Total Pageviews

Wednesday, 26 August 2015

विठ्ठल शंकर पवार व देवांगण सुकुजी परदेशी (मरणोत्तर) यांच्या या शौर्याकरिता शौर्यपदक

सलाम शूरवीरांना महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या गडचिरोली येथे पोलीस खडतर आव्हान पेलत आणि प्रसंगी आपल्या जिवाची बाजी लावत नक्षलवाद्यांशी कसा सामना करतात त्याची कहाणी.. नक्षलवादी हालचालींची गोपनीय माहिती साहाय्यक समादेशक जोशी यांना १९ ऑगस्ट २०११ रोजी मिळाली. कोतेगाव पोलीस ठाण्याच्या घनदाट जंगलात रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास नक्षलविरोधी पथकाची गस्त सुरू झाली. सुमारे तीन तासांनंतर हे पथक मकडचुवाच्या एका गावानजीक पोहोचले. त्याच वेळी 'सीआरपीएफ'चे साहाय्यक समादेशक जोशी यांना झाडामागे काही संशयास्पद हालचाल सुरू असल्याची शंका आली. त्यांनी तात्काळ आपल्या चमूला सावधान राहण्याचा आदेश दिला आणि नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. पण या आवाहनाला न जुमानता नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.पोलीस हवालदार देवांगण सुकुजी परदेशी हे 'फ्रंट पोझिशन'वर होते. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून त्यांनीही गोळीबार सुरू केला. नक्षलविरोधी पथकाने आखलेल्या धोरणानुसार साहाय्यक समादेशक जोशी हे त्यांच्या चमूसह उजव्या बाजूने नक्षलवाद्यांना घेरणार होते. त्यांना नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचणे सोपे व्हावे म्हणून पुढे असणारे पोलीस हवालदार परदेशी आणि त्यांचे सहकारी 'कव्हर फायर' करणार होते. या गदारोळात साहाय्यक समादेशक जोशी यांच्या पथकातील चंदन नाथ यांना गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले. जोशी व त्यांचा चमू यांचा जीव वाचविण्यासाठी पोलीस हवालदार परदेशी यांनी पुढे येऊन नक्षलवाद्यांवर गोळीबार सुरू केला. त्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नक्षलवादी जखमी झाले. परदेशी यांनी निधडय़ा छातीने नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. पण याच वेळी नक्षलवाद्यांच्या एका गोळीने परदेशी यांच्या छातीचा वेध घेतला आणि एका शूर पोलीस जवानाने आपले प्राण गमावले. गोळीबारात जखमी झालेल्या चंदन नाथ या जवानाला तातडीची वैद्यकीय मदत मिळावी म्हणून हेलिकॉप्टर पाठविण्यात आले होते. 'कोब्रा' २०६ बटालियनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शंकर पवार यांच्यावर चंदन नाथ यांना हेलिकॉप्टपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. नक्षलवाद्यांचा गोळीबार सुरू असतानाही पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी स्वत:च्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांचे धैर्य कायम ठेवून त्यांना आत्मविश्वास दिला. या वेळी पवार यांच्या पायाला गोळी लागली होती, पण आपण खचलो तर आपले सहकारी पोलीसही खचतील आणि त्यांचे धैर्य संपेल हा विचार करून पवार यांनी धाडसाने परिस्थितीचा सामना केला. नक्षलवाद्यांवर सातत्याने 'कव्हर फायर' करून 'सीआरपीएफ'चा जखमी जवान चंदन नाथ याला सुरक्षितपणे हेलिकॉप्टरने सुरक्षितस्थळी नेले आणि त्याचे प्राण वाचविले. विठ्ठल शंकर पवार व देवांगण सुकुजी परदेशी (मरणोत्तर) यांच्या या शौर्याकरिता त्यांना राष्ट्रपती शौर्यपदकाने गौरविण्यात येत आहे. देवांगण सुकुजी परदेशी हे या चकमकीत शहीद झाले. त्यांच्या वीरपत्नी लक्ष्मी परदेशी या हा सन्मान स्वीकारणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार आणि देवांगण सुकुजी परदेशी यांच्या शौर्याला सलाम! डॉ. रश्मी करंदीकर,पोलीस उपायुक्त, ठाणे

No comments:

Post a Comment