Total Pageviews

Thursday 9 June 2011

fast as a weapon

 
भीती उपोषणाची उपोषणासारख्या आत्मक्लेशाच्या मार्गाने निषेध नोंदवण्याची परंपरा भारतात पूर्वापार चालत आली आहे. वनवासी श्रीरामाला माघारी बोलावण्यासाठी सार्‍या विनवण्या करूनही तो ऐकत नाही असे पाहून भरताने प्राणांतिक उपोषणाची भीती घातली होती, असे वाल्मिकी रामायणात नमूद केलेले आहे. याच उपोषणाच्या हत्यारानिशी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना गदगदा हलवले. आज एकविसाव्या शतकातून वाटचाल करतानाही उपोषणाचे हे हत्यार तितकेच प्रभावी आहे आणि सरकार नावाची बलाढ्य यंत्रणा त्याला थरथर कापते, हे गेल्या काही दिवसांतील घटनांनी सिद्ध केले आहे. अण्णा हजारेंच्या ९६ तासांच्या उपोषणाने केंद्र सरकारला नमवले आणि बाबा रामदेव यांनी तेच हत्यार उगारताच त्याचे परिणाम जाणून असलेल्या सरकारने दंडेलशाहीचे दर्शन घडवत रामलीला मैदानामध्ये रावणलीलेचे दर्शन घडवले. आता पुन्हा बाबा रामदेव उपोषणाला बसले आहेत आणि अण्णा हजारेंनीही येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य झाल्यास बेमुदत उपोषणाची घोषणा काल केली आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, अगदी तालुकास्तरावरदेखील भ्रष्टाचाराविरुद्ध लाक्षणिक उपोषणांचे सत्र सुरू आहे. या सगळ्या मंथनातून या देशातील भ्रष्टाचाराच्या महाराक्षसाचा निःपात जरी संभवत नसला, तरी एक व्यापक जनजागृती, एक सकारात्मक वातावरण निश्‍चितच निर्माण झालेले आहे. भ्रष्टाचार मिटवण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून त्याकडे पाहायला हरकत नसावी. या उपोषणांनी सरकारपुढे कधी नव्हे ते आव्हान उभे केलेले आहे, ज्याची पंतप्रधानांपासून सर्वांना भीती वाटते आहे. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने या उपोषणांची किती धास्ती घेतली आहे, ते बारा रामदेव यांच्याविरुद्ध ज्या प्रकारे चारित्र्यहननाची आणि दमनाची पावले उचलली गेली आहेत, त्यावरून स्पष्टपणे दिसून येते. बाबा रामदेव यांचे आंदोलन काय किंवा अण्णा हजारे नेतृत्व करीत असलेले बुद्धिवाद्यांचे आंदोलन काय, त्यांची पार्श्‍वभूमी भिन्न भिन्न असली तरी एकाच लक्ष्याकडे समांतर जाणार्‍या या चळवळी आहेत. निदान ते लक्ष्य गाठण्याची भाषा तरी त्या करीत आहेत. केंद्र सरकारची भीती वेगळीच आहे. या तापत चाललेल्या वातावरणाचा फायदा संधीसाठी टपून बसलेल्या उजव्या शक्ती घेतील, याची त्यांना सर्वांत जास्त भीती आहे. रामदेव यांच्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा जाहीर केला आणि चित्र बिघडले. सरकारला एकाएकी बाबा रामदेव शत्रूरूपात दिसू लागले आणि पुढची सगळी दमनचक्रे फिरली. आताही बाबा रामदेव यांना संघाचा मुखवटा चढवण्याचा आटापिटा सोनिया गांधींचे सरकारमधील अष्टप्रधान करू पाहात आहेत. कॉंग्रेसने अलीकडे वकिलांची फौज पदरी बाळगलेली आहे आणि कोठे काही खुट्ट झाले, तरी वकिली आवेशात त्यावर टीकाटिप्पणी करण्यासाठी ही प्रवक्ते मंडळी धाव घेत असतात. रामदेव आणि अण्णा हजारे यांच्यावर ही मंडळी पहिल्या टप्प्यात तुटून पडली. तरीही दोघांचे जनसमर्थन अबाधित असल्याचे पाहून मग दिग्विजयसिंगांना पुढे केले गेले. तो बाणही वाया गेल्याचे पाहून आता स्वतः गृहमंत्री पी. चिदंबरम आखाड्यात उतरले आहेत. रा. स्व. संघाच्या कर्नाटकमधील पुत्तुर येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भ्रष्टाचारविरोधी आघाडीचे नेतृत्व बाबा रामदेव यांच्याकडे कधी काळी सोपवले होते असा इतिहास उगाळून रामदेव हा संघाचाच चेहरा आहे, असे ठासून सांगण्याचा त्यांचा प्रयास आहे. खरे तर एव्हाना रामदेव आणि त्यांची भारत स्वाभिमान ही एक देशव्यापी चळवळ म्हणून समर्थपणे स्वबळावर उभी राहिली आहे. हिंदुत्वाच्या बंधनात त्यांनी स्वतःला अडकवून घेतलेले नसल्याने सर्व धर्मांच्या व्यक्तींना हेतूतः सोबत घेऊन ते राजकारणात उतरण्याच्या ईर्षेने पुढे सरसावले आहेत. नैतिकता, स्वच्छ चारित्र्य आणि देशभक्ती ही रामदेव यांची बलस्थाने असल्याने त्यांच्यावरच प्रहार करण्यासाठी सध्या रामदेव यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्ष करताना दिसतो आहे. अण्णा हजारे यांच्याबाबतीतही तेच घडू लागले आहे. अण्णांच्या लढ्यात साथ देण्याची बात करणार्‍यांना आता अण्णाही नकोसे झाले आहेत. शेवटी हे सारे भीतीपोटी आहे. देश जागतो आहे याचीच ही भीती आहे

No comments:

Post a Comment