Total Pageviews

Saturday, 15 August 2015

इंटेलिजन्स ब्यूरोचे माजी उपसंचालक अशोक कर्णिक यांचे गुरुवारी सकाळी निधन

विद्याधर वैद्य इंटेलिजन्स ब्यूरोचे माजी उपसंचालक अशोक कर्णिक यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा इंटेलिजन्स ब्यूरोचे निवृत्त डायरेक्टर विद्याधर वैद्य यांचा हा विशेष लेख... गुप्तहेर व्यवसायात अख्खी कारकीर्द घालवलेल्या व्यक्तीबद्दल गोपनीयतेचे उल्लंघन न करता, लिहायचे तरी कसे? आणि ती व्यक्ती जवळचा मित्रच असेल, तर हा प्रश्‍न तसा कठीणच आहे; परंतु भावना व्यक्त केल्याशिवाय राहवत पण नाही. माझी नेमकी हीच अवस्था झाली आहे. एका दिवसाआड तरी कर्णिकांशी माझा दीर्घ वार्तालाप होत असे. आता हे सर्व संपले, ही कल्पनाच सहन होत नाही. अशोक कर्णिक यांचे व्यक्तिमत्त्व हे या सर्व वस्तुस्थितीहून पलीकडचे होते. जुन्या पिढीतील नावाजलेले साहित्यिक वा. भ. कर्णिक यांचे अशोक हे चिरंजीव. इतका दुर्मिळ साहित्यिक वारसा त्यांनी केवळ जपला नाही, तर पुढे उत्तम चालवला. त्याला गमतीदार विरोधाभास असा की, सार्वजनिक मंडळींसाठी लिहिणार्‍या एका लेखकाच्या या चिरंजीवांनी आपली संपूर्ण कारकीर्द भारताच्या प्रमुख गुप्तहेर संस्था, इंटेलिजन्स ब्यूरो (आय.बी.)साठी मलिक गोपनीय अहवाल लिहिण्यात घालविली. अशा व्यक्तीचा चेहरा, ओळख समाजाला कशी होणार? पण ही कसर त्यांनी १९९० साली निवृत्तीनंतर आपला लेखनाचा व्यासंग तितक्याच उत्साहाने पुढे चालू ठेवून, भरून काढली हे नक्की. सरकारी नोकरीतले गोपनीयतेचे साखळदंड गुप्तहेर अधिकार्‍यांवर जरा जास्तच आवळलेले असतात, हे मी स्वानुभवाने सांगतो, कारण मी स्वत: अडीच वर्षे आय.बी.चा प्रमुख राहून निवृत्त झालो. नोकरीदरम्यान देश हिताशी निगडित अनेक घटनांचे साक्षीदार असणार्‍या व्यक्तीस ही बंधने पाळत सभोवतालच्या सामाजिक घडामोडींवर निष्पक्ष भाष्य करताना ही कसरत करावी लागते. हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. कर्णिकांच्या ठायी ते सर्व गुण होते. चालू घटनांवर घडतील, तसे लेख लिहिणे हा छंद त्यांनी निवृत्तीनंतरची २५ वर्षे अव्याहत चालू ठेवला. त्या क्रमाने त्या लेखांचे वाचन म्हणजे वाचकाला गेल्या पाव शतकाचा सरकता देखावाच अनुभवल्याचा भास होई, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. ही गरज त्यांनी नुकतीच भरून काढली. आपल्या सर्व लेखांचे संकलन केलेले पुस्तकच चौकस व चोखंदळ वाचकांपुढे त्यांनी ठेवले. समीक्षकांनी या प्रयत्नाचे साहजिकच कौतुक केले. टी.व्ही.च्या वृत्तवाहिन्यांवर राजकीय घडामोडींवर होणार्‍या चर्चासत्रांत त्यांचा आवर्जून सहभाग असे. त्यात त्यांनी व्यक्त केलेले विचार सर्वांनाच प्रभावित करत. मी आणि कर्णिक एकाच व्यवसायातील, आय.बी.मधील अधिकारी. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ आम्ही त्या संस्थेत घालवला. ते माझ्यापेक्षा वयाने व अनुभवाने चार वर्षे ज्येष्ठ. त्यांची व्यावसायिक परिपक्वता व कसब पाहता, मी त्यांना ज्येष्ठ बंधूच मानत असे. उमदे व्यक्तिमत्त्व, निगर्वी, मोकळा स्वभाव व माणसे जोडण्याची वृत्ती यामुळे त्यांचा मित्रपरिवार पण विस्तृत होता. सुविद्य पत्नी, दोन्ही मुली सुस्थळी पडल्याचे, नातवंडे पाहण्याचे समाधान त्यांना मिळाले. एक परिपूर्ण समृद्ध जीवन ते जगले. वयाची ८३ वर्षे ओलांडली, तरी त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. म्हणून त्यांना जायलाच पाहिजे, हा काय नियम झाला? पण अशा व्यक्तीचे यश नियतीला पाहवत नसावे की काय, ती काही तरी निमित्ताच्या शोधातच असते. राहत्या घरीच घडलेला एक अनपेक्षित अपघात हेच ते निमित्त, त्यांच्या शेवटास कारणीभूत झाले. कुटुंबीयांच्या, माझ्या आणि विशाल मित्र समुदायाच्या मनात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. शेवटी एक गोष्ट, तर राहूनच गेली. सभोवतालच्या घडामोडींवर भाष्य करणारे लेख मी प्रथम कर्णिकांना पाठवत असे. त्यांवर त्यांच्या सूचना व अभिप्राय मला गरजेचा वाटे. त्यानंतरच सदर लेख प्रसिद्धीस धाडले जात. आता त्यांच्यावरच लिहिलेला हा लेख तसाच राहील आणि या पुढील लिखाणावर त्यांची नजर पडणार नाही, या विचाराने मन विषण्ण होते.

No comments:

Post a Comment