Total Pageviews

Tuesday, 20 November 2012

COMMUNIST PARTY & VOTE BANK POLITICS

माकपला मिळतोय अल्पसंख्याक चेहरा


कोलकाता - कम्युनिस्ट विचारधारा धर्म, जात-पात, पंथाला थारा देत नाही. धार्मिक पूजाविधी करणाऱ्यांची, तसेच प्रार्थनास्थळांत जाणाऱ्या नेत्यांची मार्क्‍सवादी विचारधारेच्या पक्षांनी हकालपट्टी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. लाल क्रांतीची विचारधारा मानणाऱ्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षात मात्र अल्पसंख्याक चेहरे वाढत आहेत.

केरळचे माजी खासदार के. एस. मनोज 2010 मध्ये चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेल्याने माकपने त्यांना पक्षातून बडतर्फ केले. मात्र आता चित्र बदलताना दिसते आहे. माकपचे माजी जमीन सुधारणामंत्री रझ्झाक मुल्ला उघडपणे प्रार्थना करतात. मशीद व दर्ग्यांनाही ते भेटी देतात. त्यांनी नुकतीच हज यात्राही केली आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या राज्य समितीच्या बैठकीत अनेक नेत्यांनी रझ्झाक यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही माकपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मौन बाळगले आहे. राज्यात अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या 30 टक्के आहे. या मतांवर माकपचा डोळा असल्याने रझ्झाक यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे मानले जात आहे.

धार्मिक पूजाअर्चा किंवा मशिदीत जाऊन नमाजपठण करणारी व्यक्तीही कम्युनिस्ट असू शकते, अशी थिअरीही रझ्झाक सांगतात. पक्ष सोडण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे सांगून, अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर दबाव वाढविण्याची भाषाही ते करतात. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समुदायाची मते न मिळाल्याने माकपच्या वरिष्ठ नेत्यांनी रझ्झाक यांच्यावर जोरदार टीका केली होती, त्यामुळे आता रझ्झाक यांनी अल्पसंख्याक समुदायाला संघटित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्याचाच भाग म्हणून ते धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाल्याचे सांगितले जाते.

विचारधारा खुंटीला!

ममता बॅनर्जींनी मुस्लिम मते आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असल्याने रझ्झाक यांच्यासारख्या नेत्यांना माकपकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र असे करताना पक्षाच्या नेत्यांनी कम्युनिस्ट विचारधारा खुंटीला टांगली आहे. एकेकाळी पक्षशिस्त आणि विचारधारेबाबत तडजोड न करणाऱ्या या पक्षावर ही वेळ आली आहे. येत्या काळात रझ्झाक यांच्याप्रमाणे माकपकडून इतर समुदायातील काही नेत्यांनाही सवलत दिली जाण्याची शक्‍यता आहे.

कृपया लिंक पहा .

http://www.esakal.com/esakal/20121121/5179945514935519176.htm

No comments:

Post a Comment