Total Pageviews

Thursday, 7 May 2015

अंगलट आलेला चांगुलपणा -NEPAL EARTHQUAKEINSENSITIVE REPORTING BY TV MEDIA

अंगलट आलेला चांगुलपणा0 -PRABHAT EDITORIAL- नेपाळमध्ये जी उलथापालथ झाली आहे, ती उघड्या डोळ्याने न पाहवणारी आहे. या परिस्थितीत तेथील लोकांना मदत करण्याची नेपाळ सरकारची क्षमता नाही, हे जाणून केवळ माणुसकीच्या आणि शेजार धर्माच्या भावनेतून मदतीला आलेल्यांना झिडकारणे हे कोणत्याच शिष्टाचारात बसत नाही. माणुसकी किंवा चांगुलपणा म्हणून एखाद्या खूप संकटात आलेल्या माणसाला हातातील कामं सोडून मदतीला गेल्यानंतर त्या माणसाने आपल्या मदतीचा हातच झिडकारून टाकला तर कसं वाटेल? वाईट तर वाटेलच; पण मनस्तापही खूप सोसावा लागेल. असाच मनस्ताप भारताला आणि भारताच्या प्रसिद्धी माध्यमांच्या वाटेला सध्या नेपाळच्या बाबतीत आला आहे. अलीकडेच आलेल्या भूकंपात नेपाळ पार उद्ध्वस्त झाला आहे. तेथील आपत्तीचे गांभीर्य भारतीय प्रसिद्धी माध्यमांनी सार्‍या जगाच्या समोर तातडीने उपस्थित केल्यानंतर सार्‍या जगातून नेपाळकडे मदतीचा ओघ सुरू झाला आणि जगातून ही मदत यायच्या आधी भारताच्या मदत तुकड्या आणि विमाने नेपाळींच्या मदतीला धावली. या तत्परतेच्या मदतीबद्दल कृतज्ञतेचे दोन शब्द व्यक्त करण्याऐवजी नेपाळी नागरिकांनी सोशल मीडियावर- भारतीय प्रसार माध्यमे आणि भारतावरच गरळ ओकण्याचे काम सुरू केले आहे. भारताचे जवान आणि मदत पथके भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी दिवस-रात्र काम करीत असताना, त्यांच्या विरोधात ‘गो होम’, म्हणजेच ‘घरी जा‘ अशी हाकाटी पिटली जाऊ लागली आहे. तब्बल १ लाख ६० हजार नेपाळी नागरिकांनी भारतीय मीडिया आणि मदत पथकांवर आगपखड करून त्यांना घरी जाण्यास सुनावले आहे. जणू काही भारत स्वतःसाठीच हे सारे करीत आहे, अशी भावना तेथील काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. हे कमी म्हणून की काय आज नेपाळ सरकारनेही अशीच भूमिका घेताना विदेशी मदत पथकांना घरी जाण्याची अधिकृत सूचना केली आहे. ती अधिक मनस्ताप देणारी आहे. भूकंपाच्या तडाख्यातून अजूनही नेपाळ सावरलेला नाही. तेथील बर्‍याच दुर्गम भागात अजून मदत पोहोचलेली नाही. पोखरा व्हॅली हा भाग तेथील ८.९ रिश्टर स्केल भूकंपाचा केंद्र बिंदू आहे. त्या व्हॅलीतील मानवी वस्तीत नेपाळ सरकारची अजून मदत पोहोचलेली नाही. त्या भागात मदत पोहोचवण्याचे पहिले काम केवळ भारतीय हवाई दलच करू शकले आहे. भूकंपानंतर अन्नपाण्यावाचून चार दिवस काढलेल्या तेथील लोकांना कुठूनही मदतीची आशा नव्हती. कारण पोखरा व्हॅलीकडे येणारे सारे रस्तेच या हानीत पार उखडून गेले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मार्गावरून मदत येण्याची सुतराम शक्यता नसल्याने आपला अन्नापाण्यावाचून तडफडून मृत्यू होणार, अशा काळजीत असलेल्या लोकांपुढे भारतीय हवाईदलाचे जवान अक्षरश: आकाशातून आलेल्या देवदूतासारखे प्रकट झाले आणि त्यांनी त्यांना अन्न-औषधांची पाकिटे प्रदान केली. त्यामुळे त्यांच्या जगण्याची उमेद पुन्हा जागृत झाली. जवानांनी अत्यंत कष्टाने तेथे हेलिकॉप्टर्स उतरू शकतील असा तात्पुरता तळ उभारला. त्याद्वारे पोखरा व्हॅलीतील लोकांना नियमित मदत पोहोच करून भारतीय हवाईदलाने जिवंत ठेवले, अशी सारी माहिती जगापुढे येत असताना अतिशहाण्या नेपाळी नेटिझन्सनी मात्र भारतावरच आगपखड सुरू करणे हे अचंबित करणारे वाटते आहे. आज मिनेंद्र रिजाल नावाच्या नेपाळच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनीही हीच ‘री’ ओढत विदेशी मदत पथकांना नेपाळमधून चालते होण्याचाच संदेश दिला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की काठमांडू आणि परिसरातील भूकंपग्रस्तांच्या मदतीचे बरेचसे काम आता पूर्ण झाले आहे, ग्रामीण आणि दुर्गम भागातील जे काम अजून शिल्लक आहे ते आमच्या देशातील कार्यकर्ते, पोलीस आणि लष्कराचे जवान करतील. आता आम्हाला विदेशी मदत पथकांची गरज नाही त्यांनी आता नेपाळमधून निघून गेले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यांची ही भाषा अगदी ‘चालते व्हा’ अशी नसली तरी, मंत्र्यांनी वापरलेल्या शब्दप्रयोगांचा अर्थ अप्रत्यक्षपणे ‘चालते व्हा, चालते व्हा’ असेच सूचित करतो. त्यात आभार प्रदर्शनाचीही कोणती भावना नाही. सोशल मीडियावर भारत आणि भारतीय प्रसार माध्यमांवर करण्यात आलेल्या आगपखडीचा प्रभाव नेपाळ सरकारच्या मंत्र्यांवरही पडलेला दिसतो. वास्तविक नेपाळ म्हणजे काही जपान नव्हे. जपानमध्ये त्सुनामीची आपत्ती आली त्यावेळी त्यांनी विदेशी मदत फारशी घेतली नाही. कारण जपानमध्ये आपद्ग्रस्तांना मदत करण्याएवढी आर्थिक ताकद हेाती आणि त्यांच्याकडे तसे तंत्रज्ञानही होते. तेथील लोकही कोणत्याही आपत्तीला तोंड देऊन त्यातून बाहेर येण्याच्या क्षमतेचे आहेत. नेपाळींमध्ये एवढी क्षमता आहे काय, त्यांना अशी भाषा किंवा भूमिका शोभून दिसते काय, हा खरा प्रश्न आहे आणि शोभून दिसो अथवा ना दिसो; पण समोर जी उलथापालथ झाली आहे, ती उघड्या डोळ्याने न पाहवणारी आहे. या परिस्थितीत तेथील लोकांना मदत करण्याची नेपाळ सरकारची क्षमता नाही, हे जाणून केवळ माणुसकीच्या आणि शेजार धर्माच्या भावनेतून मदतीला आलेल्यांना असे झिडकारणे हे कोणत्याच शिष्टाचारात बसत नाही. भारतीय प्रसार माध्यमांनी नेपाळमधील आपत्तीचा बाजार मांडला असा धादांत बिनबुडाचा आरोप तेथील नेटिझन्स लोकांनी केला आहे. भारताने नेपाळला केलेल्या तातडीच्या मदतीचेही भारतीय माध्यमांनी भांडवल चालवले आहे, भारतीय प्रसारमाध्यमे मदतकार्य फुगवून सांगत आहेत, भारतीय प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी नेपाळी नागरिकांचे रडणे, विव्हळणे मुद्दाम टीव्हीवर दाखवून नेपाळची बदनामी करीत आहेत आणि खूप मोठी मदत केल्याचा आव आणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली जात आहे, अशा प्रकारचे आरोप भारतीय प्रसार माध्यमांवर केले गेले आहेत. भारतावर घेतल्या जाणार्‍या या आक्षेपांचे स्वरूप पाहिल्यानंतर हे वरकरणी तरी साधेसरळ प्रकरण वाटत नाही. तो अंतःकरणापासून घेतला गेलेला आक्षेप वाटत नाही. चीनला नेपाळमध्ये पथारी पसरायची आहे. त्यासाठी त्यांनी तेथे आधीपासूनच पद्धतशीर हालचाली सुरू केल्या आहेत. नेपाळमध्ये माओवाद्यांचे मोठे केंद्र आहे. त्यांना हाताशी धरून चीनची ही खेळी सुरू आहे. भूकंपाचे कारण दाखवून चीनने नेपाळमध्ये शिरकाव करण्याच्या आधीच भारताने तेथे मदत पोचवून चीनचा नेपाळमधील हस्तक्षेपाचा डाव हाणून पाडला, या घटनेचीही किनार या सार्‍या पार्श्वभूमीला आहे. त्यातूनच नेपाळमधील चीन धार्जिण्या घटकांनी भारताच्या विरोधात ही मोहीम सुरू केली असावी, असे म्हणण्यास बराच वाव आहे. अन्यथा स्वतःहून मदतीला धावून आलेल्याला असे कोण झिडकारू शकतो? आता प्रश्न फक्त अशा परिस्थितीत भारत सरकारने नेपाळमधील मदत कार्य सुरूच ठेवावे काय, हा आहे. खरं म्हणजे नेपाळ सरकारनेच आता विदेशी मदत पथकांना निघून जाण्यास सांगितल्यानंतरही भारताने तेथे मदत कार्य सुरू ठेवण्यातहीं आता काही अर्थ उरलेला नाही.

No comments:

Post a Comment