Total Pageviews

Sunday, 3 February 2013

लाच 65 लाखांची

लाच 65 लाखांची
जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चाळीसगाव पोलीस स्टेशन आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला टाळून नगर जिल्ह्याच्या लाचलुचपत विभागाने चाळीसगावात येऊन ही कारवाई केली आहे हे विशेष! यामुळे लाचेचे हे प्रकरण पोलिसापुरते मर्यादित न राहता त्यात वरिष्ठांचाही सहभाग स्पष्ट झाला आहे. साध्या चौकशीसाठी कोटी-कोटीची लाच मागणारे पोलीस गृह विभागात आहेत .जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 65 लाखांची लाच स्वीकारताना एका पोलिसाला रंगेहाथ अटक करण्यात आली. आपण तर कळसुत्री बाहुले आहोत, वरिष्ठांच्या सूचनेवरूनच आपण ही लाच स्वीकारली असल्याची कबुली पोलिसाने देऊन आपल्यावरचे घोंगडे पोलीस निरीक्षकावर झटकले. गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच अचानक डीवायएसपीची तडकाफडकी बदली करण्यात आली. 65 लाखांच्या लाचेमुळे जळगावच्या पोलिसांची वर्दी कलंकीत झाली आहे. या गुन्ह्यातील मास्टरमाईंड म्हणून पोलीस निरीक्षक लक्ष्मण गायकवाड यांच्यावर ठपका ठेवला गेल्याने ते नागपुरातूनच गायब झाले आहेत आणि आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ते वॉण्टेड आहेत. चाळीसगावच्या पोलीस स्थानकात आलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी थांबवण्यावरून हे रामायण घडले आहे. पुणे येथील समृद्ध जीवन फुड्स या कंपनीची हिरापूर रोडवर शाखा आहे. तेथे दुग्धजन्य पदार्थ तयार होतात. तसेच दुधाचा पुरवठा मोठय़ा शहरांना केला जातो. या कंपनीचा कामगारांशी संबंधित तक्रार अर्ज पोलीस स्थानकात होता. त्याची चौकशी थांबविण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली आणि तडजोडीनंतर 65 लाख रुपये स्वीकारण्यात आले. जळगाव आणि धुळे जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात चाळीसगाव पोलीस स्टेशन आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला टाळून नगर जिल्ह्याच्या लाचलुचपत विभागाने चाळीसगावात येऊन ही कारवाई केली आहे हे विशेष! यामुळे लाचेचे हे प्रकरण पोलिसापुरते मर्यादित न राहता त्यात वरिष्ठांचाही सहभाग स्पष्ट झाला आहे. साध्या चौकशीसाठी कोटी-कोटीची लाच मागणारे पोलीस गृह विभागात आहेत. तसेच खंडणी प्रकरणात आरोपी असलेले पोलीस अधिकारी जळगाव जिल्ह्यातच आहेत. 65 लाखांच्या लाच प्रकरणात जळगावच्या पोलीस दलाची बदनामी झाली असून ती कधीही पुसता येणार नाही. यापूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या मनोज लोहार यांच्यावर 60 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप झाला. पोलीस जनतेचे मित्र आहेत. कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. जनतेच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच जर गुन्हेगारांसारखे गजाआड होत असतील तर जनतेने विश्वास ठेवावा कुणावर? असा प्रश्न निर्माण होतो. छुटपूट हप्ता वसुली करण्यापेक्षा आता पोलीस मोठय़ा कंपन्या, उद्योग, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांना टार्गेट करून लाच आणि खंडणी स्वीकारू लागले असल्याने गृहखात्याची प्रतिमा मलिन होते आहे. 65 लाखांच्या लाच प्रकरणात गायब झालेल्या पोलीस निरीक्षकाला शोधण्यासाठी चार पथके रवाना करावी लागतात, तरी ते सापडत नाहीत आणि अटकपूर्व जामिनासाठी मात्र त्यांचे प्रयत्न सुरू असतात, याचा मेसेज सामान्य जनतेपर्यंत काय जात असेल? औरंगाबाद येथील आयुक्त भाजीभाकरे यांच्यावर महिला पोलिसाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंदवली आहे. धुळ्याच्या राजेंद्र मुंडके नामक पोलिसाच्या घरात 12 लाखांचा अवैध मद्यसाठा पोलीस लाइनमधून जप्त केला जातो. बलात्कार, विनयभंग, चोरी अशा गुन्ह्यांतही पोलीस आरोपी होतात. यामुळे वर्दीच्या आतमधला माणूस हरवला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. गृह विभागाची प्रतिमा मलिन करणार्‍या या अशा काही घटनांचा जनतेने काय बोध घ्यावा? गुन्हेगारांवर वचक बसविण्याऐवजी वर्दीला सध्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचेच काम करावे लागत आहे. सभा, मेळावे, मोर्चे आणि आंदोलने यातच पोलीस अडकून पडले आहे आणि उरला सुरला वेळ चिरीमिरी आणि सेक्शन वसुलीत घालवतात, अशी टीका होते. याची कारणमिमांसा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करतील काय? खंडणी किंवा लाच प्रकरणात काही अधिकारी, कर्मचारी पकडले जातात किंवा काही अधिकार्‍यांवर बलात्काराचे आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल होतात, म्हणजे सगळी यंत्रणाच खराब आहे, असे म्हणत एकूणच पोलिसांना दोष देण्यात अर्थ नाही;पण व्यवस्थेतील हे नासके आंबे वेळीच बाजूला काढणे हा त्यावरचा पर्याय असू शकतो. पोलीस आणि जनता यांच्यातील संबंध वाढवायचे असतील तर पोलिसांना आपली प्रतिमा उज्ज्वल करावी लागेल, असे वाटते

No comments:

Post a Comment