एखादा अतिरेकी भारतात काही घातपात करतो तेव्हा त्याला भारतातले पत्ते, महत्त्वाची ठिकाणे, वाहतुकीच्या सोयी, पासपोर्ट, मोबाईल कार्ड, फोन, राहण्याची जागा इत्यादी गोष्टी आपोआप मिळत नाहीत. कोणी तरी स्थानिक व्यक्ती त्यांना मदत करत असतेच. माहिती देत असते म्हणूनच या घातपाती कारवाया यशस्वी होतात. अशी मदत करण्यासाठी कार्यरत असणार्या संघटनांच्या अड्डय़ांना स्लीपर सेल म्हटले जाते. पोलीस हे सेल उद्ध्वस्त करण्याचा म्हणावा तसा प्रयत्न करत नाहीत, त्यात काम करणारे लोक अनेकदा उघडपणे काम करूनही मोकळे राहतात,काही वेळा या स्लीपर सेल्सचे स्वरूपच असे काही असते की त्यांना अटक करणे राजकिय कारणामुळे शक्य होत नाही. स्लीपर सेल हे दहशतवादी संघटनांना मदत करणारे एक जाळेच असते.
त्यांना परदेशातून मिळणारा पैसा थांबवला आणि त्यांच्या नांग्या ठेचल्या की देशातला दहशतवाद संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही.स्लीपर सेलचा सदस्य कधीच उघड होत नाही. अशा स्लीपर सेलच्या छुप्या हालचाली टिपण्याचे काम फार बारकाईने करावे लागते. या करता पोलिसांना सतत जागरूक रहावे लागते. एखाद्या वस्तीत नवा आलेला माणूस कोण आहे, कोणत्या वस्तीतली काही मुले एकदम बेपत्ता झाली आहेत, एखादा तरुण मध्येच काही दिवस बेपत्ता होऊन एकदम उगवला आहे, तेव्हा तो कोठे होता, त्याबाबत लोक काय बोलतात अशा बारीक-सारीक माहितीवर सतत लक्ष ठेवावे लागते. या दृष्टीने प्रत्येक पोलीस ठाण्यावर दोन दोन खास प्रशिक्षण दिलेले पोलीस नेमण्यात यावेत. त्या परिसरात असा एखादा स्लीपर सेल कार्यरत आहे का आणि असला तर त्या दृष्टीने काही छुप्या हालचाली होत आहेत का यावर लक्ष ठेवणे हे त्यांचे एकच काम असावे.
अतिरेकी संघटनांमध्ये सामील करून घेतलेल्यांना काही प्रशिक्षण आणि मोलाच्या सूचना देऊन मोकळे सोडलेले असते. हे प्रशिक्षण मिळाले की तो स्लीपर सेलचा सदस्य होतो.स्लीपर सेलचे सदस्य आपापला व्यवसाय करत असतात. तो एखाद्या स्लीपर सेलचा सदस्य आहे याचा पत्ता कोणालाही लागत नाही. पैशाच्या बदल्यात आपल्याला नेमके काय काम करायचे आहे याची त्याला काही कल्पना नसते. या सदस्यांनी कोणते काम करायचे आहे आणि कधी करायचे आहे याची योजना पाकिस्तानात/बांगलादेशात बसलेला कोणी तरी करत असतो. भारतात असे ३०० स्लीपर सेल आहेत असा अंदाज आहे.या स्लीपर सेल्सचे २०००-२५०० सदस्य असावेत .आता हे स्लीपर सेल उद्ध्वस्त करायचे आहे.
No comments:
Post a Comment