Total Pageviews

Saturday, 13 October 2012

रात्र वैर्‍याची आहे
रात्र वैर्‍याची आहे...तरुण भारत
देशाला अतिरेकी कारवायांचा धोका नसल्याचा निर्वाळा पंतप्रधान आणि गृहमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी वारंवार देत असतात. संपूर्ण देशभर कडेकोट सुरक्षाव्यवस्था असल्याचा निर्वाळा दिला जातो. पण, जोपर्यंत अतिरेकी आपली सुरक्षाव्यवस्था भेदत नाही तोपर्यंतच आपली सुरक्षाव्यवस्था अभेद्य असते! एखादी अतिरेकी घटना घडली की, हायअलर्टचा इशारा दिला जातो. हे हायअलर्ट कधी सुरू होते आणि कधी संपते, ते कुणालाच काय, पण पोलिसांनाही कळत नाही! दुसर्‍या वेळी पुन्हा अतिरेकी हल्ला झाला की, पुन्हा हायअलर्ट दिला जातो.
राजधानी दिल्ली आणि बिहारमधील बोधगया येथे घातपात घडवण्याचे इंडियन मुजाहिदीनच्या कुख्यात अतिरेक्यांचे मनसुबे, दिल्ली पोलिसांनी, त्यांच्या तीन अतिरेक्यांना अटक करत धुळीस मिळवले आहेत. दिल्ली पोलिसांनी दक्षिण दिल्लीतील पूल प्रल्हादपूर भागातील एका गुप्त अड्ड्यातून असद खान आणि इम्रान खान या दोन अतिरेक्यांना अटक केली, तर सईद फिरोज याला निझामुद्दिन रेल्वेस्थानकावर पकडण्यात आले. या अतिरेक्यांजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला. ऑगस्टला पुण्यात झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटात या तीन अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत. या तीन अतिरेक्यांचे धागेदोरे मोठ्या अतिरेक्यांशी जुळलेले आहेत. मूळ बीडचा रहिवासी असलेला फय्याज अहमद कागझी हा लष्कर--तोयबाचा अतिरेकी आहे. सध्या त्याचे वास्तव्य एका पश्‍चिम आशियाई देशात आहे. पाकिस्तानस्थित इंडियन मुजाहिदीनच्या रियाझ भटकल आणि इक्बाल भटकल या दोघांशी समन्वय साधत, राजधानी दिल्लीसह भारतातील प्रमुख शहरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट कागझीने रचला होता. दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला अबु जिंदाल उर्फ सईद झबिउद्दिनच्या चौकशीतून ही बाब पुढे आली आणि दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत या तीन अतिरेक्यांच्या मुसक्या बांधल्या आणि मोठा अनर्थ टळला.
दसरा आणि दिवाळीच्या काळात राजधानीत बॉम्बस्फोट घडवून देशात दहशत पसरवण्याचे, तर बोधगया येथे बॉम्बस्फोट घडवून धार्मिक तणाव निर्माण करण्याचे या अतिरेक्यांचे मनसुबे होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी ते हाणून पाडले, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे पकडण्यात आलेल्या तीन अतिरेक्यांपैकी दोघे महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नांदेड येथील रहिवासी होते. याचाच अर्थ, आजही महाराष्ट्रात अतिरेक्यांची पाळंमुळं खोलवर रुजली आहेत. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातच बॉम्बस्फोट घडवण्याची हिंमत या अतिरेक्यांनी दाखवली, ही बाब महाराष्ट्र पोलिसांच्या दृष्टीने लाजिरवाणी म्हणावी लागेल. पकडण्यात आलेले आणखी किती अतिरेकी महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत आणि आपल्या कारवाया करत आहेत, असा प्रश्‍न यातून उपस्थित होतो.
जून २०१२ ला पुण्याच्या येरवडा कारागृहात असलेला इंडियन मुजाहिदीनचा कुख्यात अतिरेकी कातील सिद्दिकीची तुरुंगातच हत्या करण्यात आली होती. येरवडा तुरुंगात असलेले शरद मोहोळ आणि अशोक भालेराव या दोन कुख्यात गुन्हेगारांनी कातील सिद्दिकीची हत्या केली होती. सिद्दिकीच्या हत्येमुळे येरवडा तुरुंगाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. देशविरोधी कारवाया केल्यामुळे आम्ही कातील सिद्दिकीची हत्या केल्याचा दावा शरद मोहोळ आणि अशोक भालेराव यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रकारे कातील सिद्दिकीच्या हत्येच्या आपल्या गुन्ह्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न या दोघांकडून करण्यात आला. कातील सिद्दिकीने अतिरेकी कारवाया केल्या असल्या आणि त्यामुळे तो देशाचा गुन्हेगार असला, तरी हत्या करून त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा करण्याचा अधिकार या दोन गुन्हेगारांना कुणी दिला होता, असा प्रश्‍न यातून उपस्थित होतो. कातील सिद्दिकी कुख्यात अतिरेकी असला, तरी त्याला त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर जन्मठेपेची वा फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार हा न्यायव्यवस्थेचा आहे. न्यायव्यवस्थेच्या या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा अधिकार देशात कुणालाच नाही, मोहोळ आणि भालेरावसारख्या कुख्यात गुन्हेगारांना तर निश्‍चितच नाही. कातीलच्या या हत्येची चौकशी करण्याचे तसेच या हत्येमागे काही षडयंत्र आहे का, हे पाहण्याचे निर्देश राज्य शासनाने या प्रकरणी दिले होते. मात्र, पुढे या चौकशीचे काय झाले, ते समजू शकले नाही. कातील सिद्दिकीच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच येरवडा तुरुंगात आणि पुणे न्यायालयाच्या परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट इंडियन मुजाहिदीनने रचला होता. मात्र, काही कारणाने तो रद्द करण्यात आला. त्यानंतर शरद मोहोळ आणि अशोक भालेराव यांच्या नातलगांची हत्या करण्याचे षडयंत्र या अतिरेक्यांनी रचले होते. मात्र, तेही सोडून देण्यात आले. त्यामुळे नंतर पुणे, मुंबई आणि दिल्ली येथे बॉम्बस्फोट घडवण्याचा कट या अतिरेक्यांनी रचला होता. त्यानुसार ऑगस्टला पुण्यात त्यांनी तीन बॉम्बस्फोट घडवले होेते. सुदैवाने यात फारशी प्राणहानी झाली नाही.
या तीन अतिरेक्यांच्या अटकेमुळे राजधानी दिल्ली आणि अन्यत्र बॉम्बस्फोट घडवण्याचा कट फसला असला, तरी देशाला असलेला अतिरेकी कारवायांचा धोका पूर्णपणे टळलेला नाही वा कमीही झालेला नाही, उलट तो जास्त वाढला आहे. या तीन अतिरेक्यांच्या अटकेमुळे देशभर आजही अतिरेक्यांच्या कारवाया सुखेनैव सुरू असल्याचे दिसून येत आहे. देशाला अतिरेकी कारवायांचा धोका नसल्याचा निर्वाळा पंतप्रधान आणि गृहमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी वारंवार देत असतात. संपूर्ण देशभर कडेकोट सुरक्षाव्यवस्था असल्याचा निर्वाळा दिला जातो. पण, जोपर्यंत अतिरेकी आपली सुरक्षाव्यवस्था भेदत नाही तोपर्यंतच आपली सुरक्षाव्यवस्था अभेद्य असते! एखादी अतिरेकी घटना घडली की, हायअलर्टचा इशारा दिला जातो. हे हायअलर्ट कधी सुरू होते आणि कधी संपते, ते कुणालाच काय, पण पोलिसांनाही कळत नाही! दुसर्‍या वेळी पुन्हा अतिरेकी हल्ला झाला की, पुन्हा हायअलर्ट दिला जातो. मुळात आमच्या देशातील सुरक्षायंत्रणा सदोष आणि दिखाऊ स्वरूपाची आहे. सुरक्षायंत्रणा आक्रमक राहण्याऐवजी नेहमीच बचावात्मक पवित्र्यात असते. याला सुरक्षायंत्रणेचे तसेच राजकीय नेतृत्वही जबाबदार आहे. देशात अतिरेकी खुलेआम राहत असताना, आमच्या गुप्तचर आणि पोलिस यंत्रणेला त्यांची चाहूल का लागत नाही? देशात छुप्या स्वरूपात कोणत्या अतिरेकी आणि गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत, याची चाचपणी करण्याचे काम गुप्तचर यंत्रणांचे असते. त्यामुळे औरंगाबाद आणि नांदेड येथे इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी सदनिका घेऊन राहत असताना त्याची चाहूल गुप्तचर यंत्रणेला का लागू शकत नाही, हा प्रश्‍न आहे. याला गुप्तचर आणि पोलिस यंत्रणेचे अपयश म्हणायचे का? या अतिरेक्यांजवळून मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनवण्याचे साहित्य, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा सापडला. हे साहित्य त्यांनी कुठून आणि कसे गोळा केले, याचेही उत्तर मिळाले पाहिजे.
भारतात घातपाती कारवाया घडवण्यासाठी अतिरेकी बाहेर देशातून येत असले, तरी आतील लोकांचे सहकार्य असल्याशिवाय ते कोणतेच काम वा अतिरेकी कारवायाही करू शकत नाहीत. असद आणि इम्रानची दिल्लीतील पूल प्रल्हादपूर भागात राहण्याची व्यवस्था करणारा राजूभाई नावाचा स्थानिक अतिरेकीच होता, याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही.
या तिघा अतिरेक्यांच्या अटकेने घातपाती कारवाया टळल्या असल्या, तरी सुरक्षायंत्रणेला गाफील राहता येणार नाही. कारण, या तीन अतिरेक्यांना अटक झाली असली तरी बाहेर असलेले त्यांचे साथीदार चूप बसतील, असे वाटत नाही. ते घातपाती कारवाया घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. देशात अस्थिरता आणि दहशत निर्माण करण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न असल्यामुळे सुरक्षायंत्रणेवरची जबाबदारी वाढली आहे. ‘राजा जागा राहा, कारण रात्र वैर्‍याची आहे,’ असे देशातील सुरक्षायंत्रणेला सांगावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment