Total Pageviews

Wednesday, 28 November 2012

उपेक्षेच्या चक्रात निमलष्करी दले-ब्रिगेडीयर हेमंत महाजन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17406994.cms
नेपाळपासून तामिळनाडूच्या सीमेपर्यंत नक्षलवाद्यांनी ' रेड कॉरिडॉर ' तयार करून कायद्याच्या राज्याला आव्हान दिले आहे . देशांतर्गत शत्रूंशी दोन हात करताना निमलष्करी दलाचे जे जवान मृत्युमुखी पडतात त्यांना ' हुतात्मा ' म्हणण्यास सरकार तयार नाही . शरमेची गोष्ट ही की गेल्या पाच वर्षांत लढाई वा कर्तव्य करताना शहीद झालेल्यांपेक्षाही , आजारपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या जवानांची संख्या जास्त आहे .
आजच्या युवा पिढीला सैन्यात किंवा निमलष्करी दलात भरती होण्यास काही स्वारस्य नाही असे माझे मत आहे . आपल्या देशात , दर वर्षी साधारणत : २० - २५ ऑफिसर आर्मीच्या ५०० - ६०० जवानांना वीरमरण येते . जबर जखमी झालेल्यांची संख्या याच्या चौपट असते . निमलष्करी दलाचेही तितकेच जवान प्रत्येक वर्षी बलीदान करतात . पण आपण या सुपर हिरोंना ओळखू शकलो आहोत का , असा प्रश्न मनात येतो .
आज आपल्याकडे केंद्रीय राखीव पोलिस दल ( सीआरपीएफ - , ७५ , ००० सैनिक , २२० बटालियन्स ), सीमा सुरक्षा दल ( बीएसएफ - , ४५ , ००० सैनिक , १८० बटालियन्स ) ही दोन प्रमुख निमलष्करी दले आहेत . या शिवाय आयटीबीपी ( ५० ते ६० हजार ), एसएसबी ( ४० ते ५० हजार ), अशीही निमलष्करी दले आहेत . बीएसएफ भारत - बांगलादेश सीमा जम्मू - काश्मीरमध्ये लढत आहेत . सीआरपीएफ नक्षलवाद्यांविरोधी अभियानात आणि जम्मू - काश्मीरमध्येही आहेत . आयटीबीपी , एसएसबी हे चीन सीमा , नेपाळची सीमा नक्षलवाद्यांविरोधी अभियानात तैनात आहेत .
नेपाळपासून तामिळनाडूच्या सीमेपर्यंत नक्षलवाद्यांनी ' रेड कॉरिडॉर ' तयार करून कायद्याच्या राज्याला आव्हान दिले आहे . आयटीबीपी , एसएसबी , सीआरपीएफ , बीएसएफचे सुमारे दोन लाख जवान नक्षलवाद्यांविरोधात लढत आहेत . देशांतर्गत शत्रूंशी दोन हात करीत देशात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करताना , कर्तव्य बजावताना निमलष्करी दलाचे जे जवान मृत्युमुखी पडतात त्यांना ' हुतात्मा ' म्हणण्यास सरकार तयार नाही . या जवानांच्याही हौतात्म्याची नोंद घेण्याची सूचना करणारी फाइल सरकारदरबारी दीर्घकाळ प्रलंबित आहे . घनदाट जंगलात नक्षलवाद्यांशी आणि मलेरियाच्या डासांशी सतत युद्ध करीत असलेल्या या जवानांच्या व्यथा ऐकून घेण्यासही कोणाला वेळ नाही . या आणि अशा अनेक कारणांमुळे गेल्या तीन वर्षांत ४४ हजार जवानांनी निमलष्करी दलाला रामराम ठोकला आहे ; तर ३२८जणांनी आत्महत्या केली आहे .
सततच्या खडतर पोस्टिंगमुळे दलाच्या फिटनेसवर मोठा परिणाम होतो . आजच्या घडीला ५७ हजार जवान हायपरटेन्शनमुळे , सात हजार मधुमेहाने तर सहा हजार काविळीमुळे बाधित आहेत . ७००जणांना कॅन्सरने १३००जणांना एड्सने घेरले आहे . ५२ हजारजणांना विविध त्वचारोग , तर १६ हजार ३०० जणांना मलेरिया असून ६२००जण हृदयरोगाचे बळी आहेत आणि तेवढेच नैराश्य आणि अन्य मानसिक समस्यांची शिकार बनले आहेत . सीआरपीएफ जिथे तात्पुरत्या डयुटीवर असेल , त्या राज्यांकडून त्यांच्या राहण्याची कुठलीही काळजी घेतली जात नाही . आणि शरम आणणारी गोष्ट ही की गेल्या पाच वर्षांमध्ये प्रत्यक्ष लढाई करताना वा आपले कर्तव्य करताना शहीद झालेल्यांपेक्षाही , आजारपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या जवानांची संख्या जास्त आहे .
दार्जिलींग , काश्मीरमध्ये रस्ते आणि रेल्वेलाइन्सच्या रक्षणाचे काम करणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांना पहाटे पाच वाजता कामावर हजर व्हावे लागते आणि त्या ठिकाणी पोचण्यासाठी दोन तासांची पायपीट करावी लागते . एकदा ड्युटी चालू केल्यावर रात्री नऊच्या आत ती संपत नाहीच . गृह खात्याच्या अहवालानुसार सीआरपीएफच्या जवानांना महत्त्वाच्या संवेदनशील कार्यालयांची सुरक्षा , दंगल नियंत्रण , व्हीआयपी ड्युटीज , दहशतवादविरोधी कारवाया अशी विविध कामे करावी लागतात . दहशतवादविरोधी कारवायांसाठी प्रशिक्षित बटालियन्सला शहरी भागातील दंगली रोखण्याचेही काम आजकाल बेधडकपणे सोपवले जाते . सध्या ७२ बटालियन्स जम्मू - काश्मीरमध्ये , ३५ बटालियन्स नक्षल प्रभावित क्षेत्रात , उरलेल्या १०३ ईशान्य भारतात आणि नंदिग्राम , कंधमाल , येथे तैनात आहेत .
बटालियन्सची संख्या वाढवताना नव्याने नियुक्त लोकांच्या प्रशिक्षणासाठी पुरेशी सोय उभारण्यास मात्र सरकार विसरले . शिवाय सेवेत असणाऱ्यांच्याही प्रशिक्षणाचा प्रश्न आहेच . साधारणपणे ८० टक्के जवान आणि अधिकारी हे त्यांच्या सेवेचा ७५ टक्के कालावधी सातत्याने खडतर पोस्टींगवरच घालवत असतात . याचाच अर्थ कोणत्याही नव्या प्रशिक्षणाशिवाय २९ वर्षे जवान अधिकारी कर्तव्य बजावत असतात . सीआरपीएफच्या अॅकेडमीमधून ऑफिसर होऊन बाहेर पडल्यावर त्यांना भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय रायफल बटालियन्स्बरोबर सहा महिने अॅन्टी टेरटिस्ट मोहिमेमध्ये भाग घेण्याकरता पाठविले जाते . यामुळे त्यांना भारतीय सैन्याबरोबर काश्मिरी दहशतवाद्यांशी लढण्याचा अनुभव आता मिळत आहे . माझे एक मित्र सेनादलाचे ब्रिगेडियर अनिल राम हे सीआरपीएफ प्रमुख विजयकुमारांचे सल्लागार बनले आहेत . त्यांनी सीआरपीएफमध्ये अनेक दूरगामी बदल आणले आहेत .
मायबाप नसलेल्यांना माओग्रस्त भागात पाठवले जाते . एसआय , एएसआय पातळीवर नवशिके अधिकारी माओग्रस्त भागात , अनुभवी मात्र मोठ्या शहरात राहतात . आयपीएस अधिकारी लढण्यात भाग घेत नाही . ते हेडक्वार्टरमध्ये राहतात . कॅम्प किंवा पोस्टवर राहण्याची परिस्थिती एकदम दयनीय आहे . वीज , पाणी यांचा अभाव , पत्र्याचे छत , पोस्टचे रक्षण करण्याकरता अपुरे बंकर , आजारी , जखमी किंवा मदत पाठवण्याकरिता हेलिकॉप्टर मिळणे इत्यादी . स्थानिक जवानांवर अनेक कामांमुळे विलक्षण ताण असतो . बीएसएफ , सीआरपीएफचे दिल्लीतील मुख्यालय आरामात बसून असते . त्यांना छत्तीसगडमध्ये हलवले पाहिजे . बीएसएफ , सीआरपीएफच्या या परिस्थितीवरचे उपाय नेमके काय असू शकतात ? सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ४० वर्षे वयानंतर सर्व जवानांना राज्य पोलिस दलात सामावून घेऊनही फोर्स कायम तरुण राखणे आवश्यक आहे .
गंभीररीत्या आजारी असणाऱ्यांना पुरेशी भरपाई देऊन सेवानिवृत्त करावे लागेल . वैयक्तिक कारणांसाठीदेखील अनेकजण निवृत्ती होऊ इच्छित आहेत . त्यांना मोकळे करणे शक्य आहे . या सर्वांच्या जागी नव्या दमाच्या तरुणांची भरती करून फौज ताजीतवानी बनविता येणे शक्य आहे . गृहखात्याच्या संबंधित विभागातील सर्व अधिकाऱ्यांना वर्षातील १५ दिवस अशा जवानांसोबत राहण्याची सक्तीच करावी ; जेणेकरून या बाबू लोकांना त्यांच्या समस्या मुळातून समजतील . स्वत : च्या सैन्यदलांची काळजी घेणारे राष्ट्र अत्यंत धोकादायक परिस्थितीत नकळत जात असते . राष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांची काळजी घेण्यास त्यांचे संरक्षण करण्यास आपण कधी शिकणार ?
-

 

No comments:

Post a Comment