टीव्हीवरील चर्चातज्ज्ञ व्हायचंय?मणिंदर****
या निवडणुकीने नुसती धमाल उडवून दिली आहे. घरोघर टीव्ही चर्चा पाहत दर रात्रीचे जेवण होऊ लागले आहे. रोजचेच जेवणे या चर्चांमुळे भलतेच चविष्ट व चमचमीत होऊ लागले आहे. गेल्या 5 वर्षात बघता बघता (म्हणजे टीव्ही बघता बघता) अर्धा डझन मराठी वृत्तवाहिन्या निघाल्या आणि स्थिरावल्या. जशी सर्वच वाहिन्यांवर ‘रिऍलिटी शोज’ची चलती सुरू झाली, तशी वृत्तवाहिन्यांवरही लाइव्ह चर्चांचा रिऍलिटी शो सुरू झाला.
फरक इतकाच की नाच, गाणी, विनोद, आदी रिऍलिटी शोमध्ये प्रेक्षकांना ‘पावभाजी-पेप्सी’ मिळते (असे म्हणतात!) बातम्यांच्या रिऍलिटी शोमध्ये प्रेक्षक आपापल्या घरात असतात, त्यामुळे ‘पा-पे’ला मुकतात! जसे नाच-गाणी-विनोद यांच्या रिऍलिटी शोमध्ये ‘मान्यवर’ परीक्षक असतात, तसे बातम्यांच्या रिऍलिटी शोमध्ये ‘तज्ज्ञ मंडळी’ असतात. (पुन्हा एकदा) फरक इतकाच की पहिल्या प्रकारच्या शोमध्ये परीक्षक हसत-खेळत वागतात. क्वचित नाच करतात, वाद्य वाजवतात, गाणी म्हणतात. बातम्यांच्या रिऍलिटी शोमध्ये मात्र तज्ज्ञमंडळी एकदम गंभीर असतात. एखादी तरी स्मितरेषा दिसली तर प्रेक्षक स्वत:ला धन्य समजतो. (आणि तज्ज्ञाच्या स्कोअरकार्डवर एक फाउल जमा होतो!)
पहिल्या प्रकारच्या रिऍलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून जाण्यासाठी व्यक्ती त्या-त्या क्षेत्रात – म्हणजे संगीत, नृत्य, अभिनय या क्षेत्रात पारंगत असावी, अशी कल्पना असते. बातम्यांच्या रिऍलिटी शोमध्ये मात्र तज्ज्ञमंडळी पत्रकारितेतील जाणकारच असावीत, असे काही सक्तीचे नाही. निवृत्तीच्या उंबरठयावरील पत्रकार, विद्यापीठात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आदी विषयाचे प्राध्यापक (जे प्रश्न विचारणाऱ्याकडे न बघता कॅमेऱ्याकडे पाहून मान हलवण्यात ‘ट्रेन्ड’ असतात), सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, गेल्या दहा वर्षात एकदाही निवडून न आलेले आणि पुढल्या वीस वर्षांत निवडून येण्याची शक्यता नसलेले राजकारणी आदी कोणीही (जे सहजपणे पत्ता न विचारता स्टुडिओत पोहोचू शकतील) तज्ज्ञ म्हणून चालतात.
हे सारे तपशिलाने सांगायचे कारण असे की, वाचकांपैकी (आणि फॉर दॅट मॅटर संपादक विभागापैकीही!) कुणाला ‘टीव्हीवरील चर्चातज्ज्ञ’ ही करिअर खुणावत असेल, तर त्या व्यक्तीला अपरिमित संधी आहेत. आलेली संधी साधण्यासाठी स्वत:ची काही पूर्वतयारी असावी, या हेतूने हे लेखन करीत आहे. उत्तम आणि (हुकमी) यशस्वी चर्चातज्ज्ञ होण्यासाठी खालील मुद्दे विशेषत्वाने लक्षात घ्यावे.
1. डोक्यावरील केस काळे नाहीत ना, याची एकवार खात्री करून घ्या. ‘ग्रे केस’ ते ‘गॉन केस’ यापैकी काहीही चालेल, पण काळे केस नको. तज्ज्ञ दिसण्यासाठी ही पहिली अट आहे.
2. सर्वसाधारणपणे लोकप्रिय मत असेल त्याच्याशी नापसंती दर्शवावी. जरी आपण निवडणुकीच्या दिवशी लोकप्रिय उमेदवारास मत देणार असू, तरी ते कटाक्षाने उघड होऊ देऊ नये.
3. आपल्यापेक्षा वेगळे मत व्यक्त करणाऱ्याला शक्यतो बोलूच देऊ नये. ‘तुम्ही अशी विचारांची गळचेपी करू शकत नाही’ अशा वाक्यांची ठेवणीतील अस्त्रे काढून वेगळे मत व्यक्त करणाऱ्याचीच गळचेपी खुबीने करून टाकावी.
4. अगदीच खमक्या निघाला, तर फॅसिस्ट, प्रतिगामी, जात्यंध, बुरसटलेल्या विचारांचा, टिपिकल मध्यमवर्गीय आदी मान्यताप्राप्त शिव्यांची लाखोली वाहावी.
5. प्रचार, मतदान, युत्या-आघाडया, उमेदवार आदी संदर्भातील चर्चेत जातीचे समीकरण, कुठल्या जातीची किती टक्के मत वगैरे चर्चा बेधडकपणे करावी. अशा चर्चांतील जातीच्या उल्लेखांना संमती आहे. जरी निवडणुकीच्या आधी आणि नंतर समतेच्या आणि जातिअंताच्या आणाभाका घेतल्या असल्या, तरी.
6. प्रसंगी मुस्लिमांची मते, ख्रिश्चनांची मते, शिखांची मते अशी चर्चाही खऱ्या-खोटया आकडेवारीनिशी करायला हरकत नाही.
7. पण कटाक्षाने हिंदू, हिंदू समाजाची एकजूट आदी शब्द व शब्दावली वर्ज कराव्यात. समोरून कोणी हिंदू, हिंदू समाजाची एकजूट आदी शब्द जरी काढले, तरी जिवाच्या कराराने तुटून पडावे. या कार्यात आपला आवाज क्षीण वाटला, तरी अन्य चर्चातज्ज्ञ उडी मारून तुमची मदत करतील, याची खात्री बाळगावी.
आणि शेवटी, पण महत्त्वाचे..
8. टॉलस्टॉय, फ्रॉईड, डार्विन, कांट, काफ्का आदी पाश्चात्त्य विचारवंतांची पुस्तके वाचली नाहीत, तरी विकिपीडियामध्ये त्यांच्यासंबंधी असणाऱ्या मजकुरातील निदान पहिला परिच्छेद तरी वाचून जावे आणि मुख्य म्हणजे दर 2-4 मिनिटांनी त्यातील एकाचा उल्लेख अवश्य करावा.
वर दिलेल्या आठ टिप्स या सुरुवात करण्यासाठी पुरेशा आहेत. माध्यमांचा उथळपणा आणि तुमची चेपलेली भीड याच्या बळावर आपण नवनवी शिखरे पादाक्रांत करू शकाल, तेव्हा शुभेच्छा
No comments:
Post a Comment