चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान - चिनी परराष्ट्रमंत्री भेट आणि चीन भारत संबध ब्रिगेडिअर हेमंत महाजन
चीन आणि भारत हे परस्परांचे प्रतिस्पर्धी नाहीत तर ते एकमेकांचे सहकारी आहेत.या दोन्ही देशांनी एकमेकांमधील तीव्र मतभेदाचे सीमाप्रश्नासारखे मुद्दे बाजूला सारत उभयपक्षी संबंध सुधारण्यास चालना दिली पाहिजे, अशी भूमिका चीनमधील प्रसारमाध्यमांनी घेतली .
चिनी परराष्ट्र व्यवहारमंत्री वँग यी भारताच्या दौऱ्यावर आले.त्यांनी रविवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली . उभय देशांमध्ये सीमेच्या प्रश्नावरून 'मतभिन्नता' असल्यामुळे तणावाचे वातावरण होते.मात्र आता भारतात नवीन सरकार आले असून या दोन देशांमधील मैत्री वाढविण्यास हे सरकार चालना देईल.म्हणून दोन देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचा दौरा केला आहे, असेही झिनुआने म्हटले आहे.
वँग यी दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक यासोबतच विविध क्षेत्रात भारत- चीन सहकार्य वाढवण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा केली.दोन दिवसांच्या भारत दौ-या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व देशातील इतर प्रमुख नेत्यांचीही वँग यीनी भेट घेतली.सध्या चीन "पूर्व चीन समुद्रात" जपान आणि "दक्षिण चीन समुद्रात" व्हिएतनाम, फिलिपाइन्स आणि अन्य शेजारी देशांसोबतच्या सीमावादात गुंतला आहे. तर दुसरीकडे भारत आणि चीन यांच्यातील सीमाप्रश्नही सुटलेले नाही.
संबंध सुधारण्यासाठी चीन,अमेरिकाची स्पर्धा
नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर जेमतेम पंधरवडय़ाच्या आतच एखाद्या महत्त्वाच्या नेत्याने भारताला भेट देण्याचा हा प्रसंग दुर्मिळच म्हणावा लागेल़ चीनने या भारत भेटीसाठी खूपच घाई केल़ी. आधी चीन की आधी अमेरिका या स्पर्धेत चीनने बाजी मारली .
सुषमा स्वराज भारताच्या नव्या परराष्ट्रमंत्री झाल्या, तेव्हापासून सुषमा स्वराज यांनी अमेरिका भेटीला लवकरात लवकर यावे यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरीनी निमंत्रण दिल़े.खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नेहमीचे संकेत बाजूला ठेवून स्वतः मोदींना आपल्या देशाला भेट देण्याचे निमंत्रण दिले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने भारताच्या पंतप्रधानांचे निवडीबद्दल अभिनंदन करणे निराळे आणि ते निवडून येताच त्यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण देणे फ़ार महत्वाचे. पश्चिमेकडून असे होत असता पूर्वेकडील चीनही काही स्वस्थ बसला नाही. चीनचे पंतप्रधान ली केशांग तब्बल 25 मिनिटे मोदींबरोबर दूरध्वनीवरून बोलले. त्या लगबगीचा परिणाम म्हणून चीनचे परराष्ट्रमंत्री रविवारी भारतात आले.आणि आपल्या देशाचा अंहकार सुखावला.
काय झाले चीन-भारत भेटीत?
भारत आणि चीन यामधील सहकार्याचे संबंध दृढ व्हावेत, एवढीच अपेक्षा तूर्त त्या देशाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. हे संबंध कोणत्या मार्गाने आणि कोणत्या उपायांनी बळकट करता येतील. याबाबत चर्चा करण्यासाठी पहिलीच वेळ असल्यामुळे या भेटीमध्ये भारत-चीन यांच्यामधील व्यापारी संबंधांवर भर चीनने दिला. काही विकास प्रकल्पांबद्दल बोलणे झाले.चीन-भारत भेटीमध्ये चीनच्या लष्कराची लडाखमधील अतिक्रमणे, अरुणाचल प्रदेशाच्या नकाशात बदल करण्याचा चीनचा आगाऊपणा याबद्दल कडक शब्दात इशारा देण्यासही ही वेळ अगदी योग्य होती.ते झाले.
पण हातात नेमके काय आले? अरुणाचल प्रदेशातील नागरिकांना चीन सरकारकडून जोड (स्टेपल्ड) व्हिसा दिला जातो. हा चीनचा चांगुलपणाच व धोरणातील लवचीकताही आहे, असे वँग यी म्हणाले. अरुणाचल प्रदेशातील नागरिकांना अन्यथा चीनमध्ये प्रवेश करताच आला नसता. चीनच्या दृष्टीने हा संपूर्ण प्रांत चीनचा आहे. तेव्हा प्रश्न चीनच्या उक्तीचा नाही, तर कृतीचा आहे. हा चीनशी चर्चाचा आजवरचा अनुभव आहे.
१९ चर्चांमधून काही निष्पन्न झाले नाही
चीनचे १९ शेजारी राष्ट्रांबरोबर गंभीर सीमाविवाद होते. भारत व भूतान ही एकमेव अशी राष्ट्रे आहेत, ज्यांच्याबरोबर चीनचे सीमाप्रश्न सुटलेले नाहीत. म्हणून येत्या काळात भारत-चीन सीमा ही तणावाची, घुसखोरीची, सैन्यातील चकमकींची आणि अंतहीन सीमा चर्चांची असेल. आतापर्यंतच्या १९ चर्चांमधून काही निष्पन्न झाले नाही,१९०० चर्चांमधून सुधा काही निष्पन्न होणार नाही.जेव्हा चीनला वाटेल की, की भारताने चीनचे प्रभुत्व मान्य केले आहे, तेव्हाच चीन हे प्रश्न सोडवेल.
अनेक क्षेत्रांमध्ये चीनची पाऊले भारतीय हिताच्या विरोधी पडताना दिसत आहेत. काश्मिरमधील भारतीयांना वेगळा व्हिसा देणे, पाकव्याप्त काश्मिरमध्ये धरणे बांधणे, ब्रह्मपुत्रा सारख्या नदीवर धरण बांधणे वगैरे.पाकिस्तानातील काश्मिर भागात ११ हजार चिनी सैनिक, काम करीत आहेत.एकीकडे भारतासोबत व्यापार वाढवायचा, आणि दुसरीकडे वादग्रस्त सीमाभागात लष्करी वा हवाईतळ निर्माण करायचा, क्षेपणास्त्रे तैनात करायची, लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वेमार्ग सीमेपर्यंत आणून भिडवायचे, भारताच्या अवतीभवती नवे नाविक तळ निर्माण करायचे, अशी चीनची रणनीती राहिली आहे.
व्यापार वाढवला की चीनचा आक्रमकता नाहीशी होईल का?
आपला व्यापार सध्या ६७ वार्षिक अब्ज डॉलरच्या घरात आहे, त्यामध्ये आपली निर्यात केवळ १३ अब्ज डॉलर आहे, बाकी सगळी आयातच आहे.म्हणजे हा व्यापार आपल्यापेक्षा चीनच्याच फायद्याचा आहे. चीनचा व्यापार वाढवला की त्यांची आक्रमकता नाहीशी होईल. ही एक भोळसट समजूत आहे. चीन आणि जपानचा ३०० अब्ज डॉलरचा व्यापार आहे, पण चीनने जपानशी आक्रमक शत्रुत्वाच्या खेळी अजिबात मागे घेतलेल्या नाहीत. उलट अधिकाधिक जोरकसपणे त्या सुरू आहेत.आपण व्यापारातला घाटा पुरा करायच्या आधी, नविन करारावर सह्या करु नये.
सेशेल्समध्ये नाविक तळ,पाकिस्तानातील बलुचिस्तानात ग्वादर बंदर, म्यानमारमध्ये कोको आयलंड, श्रीलंकेत हंबनटोटा बंदर, बांगलादेशात चितगाव ही बंदरे चीनने विकसित केली आहेत. नकाशात पाहिल्यास, भारतीय द्वीपकल्पाभोवती गळ्या भोवती फ़ांस चीन ओवतोय.
चीनच्या 'एन्सर्कलमेंट'ला भारताने वेळीच प्रत्युत्तर दिले पाहिजे. मालदीव, मादागास्कर, तसेच सेशेल्सबरोबर असलेल्या संबंधात वाढ करणे, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्याशी विशेष संबंध प्रस्थापित करणे यांसारख्या उपाययोजना भारत करू शकतो. चीनभोवती भारतानेही आपला विळखा मजबूत करणे गरजेचे आहे.सरकार ने जनरल व्हि के सिंग यांना ईश्यान्य भारत विकास परिषदेचा अध्यक्ष बनवल्यामुळे लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वेमार्ग,रस्ते,विमान तळ बांधण्याची गती नक्किच वाढेल.मागचे सरकार राष्ट्रीय सुरक्षा विषयीच्या प्रक्रियेत सशस्त्र दलातील तज्ज्ञांना सतत कमी लेखत होते. ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक बाब होती.आता व्हि के सिंग राज्य परराष्ट्रमंत्री असल्यामुळे सरकारला नक्किच योग्य सल्ला मिळेल.
सीमेवर लष्करी हालचाली वाढविणे, चीनचा विरोध डावलून दलाई लामांची अरुणाचल भेट होऊ देणे, चिनी कामगारांना व्हिसा नाकारणे करायला हवे. चिनी मालावर अँटिडम्पिंग नियम लावणे किंवा आरोग्याच्या कारणावरून चिनी बनावटीच्या खेळण्यांवर बंदी घा्लावी. येत्या पाच वर्षात सीमा प्रश्नवर राजकीय तोडगा काढण्यास चीनला भाग पाडणे हाच त्यामागचा हेतू असावा. चीनला जशास तसे उत्तर द्यायला हवे.या करता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान आणि व्हिएटनामला भेट द्यावी.
NACHIKET PRAKASHAN ,24 YOGSHEM,LAY OUT,SNEH NAGAR WARDHA ROAD NAGPUR -PIN 440015,TELE-0712-2285473,9225210130 9225210130 FREE ,
email-nachiketprakashan @gmail.com,
www.nachiketprakashan.wordpress.com
No comments:
Post a Comment