Total Pageviews

Tuesday, 30 July 2019

भारत सरकारची ‘जलशक्ती’ अभियान मोहीम महा एमटीबी 30-Jul-2019 अच्युत राईलकर

सद्यस्थितीनुसार ग्रामीण भागातील सुमारे 80 टक्के घरांमध्ये नळाचे पाणी मिळण्याची वानवा आहे. देशातील प्रत्येक घरामध्ये 2024 पर्यंत नळातून पाणी मिळावे, या उद्देशाने 1 जुलै 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जलशक्ती अभियाना’ची घोषणा केली. त्याविषयी...
 
नीति आयोगाच्या 2018च्या पाण्यासंबंधीच्या अहवालानुसार, देशातील 60 कोटी नागरिकांना मोठ्या जलसंकटाला तोंड द्यावे लागत आहे.सरकारने ज्या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीत जलसंकट आहे, तेथील 255 जिल्ह्यातील 1,593 ठिकाणांच्या दुष्काळी भागाकरिता भूजलामध्ये वाढ होण्याकरिता 1 जुलैपासून ‘जलशक्ती’ मोहीम सुरू करून त्याकरिता प्रथम व द्वितीय पर्वाचे काम करण्याकरिता 550 गट करून 255 क्रियाशील (सचिव दर्जाच्या) अधिकाऱ्यांची सरकारने नेमणुका केल्या आहेत.
 
2014 पासून आतापर्यंत ग्रामीण भागातील लोकांना मिळणारे नळाचे पाणी (टक्क्यांमध्ये)
 
2014-15 (13.3)
2015-16 (13.6)
2016-17 (15.6)
2017-18 (17.0)
2018-19 (18.3)
 
राज्यानुरुप उपलब्ध नळाचे पाणी (टक्क्यांमध्ये)
 
50 टक्क्यांहून जास्त
 
सिक्कीम (99)
गुजरात (78)
हिमाचल (56)
हरियाणा (53)
पंजाब (53)
पुदुच्चेरी (50)
 
50 टक्क्यांहून कमी
 
कर्नाटक (44)
महाराष्ट्र (38)
तेलंगण (34)
आंधप्रदेश (34)
जम्मू-काश्मीर (30)
तामिळनाडू (30)
केरळ (17)
मिझोराम (16)
उत्तराखंड (14)
राजस्थान (12)
मध्यप्रदेश (12)
अंदमान-निकोबार (10)
अरुणाचल (9)
छत्तीसगढ (9)
झारखंड (6)
मणिपूर (6)
नागालँड (5)
ओडिशा (4)
त्रिपुरा (3)
आसाम (2)
बिहार (2)
उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि मेघालय (1)
 
राज्यवार दुष्काळी प्रदेशातील ‘जलशक्ती’ अंतर्गत सुरु असलेले कामे
 
तामिळनाडू (541)
राजस्थान (218)
उत्तरप्रदेश (139)
तेलंगण (137)
पंजाब (111)
हरियाणा (81)
आंध्रप्रदेश (69)
कर्नाटक (53)
बिहार (30)
गुजरात (30)
मध्य प्रदेश (29)
दिल्ली (24)
महाराष्ट्र (20)
जम्मू-काश्मीर (15)
अरुणाचल प्रदेश (11)
 
जलशक्ती अभियाना’च्या प्रथम पर्वाचे काम 1 जुलै, 2019 ते 15 सप्टेंबर, 2019 आणि दुसऱ्या पर्वाचे काम 1 ऑक्टोबर, 2019 ते 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत असेल. या ‘जलशक्ती’ अभियानात पाण्याची जपणूक व पर्जन्यजलाची साठवण करणे, पारंपरिक जलस्रोतांचे नूतनीकरण करणे, कूपनलिकांच्या दुरुस्त्या करणे व खड्डे करून त्यात पर्जन्यजल झिरपून जाण्याची व्यवस्था करणे व सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातून पुनर्वापर जल निर्माण करणे, भूजलामध्ये वाढ करणे, झाडांची लागवड करणे आदी कामांचा अंतर्भाव आहे.
 
स्वतंत्र ‘जलशक्ती’ खाते
 
मोदी सरकारने ‘जलशक्ती’ विभागाच्या कामांकरिता स्वतंत्र खात्याची उभारणी केली. त्यात पेयजल, मलमूत्र स्वच्छता कामे, जलस्रोत, नद्या, गंगा शुद्धीकरण कामे, देशात सर्व घरांकरिता नळाचे शुद्ध पाणी पुरविणे, पाणी संचयन करणे या कामांकरिता गजेंद्रसिंग शेखावत यांची जलशक्तीमंत्री म्हणून नेमणूक झाली आहे. 255 जलसंकटांच्या जिल्ह्यांचे काम त्यानी ताबडतोब हातात घेतले आहे. शेखावत यांनी यासंदर्भात दिलेल्या एका मुलाखतीतील काही मुद्दे प्रकर्षाने मांडत आहे. पाणी हा विषय संपूर्ण विश्वाकरिता फार महत्त्वाचा ठरतो. आपल्या देशात 65 टक्के नागरिक भूजलावरती म्हणजे विहिरीच्या पाण्यावर तहान भागवितात. देशातील एकूण वर्षाला मिळणाऱ्या चार हजार अब्ज घनमीटर पाण्यापैकी फक्त 1,198 अब्ज घनमीटर पाणी वापरण्याजोगे आहे व त्यातील 300 अब्ज घनमीटरपेक्षा कमी पाणी उपलब्ध असलेल्या 5 हजार, 400 जलाशयांमध्ये साठविता येते. भूजलातील व इतर ठिकाणच्या पाण्यासह आपण फक्त 600 अब्ज घनमीटर पाणी वापरात आणू शकतो. लोकसंख्यावाढीमुळे व पाणीटंचाईमुळे 1950 मध्ये प्रत्येक माणसाला मिळणारे 5,100 घनमीटर पाणी आताच्या काळात माणशी 1,400 घनमीटरपर्यंत कमी झाले आहे. हळूहळू हा आकडा एक हजार घनमीटरपर्यंत पोहोचेल म्हणजेच जलदुर्भिक्षतेच्या मर्यादेला पोहोचेल. अनुमानाकरिता यात माणशी दिवसाला 50 लिटर पाण्याचा वापर हिशोबात धरला आहे. हे पाण्याचे संकट वा जलक्रांती प्रथम दूर झाली पाहिजे. 1 जुलैला जलशक्ती मंत्रालयाने 255 जिल्ह्यातील 1 हजार, 593 ठिकाणी जलशक्ती मोहिमेचे काम सुरू केले आहे. हे जलसंकट दूर करण्याकरिता चार प्रकारची कामे करावी लागतील. पर्जन्यजल साठवण करणे वा जमिनीत ते जिरवून भूजलाचा साठा वाढविणे. दुसरे काम म्हणजे, पाण्याचा योग्य प्रकारे वापर करणे. आपल्या जलवापरामध्ये घरगुती पाणी, औद्योगिक कामाकरिता वापर व शेतीकरिता वापर असतो. परंतु, शेतीकरिता 89 टक्के व इतर घरगुती-औद्योगिक वापराकरिता फक्त 11 टक्के पाणी लागते.
 
आपण सध्या जे शेतीकरिता पाणी वापरतो त्यात फार पाणी फुकट घालवितो. एक किलो तांदळाच्या उत्पन्नाकरिता सरासरी भारतात 5,600 लिटर पाणी वापरले जाते, तर चीनमध्ये फक्त 350 लिटर पाणी लागते. भारतात 89 टक्के पाणी शेतीकरिता वापरले जाते, तर चीन व ब्राझील देशात हे प्रमाण अनुक्रमे फक्त 65 टक्के व 60 टक्के एवढेच आहे. आपल्याकडे बुद्धी व तंत्रज्ञानाची कमतरता नाही, पण आपण भारतीय पाण्याला महत्त्व न देता त्याचा अनावश्यक वापर करतात. तिसरा प्रकार म्हणजे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे.सिंगापूरसारख्या देशात मलशुद्धीकरण करून पाण्याचा पुनर्वापर केला जातो. नेहमीच्या वापरलेल्या पाण्यात तेथे 70 टक्क्यांपर्यंत पुनर्वापराचे पाणी वापरले जाते. असे भारतात घडले तर कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा व पंजाबमधील सध्या चालू असलेले जलतंटे दूर होऊ शकतील. चौथी गोष्ट म्हणजे वृक्षांची लागवड करणे. त्यामुळे वृक्षलागवड करुन आपण आपला प्रदेश अधिकाधिक हरित बनविला पाहिजे.
 
दुष्काळी 255 जिल्ह्यांच्या जलसंकट दूर करण्याकरिता ‘जलशक्ती’ मंत्रालयाने सर्व राज्यांकडे पारंपरिक पाणथळी व जलसाठ्यांविषयी विचारविनिमय सुरू केला आहे. यावेळी काही माहिती ‘जलशक्ती’ खात्याला बुंदेलखंडाच्या दुष्काळी विभागातून कळली. साधारण सहाशे ते एक हजार वर्षांपूर्वीच्या काळातील तत्कालीन चांदेला राज्यकर्त्यांनी नऊ हजार पाण्याच्या टाक्या बांधल्या होत्या. त्यातील अडीच हजार टाक्या शोधून, त्यातील अडीचशे टाक्यांचे गेल्या दोन वर्षांत नूतनीकरण करून त्या वापरण्यास सुरुवात झाली आहे व बुंदेलखंडच्या दुष्काळी समस्यांपैकी अर्ध्या समस्या दूर झाल्या आहेत. जर सर्व नऊ हजार टाक्या शोधून, त्या वापरात आणण्याजोग्या बनविल्या, तर बुंदेलखंड प्रदेश हा जलयुक्त श्रीमंत बनेल. या सगळ्या टाक्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, या सर्व टाक्या एकमेकांना जोडलेल्या होत्या. एका टाकीतील पाणी कमी झाले, तर जोडणीमुळे परत भरले जाते. तशीच एक जुनी जलसंचय यंत्रणा जयपूरच्या एका किल्ल्यातही कार्यरत होती. त्या किल्ल्यात एक तीन कोटी लिटर क्षमतेची टाकी व त्याला 25 किमी लांब जाळी असलेला कालवा बांधलेला आहे. त्यात पर्जन्यजल साठविले जायचे व ते एक वर्षभर किल्ल्यात राहिलेल्या 30 हजार सैनिकांच्या सहज उपयोगी पडायचे.
 
गंगाशुद्धीकरणाकरिता सरकारतर्फे 20 वर्षांपूर्वी मलजल प्रक्रिया केंद्रे स्थापली गेली. पण, ती राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे बंदच पडली. त्यामुळे जर गावकऱ्यांना प्रक्रिया केंद्रे नकोत, मग पाणी कसे शुद्ध होणार, हा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी आता वाराणसीला 27मलजलवाहिन्यांवर प्रक्रिया केंद्रे सरकारतर्फे बांधली जाणार आहोत व ती चालविण्याकरिता राज्य सरकारकडे केंद्र सरकारच्या मदतीने करार करण्यात येईल. सरकारच्या म्हणण्यानुसार, जर जर्मनीमध्ये र्‍हाईन नदी शुद्धीकरण अनेक पर्वांच्या कामाला 25 वर्षे लागली, तर गंगा शुद्धीकरण कामाला काही वर्षे लागू शकतात. नागरी क्षेत्राकरिता शुद्ध पाणी पुरविण्याचे केंद्र सरकारचे ध्येय असून या कामांच्या निधीसाठी बीओटी, पीपीपी मॉडेल इ. तयार करावी लागतील. अगदी लहानपणापासून आपण पाण्याला जलदेवता मानत आलो आहोत. प्रत्येक गावात एक तळे असायचे. त्याच परिसरातील क्षेत्रामधून पाणी साठविले जायचे व ते पाणी उन्हाळ्याच्या वेळी कामाला यायचे. परंतु, आता अशा जलसाठ्याच्या परिसरात अतिक्रमणे वाढली आहेत. जनमानसाच्या विचारसरणीमध्ये जीवनशैलीमुळे बदल घडला आहे. या अशा भरकटलेल्या समाजाला जागे करून आपण हे जलसंकट दूर करायला हवे.

Monday, 29 July 2019

मोठ्या लढाईची तयारी?महा एमटीबी 29-Jul-2019 मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शाह जी काही पावले उचलत आहेत, त्यामागे मोठ्या लढाईची तयारी चालू असल्याचे नक्कीच जाणवते.-tarun bharat editorial


 जम्मू-काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत झालेली घट, नुकतेच शक्तीशाली केलेली 'एनआयए' ही तपास यंत्रणा, तर 'युएपीए' कायद्यातील व्यक्तीलाही दहशतवादी ठरवण्याची दुरुस्ती या सगळ्याच घडामोडींचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे.

फाळणीपासूनच तमाम राष्ट्रवादी देशभक्तांच्या हृदयाला पीळ पाडणारी भळभळती जखम म्हणजे जम्मू-काश्मीर! जम्मू-काश्मीरसंदर्भात चर्चा केल्याशिवाय, भारतातील विनाशर्त-सर्व प्रकारची कलमे वगळून विलीनीकरणाच्या विचाराशिवाय त्यांचा एकही दिवस कधी जात नसेलतर देशविघातक ताकदींसाठी मात्र जम्मू-काश्मीर ही आपली दुकानदारी चालवण्याची अव्याहत सोयच! अशा विघातकांत दहशतवादी, फुटीरतावादी-आझादीवादी, पाकिस्तानी घुसखोर आणि 'आयएसआय' तर येतातच, पण मुफ्ती-अब्दुल्ला कुटुंबीयांशिवायही ही नामावली पूर्ण करता येत नाही. आताच हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांपासून जम्मू-काश्मीरचे पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी येणे.

नुकतीच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये १० हजार अतिरिक्त सैनिकांची कुमक तैनात केली आणि देशाच्या राजकीय, माध्यमी, बुद्धीजीवी वर्तुळात पतंगबाजीला ऊत आला. मोदी सरकार आता जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 'कलम ३७०' 'कलम ३५ अ' तत्काळ रद्द करणारहा त्यातला प्रमुख मुद्दाचर्चेच्या याच पतंगबाजीवर उडत मग राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्तींनी ताळतंत्र सोडले व त्या फुत्कारू लागल्या. "३५ अ कलमाशी छेडछाड करणे हे दारूगोळ्याच्या कोठारावर हात टाकण्यासारखे होईल आणि जो हात यासाठी उठेलतो हातच नव्हे तर त्याचे संपूर्ण शरीर जळून राख होईल," असे त्या उद्गारल्या. तसे पाहता मेहबूबांचे म्हणणेही खरेच आहेत्यात चुकीचे काहीच नाही.

मेहबूबा मुफ्ती असोत वा त्यांच्याच रांगेतले ओमर आणि फारुख अब्दुल्ला असोतही सगळीच मंडळी दारूगोळ्याचेच सौदागर आहेत.आजपर्यंत त्यांनी याच दारूगोळ्याच्या कोठारांची भीती दाखवत केंद्र सरकारला जम्मू-काश्मीरबद्दल कोणताही निर्णय घेण्यापासून परावृत्त केलेही दारूगोळ्याची कोठारे म्हणजेच दगडफेके, फुटीरतावादी-आझादीवादी, दहशतवादी आणि त्यांच्या पिलावळी. परंतु, केंद्रात पुन्हा एकदा मोदींचे सरकार सत्तेवर आलेगृहमंत्रीपदी अमित शाह विराजमान झाले आणि एकमेकांना सांभाळून घेणार्‍या या सर्वांच्याच तोंडचे पाणी पळालेदेशाशी गद्दारी करणार्‍यांना आपले दिवस भरल्याचे जाणवले. आता हीच सगळी मंडळी निरर्थक बडबडीतून, बेताल बरळण्यातून बचावाची अखेरची फडफडधडपड करत असल्याचे दिसते. मात्रजेव्हा केव्हा वरील कलमांबद्दल निर्णय घेतला जाईलतेव्हा तो घेणार्‍यांच्या हातांची नव्हे, तर या कलमांच्या जीवावरच आपला मतलब साधणार्‍यांच्या देशविघातक, देशविरोधी मनसुब्यांची राख होईल, हे निश्चित.

दुसरीकडे जम्मू-काश्मीरची समस्या सैनिकी नव्हेतर राजकीय असल्याचे नेहमीच बोलले जाते. त्यावर उपायही राजकीय पद्धतीनेच शोधला पाहिजे, असेही म्हटले जाते. त्यापैकीच एक उपाय म्हणजे परिसीमनाचा. जम्मू-काश्मीर विधानसभेत एकूण १११ जागा असल्या तरी त्यापैकी केवळ ८७ जागांवरच निवडणुका होतातउरलेल्या २४ जागा पाकव्याप्त काश्मीरमधील मंडळींसाठी राखीव ठेवल्या आहेत.विधानसभेच्या सर्वच जागांसाठी मतदान होत नसल्याने अन्याय होणारी लोकसंख्याही राज्यात मोठी आहेही लोकसंख्या जम्मू आणि लडाख भागात वसलेली असून काश्मीर खोर्‍याला जितके प्रतिनिधीत्व मिळते, तेवढे त्यांना मिळत नाही. जम्मू या हिंदूबहुल व लडाख या बौद्धबहुल भागातील जनतेवरील हा अन्यायच. परंतुमतदारसंघांच्या परिसीमनाने किंवा पुनर्रचनेने या अन्यायापासून मुक्ती मिळेल, असे त्यांना वाटते.

२००५ साली असा प्रस्तावही आला होता. मात्रसत्तास्वार्थात बुडालेल्या फारूख अब्दुल्ला सरकारने तो फेटाळलाआताची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहेत्यामुळे इतकी वर्षे आपल्या कैक पिढ्यांची सोय करण्यासाठी राज्यातील जनतेला न्याय देणारा परिसीमनाचा प्रस्ताव पुन्हा एकदा मांडता येईल का, याची चाचपणी करून ठोस निर्णय घ्यायला हवा. असे झाल्यास,आतापर्यंत राज्याला स्वतःची जहागीर समजणार्‍या आणि ही जहागीर सांभाळण्यासाठी अराजक माजविणार्‍यांनादहशतवाद्यांना पाठीशी घालणार्‍यांना धडा शिकवता येऊ शकतो. कारणही सगळीच मंडळी स्वतःकडील अधिकाधिक जागांच्या मदतीनेच तर आपली कारस्थाने करत असतात, दोन-चार जिल्ह्यातल्या तणावाला संपूर्ण राज्यातली समस्या सांगत असतात, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत असतात. परिसीमन केल्यास त्यांचे हे सगळेच उद्योग थांबतील आणि जम्मू-काश्मीर समस्येवर राजकीय तोडगाही निघेल.

जम्मू-काश्मीरविषयक चर्चा करताना तिथल्या जनतेचाही उल्लेख केला जातोकेंद्र सरकारने एखादा निर्णय घेतला तर त्यावर तिथल्या जनतेची प्रतिक्रिया काय असेल? तणाव निर्माण होईल, कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशांतता नांदेल आदी गोष्टी यावेळी उपस्थित केल्या जातात. मात्र, इथे काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. जम्मू-काश्मिरातील स्थानिक जनतेला राजकारण्यांनी चालवलेल्या सत्तेच्या-संघर्षाच्या-विरोधाच्या खेळात रस नाहीचतिथे एखाद्या घटनेवरून उडणारा उद्रेक हा कृत्रिमच असतोत्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा वा समर्थन नसतेच आणि तो निर्माण करतात फुटीरतावादी-आझादीवादीराज्यातल्या राजकीय शक्ती व भारतविरोधी तत्त्वेइथल्या तणावाला सर्वसामान्यांचा पाठिंबा असता तर तिथल्या सर्वच प्रकारच्या चळवळी 'एनआयए'ने छापे पडल्यानंतर, फुटीरतावाद्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर, दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतरही चालूच राहिल्या असत्या.

कारणएखाद्या भूभागातल्या जनतेची स्वातंत्र्यकांक्षा जगातल्या महासत्ताही रोखू शकत नसतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चले जाव आंदोलन! ब्रिटिशांनी देशपातळीवरील नेतृत्वाला गजाआड करूनही चले जाव आंदोलन सुरूच होते, त्यात कसलाही खंड पडला नव्हता. इथेच त्यातली प्रामाणिकता स्पष्ट होते. जम्मू-काश्मीर प्रश्नाचे मात्र तसे नाही. तिथल्या जनतेला फूस लावून, प्रलोभने दाखवूनसंपर्क साधून आपल्यामागे उभे करण्याचा प्रयत्न राज्यातील अराजकवादी गट करतातपण ते तेवढ्यापुरतेच असते. त्याला जनतेच्या प्रबळ इच्छाशक्तीचा आधार नसतो. तसा आधार असता तर तिथल्या जनतेने मतदानातसरकारी योजनांत, प्रकल्पांत सहभागच घेतला नसता. त्यामुळे आता केंद्र सरकारने १० हजार सैनिक जम्मू-काश्मिरात धाडल्याने तिथली जनता भयाच्या सावटाखाली आहे, 'त्या दोन कलमांशी छेडछाड केली तर खाक व्हाल,' वगैरे धमक्या बोगस ठरतात. भय कोणाला वाटत असेल तर ज्या मोजक्या कुटुंबांनी सरकारी अनुदानाचा पैसा लाटला, त्यावर घरे भरलीफुटीरतावाद्यांकडून खंडणी उकळली त्यांनाच!

होएक मात्र नक्की कीमोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शाह जी काही पावले उचलत आहेतत्यामागे मोठ्या लढाईची तयारी चालू असल्याचे नक्कीच जाणवते. दगडफेकीच्या घटनांत झालेली घट, काश्मिरी युवकांचा विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचा वेगरोजगाराच्या संधींचा फायदा घेण्याकडचा वाढता कल आणि त्या जोडीला नुकतेच शक्तीशाली केलेली 'एनआयए' ही तपास यंत्रणा तर 'युएपीए'कायद्यातील व्यक्तीलाही दहशतवादी ठरवण्याची दुरुस्ती या सगळ्याच घडामोडींचा एकमेकांशी जवळचा संबंध आहेतसेच आगामी काळातही काश्मीरची समस्या निकालात काढण्यासाठी धाडसीपणे निर्णय घेतलेच जातील, जेणेकरून ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते, ते खरेच तसे होईल

Friday, 26 July 2019

भारताच्या तरुण, मिसरूडही न फुटलेल्या, 20 ते 35 वर्षांच्या 527 शूर वीरांनी अतिशय प्रतिकूल वातावरणात, हाती असलेल्या शस्त्रांनी लढा देत आपले बलिदान देताना, कारगिलमधल्या 14 ते 17500 फुटांवरील पोस्टवर सफलतापूर्वक कब्जा केला आणि पाक सैनिकांना संपूर्णतः हाकलून लावले होते. कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) -


कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)  
भारताच्या तरुण, मिसरूडही न फुटलेल्या, 20 ते 35 वर्षांच्या 527 शूर वीरांनी अतिशय प्रतिकूल वातावरणात, हाती असलेल्या शस्त्रांनी लढा देत आपले बलिदान देताना, कारगिलमधल्या 14 ते 17500 फुटांवरील पोस्टवर सफलतापूर्वक कब्जा केला आणि पाक सैनिकांना संपूर्णतः हाकलून लावले होते. 
भारतासाठी हा एक ऐतिहासिक विजय होता. पॉईंट 5140 वरील विजयानंतर तत्कालीन सेनाध्यक्ष जनरल व्ही. पी. मलिक यांनी विक्रम बत्रा यांना स्वतः फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि विचारले, की तुला काय हवंय? यावर विक्रम बात्रा उत्तरला, ‘सर, ये दिल मांगे मोअर!आणि हीच त्याची व्हिक्टरी साईन होती. त्याचे हे उत्तर भारताच्या तरुणाईने डोक्यावर घेतले होते.
17 हजार फूट उंचीवर केलेल्या या ऑपरेशनमध्ये एकही जीवहानी न होता, त्या शिखरावर घुसखोरी केलेल्या पाकड्यांना मिशीसुद्धा न फुटलेल्या, या कोवळ्या वीरांनी धूळ चारली. या शिखरावर कब्जा केल्यावर पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्याला तोंड देण्यासाठी विक्रम बत्रा व संजीव जमवालला काही दिवस पॉईंट 5140 वर थांबणे जरुरी होते. तेथे 26 जूनपर्यंत थांबल्यानंतर त्यांची कंपनी पलटण मुख्यालयात रेस्ट अँड रिफिटसाठी आली. त्यानंतर त्यांना पॉईंट 4875 वरील हल्ल्याच्या मदतीला जावे लागले. 5 जुलैला रात्री एक वाजता 13 जॅक अलायनी पॉईंट 4875 हस्तगत केले; पण त्यांच्यावर उत्तरेकडील लांबलचक पाकी पोस्टवरून तुफान फायर होत असल्यामुळे तेथे पाय रोवणे मुश्कील होते. 4875 वर पूर्ण कब्जा करण्यासाठी उत्तरेकडील त्या पाकिस्तानी पोस्टवर कब्जा करणे अत्यावश्यक होते. 6 जुलैपर्यंत तो होऊ शकला नाही. त्यामुळे विक्रम बत्राला त्यांच्या मदतीला पाठवण्याचा निर्णय कमांडिंग ऑफिसरला घ्यावा लागला. 
कॅप्टन विक्रम व त्याची कंपनी तेथे आल्यामुळे पॉईंट 4875 वरील सैनिकांमध्ये नवीन स्फुरण निर्माण झाले. 5140 वरील त्यांच्या पराक्रमाच्या गाथा तोपर्यंत सर्वदूर पसरल्या होत्या. रेडिओ इंटरसेप्शनच्या माध्यमातून पाक चौकीवरील सैनिकांना विक्रम तेथे पोहोचल्याची खबर मिळाली. शेर शाहा, उपर तो आ गये हो, पर वापस नाही जाने देंगे। इन्शाल्हा, उपरही भेज देंगे।, असा संदेश त्यांनी भारतीय पोस्टला दिला. निडर विक्रमनी उत्तर दिले, ‘ठीक समज लो. उपर तो तुम्हे और तुम्हारे साथीयोंको जाना होगा।
6-7 जुलैच्या रात्री विक्रमनी लेजवर हल्ल्यासाठी जाण्याची तयारी केली. प्रचंड थकवा आणि तापामुळे त्याचे डोळे लाल झाले होते. त्याच्या त्या अवस्थेमुळे कमांडिंग ऑफिसरनी त्याला जाण्याची परवानगी दिली नाही; पण विक्रमनी हट्टच धरला. त्याचे वर्तन पाहून स्फुरण पावलेल्या अनेक सैनिकांनी त्याच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. लेजकडे जाताना विक्रमची देहबोली अचानक बदलली. थकलेल्या, आजारी सैनिकाऐवजी एक नवाच, ‘करो या मरोया विचारांनी ग्रासलेला नवा विक्रम त्याच्या कंपनीला लीड करत होता. मश्कोह खोर्‍यातील अती थंड वारे आगेकूच करणार्‍या त्या सैनिकांच्या हाडात खिळत होते. त्यावेळीच बर्फवृष्टी सुरू झाली. आपल्या थकलेल्या सैनिकांमध्ये जोश भरत विक्रम एखाद्या हिमबिबट्यासारखा चपळाईने लेजकडे सरकत असतानाच त्याला मशिनगनची रॅटरॅट ऐकू आली. त्यांच्या समोर जाण्यावर मशिनगन फायरनी अटकाव केला. विक्रमनी तेथील खडकांच्या मागून लपतछपत जात त्या मशिनगनवर हॅन्ड ग्रेनेड फेकून तिला बरबाद केले. त्यानंतर आपल्या एके 47 रायफलनी फायर करत विक्रम शत्रू जवळ पोहोचला. 
इतक्या जवळ रायफल फायर करणे अशक्य असल्यामुळे विक्रमनी रायफलवर संगीन (बायोनेट)चढवून तेथील पाकड्यांवर तडक हल्ला चढवला. एका पाक सैनिकाला त्यांनी संगिनीने भोकसून ठार मारले. त्याच्यावर मागून चाल करून आलेल्या दुसर्‍याला धोबीपछाड मारून खाली पडून त्यालाही भोकसलं आणि  तो लेजवर पोहोचला. तेथील मशिनगन पोस्टमध्ये दोन पाकी त्यांच्या गनला फीड करत होते. एक गन चालवत होता आणि एक यंग ऑफिसर त्यांना सुपरवाईझ करत होता. विक्रमनी त्या चौघांनाही गोळ्या घातल्या खर्‍या; पण तोही शत्रूच्या गोळ्यांनी जखमी झाला.
तिकडे लेफ्टनंट अनुज नायर लेजवरील इतर बंकर्सचा सफाया करत होता. जखमी विक्रम मशिनगन पोस्टमधून बाहेर आला असता त्याने स्फोटात पाय तुटलेल्या लेफ्टनंट नवीन अमबरूला पाहिले आणि तो त्याच्या मदतीला जाऊ लागला. त्याच्याबरोबर असलेल्या सुभेदारांनी तुम्ही जखमी आहेत, तुम्ही जाऊ नका, मी जातोअसे म्हटले असता कॅप्टन विक्रमनी त्याला हुकूम दिला, ‘तू बालबच्चेदार है, हट जा पीछेअसे म्हणत त्यांनी अनुजला ओढत खडकामागे आणले; पण हे करत असतानाच त्याच्या छातीला शत्रूच्या गोळ्यांनी घायाळ केले आणि भारतमातेच्या या वीरसुपुत्राने त्याच जागी आपला देह ठेवला. कॅप्टन विक्रम बत्राला त्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल परमवीरचक्र (मरणोत्तर) प्रदान करण्यात आले.
कारगिलहून परत आल्यावर कॅप्टन विक्रम बत्रा आपली बालपणीची मैत्रीण डिम्पल चिमाशी लग्न करणार होता; पण त्याआधीच त्याला देवाकडे जाव लागले. त्याच्या बरसीला आपल्या मित्राबद्दल असलेल्या भावना प्रकट करताना मिस चिमा म्हणतात, ‘नॉट ए सिंगल डे, आय फेल्ट डिटॅच्ड फ्रॉम यू. आय फील सो प्राऊड व्हेन पीपल टॉक अबाऊट युवर अकम्प्लिशमेंट्स. बट अलॉन्ग विथ दॅट, देअर इज सम रिग्रेट इन द कॉर्नर ऑफ माय हार्ट. यू शुड हॅव बीन हियर; शेअरिंग, लिसनिंग टू स्टोरीज ऑफ युवर ब्रेव्ह डीड्स, ऑफ हाऊ यू आर इन्स्पिरेशन फॉर यूथ ऑफ टू डे. आय नो इन माय हार्ट दॅट वुई आर गोईंग टू मीट अगेन, इट्स जस्ट ए मॅटर ऑफ टाइम.
राजपुताना रायफल्सचा कॅप्टन विजयन्त थापर धारातीर्थी पडला, त्यावेळी केवळ 22 वर्षांचा होता. त्याच्यामुळेच भारताला टोलोलिंगवर तिरंगा फडकवता आला. त्याला त्याच्या अतुल शौर्याबद्दल महावीरचक्र (मरणोत्तर) प्रदान करण्यात आले. त्याचे वडील कर्नल विजेंद्र थापर 2016 मध्ये 16 हजार फुटांवर असलेल्या शिखरावर गेले, जेथे विजयंतनी शत्रूशी लढताना आपला देह देशार्पण केला. युद्धात डोळ्याला इजा झाल्यामुळे आपल्या उजव्या डोळ्यावर हिरव्या रंगाची कापडी झापड लावलेले कर्नल विजेंद्र थापर नेहमी इंग्लिश चलचित्र वाहिन्यांच्या चर्चांमधे दिसतात. आपल्या मुलाबद्दल बोलताना त्यांचे डोळे भरून येतात.  
राजपुताना रायफल्सचे मेजर पद्मपाणी आचार्या टायगर हिलवर लढताना धारातीर्थी पडले, त्यावेळी त्यांची पत्नी गर्भवती होती. 21 जूनला पद्मपाणी आपल्या घरच्यांबरोबर फोनवर बोलले; पण यानंतर त्यांचा आवाज कधीच आपल्या कानी पडणार नाही, याची त्यांच्या कुटुंबीयांना तिळमात्र कल्पना नव्हती. मेजर पद्मपाणी आचार्यांना महावीरचक्र या वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
शीख रेजिमेंटच्या लान्स नायक निर्मल सिंग वीर चक्र यांच्या गणवेशाच्या आधारे त्यांच्या पत्नी, जसविंदर कौर आपले दिवस काढताहेत. टायगर हिलवर निर्मल सिंगनी देशासाठी आपले प्राण द्यायला मागे-पुढे पाहिले नाही. त्यावेळी जसविंदर कौरचे लग्न होऊन केवळ पाचच वर्षे झाली होती. त्यांचा पुत्र निर्जस सिंग फक्‍त तीन वर्षांचा होता. आज तो आर्मीत लेफ्टनंट आहे. जसविंदर कौर निर्मल सिंगच्या गणवेशाला ममतेने कुरवाळत असतात.  
कारगिल युद्धाच्या सुरुवातीला  बटालिक शिखराचे रक्षण करताना मेजर मॅरिअप्पन सर्वांनन वीरचक्रला 29 मे 1999 रोजी वीरगती प्राप्त झाली. कारगिल युद्धातील हा पहिला बळी होता. त्यांना हिरो ऑफ बटालिकम्हणतात. त्याचे पार्थिव एक महिन्यापेक्षा जास्त दिवस बर्फामध्ये पडून होते. भारतीय सैनिक त्याचे पार्थिव घेण्यासाठी काही हालचाल करताच पाकिस्तान फायर करत असे आणि पाकिस्तानने त्यांचे कलेवर नेण्याचा प्रयत्न करताच भारतीय सैनिक फायर करत असत. मृत्यूनंतर 41 दिवसांनी त्यांचे पार्थिव भारताला मिळू शकले. आपल्या मुलाच्या शेवटच्या भेटीची आठवण काढताना त्यांच्या मातोश्री श्रीमती अमिथावल्ली मॅरिअप्पन अत्यंत भावूक होतात.  
18 ग्रेनेडियर्सच्या मेजर राजेश अधिकारी, महावीर चक्रचे लग्न कारगिल युद्धाच्या केवळ दहाच महिने आधी झाले होते. कारगिलला जाण्याचा आदेश मिळाल्यावर त्याला प्रचंड अभिमान वाटला आणि तो उत्साहान सळसळून गेला. आपल्या एका पत्रात त्यांनी पत्नी किरणला लिहिले की, तो परत येईल की नाही, याची खात्री देता येत नाही. किरण त्यावेळी गर्भार होती; पण तिने त्याला उत्तर पाठवले. राजेशला ते पत्र मिळाले तेव्हा तो मिशनवर जाण्याची तयारी करत होता आणि त्यांनी विचार केला, की मिशनहून परत आल्यावर आरामात पत्र वाचू, त्याची पारायण करू; मात्र त्याला ते शेवटचे पत्र वाचायची संधीच मिळाली नाही. किरण त्या पत्रात लिहिते, ‘तू परत आलास, तर मला निश्‍चितच आनंद होईल; पण तू परतला नाहीस तर मी शहीदपत्नी म्हणून अभिमानाने आयुष्याची गुजरान करेन.’ 
अशा अनेक गाथा ऐकताना डोळे पाणावतात व उर भरून येतो. भारताच्या तरुण, मिसरूडही न फुटलेल्या, 20 ते 35 वर्षांच्या 527 शुरवीरांनी अतिशय प्रतिकूल वातावरणात, हाती असलेल्या शस्त्रांनी लढा देत आपले बलिदान देताना, कारगिलमधल्या 14-17500 फुटांवरील पोस्टवर सफलतापूर्वक कब्जा केला आणि तेथे घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैनिकांना संपूर्णतः हाकलून लावले होतं. त्यांच्या या स्फूर्तिदायक स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येक 27 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण होताहेत, त्या निमित्तानं दोन्ही बाजूकडील वीरांना भावपूर्ण आदरांजली. कारण सोल्जर्स नेव्हर डाय, दे जस्ट फेड अवे..