Total Pageviews

Tuesday, 20 November 2012

कसाबला फाशी द्यायलाच हवी!

कसाबला फाशी द्यायलाच हवी!

रोहन जुवेकर  Friday August 31, 2012

कसाबच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब करताच काहीजणांनी या फाशीला विरोध केला आहे. कसाबला फाशी देऊन ‘शहीद’ करू नका, या फाशीने दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढेल; असे मत विरोधक व्यक्त करत आहेत. त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देणे फाशी देण्याइतकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी केलेला हा एक प्रयत्न....
मोहम्मद अजमल आमीर कसाब या पाकिस्तानी दहशतवाद्याने भारतात बेकायदा घुसखोरी करुन अंदाधुंद गोळीबार करत अनेकांना ठार केले. यातील एकाही व्यक्तीशी त्याचे वैयक्तिक मतभेद नव्हते, तरीही त्याने या सगळ्यांना मारले. कारण एकच, ते भारतात वास्तव्याला होते आणि भारतामध्ये जाऊन दहशतीचे वातावरण निर्माण करणे हेच काम कसाबला शिकवण्यात आले होते. याचा अर्थ कसाबला काही कारणास्तव मुंबईत हल्ला करणे शक्य झाले नसते तर भारतातल्याच दुस-या शहरात हा दहशतवादी हल्ला झाला असता.
कसाबचे कृत्य हे आजवर भारतात ज्या-ज्या कृत्यांसाठी फाशी दिली गेली, त्यापेक्षा जास्त भयंकर आहे; अशा स्वरुपाचे मतप्रदर्शन सुप्रीम कोर्टाने स्वतः केले आहे. देशातल्या अनुभवी कायदेतज्ज्ञांचे हे मत असताना, मग फाशीला विरोध करण्याचा प्रश्न येतच नाही.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा.... दहशतवादप्रश्नी सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू असते. याच चर्चेतून दहशतवादाची एक व्याख्या पुढे आली आहे... ‘कोणत्याही देशातील सामान्य नागरिकाचे अथवा नागरिकांचे शारीरिक, आर्थिक अथवा मानसिक नुकसान करणे. त्यांच्या मनात भीती उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करणे हा गुन्हा आहे. हा गुन्हा करुन एक किंवा जास्त व्यक्ती विशिष्ट समुहाला आर्थिक किंवा राजकीय लाभ मिळवून देत असतील तर हे दहशतवादी कृत्य आहे.’
दहशतवादाच्या या व्याख्येचा आधार घेतल्यास कसाबचे कृत्य हे निर्विदापणे दहशतवादी कृत्य ठरते. हे कृत्य करण्यासाठी त्याला प्रशिक्षित करणारी मंडळी एकट्या कसाबलाच तयार करुन गप्प बसलेली नाहीत. त्यांच्या कारवाया सुरू आहेत आणि या संदर्भातली थोडीफार माहिती भारतीय गुप्तचरांच्या हाती येतच आहे. त्यामुळे कसाबला फाशी दिली काय किंवा नाही दिली काय?, भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा धोका कमी  होणार नाही. उलट कसाबला तुरुंगात ठेवले तर भविष्यात त्याच्या सुटकेसाठी अपहरणाचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय आपल्या सरकारने कसाबला तुरुंगात ठेवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे. कसाब शिंकला तरी बातमी होईल अशी आज परिस्थिती झाली आहे. जर त्याच्या शहीद होण्याची एवढी चिंता वाटते तर ही काळजी करणा-यांनी कसाबच्या सुनावणीला सतत प्रसिध्दी देणा-या माध्यमांना चाप लावण्यासाठी कायदेशीर चौकटीत प्रयत्न का केले नाहीत?
दहशतवादी कृत्याला मिळणारी अतिप्रसिध्दी ही दहशतवादाला खतपाणी घालते हे खरे आहे. पण आपल्या सरकारने तसेच प्रसारमाध्यमांनी २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्रीपासून आजवर ही चूक अनेकदा केली आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचा वेग अद्याप खूप कमी आहे. अशा परिस्थितीत कसाबला फाशी न देण्याने दहशतवादी हल्ल्याचा धोका कमी होईल, असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. त्यामुळे दहशतवाद्याला तुरुंगात ठेवण्यासाठी खर्च होत असलेला पैसा आणि मनुष्यबळ हे देशाच्या सुरक्षेसाठी वापरायचे असल्यास कसाबच्या फाशीची लवकर अमलबजावणी करणे आणि भविष्यात २६/११ च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संरक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल करणे हे जास्त हिताचे आणि आवश्यक आहे

No comments:

Post a Comment