Total Pageviews

Friday, 8 February 2013

भारतासमोर चीनचे जलसुरक्षेचे आव्हान

http://www.esakal.com/esakal/20130208/5530293625376424836.htm


भारतासमोर चीनचे जलसुरक्षेचे आव्हान ब्रिगेडियर हेमंत महाजन
ब्रह्मपुत्रा नदीवर भारत-चीन सीमेजवळच "ग्रेट बेंड' येथे चीनकडून बांधल्या जाणाऱ्या मोठया धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. फराक्का येथील बराजवरून भारताकडे वळवल्या जाणाऱ्या पाण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरूच आहेत. भारताकडून जास्त प्रमाणात पाणी वळवले जात असल्याचा आरोप बांगलादेशकडून होत आहे. इतकेच नव्हे, तर भारतात गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू असलेल्या संभाव्य नदीजोड प्रकल्पाबाबतही चीनने आक्षेप घेतले आहेत. असा प्रकल्प बांगलादेशवर अन्याय करणारा ठरेल, असे सांगून बांगलादेशाने आपला विरोधही नोंदवला आहे.

या वादांच्या मुळाशी आहेत गंगा, ब्रह्मपुत्रा, कोसी, गंडक या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या ! या वादांचे भवितव्य काय आणि हिमालयातील नद्यांचे हे आव्हान आपल्याला पेलवणार का? पाण्यावरून केवळ भांडणे, वाद आणि संघर्षच होत राहून पुढील काळात परिस्थिती अधिकाधिक चिघळतच जाणार का? पुढचे महायुद्ध पाण्यावरून भडकणार आणि पाणी हेच भविष्यातील संघर्षांचे प्रमुख कारण असल्याचे ठामपणे सांगितले जाते. आजच्या काळात तरी पाणी हे संघर्षांचे प्रमुख कारण ठरले आहे. बदलत्या काळात जगाच्या सर्वच भागांत जलसुरक्षेचे आव्हान बिकट होत आहे.

नदी उगम पावते, तिथून उतार मिळतो तिथे ती वाहत जाते. तिला देशांच्या सीमा अडवू शकत नाहीत. 1954 मध्ये चीनने ज्या तिबेटला गिळले, त्याचे पठार अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. आग्नेय आशियात वाहत जाणाऱ्या मॅकोबसारख्या काही नद्या तिबेटमध्ये उगम पावतात. मॅकोब नदी तर तिथून निघून लाओस, थायलंड अशा दोन देशांना पावन करत शेवटी समुद्राला मिळते. ती एक मोठी नदी आहे. त्याशिवाय तिबेटमधून उगम पावणाऱ्याच जवळपास 30 नद्यांमध्ये सतलज, चिनाब, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा याही नद्या आहेत.

ब्रह्मपुत्रचे खोरे चीन, भारत व बांगलादेश या तीन देशांमध्ये विभागले आहे. शिवाय या नद्या हिमालयातील बर्फातून उगम पावणाऱ्या असल्याने त्यांच्यावर जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या समस्येचा थेट परिणाम होतो. या आव्हानांची ओळख करून घेतल्यावरच आपल्या प्रदेशातील पाण्याच्या नेमक्‍या समस्येचा अंदाज येईल. ब्रम्हपुत्रेचा वर्षांतील 12.3 टक्के प्रवाह हिमालयातील बर्फावरच अवलंबून असतो. एका भाकितानुसार हवामान बदलामुळे हिमालयासारख्या पर्वतांवरील हिमनद्या 2350 पर्यंत बऱ्यापैकी नष्ट झालेल्या असतील. असे घडलेच तर एकूण प्रवाहात 20 टक्के घट होईल आणि पावसाळ्यात मात्र या नदीला आतापेक्षा जास्त पूर येतील .

चीनचे ब्रह्मपुत्रा ब्रह्मास्त्र
भारताचा विरोध असतानाही ब्रह्मपुत्रा नदीवर तीन धरणं बांधून भारतावर "ब्रह्मास्त्र' सोडण्याचा डाव चीनने रचला आहे. चीनमधून उगम पावणाऱ्या ब्रम्हपुत्रेवर त्या देशाने तीन जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्या नदीचे भारताला मिळणारे पाणी कमी होणार आहे. ब्रह्मपुत्रेबाबत आपण खालच्या बाजूस आहोत आणि चीन वरच्या बाजूस आहे. म्हणून आपण ब्रम्हपुत्रेवर जलविद्युत प्रकल्प उभारणाऱ्या चीनवर टीका करत आहोत. आंतरराष्ट्रीय आयोगापुढे दावा मांडून आपण चीनचा ब्रह्मपुत्रेवर ते तीन प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे. देशातील अनेक नद्याच काय, पण धरणांची जलाशयेही पाणी वाटपाच्या संघर्षातून पेटली आहेत. राज्याराज्यांत आणि जिल्हा- जिल्ह्यांतील वाद विकोपाला जात आहेत. ते कसे मिटवावेत, यावर सरकार विचार करत असतानाच ब्रह्मपुत्रेचे पाणी पेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. हे पाणी एकूण तीन देशांत पेटणार आहे.

ब्रह्मपुत्रा नदीचा वाद भारत आणि चीन या दोन देशातील आहे. ब्रम्हपुत्रा चीनमध्ये उगम पावून भारतात येते. या नदीवर चीन आपल्या देशात तीन जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. यापूर्वी चीनमध्ये ब्रह्मपुत्रेवर 510 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यानिमित्तानेही बरीच आरडाओरड झाली. पण तरीही चीनने हा प्रकल्प उभारून त्यापासून वीज निर्माण करायला सुरवातही केली आहे. आता आणखी तीन नवे प्रकल्प दागू, जियाचा आणि जिएझू येथे उभारण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चीनच्या मंत्रिमंडळाने अलीकडेच ब्रह्मपुत्रा नदीवर दागू, जियाचा व जियाक्‍सू अशी तीन धरणे बांधण्यास परवानगी दिली आहे. ही धरणे बांधण्याबाबत भारत व बांगलादेश यांची परवानगी नाही.

ब्रह्मपुत्रा नदी 2900 किलोमीटर लांबीची आहे. चीनने ब्रम्हपुत्रेचे पाणी अडवले, तर आपले नुकसान होणार, हे खरे. 2010 मध्ये तिबेटमध्ये चीनने ब्रह्मपुत्रेचा प्रवाहच बदलण्याची योजना आखल्याचे खात्रीलायक वृत्त दिले होते. चीन आपला शत्रू आणि तो जे काही करेल ते आपल्यावर त्रास करण्यासाठीच असणार. त्यामुळे चीनच्या अशा कामांची काही कुणकुण लागली, की आपण चीनला इशारा दिला पाहिजे. ब्रह्मपुत्रा ज्या दिशेने वाहते, त्याऐवजी तिला दुसऱ्याच दिशेला वाहवत नेणे शक्‍य आहे का? शक्‍य नक्की आहे . त्यासाठी चीनचे डोंगरांमध्ये आठ ते दहा किलोमीटर लांब बोगदा खोदायचे नियोजन केले आहे.

भारताला अंधारात ठेवून आणखी तीन धरणे
भारत आणि चीनच्या आर्थिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत बनलेली ब्रह्मापुत्रा नदी तिबेटच्या 1625 किलोमीटर भूप्रदेशातून वाहते. भारतात प्रवेश केल्यानंतर तिचा प्रवाह आणखी 918 किलोमीटरचा आहे. ब्रह्मपुत्रेला दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे ईशान्य भारत आणि बिहारमधील मोठा भूभाग अनेकदा पूरग्रस्त ठरतो. या घटनेबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी चिनी नेत्यांचे ब्रह्मपुत्रेच्या जलप्रबंधनाकडे लक्ष वेधले. 2006 मध्ये ब्रह्मपुत्रेबाबत उत्पन्न झालेल्या समस्यांचा विचार करण्यासाठी एका तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या झालेल्या बैठकांमध्ये भारताने वारंवार स्पष्ट केले की, ब्रह्मपुत्रेवर चीनने धरण बांधले अथवा तिचा प्रवाह अन्यत्र वळवला तर भारतात ईशान्येकडील राज्ये आणि बिहारला खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल. नुकतेच भारताचे सुरक्षा सल्लागार शिव शंकर मेनन यांनी चीनच्या दाई बिंगुओ यांच्याशी सल्लामसलत केली होती. यावेळी दोन्ही देशांतून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी वाटपावरही चर्चा झाली होती. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रावर विपरीत परिणाम होईल असे काम चीनकडून केले जाणार नाही, असेही आश्वासनही त्यांनी दिले होते.मात्र प्रत्यक्षात चीनने आपले वचन मोडून ब्रह्मपुत्रेवर मोठे धरण बांधून मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प उभारले आहे.

ब्रह्मपुत्रेवर पहिले धरण बांधणाऱ्या चीनने या नदीवर आणखी तीन धरणे बांधण्यास मंजुरी दिली असून, भारताला अस्वस्थ करणारे हे वृत्त चीनने अद्याप अधिकृतरीत्या भारताला कळविलेले नाही. ब्रह्मपुत्रा नदीवर आणखी तीन धरणे बांधण्याची तयारी चीनने सुरू केली असून त्यासाठीची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. ही तीन धरणे तिबेटच्या बाजूने बांधण्यात येतील. चीनने आपल्या बाराव्या पंचवार्षिक योजनेत या धरणांच्या बांधकामांचा समावेश केला असून, त्यासाठी लागणारी मंजुरी घेण्यात आली आहे. ही तीनही धरणे तिबेटच्या दागू, जायचा आणि जिक्‍सू या ठिकाणी बांधली जातील.

भारत आणि चीन यांच्या दरम्यान इतरही अनेक नद्या वाहतात. त्या तिबेटमधून उगम पावतात. त्या काही अंतर तिबेटमध्ये वाहतात आणि नंतर भारतात प्रवेश करतात. त्यातील सिंधू, लोहित, सतलज, कर्नाली या नद्यांवर चीनने अनेक छोटे छोटे जलविद्युत प्रकल्प उभे केले आहेत. ते उभे करण्यात आले तेव्हाही आपल्याला पत्ता लागला नाही आणि अजूनही अनेक प्रकल्पांची आपल्याला काही माहिती नाही. येथे आपली गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरली आहे. पण आपण ब्रह्मपुत्रेबाबत प्रश्न गळ्यापर्यंत पोहचल्यामुळे निषेध खलिते पाठवत आहोत. चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी न सांगता वापरत असेल तर तिचे भारताला मिळणारे पाणी कमी होईल. म्हणून चीनच्या या तीन प्रकल्पांवरून भारत अस्वस्थ आहे. ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर कोणताही प्रकल्प उभा करताना भारताचे हितसंबंधांना बाधा न येऊ देणे महत्वाचे आहे.

शस्त्रसज्जही असू नये का ?
चीनच्या सीमेवर 89 हजार सैनिक व 400 अधिकाऱ्यांची विशेष पलटण उभी करण्याचा निर्णय भारताने 2010 मध्ये घेतला होता. परंतु, आर्थिक स्थिती बरी नसल्याने अर्थ मंत्रालय पैसा देत नाही. चीनची धास्ती बाळगू नये, याचा अर्थ शस्त्रसज्जही असू नये असा होत नाही. दुर्दैवाने, तसा अर्थ काढणारे महाभाग भारतात आहेत. चीनमधील कम्युनिस्ट राजवटीबद्दल नको तितकी आस्था दाखविणाऱ्यांची लॉबी भारतात कित्येक वर्षे काम करते. 1962 मध्ये चीनने आक्रमण केलेच नव्हते, असा दावा यातील अनेकजण करतात. "साउथ चायना सी'मधील वादामध्ये भारताचा कृतिशील सहभाग चीनला अस्वस्थ करतो व भारत अमेरिकेच्या अधिक जवळ जाण्याची धास्ती चीनला वाटते. पूर्व सीमेवर जपान व कोरिया यांच्याबरोबर वाढत चाललेला वाद व "साउथ चायना सी'मध्ये होत असलेली घेराबंदी यातून मार्ग काढण्यासाठी चीनकडून गोड भाषा होत आहे. मात्र ही भाषा करीत असतानाच ब्रह्मपुत्रेवर आणखी दोन धरणे बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन भारताचे पाणी कमी करण्यासही तो मागेपुढे पाहात नाही. पाकव्याप्त काश्‍मीरमधील चिनी सैनिकांच्या वास्तव्याबद्दलची भारताची तक्रार तो ऐकून घेत नाही. संरक्षण सिद्धतेवर तर चीन अतोनात खर्च करीत आहे. चीनच्या सज्जतेची त्यामध्ये मांडलेली वस्तुस्थिती पाहता चीनच्या मवाळ भाषेला फसून न जाता संरक्षणसज्जतेकडे लक्ष देण्याचे धोरणच योग्य म्हणता येईल

No comments:

Post a Comment