Total Pageviews

Tuesday, 27 November 2012

पाकिस्तानात हिंदुस्थानी अतिरेक्यांची दुर्दशा-पोलीस डायरी

गेल्या आठवड्यात मोहमद अजमल कसाबला अखेर पुण्याच्या येरवडा जेलमध्ये निवृत्तीच्या काठावर असलेल्या एका जेलच्या कर्मचार्‍याने फाशी दिली तेव्हा सार्‍या हिंदुस्थानात आनंद व्यक्त करण्यात आला. कसाबने मुंबईत बुधवारी पाय ठेवला आणि त्याला बुधवारीच (२१ नोव्हेंबर) फाशी देण्यात आली. कंगाल बापाने गरिबीला कंटाळून कसाबला लश्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेत पैशांसाठी भरती केले आणि आपल्या मुलाची आहुती दिली. जेव्हा कसाबला वधस्तंभाकडे नेण्यात आले तेव्हा ‘मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. मी पुन्हा असे काही चुकीचे काम करणार नाही. मला फसवून गरिबीचा फायदा घेऊन अतिरेकी प्रशिक्षण देण्यात आले आणि मरेपर्यंत लढण्यास सांगितले होते, परंतु दुर्दैवाने मी पोलिसांच्या तावडीत सापडलो आणि माझ्यावर अशी तडफडण्याची वेळ आली.’ कसाबच्या या आर्त विनवणीचा फाशी देणार्‍या कर्मचार्‍यावर काहीच परिणाम झाला नाही. त्याने कसाबच्या मानेवरचा दोर खाडकन ओढला. फाशी दिल्यावर साधारणपणे दोन ते तीन मिनिटांत माणसाचा जीव जातो, परंतु कसाब आठ ते दहा मिनिटे तडफडत होता, असे जेलच्याच एका अधिकार्‍याने सांगितले.
कसाबला फाशी देण्यात आली. आता संसदेवरील हल्ल्याच्या कटात सहभागी झालेल्या दिल्लीच्या अफझल गुरूला फाशी देणे बाकी आहे, परंतु त्याला फाशी देतील की नाही याबद्दल शंकाच वाटत आहे. कसाब हा इस्लामी अतिरेक्यांसाठी हुतात्मा झाला आहे. कसाबच्या फाशीचा बदला घेण्यासाठी इस्लामी अतिरेक्यांनी तयारी सुरू केली असून मुंबई, दिल्ली तसेच पुण्यासारख्या शहरी भागांत कोणत्याही क्षणी घातपात घडविला जाऊ शकतो ही सर्व पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन एटीएसचे अधिकारी सतर्क झाले आहेत. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कसाबला फाशी देण्यात आली. त्याआधी कातिल अन्सारी हा अतिरेकी येरवडा जेलमध्येच शरद मोहोळ या पुण्याच्या स्थानिक गुंडाकडून मारला गेला होता. त्याचा बदला म्हणून पुण्यात बॉम्बस्फोट मालिका घडविण्यात आल्या. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. आता मात्र कसाबला फाशी देण्यात आल्यामुळे अतिरेक्यांनी पुण्यालाच टार्गेट केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी विशेषत: सिनेमागृहे, मॉल, मंदिरे तसेच अन्य ऑयकॉनिक स्थळांजवळ सुरक्षा व्यवस्था वाढविणे गरजेचे आहे.
कसाबप्रमाणेच २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील हल्ल्याच्या कटात सामील असलेला बीडचा सय्यद जबीउद्दीन ऊर्फ अबू जिंदाल हाही सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अबू जिंदाल मुंबई क्राइम ब्रँचच्या तपास अधिकार्‍यांना जबाब देताना म्हणतो, ज्यावेळी मुंबईवर फिदायीन हल्ला झाला त्यावेळी मी पाकिस्तानात लश्कर-ए-तोयबाच्या कंट्रोल रूममध्येच होतो. तेथूनच झाकीर रेहमान लकवी आदी अतिरेकी हल्ल्याची सूत्रे हलवीत होते. कसाब पकडला गेल्यानंतर कंट्रोल रूममधील सर्वांचेच चेहरे पडले आणि प्रकरण अंगाशी येणार म्हणून चिंता व्यक्त करीत होते. कसाब पकडला जायला नको होता असे सार्‍यांचे मत होते. जिंदाल म्हणतो ते खरे आहे. कसाब पकडला गेल्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. अबू जिंदाल हा एक सुशिक्षित तरुण आहे. बीएसस्सीनंतर त्याने एमएची पदवी घेतली आहे. २००४ च्या सुमारास कॉलेजच्या कॅण्टीनमध्ये असताना सध्या हिंदुस्थानला वॉण्टेड असलेला फैयाज कागजी हा गुजरातच्या दंगलीच्या सीडीज घेऊन अबू जिंदालला भेटला. मुस्लिमांवर गुजरातमध्ये कसे अत्याचार करण्यात आले आहेत याच्या खोट्या खोट्या सीडीज त्याला दाखविल्या. त्या पाहून जिंदाल अतिरेक्यांसाठी काम करू लागला. त्याने २००६ च्या सुमारास पाकिस्तानातून एके-५६ रायफल, हातबॉम्ब, पिस्तूल इत्यादी शस्त्रसाठा मागविला, एटीएसने तो पकडला. त्यामुळे अबूने कोलकातामार्गे बांगलादेश व त्यानंतर पाकिस्तान एअरलाइन्समार्गे पाकिस्तानात पलायन केले. तेथे त्याने घातपाती कारवायांचे प्रशिक्षण घेतले. हिदुस्थानात येण्याचा मार्ग बंद झाल्याने तो पाकिस्तानात स्थायिक झाला. त्याने तेथील तरुणीशी लग्न केले, परंतु २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर आलेल्या दबावामुळे त्याने पाकिस्तान सोडून सौदी गाठले. अटकेच्या भीतीने बीड सोडणारा त्यानंतर पाकिस्तानातून गायब झालेला अबू जिंदाल अखेर हिंदुस्थानच्या हाती लागला. मुल्लामौलवींच्या धार्मिक प्रवचनाला बळी पडून बरेच मुस्लिम तरुण अतिरेकी कारवायांसाठी तयार होतात, परंतु त्यानंतर त्यांना पश्‍चाताप होतो. ते अटकेला, मरणाला घाबरतात, असे पोलीस तपासात आढळून येत आहे. पाकिस्तान आपल्या देशाच्या मुळावर आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानात अतिरेक्यांचे अड्डे बनविले आहेत. हिंदुस्थानी मुस्लिम तरुणांना तेथेच घातपाती कारवायांचे प्रशिक्षण दिले जाते आणि परत हिंदुस्थानात पाठविले जाते. परंतु या काळात मुस्लिम तरुणांची झालेली दुर्दशा त्यांच्या जबानीतून ऐकली तर अंगावर काटा उभा राहतो. त्यांची तेथे खाण्यापिण्याचीही आबाळ होते. हिंदुस्थानी मुसलमानांना पाकिस्तान मुहाजीर समजते म्हणजे उपरे! याचा धर्माच्या नावाखाली बहकलेल्या हिंदुस्थानी मुसलमानांनी बोध घेतला पाहिजे आणि पाकिस्तानच्या ‘मजहब’पासून लांब राहिले पाहिजे- प्रभाकर पवार

No comments:

Post a Comment