पाकिस्तानातील दुष्टचक्र
कराचीतील जीना आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत्मघाती हल्ला करून "तालिबानी‘ दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका नेमका कोणाकडून आहे, याचे निःसंदिग्ध उत्तर देऊन टाकले आहे. तो वाढता मूलतत्त्ववाद आणि त्यावर आधारलेल्या दहशतवादाचा आहे. देशातील लोकशाहीचे संस्थात्मक अवशेषही उद्ध्वस्त करण्याचा विडाच दहशतवादी संघटनांनी उचललेला दिसतो. या संकटाला समर्थपणे तोंड द्यायचे असेल, तर पाकिस्तानचे मुलकी राज्यकर्ते आणि लष्कर या दोघांना आता तरी खडबडून जागे व्हावे लागेल. आधी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरकार आणि पाठोपाठ नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लाभलेल्या राजकीय स्थैर्यामुळे त्या देशात लोकशाही मूळ धरत असल्याची आशा एकीकडे व्यक्त होत असतानाच या आशेला छेद देणाऱ्या घटनाही वारंवार घडत आहेत. कराची विमानतळावरील हल्ला हीही त्याच मालिकेतील एक घटना.
गेल्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवाझ शरीफ हे दहशतवाद्यांच्या मुसक्याए आवळण्यासाठी काही ठोस पावले उचलतील, अशी आशा व्यक्त झाली. परंतु, त्यासाठी जे स्पष्ट आणि सर्वंकष धोरण ठरवावे लागते, त्याचाच अभाव होता. अफगाणिस्तानातील "तालिबान‘ आणि पाकिस्तानातील "तालिबान‘ असा भेद त्यांनी केला. त्यांना असे वाटत होते, की अफगाणिस्तानातील "तालिबान‘पासून आपल्याला धोका आहे आणि "पाकिस्तानी तालिबान‘शी वाटाघाटी करून देशातील घातपाती कारवायांची डोकेदुखी कमी करता येईल. प्रत्यक्षात अशा वाटाघाटींमधून काहीही निष्पन्न झाले नाही. तसे ते होण्याची शक्यशताच नव्हती. कारण धार्मिक मूलतत्त्ववाद्यांच्या कोणत्याच मागण्यांना तार्किक चौकट नसते. कायद्यावर आधारलेले आधुनिक संस्थात्मक जीवनच त्यांच्या डोळ्यांत खुपत असल्याने त्यांच्याशी बोलणी करून नेमके काय साधणार? उलट सरकार गुडघे टेकत असल्याचा समज करून घेऊन या संघटनेला जास्तच चेव चढला असल्यास नवल नाही. हे झाले लोकनियुक्त सरकारचे अपयश. लष्करानेदेखील मूलतत्त्ववादी शक्तींचा धोका न ओळखता या आगीशी खेळ केला. भारतविरोधी कारवायांसाठी त्यांचा उपयोग करून घेत छुपे युद्ध खेळण्याचा लष्कराचा डाव आता इतका अंगलट आला आहे, की त्याच लष्कराचे महत्त्वाचे तळ सध्या दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरत आहेत. दहशतवाद्यांना आवर घालणे पाकिस्तानी लष्कराला जिकिरीचे ठरते आहे.
अफगाणिस्तानातील युद्धामुळे पाकिस्तानातील अमेरिकाद्वेष पराकोटीला पोचला आहे. तेथील अमेरिकेचे सैन्य याच वर्षअखेर माघारी जात असताना निर्माण होणाऱ्या पोकळीत दहशतवादी संघटना काय थैमान घालतील, हे सांगता येत नाही. अफगाणिस्तानातील "तालिबान‘शी पाकिस्तानातील मूलतत्त्ववादी गटांचे खोलवर लागेबांधे आहेत. या परिस्थितीत अमेरिकाविरोधाच्या आपल्या अजेंड्यासाठी पाकिस्तानचे लष्कर पुरेशी मदत करीत नसल्याने ते चवताळलेले आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकी सैन्याच्या ड्रोन हल्ल्यात "तालिबान‘चा म्होरक्यात हकीमुल्ला मेहसूद ठार झाला. त्याचा सूड म्हणून कराचीतील विमानतळावर हल्ला केल्याचे पाकिस्तानच्या "तेहरिक -ए- तालिबान‘ने म्हटले आहे. मानवी हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते, शियापंथीय नागरिक, अन्य अल्पसंख्य, पोलिओनिमूर्लनासाठी लसीकरण मोहीम राबविणारे डॉक्टार व कर्मचारी, स्त्रियांच्या शिकण्याच्या हक्कासाठी लढणारी मलाला युसुफजाई अशा अनेकांना हल्ल्यांचे लक्ष्य करणारी हीच संघटना. हा आढावा घेतला, तर या संघटनेचे इरादे काय आहेत, हे लगेच स्पष्ट होते. पाकिस्तानातील संस्थात्मक जीवनाचा उरलासुरला भागही कसा धोक्यावत आला आहे, हे यावरून स्पष्ट होते. पण या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची इच्छाशक्ती सरकार आणि लष्कराकडे आहे किंवा नाही, हाच खरा प्रश्ना आहे. "जिओ‘ या दूरचित्रवाणी वाहिनीचे प्रसारण चालू राहू नये, यासाठी लष्कराकडून जे प्रयत्न होत आहेत, ते सध्याच्या विदारक स्थितीचे ताजे उदाहरण. हमीद मीर या "जिओ‘ वाहिनीच्या पत्रकारावर हल्ला झाला, त्यामागे "आयएसआय‘ असल्याचा आरोप वाहिनीने केला होता. तो नंतर मागेही घेतला; परंतु त्यानंतर लष्कर व "आयएसआय‘ हात धुवून त्या वाहिनीच्या मागे लागले आहेत. पाकिस्तानच्या विरोधात ती काम करीत असल्याचा आरोपही करण्यात आल्यानंतर या वाहिनीने "आयएसआय‘ला बदनामीबद्दल नोटीस दिली आहे. पाकिस्तानात "आयएसआय‘च्या विरोधात एखाद्या संस्थेने उघडपणे कायदेशीर दाद मागण्याचा हा प्रकार अभूतपूर्व आहे. लोकशाहीच्या गाभ्याशी जे व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य आहे, तेच वारंवार पायदळी तुडविले जात असल्याने पाकिस्तानी लोकशाहीची सध्याची शोकांतिका पाहायला मिळत आहे. त्या देशाची प्रत्येक पातळीवर झालेली दुभंगावस्थाच त्यामुळे ठळक होत चालली आहे. कराचीतील हल्ला हा त्या पोखरलेल्या स्थितीचे आणि आजाराचे एक लक्षण फक्त आहे. जोपर्यंत पाकिस्तानी राज्यकर्ते, लष्कर, समाजधुरीण आदी समस्येच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार करीत नाहीत, तोवर हे दुष्टचक्र थांबण्याची चिन्हे नाहीत.
दहशतवादी हल्ल्यांच्या सावटाखाली गेली बारा वर्षे पाकिस्तान धुमसत आहे. तालिबानींच्या आत्मघातकी हल्ल्यांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत...
- 25 डिसेंबर 2003 ः अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर आत्मघातकी हल्ला, 15 ठार
- 20 मार्च 2005 ः दक्षिण बलुचिस्तानातील शिया मुस्लिमांच्या मशिदीजवळ स्फोटात 43 ठार
- 11 एप्रिल 2006 ः कराचीत सुन्नी पंथीयांचे नमाजपठण सुरू असताना आत्मघातकी बॉंबस्फोटात 57 ठार
- जुलै-नोव्हेंबर 2007 ः इस्लामाबादमधील लाल मशिदीवर अतिरेक्यांचा आठवडाभर ताबा. सरकारच्या 10 जुलैच्या कारवाईत 105 ठार. नंतर नोव्हेंबरपर्यंतच्या दहशतवादी हल्ल्यांत किमान चारशे मृत्यू
- 10 ऑक्टोबर 2009 ः रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयावर सैनिकांच्या वेशातील दहा अतिरेक्यांच्या हल्ल्यात सहा सैनिक ठार. जबाबदारी तेहरिके तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) स्वीकारली
- 10 जुलै 2010 ः याकाघुंद खेड्यातील आत्मघातकी हल्ल्यात 102 ठार
- 5 नोव्हेंबर 2010 ः दारा आदम खेल येथील आत्मघाती हल्ल्यात 68 भाविकांचा मृत्यू
- 1 एप्रिल 2011 ः डेरा गाझी खान जिल्ह्यात सूफी मुस्लिमांच्या उत्सवावेळी दोन बॉंबरच्या हल्ल्यात 50 ठार
- 13 मे 2011 ः वायव्य पाकिस्तानातील छासद्दातील निमलष्करी दलाच्या प्रशिक्षण केंद्रावरील हल्ल्यात 80 जण ठार. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा तालिबान्यांचा हल्ला
- 15 डिसेंबर 2012 ः पेशावरमधील बच्चा खान विमानतळावरील हल्ल्यात 10 अतिरेकी, दोन पोलिस आणि तीन नागरिक असे 15 ठार
- 8 जून 2014 ः कराचीतील जुन्या टर्मिनलवर झालेल्या हल्ल्यात बारा अतिरेक्यांसह 29 ठार
No comments:
Post a Comment