कर्मठ तालिबान, दगाबाज पाकिस्तान
पालकांनो, आपली मुलं सांभाळा!SAMANA EDITORIAL
पाकिस्तानच्या लष्करी शाळेतील लहान मुलांच्या रक्तपातानंतर सार्या जगाची झोप उडाली आहे. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना कवटाळून बसले आहेत. कुणी माथेफिरू आपल्या बाळाला टार्गेट तर करणार नाही ना? अशी भीती जगभरातील मातांना वाटत आहे. या जगाने यापूर्वी असंख्य धरणीकंप, आगडोंब, महापूर पाहिले आहेत. नैसर्गिक आपत्तीत गावेच्या गावे, शहरेच्या शहरे नष्ट झालेली उघड्या डोळ्यांनी बघितली आहेत. महासंहारक बॉम्बस्फोट मालिकांमध्ये निरपराधांच्या झालेल्या चिंधड्याही पाहिल्या आहेत, परंतु १६ डिसेंबर रोजी तालिबानी अतिरेक्यांनी पेशावरमध्ये घडवून आणलेला १३२ लहान विद्यार्थ्यांचा ‘नरसंहार’ मानवतेच्याच चिंधड्या उडविणारा होता. मुलांना शिकविणार्या त्या शाळेतील शिक्षिकेलाही तालिबानी अतिरेक्यांनी विद्यार्थ्यांसमोर जिवंत जाळले. महिलांनी शिकायचे नाही, महिलांना शिकवायचेही नाही. फक्त घरात आणि बुरख्यात निमूटपणे ‘शरीयत’ कायद्याप्रमाणे अंग झाकून राहायचे. नाहीतर भरचौकात सर्वांसमोर तुमचा शिरच्छेद अटळ आहे, असा दंडक घालणार्या तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणप्रमाणे आता पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणात हैदोस घातला असून पाकिस्तानी लष्कराने जर तालिबानी अतिरेक्यांच्या पहाडी भागात घुसून त्यांचा लवकर खात्मा केला नाही तर हे तालिबानी संकट हिंदुस्थानात शिरण्याची शक्यता असून आपल्या देशातील सर्व शाळांना धोका निर्माण झाला आहे. नव्हे २००८ साली त्यांनी त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मुंबईतील गोरेगाव, मोतीलाल नगरमधील फईम अन्सारी व बिहारमधील मधुबनीचा सबाऊद्दीन शेख या स्थानिक देशद्रोह्यांनी त्यात भाग घेतला होता. त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट केला होता. ताज, ओबेरॉय, नरीमन हाऊस, छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून अजमल कसाब व त्याच्या साथीदारांना घटनास्थळी कसे पोहोचायचे याचे नकाशे पाठवून या दोघांनी मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे पाकिस्तानी अतिरेकी मुंबईत २६ नोव्हेंबर रोजी घुसले व त्यांनी गुजरातच्या मासेमारी बोटीतील चार खलाशांसह १७० जणांना ठार मारले. मुंबईतील स्थानिकांची जर त्यांना मदत झाली नसती तर पाकिस्तानी अतिरेकी कदापि मुंबईवर हल्ला करू शकले नसते. तेव्हा पाकिस्तानला छुपी मदत करणारेही देशाचे खरे शत्रू आहेत.
मुंबई शहरात गेल्या दीड दशकात शंभरच्यावर बॉम्बस्फोट झाले असून त्यात ६०० च्या वर निरपराध मारले गेले आहेत. हे सर्व बॉम्बस्फोट पाकिस्तानातील आयएसआय व लष्कर-ए-तोयबाने मुंबईतील स्थानिकांची मदत घेऊन घडवून आणलेले आहेत. तेव्हा जोपर्यंत पाकिस्तानी अतिरेक्यांना मदत करणार्या पाकिस्तानी हस्तकांना ठेचले जाणार नाही, त्यांना फाशीसारखी कठोर शिक्षा होणार नाही तोपर्यंत मुंबईवर हल्ले हे होतच राहतील. गेल्या तीन वर्षांत ‘एटीएस’ने पाकिस्तानी हस्तकांची पूर्णपणे नाकाबंदी केल्याने मुंबईत एकही बॉम्बस्फोट घडू शकला नाही. २०११ साली ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार व दादर येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी तीन बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यात २७ ठार तर १२७ जण गंभीर जखमी झाले होते, परंतु आता तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानात जे काही तांडव केले आहे त्याचे पडसाद सार्या जगभरात उमटल्याने हिंदुस्थानातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईतही असा हल्ला कधीही होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी सर्व शाळांच्या संचालकांना शाळेभोवती भिंत बांधून सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
‘तालिबानी अतिरेकी काहीही करू शकतात. नायजेरियाच्या बोको हराम या इस्लामी संघटनेच्या अतिरेक्यांनी या वर्षीच्या एप्रिल महिन्यात तर आठ ते पंधरा वर्षांच्या शाळेतील ३०० विद्यार्थिनींचे अपहरण करून त्यांना दूरवर जंगलात ठेवले आहे व त्यांचे लैंगिक शोषण करण्यात येत आहे. काहींना ठार मारण्यात आले आहे. आता पुन्हा याच हरामांनी आणखी १०० महिलांचे नायजेरियातून अपहरण केले असून ३३ महिलांना ठार मारले आहे. अपहरण करण्यात आलेल्या मुली व महिला या ख्रिश्चन असून त्यांना रोज नमाज पढण्यास सांगण्यात येते. तेव्हा इस्लामच्या नावाखाली जगभरात अतिरेक्यांनी जे काही थैमान घातले आहे ते ऐकले व बघितले की मन सुन्न व खिन्न होते. पूर्वी अतिरेकी म्हणजे अशिक्षित समजले जायचे, परंतु आज अतिरेकी कारवायांमध्ये उच्चशिक्षित तसेच टेक्नोसॅव्ही मुस्लिम तरुणही ‘इसिस’सारख्या खतरनाक इस्लामी संघटनेत सामील होत असून अलीकडेच बंगळुरूमधील मेहदी मसरूर विश्वास या उच्चशिक्षित तरुणाला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन महिन्यांपूर्वी मुंबई एटीएसच्या अधिकार्यांनी कुर्ल्यातून अनिस अन्सारी या इंजिनीयरला अटक केली आहे. हा अनिस इंटरनेटवरून ‘इसिस’च्या संपर्कात होता. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील अमेरिकन शाळेवर हल्ला करण्याचा ‘प्लान’ अनिस अन्सारीने आखला होता, परंतु त्याच्या दुर्दैवाने तो एटीएसच्या हाती लागला; परंतु मेहदी विश्वास व अनिस अन्सारीसारखे शेकडो न पकडले गेलेले तरुण ‘इराक’मधील ‘इसिस’च्या संपर्कात असून या सर्वांना सार्या जगावर इस्लामचे राज्य आणायचे आहे.
त्यासाठी या नामर्दांनी लहान लहान बालकांना, महिलांना टार्गेट केले आहे. तेव्हा मायबाप जनहो सावधान! आपल्या मुलांना, पोरींना सांभाळा!! पेशावर हत्याकांडानंतर माणुसकीशी कोणतेही देणेघेणे नसलेल्या तालिबानी सैतानांचा पाकिस्तानने आता खात्मा करण्यास व फाशी देण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्थानविरुद्ध उभा केलेला हा भस्मासुर स्वत:वरच उलटल्यानंतर पाकिस्तानला हे शहाणपण सुचले आहे; परंतु दगाबाज पाकिस्तानवर आपण विसंबून राहाता कामा नये. आपल्या संरक्षणासाठी आपणच सज्ज राहिले पाहिजे हे आमच्या सुज्ञ देशवासीयांनो लक्षात ठेवा!
हिंदुस्थानच्या ‘एनआयए’ व महाराष्ट्राच्या ‘एटीएस’ या तपास यंत्रणांनी रियाज भटकळची इंडियन मुजाहिद्दीन ही संघटना त्याच्या बहुसंख्य साथीदारांना अटक करून संपवून टाकली. पाकिस्तानच्या आयएसआय व लष्कर-ए-तोयबाचाही आता हिंदुस्थानात तितकासा प्रभाव राहिलेला नाही. आता फक्त हिंदुस्थानसमोर इराकमधील इस्लामी स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया म्हणजे ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे व पाकिस्तानातील तालिबानी अतिरेक्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जगभरातील सुन्नी मुस्लिम तरुणांना या संघटनेचे आकर्षण आहे. फेसबुक, व्हॉटस् ऍप, ट्विटर आदी सोशल नेटवर्किंगद्वारे धर्मांध मुस्लिम एकत्र येऊन सर्वत्र जातीय व धर्मांधतेचे विष पेरत आहेत. या सोशल साइटस्वर जर लक्ष केंद्रित केले तर बंगळुरूच्या मेहदी विश्वास व मुंबईच्या (कुर्ला) अनिस अन्सारीसारखे शेकडो इंटरनेट जिहादी (लोन वुल्फ) पोलिसांच्या हाती लागतील, परंतु उच्चशिक्षित जिहादी व अशिक्षित तालिबानी यांच्यात फरक तो काय? एकाकीपणे इंटरनेटवर कटकारस्थाने करणारे हे ‘लोन वुल्फ’ ही तितकेच कर्मठ विचारसरणीचे असून अशा या Radical तरुणांना तालिबानप्रमाणे मृत्युदंडाची शिक्षा दिली पाहिजे.
- प्रभाकर पवार
No comments:
Post a Comment