Total Pageviews

Wednesday, 18 June 2014

NARENDRA MODI VISIT TO BHUTAN

भारत भूतान संबंध एका नवीन वळणावर पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी विदेश दौरा करताना सर्वप्रथम भूतानची निवड केली आणि सार्यान तज्ज्ञ भुवया उंचावल्या.त्यांचा भूतानचा दौरा करण्याचा निर्णय जागतिक चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधानांनी आपल्या शपथविधी सोहळ्यासाठी सार्क देशांच्या पंतप्रधानांना आमंत्रित करून कारकीर्दीच्या सुरवातीलाच एक महत्वाचे पाउल उचलले होते.आता विदेश दौर्याासाठी भूतानला प्राधान्य देऊन मोदींनी पुन्हा मुत्सद्देगिरी दाखवली. भूतान दौरा अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे. पहिले म्हणजे भारत-भूतान यांच्यातील आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणे आणि दुसरे भूतानला कायम धाकात ठेवू पाहणार्याा शेजारच्या ‘चीनला शह देणे. चीनला इशारा भारत आणि भूतानचे पारंपरिक संबंध, मधल्या काही काळात संवाद तुटत चालले होते.भूतान आर्थिक, औद्योगिक व इतर सर्वच क्षेत्रांत पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे.पेट्रोल डिझेलपासून, दैनंदिन वापराच्या सर्वच वस्तू हा देश भारतातून आयात करतो.डॉ. मनमोहनसिंग सरकारने मधल्या काळात डिझेल-पेट्रोलवरची सबसिडी रद्द केल्यामुळे या देशाची अर्थव्यवस्थाच रुळावरून घसरली. तेथील दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आणि भारताकडे मोठा भाऊ या दृष्टीने पाहणारे भूतानी नागरिक नाराज झाले.सरकारने आता ही सबसिडी पुन्हा सुरू केल्याने परिस्थिती परत निवळली. भूतानची ही चलबिचल ओळखून चीनने या देशाशी जवळीक वाढविली होती.या भेटीचा दुसरा उद्देश चीनला इशारा देण्याचाही आहे. लवकरच भूतान आणि चीन यांची द्विपक्षीय चर्चा होत आहे. भूतानची राजधानी थिंपू येथे अद्याप चीनचा दूतावास नाही. तो चीनला उघडायचा आहे. भूतानच्या कर्जबाजारी अर्थकारणात चीन कोट्यावधी डॉलर ओतू शकतो. या पार्श्वभूमीवर, मित्र म्हणून भूतानला गमावणे भारताला परवडणारे नाही. त्यामुळेच, मोदींनी भूतानला दूध, तांदूळ, तेल निर्यात करण्यावर कोणतेही निर्बंध नसतील, असा करार थिंपूमध्ये केला. भूतानची लोकसंख्या केवळ साडेसात लाख असली तरी पाठीशी हिमालय असलेल्या देशाचे क्षेत्रफळ स्वित्झर्लंडइतके विस्तृत आहे. भारताच्या ‘गटा’तील हा देश चीनच्या वळचणीला जाऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भौगोलिक व सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थानी असलेल्या भूतानची पहिल्या परदेश दौर्याीची निवड करून संबंधित राष्ट्रांना संदेश दिला आहे. हिमालयाने भारत व भूतानला जोडले भूतानमधील संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये बोलताना मोदींनी भारत व शेजारी देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर जोर दिला.जर भारताची प्रगती झाली, तर त्याचा फायदा आपोआपच शेजारी देशांच्या प्रगतीमध्ये होईल. भारतात स्थिरता आणि विकास होत राहिला तर भूतानलाही त्याचा फायदाच होईल. मोदींनी भूतानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलाचे उद्घाटन केले. भूतान-भारत द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख मोदींनी बीटूबी म्हणजे भारत ते भूतान असा उल्लेख भूतानच्या राजे जिग्मी कसेर नामग्याल वांचुक आणि पंतप्रधान शेरिंग तोग्बे यांच्याशी बोलताना केला. भूतानने लोकशाहीच्या मार्गाने मर्यादित राजीशाहीकडे केलेली शांततापूर्ण वाटचाल कौतुकास्पद आहे. भूतानने अवघ्या सात वर्षांत सक्षम लोकशाही निर्माण केली. भूतानच्या जागरूक मतदारांचे कौतुकच करायला हवे. हिमालय पर्वतरांगा हा भारत आणि भूतानला मिळालेला वारसा असून, या संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तसेच, हिमालयाच्या अभ्यासासाठी केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करू, अशी घोषणाही त्यांनी केली. भूतानच्या अर्थसंकल्पात शिक्षणावर लक्षणीय खर्च केला जात आहे. भूतानमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दालन खुले करून देण्यासाठी भारत भूतानमध्ये ई लायब्ररीचा प्रकल्प राबवेल, अशी घोषणा त्यांनी केली.भूतानच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. जलविद्युत प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली.जलविद्युत प्रकल्पांमध्ये परस्पर विश्वासाच्या आधारावर आमचे जे सहकार्य आहे ते विभागातील इतर देशांसाठी आदर्शवत असल्याचे मोदी म्हणाले.ऊर्जा क्षेत्रात हायड्रोपॉवर प्रकल्प राबवून भारत- भूतानने ग्लोबल वॉर्मिंगने ग्रासलेल्या जगभरातील देशांसमोर एक नवीन पायंडा घालून दिल्याचे मोदींनी सांगितले. दैनंदिन जगण्याचे सुखमापन करून आनंदाचा निर्देशांक काढणारा जगातील हा एकमेव देश आहे. पंतप्रधान मोदी यांनी या निर्दशांकाचा विशेष उल्लेख केला. मोदी म्हणाले,दहशतवाद जगाला तोडतो आणि पर्यटन जोडते. हिमालयाने आम्हाला परस्परांशी जोडले आहे.हिमालयाच्या परिसरातील सर्व राज्य आणि देशांमध्ये क्रीडा स्पर्धा व्हायला हव्यात. हिमालयीन प्रदेशाच्या अभ्यासासाठी विश्वविद्यापीठ स्थापण्याचा भारताचा विचार आहे. शेवटचा माणूस सुखी होणे हाच खरा विकास आहे. भूतानने परंपरा मोडली भूतानमध्ये टाळी वाजवणे अशुभ मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तेथील नॅशनल असेंब्लीत सुमारे पाऊण तास हिंदीतून तडाखेबंद भाषण झाले. भाषणानंतर सभागृह टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने दणाणून गेले. भूतानच्या खासदारांसहीत पत्रकारांनीही आपली टाळी न वाजवण्याची परंपरा मोडीत काढली आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.परंपरेचे भूत भूतानमधून गायब झाले. या दौऱ्याचा फायदा द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होण्यात होतील.नरेंद्र मोदी हे सहृदय आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे, अशा शब्दांत भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोग्बे यांनी कौतुक केले. भारतीय कंपन्या मोठय़ा प्रमाणात भूतानमध्ये गुंतवणूक करत असून, त्यांचे इतर गरजा तातडीने पूर्ण करु. मोदींच्या भेटीनंतर द्विपक्षीय संबंधांना नवे परिमाण प्राप्त होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्यासारख्या लहानशा व जगाच्या दृष्टीने मागासलेल्या देशाची बलाढ्य भारताच्या पंतप्रधानांनी त्यांच्या विदेश दौर्याीसाठी निवड करावी याचे तेथील नागरिकांना फारच आश्चमर्य वाटत आहे. राजधानी थिंफूपासून ५० किमी अंतरावर असलेल्या पारो येथील विमानतळावरून मोदी यांना रवाना करण्यासाठी टोबगे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पोहोचले होते. रस्त्यावर दुतर्फा उभे राहून स्थानिक लोकांनी भूतान आणि भारताचे ध्वज घेऊन मोदी यांना शुभेच्छा दिल्या होत्या. स्वत: मोदी यांनी दोनदा गाडीतून उतरून लहान मुलांशी संवाद साधला. तेथील जनता नरेंद्र मोदींच्या या निर्णयामुळे सुखावली व आनंदीही झाली आहे. भारतीय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पारो ते थिंपू या ५० किमीच्या महामार्गावर हजारो भूतानी नागरिक उत्स्फूर्तपणे उभे राहून भारतीय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उभे होते, यातच सर्वकाही आले. ही दोन दिवसांची भेट यशस्वी झाली असे म्हणायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment