ‘लिंट चॉकलेट कॅफे’वरील हल्ला काय किंवा पेशावरमधील सैनिकी शाळेत तालिबान्यांनी केलेले ‘निरागसते’चे नृशंस हत्याकांड काय, इस्लामी दहशतवादाचे हे थैमान कायमचे संपविण्यासाठी आता जागतिक स्तरावरच एक सूत्रबद्ध आणि निर्णायक कारवाई होण्याची गरज आहे

1 comment: