मराठयांची सांघिक कामगिरी जमिनीप्रमाणे ह्या समुद्रावरील (आरमार)'गनिमी काव्या'तही उत्कृष्टच होती. महाराजांच्या कारकिर्दीच्या अखेरीला पोर्तुगीजांनी मराठी आरमाराला सवलती देणे सुरू केले.
मागच्या लेखात आपण आरमाराची काही माहिती घेतली होती, आता पुढे. आरमारासंबंधात आपली उद्दिष्टे सुरुवातीच्या काळात तरी खाडया आणि किनारे एवढयापुरतीच राहायला पाहिजेत, हे महाराजांनी ओळखले आणि तशीच उपाययोजना केली. किनाऱ्याला आणि खाडयांमध्ये पाणी फार खोल नसते. त्यामुळे त्यांनी सपाट बुडाच्या नौकांना प्राधान्य दिले. तसेच वाऱ्याची साथही किनारपट्टीला आणि खाडयांमध्ये कमीच लागणार व असणार, हे जाणून त्यांनी वल्ही मारण्याच्या छोटया नौकांना प्राधान्य दिले. जमिनीवरील किल्ल्यांप्रमाणे समुद्री किल्ल्यांची जोडही त्यांनी आपल्या नौदलाला दिली. कारण रसद, संरक्षण, दुरुस्ती अशा तिन्ही सुविधा त्यातून मिळत होत्या. किल्ल्यांनाही टेहळणीसाठी आणि संपर्कासाठी ह्या नौकांचा चांगला उपयोग होत असे. अशा परस्परपूरक रचना करण्यात महाराजांचा हातखंडा होता. वल्ही मारणाऱ्या नौकांवर भिस्त असणाऱ्या नौकांचा उपयोग करून महाराजांनी खांदेरी बेटावरच्या किल्ला बांधणाऱ्या आपल्या कामगारांना आणि सैनिकांना रसद सतत चालू ठेवली. ही रसद बंद न करता आल्यानेच इंग्राजांना ह्या संघर्षातून नामुश्कीची माघार घ्यायला लागली. इंग्राजांच्या नौका महाराजांच्या नौकांपेक्षा खूप मोठया आणि मारगिरीत सरस होत्या, पण मराठयांनी समुद्रावरही 'गनिमी कावा' दाखवून त्याची मारकक्षमता प्रत्यक्ष उपयोगात येऊच दिली नाही. इंग्राजांची जहाजे मोठी असल्यामुळे वारा अनुकूल असल्याशिवाय त्यांचा उपयोग होत नसे. वारा पडलेला पाहून नेमक्या वेळी मराठे हलचाल करीत आणि इंग्राजांना हताश होऊन पाहत राहण्याशिवाय काही करता येत नसे. खाडीचे पाणी फार खोल नसल्यामुळे, हल्ला करून किंवा रसद पुरवून पळणाऱ्या मराठयांच्या छोटया नौकांचा पाठलागही इंग्राजांना करता येत नसे. आपल्या मुलखाला साजेशा ह्या युध्दपध्दतीमुळे इंग्राजांसारख्या बलाढय शत्रूलाही मराठयांनी जेरीस आणले. खांदेरी किल्ल्याच्या बांधकामाला संरक्षण देणाऱ्या मराठी सैन्यानेही आपले मनोबल खचू न देता इंग्राजांना यशस्वीरित्या तोंड दिले. मराठयांची सांघिक कामगिरी जमिनीप्रमाणे ह्या समुद्रावरील 'गनिमी काव्या'तही उत्कृष्टच होती.
ह्या आरमारी लढाईत 'संगमेश्वरी' पध्दतीच्या मराठी नौकांचा सर्वात जास्त उपयोग झाला. खांदेरीच्या रणसंग्राामात फार मोठया लढाया कधीच झाल्या नाहीत, मात्र सतत छोटया-मोठया चकमकी होत राहिल्या आणि त्याच इंग्राजांना जाचक झाल्या. ह्या चकमकींमुळे मोहिमेचा कालावधी वाढत गेला आणि त्यामुळे खर्च वाढून इंग्राज अडचणीत आले. मराठयांच्या ह्या क्षमतेचे भान आल्यामुळेच इंग्राजांनी तह करून ही मोहीम आटोपती घेतली. ह्यातल्या अनुभवामुळेच संगमेश्वरी पध्दतीच्या नौका आपल्याकडेही असल्या पाहिजेत असे त्यांना वाटू लागले.
महाराजांच्या ह्या धोरणीपणावर इंग्राजांची 'English people would never be slaves, because English fleet rules the waves' ही दर्पोक्ती मात करू शकली नाही. अशेरी, सुवर्णदुर्ग, खांदेरी, कुलाबा इ. मुंबईजवळची किल्ल्यांची साखळी ह्यात उपयोगी पडत होती. त्यामध्ये खांदेरी किल्ला मुंबईला सर्वात जवळ असल्याने इंग्राज व सिद्दी यांच्यामध्ये पाचर मारण्यासाठी त्याचा सर्वाधिक उपयोग होता. हे इंग्राज व सिद्दीलाही कळत असल्यानेच त्यांनी मराठयांना अयशस्वी पण कडवा विरोध केला.
आपले शत्रू म्हणून महाराजांनी इंग्राज, सिद्दी, पोर्तुगीज, डच यांना समोर ठेवले होते. आपले कार्यक्षेत्र म्हणून त्यांनी सुरत ते कडवाड (कारवार) हा पश्चिमी समुद्रकिनारा निश्चित केला होता. सुरुवातीला हे सर्वच शत्रू समुद्रावर व काही अंशी जमिनीवर / किनाऱ्यावर महाराजांना भारी होते. पण महाराज इ.स. 1660नंतर हळूहळू प्रभावी होत गेले.
उत्तरेला खांदेरी ते दक्षिणेला सिंधूदुर्ग इथपर्यंत 13 सागरी किल्ले उभारून / सुधारून किंवा काबीज करून महाराजांनी आपल्या समुद्री व्यापारालाही लढाऊ नौदलाच्या साह्याने उत्तम संरक्षण व प्रोत्साहन दिले. महाराज आग्य्राला औरंगझेबाच्या कैदेत अडकलेले असताना रांगणा किल्ला जिंकून स्वराज्य एका किल्ल्याने वाढवणारा रावजी उर्फ राहूजी सोमनाथ हाच महाराजांचा कोकण विभाग, त्यातही प्रामुख्याने व्यापारी व्यवधान सांभाळत असे, हे ह्या संदर्भात उल्लेखनीय. महाराजांचे Aggressive Marketing त्यातून चांगले व्यक्त होते. अनेक परकीयांच्या पत्रव्यवहारात ह्या रावजी सोमनाथचा उल्लेख वारंवार आला आहे.
व्यापाराचे महत्त्तव ओळखून मिठाच्या व्यापाराकरता महाराजांनी व्यापारी नौदल तयार ठेवले होते. मस्कत व मोचा ह्या अरबांच्या बंदरांशी व्यापार करण्याकरता त्यांनी डोलकाठयांची तीन जहाजे बांधली होती. मस्कतच्या इमामाशी महाराजांचे व्यापारी संबंध होते. ते फार घनिष्ट होते असे नव्हे, पण ह्या इमामाचे पोर्तुगीजांशी हाडवैर होते. शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र, या तत्त्वानुसार महाराजांनी त्यांच्याशी थोडा स्नेह ठेवला होता. व्यक्तिगत भेट अर्थातच झालेली नव्हती, पण दोस्तीचे सूत्र हुशारीचे होते. इथे त्याचा इस्लाम धर्म महाराजांनी विचारातही घेतलेला दिसत नाही.
इमामाच्या दोस्तीचा फायदा घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांकडून काही सवलती मिळवल्या होत्या. मस्कतच्या व्यापाऱ्यांनाही महाराजांच्या पश्चिम भारतातील किनाऱ्यावर फायदा होई, विशेषतः पोर्तुगीज त्यांना त्रास देत नसत. महाराजांच्या कारकिर्दीच्या अखेरीला पोर्तुगीजांनी मराठी आरमाराला सवलती देणे सुरू केले, ज्या ते मुघलांना देत असत.
महाराजांच्या आरमारात कोळी, गावित, भंडारी, खारवी, मुसलमान यांचा व इतरांचा प्रामुख्याने भरणा असे. ह्याचा अर्थ मराठी नौदलात नाविक होण्याचा एक नवा पेशाच महाराजांनी कोकणवासीयांना उपलब्ध करून दिला. कारण उपरोल्लेखित सर्व जमाती कोकणातल्याच आहेत. सुमारे 5000 लोक महाराजांच्या आरमारात काम करत होते. ह्याचा अर्थ 5000 कुटुंबांची आर्थिक स्थिती त्यामुळे सुधारली. महाराजांच्या आर्थिक उलाढालीचे, साहसांचे सुफल परिणाम सर्वकष होते.
No comments:
Post a Comment