मतदान केल्याचा राग
वृत्तसंस्था
ढाका, ७ जानेवारी
बांगलादेशातील नवनिर्वाचित शेख हसीना सरकारला विरोध करणार्या बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टी आणि बंदी असलेल्या ‘जमात सिबिर’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देशातील हिंदू सामुदायावर हल्ले सुरू केले आहेत.रविवारी झालेल्या निवडणुकीला हिंसक वळण लागल्यानंतर देशातील विविध जिल्ह्यांमध्ये वर्षानुवर्षे राहणार्या हिंदू कुटूंबांवर संघटीत हल्ले होत आहेत. त्यांची घरे, दुकाने आणि काही ठिकाणी,तर शेतीतील उभे पीक जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.हल्ल्यांमुळे दहशतीच्या सावटात असलेल्या हिंदूधर्मियांनी मंदिरांमध्ये आणि मोकळ्या मैदानावर आश्रय घेतला आहे. प्रशासन संरक्षणाची खात्री देत नसल्याने लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.
ठाकूरगाव, दिनाजपूर, रंगपूर, बोगरा, चितगॉन्ग याभागांमध्ये झालेल्या भीषण हिंसाचारामुळे लोकांना १९७१ च्या परिस्थितीची आठवण होत आहे. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारातही हिंदूंनाच लक्ष्य करण्यात आले होते.अभयनगर या हिंसाचारग्रस्त भागातील मासेमार बिस्वजीत सरकार यांच्या मते,१९७१ सारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी पाकिस्तानचे लष्कर आणि रझाकारांनी आमच्या गावाला आग लावली होती, अशी आठवण सांगून ते म्हणाले की, आताही दंगेखोरांनी आपले घर आणि दुकानासह मासे पकडण्याचे जाळे आग लावून बेचिराख केले आहे. घरकाम करणार्या मायारानी यांचीही कथा साधारणत: अशीच आहे. ‘नेसत्या साडीनिशी मी घराबाहेर पडले म्हणून वाचले. माझी झोपडी तर जाळलीच पण त्यातील पाच किलो तांदूळही लूटला,’ अशी व्यथा तिने व्यक्त केली.
‘मतदान केले, आता भोगा’
गावकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार जमात सिबिरच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत मतदान न करण्याची धमकी दिली होती. मतदानाच्या दिवशी संध्याकाळीच चार-पाचशे जणांच्या जमावाने गावावर हल्ला केला. दोन तासांपर्यंत कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला. दरम्यान त्यांनी शेकडो बॉम्बस्फोट केले आणि शेकडो घरांना लुटून आगी लावल्या. परिणामी हजारो लोक गाव आणि घर सोडून निघून गेले. लोकांनी नद्या ओलांडून जंगलांमध्ये आश्रय घेतला आहे. मालोपारा नजीकच्या ‘ईस्कॉन’ या कृष्णमंदिरात बहुतांश पीडितांनी आश्रय घेतला आहे. इशारा देऊनही मतदान का केले ? आता त्याचे परिणाम भोगावेच लागतील, अशी बडबड आंदोलक करीत होते.
...मग आले पोलिस !
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसा सुरू होताच त्यांनी सत्तारूढ अवामी लिगचे नेता आणि पोलिस-प्रशासनाला फोन करून घटनेची माहिती दिली. पण पोलिस येईपर्यंत दंगेखोरांनी सारे काही बेचिराख केले होते. चितगॉन्गमध्ये दोन हजार आंदोलकांच्या जमावाने एक मंदिर लूटण्याचा प्रयत्न केला पण स्थानिकांच्या प्रतिकारामुळे ते यशस्वी झाले नाहीत. मात्र, चितगॉन्ग आणि दिनाजपूरमध्ये त्यांनी शेकडो घरे आणि दुकानांना आगी लावल्या.
No comments:
Post a Comment