बांगलादेशातील हिंदूंवर रोज भयंकर हल्ले होत असताना १०० कोटी हिंदू असलेला हिंदुस्थान मात्र शांत आहे. हिंदुस्थानचे सरकार बांगलादेशी हिंदूंसाठी काय करते आहे? याचा जाब देशभरातील हिंदूधर्मीयांनी कॉंग्रेजी नेत्यांना विचारायलाच हवा.
बांगलादेशी हिंदूंना
मरू द्यायचे काय?
बांगलादेशातील हिंदूंवर धर्मांध मुस्लिमांकडून भीषण हल्ले सुरू आहेत. प्रत्येक हिंदूधर्मीयाने अस्वस्थ व्हावे अशा बातम्या ढाक्याहून येत आहेत. बांगलादेशात ५ जानेवारीला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर हिंदूंवरील हल्ल्यात प्रचंड वाढ झाली असून तेथील हिंदूधर्मीय अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहेत. हिंदूंची घरे-दारे, दुकाने आणि हिंदू देव-देवतांची मंदिरे धर्मांधांच्या निशाण्यावर आहेत. रात्री-अपरात्री अचानक धर्मांधांचा जमाव हिंदू वस्तीत घुसतो. घरादारांची तोडफोड करतो. जाळपोळ करतो. दुकानांची नासधूस करतो. हिंदू आया-बहिणींवर अत्याचार करतो. संख्येने कमी असलेले हिंदूधर्मीय ना आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकतात ना हल्लेखोरांचा प्रतिकार करू शकतात. धर्मांधांचे अत्याचार सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच बांगलादेशी हिंदूंसमोर नाही. बांगलादेशातील निवडणुकांत शेख हसिना आणि खालिदा झिया या दोन आजी-माजी पंतप्रधानांमध्ये कायम रस्सीखेच सुरू असते. यावेळी शेख हसिना यांच्या सत्तारूढ अवामी लिग पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. निवडणुकीत बांगलादेशातील
हिंदूधर्मीयांनी हसिना यांच्या पक्षाला
एकगठ्ठा मतदान केल्याचा धर्मांधांना राग आहे. त्यामुळेच निवडणुकीवर बहिष्कार टाकणार्या खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमाते-ए-इस्लामी या धर्मांध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंना लक्ष्य करणे सुरू केले आहे. निवडणुका झाल्यापासून गेल्या १५ दिवसांमध्ये तब्बल ३२ जिल्ह्यांमध्ये धर्मांधांनी हिंदूंवर हल्ले चढवले आहेत. कट्टरपंथी मुस्लिमांनी १५ दिवसांत हिंदूंची ४८५ घरे उद्ध्वस्त केली. ५७८ दुकानांची संपूर्ण लुटालूट आणि नासधूस केली. १५२ मंदिरांची तोडफोड करून देव-देवतांच्या मूर्तींची घोर विटंबना केली. बांगलादेशातील हिंदूंवर रोज भयंकर हल्ले होत असताना १०० कोटी हिंदू असलेला हिंदुस्थान मात्र शांत आहे. हिंदुस्थानचे सरकार बांगलादेशी हिंदूंसाठी काय करते आहे? याचा जाब देशभरातील हिंदूधर्मीयांनी कॉंग्रेजी नेत्यांना विचारायलाच हवा. मुळात तेथील राजकारणात हिंदूंचा हकनाक बळी जात आहे. बांगलादेशची लोकसंख्या १६ कोटींच्या आसपास आहे आणि तेथील हिंदूंची लोकसंख्या ही जेमतेम १० टक्के म्हणजे सुमारे दीड कोटी इतकी आहे. मुळात ९० टक्के मुसलमानांच्या देशात १० टक्के हिंदू त्यांना हवे असलेले सरकार सत्तेवर आणूच शकत नाही. पुन्हा ज्या शेख हसिनाचे सरकार सत्तेवर आले तेही हिंदुत्ववादी असण्याची सूतराम शक्यता नाही. असे असताना
‘वड्याचे तेल वांग्यावर’ काढून
तेथील हिंदूंवर हल्ले का होत आहेत? हिंदूंच्या मंदिरांची नासधूस का केली जात आहे? याचा जाब हिंदुस्थानने बांगलादेशच्या राज्यकर्त्यांना विचारायलाच हवा. १९७१ साली हिंदुस्थाननेच आपले लष्कर पाकिस्तानात पाठवून पाकड्यांच्या अत्याचारी राजवटीतून बांगलादेशला मुक्ती दिली. पाकिस्तानची दोन शकले करून बांगलादेशला स्वतंत्र करण्याचे महान कार्य हिंदुस्थानने केले. पाकिस्तानी सैनिक आणि ‘जमात’च्या धर्मवेड्या मुस्लिमांनी त्यावेळी सुमारे ३० लाख बांगलादेशींचे शिरकाण केले. लाखो महिलांवर झालेले बलात्कार, भयंकर कत्तली अशा रक्तरंजित संघर्षात उडी घेऊन हिंदुस्थानने बांगलादेशला जन्माला घातले. या ‘उपकारा’ची बांगलादेशातील मुसलमान आज ‘अपकारा’ने अशी पांग फेडत आहेत. ज्या हसिना सरकारला हिंदूंनी मतदान केल्याचा तेथील धर्मांधांना राग आहे, ते हसिना सरकार तरी आपले मतदार असलेल्या हिंदूंच्या सुरक्षेसाठी काय करते आहे? हिंदूंचे नशीबच फुटके आहे. इकडे हिंदुस्थानात बहुसंख्य असूनही हिंदूच मार खातो. तिकडे पाकिस्तान-बांगलादेशात तर बोलून चालून हिंदू अल्पसंख्यच. आपल्याकडे ‘बहुसंख्य’ म्हणून हिंदूंचे लाड नाही आणि तिकडे ‘अल्पसंख्य’ म्हणून हिंदूंना मरणयातना भोगाव्या लागतात. बांगलादेशात तेच होत आहे. हिंदूंच्या घरादारांची राखरांगोळी करून त्यांना देशाबाहेर पिटाळून लावण्याचाच हा प्रयत्न आहे. पाकिस्तानातील हिंदू तर नामशेष होतोच आहे, आता बांगलादेशी हिंदूंनाही असेच मरू द्यायचे काय?
No comments:
Post a Comment