20140512
पुस्तक परिचय- आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे
मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेल्या, ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाचा, श्री.नरेंद्र गोळे ह्यांनी केलेला, ’आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’, हा मराठी अनुवाद १०-०५-२०१४ रोजी पुण्यात प्रकाशित झाला.
हे पुस्तक माधवी-प्रकाशन-पुणे येथे, खालील पत्त्यावर विक्रीस उपलब्ध आहे. किंमत रु.२२५/- फक्त.
चंद्रशेखर जोशीदत्तकुटी, १४१६ सदाशिवपेठ, पुणे ४११०३०दूरध्वनीः २४४७४७६२, २४४७५३७२, भ्रमणध्वनीः ९३२५०९७८९४
ई-मेलः madhavipublisher@gmail.com
’खो रहा चैनो अमन, मुष्किलों में है वतनसरफरोशी की शमा, दिल में जला लो यारोंजिंदगी मौत ना बन जाए, सम्हालो यारों’
ह्या सरफरोश सिनेमातील शीर्षकगीतात व्यक्त केलेल्या परिस्थितीचा हा काळ आहे. देशातील खुशाली आणि शांतता भंग होत असण्याचा हा काळ आहे. कोणकोणते धोके ह्या काळाच्या उदरात दडलेले आहेत? ते प्रत्येक सुजाण नागरिकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ती माहिती सहजी उपलब्ध असणारी नाही. ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांनी ह्या पुस्तकाच्या रूपाने ती समोर आणली आहे.
दुसर्या महायुद्धांतील जेत्यांनी जर्मनीस विभाजित केले. बर्लीन शहरात भिंत बांधून वैमनस्याची बीजे रोविली. पण सुजाण जर्मन नागरिकांनी एकजुटीने जर्मन राष्ट्रास एकसंध केले. बर्लिनची भिंत तर आता केवळ नामशेषच होऊन राहिली आहे. जर्मनीप्रमाणेच भारत-पाकिस्तान विलीनीकरण होऊन काश्मीरबाबतच्या सर्व समस्या समूळ नष्ट होतील तो सुदिन मानावा लागेल! सध्यातरी, १६ मेला उदयमान होणारी नवी राजसत्ता, ’उँची राजनीती’ करून, हे साध्य करेल अशी आपण आशा करू या. मात्र तोपर्यंत, किमान काश्मीरची समस्या काय आहे? हे जाणून घेण्याचा सोपा सोपान म्हणजेच, ’आव्हान जम्मू आणि काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तक आहे.
जर्मनीच्या एकीकरणासारखे अद्वितीय उदाहरण जगभरात झालेले नाही असे मानले जाते. मात्र हे खरे नाही. भारतातच असे एक देदिप्यमान उदाहरण विद्यमान आहे. मात्र ते म्हणावे तितक्या ठळकपणे लोकांच्या नजरेसमोर आणले गेलेले नाही. १९७५ पर्यंत सिक्कीम हा एक स्वतंत्र देश होता. तो १९७५ साली भारताचे २८ वे राज्य म्हणून भारतात विलीन झाला. आज त्याबद्दल पूर्वाश्रमीच्या सिक्कीमवासीयांना, भारतवासीयांना, वा जगातील इतर कुणालाही, खंत वाटत नाही. दुधात साखर मिसळून जावी तसे, सिक्कीम भारतात विलीन होऊन गेले आहे. सिक्कीमला पर्यटन करून आपण तिथल्या निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आस्वादही घेत असतो. उदयमान राजसत्तेने अशाच पद्धतीने, अखंड भारताचे चित्र पुनर्स्थापित करावे अशी आपण आशा करू या. मात्र त्यानंतरच्या भारतीय उपखंडाचे भवितव्य स्थिरपद शांततेचे आणि समृद्धतेचे व्हावे, ह्याकरता ह्या पुस्तकातील काश्मीरच्या साद्यंत इतिहासावे विवेचन वाचणे जरूर आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या इतिहासाचे अनोखे तपशील देणारा मजकूर, राज्याच्या भौगोलिक सीमांचे यथार्थ दर्शन करविणारे सुरेख मुखपृष्ठ आणि राज्याच्या वर्तमान परिस्थितीचा जणू भावार्थप्रदीप शोभेल असा आढावा, ह्यांनी हे पुस्तक सजलेले आहे.
भारत स्वतंत्र झाला तेव्हा जम्मू आणि काश्मीर हे एक स्वतंत्र राष्ट्र होते. इंग्रजांनी त्यास स्वतःचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. मुस्लिमबहुल लोकसंख्येचे आधारे, पाकिस्तान त्याचेवर पाकिस्तानात विलीन होण्याकरता दबाव टाकत होता. भारत नेहमीप्रमाणे तटस्थ होता. जम्मू आणि काश्मीरचे महाराजा हरिसिंह स्वतंत्र राहू चाहत होते. मात्र अशक्त, दुर्बळ राष्ट्रे दीर्घकाळ स्वतंत्र राहू शकत नाहीत. स्वातंत्र्य मिळवू पाहणार्या त्या राज्यांतर्गत शक्तींना हाताशी धरून पाकिस्तानने अप्रत्यक्षरीत्या त्या राज्यावर हल्ला चढविला. काही कळायच्या आतच, राज्याच्या मोठ्याशा भूभागावर पाकिस्तानने आपली सत्ता प्रस्थापित केली. महाराजा हरिसिंह ह्यांना भारताची मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता. त्याकरता, नेहरूंनी जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन करावे अशी अट घातली. महाराजा हरिसिंह ह्यांनी हा निर्णय घेण्यास लावलेल्या अक्षम्य विलंबाचे पर्यवसान, आपण आज पाकव्याप्त काश्मीरच्या स्वरूपात पाहतो आहोत. हा सर्व उत्कंठावर्धक इतिहास ह्या पुस्तकात तपशीलाने दिलेला आहे.
जम्मू आणि काश्मीर राज्याचे भारतात झालेले विलीनीकरण, सोबत अनेक समस्या घेऊनच झाले. घटनेचे ३७० कलम, पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तानने चीनला दिलेला भारतीय भूभाग आणि चीनच्या ताब्यात असणारा आकाशी चीन, मुस्लिमबहुल प्रांतातील हिंदू अल्पसंख्यांकांचे प्रश्न, घूसखोर-निर्वासित आणि विस्थापितांच्या समस्या, ह्या त्या समस्यांपैकीच काही आहेत. ह्या समस्यांच्या निरसनार्थ भारतीय संघराज्याची संसाधने मग सततच खर्च होत राहिली. काश्मीरातील लोकांच्या समस्यांकरता भारतीय संघराज्याचा पैसा प्रमाणाबाहेर खर्च होऊ लागला. उत्तरप्रदेश, बिहारसारख्या बिमारू राज्यांनाही कधी मिळाली नाहीत, एवढी संसाधने काश्मीरावर खर्ची पडू लागली. जिथे जाऊन राहू शकत नाही, जिथली जमीन खरीदू शकत नाही, त्या राज्यास, इतर राज्यांनी मदत तरी किती करायची! हा आर्थिक असमतोलाचा प्रश्न मग उपस्थित झाला. ह्या आर्थिक प्रश्नाची सम्यक ओळख ब्रिगेडिअरसाहेबांनी ह्या पुस्तकात व्यवस्थित करून दिलेली आहे. त्याकरताही हे पुस्तक वाचनीय आहे.
अशीच समाज-प्रबोधक आणि शासनास ज्ञानदीप ठरावीत अशी, निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके निरंतर लिहिली जावीत, अशी सदिच्छा मी ह्या निमित्ताने व्यक्त करतो.
No comments:
Post a Comment