दिवट्या’ अब्दुल्लाची मुक्ताफळे
जम्मू आणि कश्मीर म्हणजे आपली खासगी जहांगीर समजणारे अब्दुल्ला कुटुंब कधी कुठले फूत्कार सोडेल याचा नेम नाही. कधी त्या फारुख अब्दुल्लांचा तोल जातो, तर कधी त्यांचे पुत्र ओमरमियां भलतेसलते बरळतात. आता या ओमरचे काकाश्री म्हणजे डॉ. फारुख यांचे धाकटे बंधू मुस्तफा कमाल यांनी बेताल बडबड केली आहे. कश्मीरचा शत्रू पाकिस्तान नसून हिंदुस्थानच आहे, अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. एका जाहीर सभेत बोलताना हा मुस्तफा फक्त एवढीच गरळ ओकून थांबला नाही, कश्मिरी लोक हिंदुस्थानपेक्षा पाकिस्तानच्याच जास्त जवळचे आहेत असेही तारे त्याने तोडले. कश्मीरमधील फुटीरवादी मंडळी नेहमीच हिंदुस्थानविषयी आक्रस्ताळी विधाने करीत असतात. १५ ऑगस्टला तिरंग्याऐवजी श्रीनगरमधील लाल चौकात पाकिस्तानी राष्ट्रध्वज फडकविणारी हीच मंडळी असतात. डॉ. फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे मुख्यमंत्री पुत्र ओमर यांच्यावर फुटीरवादी असा थेट शिक्का नाही. मात्र देशविरोधी ठरतील अशी वादग्रस्त विधाने करण्याची हौस त्यांनाही आहेच. हा जो कुणी कमाल मुस्तफा आहे, त्याने ही जी कश्मीरविरोधी गरळ ओकली त्यामागे त्याचा बोलविता धनी कोण आहे? त्याला अचानक लागलेली पाकप्रेमाची उचकी अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे लागली, की आणखी कशामुळे? आदी प्रश्नही आहेतच. अर्थात हा मुस्तफाच नव्हे तर ओमर महाशयांनाही अधूनमधून अशी ‘हिरव्या’ प्रेमाची उचकी लागत असते. गेल्या वर्षी त्यांनी कश्मीर खोर्यात हिंसाचार घडविणार्यांना माफी देऊन कश्मिरी मुस्लिमांना ईदचा ‘तोहफा’ दिला होता. त्याशिवाय संसदेवर हल्ला करून देशाच्या सार्वभौमत्वालाच आव्हान देणारा आणि सध्या तिहारमध्ये फाशीची वाट बघत असलेला दहशतवादी अफझल गुरू याच्याबद्दलही दयेचा पाझर फुटला होता. ‘कश्मीर विधानसभेने गुरू याच्या माफीसाठी ठराव संमत केला तर...’ अशी टिव टिव ओमरमियॉंनी ‘ट्विटर’वर केली होती. अफझल गुरूला फाशी दिली तर कश्मीरमध्ये आगडोंब उसळेल अशी धमकी द्यायलादेखील ते विसरले नव्हते. थोडक्यात काय, तर कश्मीर आणि हिंदुस्थानविरोधी मुक्ताफळे उधळणे हा अब्दुल्ला आणि कंपनीचा जुनाच धंदा आहे. मुस्तफा कमाल या दिवट्या ‘अब्दुल्ला’नेही तेच केले आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला केंद्रात मंत्री आहेत आणि ओमर कश्मीरचे मुख्यमंत्री. हे पिता-पुत्र या ‘दिवट्या’ अब्दुल्लाचे कान उपटण्याचे धाडस दाखविणार आहेत काय?पैशाचा मोहमनुष्यप्राणी हा अनुभवातून सुविचार लिहू शकतो, पण शहाणा होतोच असे नाही. चमकणारे सारे सोने नसते हे मनोमन कितीही पटले तरी अनेकदा त्याच्याही मोहात तो पडतोच. हा मोह भल्याभल्यांना भुरळ पाडतो आणि अशा ‘भूलथापा’ देणारेही या जगात अनेक आहेत. दिल्ली पोलिसांनी अलीकडेच जेरबंद केलेले उल्हास खैरे आणि रक्षा उर्स हे ‘बंटी-बबली’ जोडपे त्यापैकीच एक. मूळचे नागपूरचे असलेले हे जोडपे ठगांच्या दिल्लीत जाऊन ‘महाठग’ बनले. थोड्याथोडक्या नव्हे तर दोन लाखांवर गुंतवणूकदारांना सुमारे पाचशे कोटी रुपयांना त्यांनी फसविल्याचे उघड झाले. शाळा अर्धवट सोडलेल्या उल्हासचे कारनामे दिल्ली पोलिसांनाही चक्रावून टाकणारे ठरले. चेहरेपट्टी, वेशभूषा आणि नावे बदलून वावरण्यात पटाईत असलेल्या या जोडप्याची २० बँकांमध्ये १३ खोट्या नावांनी ९४ खाती होती. स्टॉक गुरू नावाने सल्लागार कंपनी सुरू करून या दोघांनी गुंतवणूकदारांना महिन्याला २० टक्के असा ‘गडगंज’ परतावा देण्याचे आमिष दाखविले. वास्तविक इतका परतावा मिळणे अशक्यकोटीतले होते तरी माणसे भुललीच आणि त्यांनी ‘गुंतवणूक’ केली. लोकांचे पैसे गोळा करून हा ‘फ्रॉड गुरू’ दिल्लीतून पसार झाला आणि रत्नागिरीत आला तो पुन्हा नवे जाळे टाकण्याच्या तयारीतच. मात्र तत्पूर्वीच हे जोडपे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आणि फसवले जाऊ शकणारे हजारो गुंतवणूकदार सुदैवी ठरले. खैरेंसारख्या महाठगांचे लक्ष्य मध्यमवर्गच असतो. आपल्या गरजा भागवूनही थोडाफार पैसा हाताशी खुळखुळत असणार्या मध्यमवर्गीयांना जाळ्यात ओढले जाते. २० टक्के परतावा देणे अर्थतज्ज्ञांना अशक्य वाटते, तो कुणीतरी महाठग कसा काय देऊ शकेल हे सारासार विचार करणार्या कुणालाही कळेल, परंतु पैशाचे भूत माणसाला स्वस्थ बसू देत नाही हेच खरे. खरे तर अशा फसवणुकीच्या घटना नेहमीच चव्हाट्यांवर येत असतात. तरीही ‘बंटी-बबली’चे नवनवे अवतार सामान्यांना गंडा घालतच असतात. त्यांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये होणार्या तपासकार्याचे पुढे काय होते हेदेखील गूढच आहे. अशा घटना वारंवार उघड होऊनही फसविणार्यांचे आणि फसविल्या जाणार्यांचे पीक कमी होत नाही. पैशाचे भूत जोपर्यंत माणसाच्या मानगुटीवरून उतरत नाही तोपर्यंत हे प्रकार सुरुच राहणार.
No comments:
Post a Comment