दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांनी भर विधानसभेत केजरीवाल आणि कंपनीच्या ढोंगाचा बुरखा फाडला आहे. विधानसभेतील सगळ्यात मोठा पक्ष आज विरोधी पक्षात बसला आहे व अल्पमतातील पक्षाने सत्तेसाठी ‘सौदा’ केला आहे, हा विचार हर्षवर्धन यांनी मांडला व केजरीवाल यांच्याकडे त्याचे उत्तर नाही.
डॉ. हर्षवर्धन, शाब्बास!
ढोंग्यांचे बिंग फुटले
दिल्ली विधानसभेत भ्रष्ट कॉंग्रेसच्या पाठिंब्याने अरविंद केजरीवाल यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार केजरीवाल आणि कंपनीने गमावला आहे. त्याच भ्रष्टाचार्यांचा पाठिंबा घेऊन केजरीवाल हे दिल्लीत झाडू मारण्याची घोषणा करीत असतील तर ते ढोंग आहे. भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील नेते डॉ. हर्षवर्धन हे एक स्वच्छ व प्रामाणिक राजकारणी असल्याचे प्रमाणपत्र खुद्द केजरीवाल यांनीच दिले आहे. हर्षवर्धन हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते व आता दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. डॉ. हर्षवर्धन यांनी भर विधानसभेत केजरीवाल आणि कंपनीच्या ढोंगाचा बुरखा फाडला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी घणाघाती भाषण केले व केजरीवाल टोळीचा खोटारडेपणा उघड केला. केजरीवाल जनतेला मूर्ख बनवीत आहेत. केजरीवाल यांचे खास आदमी मनीष शिसोदिया आहेत व केजरीवाल यांच्या सरकारात आता ते मंत्री आहेत. शिसोदिया यांच्याकडे बोट दाखवून डॉ. हर्षवर्धन यांनी विचारले, ‘‘स्वच्छ चारित्र्याच्या आणि पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारता ना, मग मनीष सिसोदिया चालवीत असलेल्या ‘कबीर’ एनजीओला अमेरिकेच्या फोर्ड फाऊंडेशनकडून दिलेल्या ३ लाख ६९ हजार डॉलर्सचा मतलब काय आहे?’’ इतकी प्रचंड रक्कम कोणी उगाच दानधर्म म्हणून वाटत नाही. डॉ. हर्षवर्धन यांचा सवाल बिनतोड आहे. परदेशी पैशाने देशात अस्थिरता आणि अराजक निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे काय, यावरही आता जाहीर चर्चा व्हायला हवी. ‘आयएसआय’चा पैसा अतिरेक्यांना हिंदुस्थानात बॉम्बस्फोट घडविण्यासाठी मिळतो. मग अमेरिकेचा पैसा
‘व्हाईट कॉलर’ अराजकवाद्यांना
मिळत आहे काय? हिंदुस्थानातील सगळेच राजकारणी भ्रष्ट व नालायक असल्याची गर्जना केजरीवाल यांनी केली होती, पण ज्या भ्रष्ट व नालायक कॉंग्रेसला दिल्लीच्या जनतेने लाथा घालून हाकलून दिले त्याच कॉंग्रेसचा टेकू त्यांनी आता घेतला आहे. कॉंग्रेस हीच देशातील भ्रष्टाचाराची गंगोत्री असल्याचे केजरीवाल म्हणाले होते. त्याच भ्रष्टाचाराच्या गंगोत्रीत ते आज आंघोळीस उतरले आहेत. दुसर्यावर बेइमानीचे आरोप करणे सोपे असते, पण केजरीवाल स्वत:च स्वत:ला इमानदारीचे प्रमाणपत्र देत आहेत. हा वैचारिक गोंधळ आहे. हर्षवर्धन यांनी त्यांच्या भाषणात केजरीवाल यांना रक्तबंबाळ केले. खरे तर केजरीवाल व त्यांची टोळी यांनी देशभावनेशी खेळ केला आहे. त्याबद्दल त्यांनी देशाची माफीच मागायला पाहिजे. बाटला हाऊस चकमकीत जॉंबाज पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा शहीद झाले आणि तीन खतरनाक अतिरेकी मारले गेले, पण केजरीवाल म्हणतात, ही चकमक खोटी आहे. मोहनचंद शर्मा यांच्या हौतात्म्याचा हा अवमान आहे. बाटला हाऊस चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांविषयी केजरीवाल यांना इतका कळवळा का? कश्मीरप्रश्नी सार्वमत घ्यावे व पराभव झाला तर कश्मीर पाकिस्तानच्या हवाली करावा, अशी भूमिका ‘आप’चे नेते घेतात. हा देशद्रोहच आहे. प्रखर राष्ट्रवादी असलेल्या आम आदमींचा व सीमेवर लढणार्या सैनिकांचा अपमान आहे. याबद्दल केजरीवाल माफी का मागत नाहीत? कश्मीरात सार्वमत घेण्याची मागणी आजपर्यंत कुणीच केली नाही. ‘आप’वाल्यांनी केली. परदेशी पैशांतून बाहेर पडलेली ही देशद्रोही बांग आहे काय? केजरीवाल यांना जे सवाल केले गेले त्यावर ते मूग गिळून बसले. त्यामुळे दिल्लीत वीज, पाणी स्वस्त झाले तरी मुगाचे भाव प्रचंड वाढणार आहेत! केजरीवाल यांनी असेही जाहीर केेले होते की, मी व माझे मंत्री लालबत्तीच्या गाडीतून फिरणार नाही. वास्तविक दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लालबत्तीच्या गाड्या हटवल्या जात आहेत. तेव्हा त्यासाठी केजरीवाल
स्वत:ची टिमकी
का वाजवीत आहेत? बरं, केजरीवाल सरकारच्या मंत्र्यांनी आता ‘मस्त’ इनोव्हा गाड्या स्वीकारल्या आहेत व गाडी-घोड्याच्या आधीच्या भूमिकेला टांग मारलीच आहे! सरकारी बंगला घेणार नाही वगैरे घोषणा केजरीवाल यांनी केल्या, पण दिल्लीच्या टिळक मार्गावर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासाठी ९००० चौ. फुटांची दोन घरे ‘तयार’ केली जात आहेत आणि त्यावर सरकारी तिजोरीतून वारेमाप खर्च होत असल्याचा स्फोट डॉ. हर्षवर्धन यांनी करताच केजरीवाल व त्यांच्या मंडळास घाम फुटला. त्यांनी तत्काळ ‘मला छोटं घर चालेल’ अशी सारवासारव केली, पण मुळात सरकारी बंगला व गाडी-घोडा न वापरण्याची त्यांची घोषणा होती व ती पहिल्या चोवीस तासांतच हवेत विरली. मी व माझे मंत्री ‘आम’ जनतेप्रमाणे रोज ‘मेट्रो’ने सफर करू व मंत्रालयात जाऊ, असेही केजरीवाल यांनी सांगितले होते. मात्र हे आश्वासनही ते स्वत:च विसरून गेले. दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना विस्मृतीचा आजार इतक्या लवकर जडेल असे वाटले नव्हते, पण ही ‘बिमारी’ त्यांना सत्तापदी बसल्यानंतर लगेच जडली आहे हे देशातील जनतेने आता लक्षात घेतले पाहिजे. हर्षवर्धन यांनी त्यांच्या भाषणात केजरीवाल कंपनीचे थोबाड रंगविणारे अनेक मुद्दे मांडले. हर्षवर्धन यांचे भाषण जोरकस होते. त्यांची तळमळ योग्यच आहे. आपल्या देशातील लोकशाहीचा नेहमीच डंका पिटला जातो. मात्र सध्या दिल्लीत जो तमाशा सुरू आहे तो पाहिल्यावर ही कसली लोकशाही असाच प्रश्न मनात येतो. विधानसभेतील सगळ्यात मोठा पक्ष आज विरोधी पक्षात बसला आहे व अल्पमतातील पक्षाने सत्तेसाठी ‘सौदा’ केला आहे, हा विचार हर्षवर्धन यांनी मांडला व केजरीवाल यांच्याकडे त्याचे उत्तर नाही. हर्षवर्धन यांच्या भाषणाने दिल्लीतील थंडीतही केजरीवाल यांना घाम फुटला असेल व त्यांनी सरकारी कार्यालयातील एअर कंडिशनर लावून घाम पुसला असेल
No comments:
Post a Comment