काँग्रेसचा सल्ला
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
'आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा फायदा दुसरा कोणी स्वतःच्या राजकीय लाभासाठी करून घेत असेल, तर त्यापासून लतादीदींनी सावध राहावे,' असा सल्ला काँग्रेसने दिला आहे. 'ए मेरे वतन के लोगों' या गीताला ५१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत सोमवारी झालेल्या कार्यक्रमात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसकडून लतादीदींना हा सल्ला देण्यात आला आहे.
'लता मंगेशकर हे आपल्या सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व असून, आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. त्यांच्या आवाजाची जादू सर्व देशवासीयांच्या मनावर अधिराज्य करते; पण देशाची जी आदर्श व्यक्तिमत्त्वे आहेत, त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा राजकीय लाभासाठी केला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा कोणी गैरवापर करू नये, याची लतादीदींनी काळजी घ्यावी,' असे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर झालेल्या कार्यक्रमात लता मंगेशकरांसोबत नरेंद्र मोदीही उपस्थित होते. या प्रसंगी आपला सत्कार केल्याबद्दल लतादीदींनी मोदींचे आभारही मानले होते. काही महिन्यांपूर्वी पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नव्या बिल्डिंगच्या उद्घाटनासाठी लतादीदींनी मोदी यांना आमंत्रित केले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनावेत अशी आपली इच्छा असल्याचे त्या वेळी लतादीदींनी बोलून दाखवले होते.
मोबाइलवर ताज्या बातम्या, लेख, भविष्य, लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा mtmobile.in वर
No comments:
Post a Comment