टेनिसमध्ये नोव्हाक जोकोविचचे विक्रमी २३ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद फेडरर-नडाल युगाच्या अंतावर आणि जोकोविच युगाच्या अद्भुत कालजयित्वावर शिक्कामोर्तब करणारे ठरले. तिकडे युरोपातच युएफा चॅम्पियन्स या जगातील सर्वात लोकप्रिय क्लब फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंग्लंडच्या मँचेस्टर सिटीने इटलीच्या इंटर मिलानला हरवून, या हंगामातील अतिशय दुर्मीळ अशा तिहेरी अजिंक्यपदांवर नाव कोरले. या अजिंक्यपदांचे संहिताकार ठरलेले मँचेस्टर सिटीचे अवलिया प्रशिक्षक पेप गार्डियोला आता फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तमांमध्ये गणले जाऊ लागले आहेत. नॉर्वेमध्ये एका अत्यंत उच्च दर्जाच्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशने अतिशय कौतुकास्पद तिसरे स्थान पटकावले. माजी जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनसह अनेक मातब्बर बुद्धिबळपटूंना मागे सोडत गुकेशने ही कामगिरी केली. महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने कझाकस्तानमध्ये झालेल्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकवताना थरारक कामगिरी केली. बुद्धिबळ जगतातील भारताच्या वाढत्या प्रभावाची झलक सादर करणारी ही कामगिरी. तर हॉकीमध्ये दक्षिण कोरियाचे खडतर आव्हान परतवून लावत भारतीय मुलींनी ऐतिहासिक आशियाई ज्युनियर अजिंक्यपद पटकावले आणि या राष्ट्रीय खेळामध्ये भारताची प्रगती सर्वागीण होत असल्याचे दाखवून दिले. हे सगळे घडत असताना आपले क्रिकेटपटू मागे कसे राहतील? महत्त्वाच्या आयसीसी सामन्यांमध्ये पराभूत होण्याचा पायंडा त्यांनीही कायम राखला! त्या सामन्याकडे लक्ष लागलेल्यांची संख्या बहुधा इतर बहुतेक सामन्यांच्या तुलनेत अधिक असू शकते. आता त्याच लक्षावधींपैकी बहुतांची या सामन्याविषयी बोलण्याची वा ऐकण्याची इच्छादेखील नाही. भारतीय क्रिकेट संघाच्या बाबतीत हे असे वारंवार घडू लागलेले आहे. परंतु त्याविषयी चिकित्सेकडे वळण्यापूर्वी विक्रमी अजिंक्यपद मिळवलेल्यांची गौरवपूर्ण दखल आवश्यक ठरते.
फेडरर आणि नडाल या महान टेनिसपटूंच्या प्रदीर्घ काळ छायेत राहून खेळणे ही एक बाब, त्यांच्यासमवेत स्वत:ची छाप पाडणे ही दुसरी बाब आणि या दोहोंपेक्षा अधिक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे ही तिसरी बाब. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने हा तिहेरी चमत्कार करून दाखवला. फेडरर आणि नडाल यांच्याइतकी रसिकप्रियता जोकोविचच्या वाटय़ाला कधीही आली नाही. कारण त्याच्या वागण्यात काही त्रुटी निश्चित आहेत. याउलट फेडरर आणि नडाल हे व्यक्ती म्हणूनही उच्च शहाणिवेचे होते. परंतु निर्दोष नाही म्हणून कुढत बसणे हाच सर्वात मोठा दोष. जोकोविच त्या पराभूत आणि रडय़ा मानसिकतेच्या वाटेला गेलाच नाही. फेडरर-नडालनंतर काही वर्षांनी जोकोविच मोठय़ा स्पर्धा जिंकू लागला. यात त्याच्या उच्च कौशल्याइतकाच वाटा अफलातून शारीरिक तंदुरुस्तीचा आहे. एक-दोन स्पर्धामध्ये थोडा चक्रमपणा दाखवला नसता, तर जोकोविच यावेळेपर्यंत पाव शतकी ग्रॅड स्लॅम अजिंक्यपदांचा मानकरी झाला असता. ते उद्दिष्ट आजही त्याच्या आवाक्याबाहेरील वाटत नाही. परंतु त्याच्या आसपास पोहोचणेदेखील विद्यमान सर्व टेनिसपटूंच्या आवाक्याबाहेरचे ठरते हे नक्की. कदाचित फेडरर-नडाल युगाने जोकोविचचा खेळ अधिक उंचावला असू शकतो. पण या दोघांच्या साम्राज्याबाहेर स्वत:चे साम्राज्य उभे करण्यासाठी आवश्यक मानसिक कणखरपणा आणि जिंकण्याची भूक जोकोविच ज्या प्रकारे आजही दाखवतो त्याला टेनिस इतिहासात तोड नाही.
युरोपियन क्लब फुटबॉलच्या इतिहासात दोन वेगवेगळय़ा क्लबसाठी (बार्सिलोना आणि मँचेस्टर सिटी) तिहेरी अजिंक्यपदे पटकावण्याचा मान मिळवणारे पेप गार्डियोला पहिले प्रशिक्षक ठरले. महान फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक योहान क्रुइफ यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या गार्डियोला यांनी स्वत:ची शैली विकसित केली. बार्सिलोना, बायर्न म्युनिक आणि आता मँचेस्टर सिटी या क्लबना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळत आहे. मँचेस्टर सिटीमध्ये अरबांची मोठी गुंतवणूक असली, तरी मैदानावर व्यूहरचना आखण्याची जबाबदारी गार्डियोला यांचीच असते आणि ते ती चोख पार पाडत आहेत
No comments:
Post a Comment