श्वेतपत्रिका काढाच
पवार आहेत देशाचे कृषिमंत्री. पण, आपल्या खात्यात रस न घेता अन्य खात्यात कसा रस घ्यावा,हे पवारांकडूनच शिकले पाहिजे. क्रिकेट, लवासा, अन्नधान्यापासून दारू, द्राक्षांपासून वाईन अशा अनेक विषयांत पवारांनी जो रस घेतला, तो प्रशंसनीय नाही का?
आघाडी सरकार चालविण्यासाठी मुख्यमंत्र्यांजवळ कौशल्य असले पाहिजे,कला असली पाहिजे असा टोमणेवजा सल्ला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिला आहे. हा सल्ला त्यांनी एकाएकी दिलेला नाही. राज्यात गेल्या दहा वर्षांत सिंचनावर ४० हजार कोटी रुपये खर्च होऊनही एक टक्काही सिंचनात भर पडली नाही, असा जो अहवाल कॅगने दिला आहे, त्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्तंभित झाले अन् त्यांनी सिंचनावर श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय जाहीर केला.हा निर्णय राष्ट्रवादीला खूपच झोंबलेला दिसतो.त्यातही आधी जलसंपदा मंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचा तर तिळपापड झाल्याचे त्यांच्या विधानावरून आणि देहबोलीवरून दिसत आहे.अजित पवारांकडे जलसंपदा खाते असताना त्यांनी बराच निधी आपल्या मर्जीच्या योजनांकडे वळवून घेतला होता. अंदाजपत्रकीय तरतुदीव्यतिरिक्त निधीही त्यांनी अनेक शीर्षांमधून ओरबाडला होता.ही वस्तुस्थिती आता लपून राहिलेली नाही.यात सर्वाधिक निधी हा कृष्णा खोरेसाठी ओढण्यात आला. ज्या विभागांतून निधी पळविण्यात आला, त्यात विदर्भ सिंचन महामंडळाचाही समावेश आहे. राज्यातील अनुशेषाबाबत इत्थंभूत माहिती आणि अभ्यास असलेले अर्थतज्ज्ञ डॉ. मधुकरराव किंमतकर यांनी तर आकडेवारी सादर करून विदर्भाच्या सिंचनाचा पैसा कसा वळविण्यात आला, हे सप्रमाण सिद्ध केले. अन्य महामंडळांकडूनही निधी ओढला गेला. अशी सर्व स्थिती असताना केवळ एक टक्का सिंचन झाल्याची बाब जेव्हा समोर आली,तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. श्वेतपत्रिका बाहेर आल्यास तो राष्ट्रवादीच्या विरोधात जाणार, हे उघडच आहे.सध्या जलसंपदा खात्याचा कारभार असलेले सुनील तटकरे हे अगदी बेंबीच्या देठापासून सांगत आहेत की,असे काहीही झालेले नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांकडे जी माहिती आली आहे, ती खोटी आहे, असा त्यातून त्यांनी संदेश दिला आहे.असेच विधान अजित पवार यांनी तटकरे यांच्या विधानापूर्वी केले होते. आता त्यांनी उत्तर देण्यासाठी तटकरे यांना मैदानात उतरविले आहे. पण, विरोधी पक्ष आणि सिंचनाचे जाणकार असलेल्या सर्वांनीच तटकरे यांच्याच खात्याच्या अधिकार्यांनी दिलेल्या अहवालाचा हवाला देत तटकरे यांचे कपडे फाडल्यामुळे तटकरे यांची बोलतीच बंद झाली आहे. स्वत: तटकरे यांच्या मतदारसंघातील बाळगंगा प्रकल्पासाठी दुपटीपेक्षा अधिक तरतूद केल्याचा मुद्दा गाजतच आहे.या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुनील तटकरे या दोघांचाही बचाव करण्यासाठी शरद पवारांना मैदानात उतरावे लागले आहे.
महाराष्ट्र विधिमंडळातर्फे, ‘महाराष्ट्र : काल, आज आणि उद्या’ या विषयावर आयोजित परिसंवादात पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडले. आघाडीधर्माची आठवण करून दिली आणि सर्वांना सोबत घेऊन चालावे,असा सल्लाही दिला. पृथ्वीराज चव्हाण यांनी हा सल्ला मानायला हवा.कारण, पवारांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे.अगदी ते संरक्षणमंत्री असताना, त्यांच्या विमानातून एका गुन्हेगाराने प्रवास करण्याची बाब पुढे आली तेव्हा, मला तर हे माहितच नव्हते, अशी भूमिका पवारांनी घेतली होती. पवार आहेत देशाचे कृषिमंत्री. पण, आपल्या खात्यात रस न घेता अन्य खात्यात कसा रस घ्यावा, हे पवारांकडूनच शिकले पाहिजे. क्रिकेट, लवासा, अन्नधान्यापासून दारू, द्राक्षांपासून वाईन अशा अनेक विषयांत पवारांनी जो रस घेतला, तो प्रशंसनीय नाही का? देशात अन्नधान्याचे लक्षावधी टन साठे सडवायचे. ते सडले की दारू कारखानदार, पशुखाद्य कंपन्या यांना अल्प दरात विकायचे, हा नवा मंत्र देशात आणखी कुणी दिला असता का? फक्त पवारच ही किमया करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्यानंतरही त्यांनी हा साठा न सडता गरीब लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न केले का? पण, मुख्यमंत्री महोदय, असले प्रश्न विचारायचे नसतात. फक्त पवारांनी काय काय केले, हे लक्षात घ्यायचे असते आणि त्यांचा सल्ला ऐकायचा असतो. पवारांचं लवासाचं बाळ तर आता गुटगुटीत झालं आहे. तीन हजार व्यापारी गाळे, फ्लॅट विकले गेले आहेत. ३५ हजार कोटी वसूल! आता पर्यावरणाचा आणखी नाश करून नवी योजना उभारली जात आहे.लवासाच्या पहिल्याच टप्प्याच्या उभारणीसाठी हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली, टेकड्या फोडण्यात आल्या. नदीचा प्रवाह बदलण्यात आला. हा सर्व खटाटोप मुख्यमंत्री महोदय, कुणी केला असता का? हे सर्व फक्त पवारांनाच शक्य झाले. गरीब बिचारे उपाशी असताना, शेतकरी आत्महत्या करीत असताना, त्याकडे लक्ष न देता उद्योगपतींना हात लावू नका हे पवारांनी सांगितले नव्हते का? आज विदर्भात सिंचनाच्या सोयी नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेतीवरच अवलंबून राहावे लागते. आधीच सिंचनाचा पैसा पवारांच्या अनुयायांनी पळविलेला. त्यावर पवार काहीही भाष्य करीत नाहीत. कारण, असल्या विषयांवर भाष्य करायचे नसते. आघाडीचा पूर्ण फायदा घ्यायचा असतो. चव्हाण साहेब, आपण हे कधी ध्यानात घेणार? निधी वळविण्याचा आणखी एक अफलातून प्रकार विदर्भात उघडकीस आला. सिंचनासाठी प्रकल्पांची आधी घोषणा करायची. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करायची. पण, ऐनवेळी वनकायद्याचा अडसर आहे, म्हणून प्रकल्प रद्द करायचे आणि विदर्भाचा पैसा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवायचा ही ती चोरीची नवी पद्धत. विधिमंडळात सादर करण्यात येणार्या सिंचनविषयक अहवालांमध्येच ही माहिती आहे. पण, लवासा उभारताना वनकायद्याचा अडसर का निर्माण झाला नाही, हा प्रश्न शेकडो वेळा विचारण्यात आला. त्याला कोणतेही उत्तर पवारांनी दिलेले नाही. तेव्हा आघाडीत असताना आपला मित्रपक्ष काहीही करो. आपण केवळ मूक दर्शक बनून पाहावे, हा जो मोलाचा सल्ला पवारांनी दिला आहे, तो फारच महत्त्वाचा वाटतो.
पवारांनी याच परिसंवादात प्रादेशिक वाद वाढीस लागू नये, अशीही सूचना केली आहे.त्यांचा रोख विदर्भ आणि मराठवाड्याकडे आहे, हे कोणत्या ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही,एकतर विदर्भ आणि मराठवाड्याच्या निधीवर दरोडा घालायचा आणि वरून कुणी चकार शब्द काढू नये, असा सल्ला द्यायचा यालाच म्हणतात आघाडी धर्म.एकतो चोरी और उपरसे सिनाजोरी.महाराष्ट्रात दुष्काळाची झळ बसू लागली तेव्हा पवारांनी संपूर्ण राज्याचा दौरा करायला पाहिजे होता. जलसंपदा, पाणीपुरवठा हे दोन्ही विभाग तर राष्ट्रवादीकडेच आहेत. पण, आपली जबाबदारी झटकून राज्यपालांनी दुष्काळी भागांचा दौरा करावा, अशी अफलातून मागणी पवारांनी केली. अशी मागणी आपण केली असती का मुख्यमंत्री महोदय?पवारांनी राज्यपालांवर जे शरसंधान केले, त्यामागे पवारांचा नापाक इरादा दडलेला आहे. राज्यपालांनी आपल्या अधिकारात विदर्भ आणि मराठवाड्याला जो त्यांचा हक्काचा निधी वाढवून दिला आहे, त्यामुळे पवारांचा जळफळाट झाला आहे.विदर्भ आणि मराठवाडा गेला खड्ड्यात. आधी पश्चिम महाराष्ट्राचा विचार करा, असा संकेत पवारांना द्यायचा होता. इतक्या खालची पातळी पवार गाठतील, अशी कल्पनाही कुणी केली नसेल. पण, आघाडी धर्माची दुहाई देत पवारांना फक्त आपल्या पोळीवर तेवढे तूप ओढून घ्यायचे आहे, हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. आपल्या भागात वर्षानुवर्षे पिण्याचे पाणीही देऊ न शकणारा राष्ट्रवादी पक्ष कोणत्या तोंडाने प्रादेशिक वादाच्या गोष्टी करीत आहे? स्वत: पवारच प्रादेशिक वाद वाढविण्यासाठी खतपाणी घालत आहेत. तेव्हा मुख्यमंत्री महोदय,अशा नेत्यांच्या सल्ल्यांना आणि धमक्यांना भीक न घालता आपण श्वेतपत्रिका काढा आणि राष्ट्रवादीचे पितळ उघडे पाडा. संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी उभी राहील
No comments:
Post a Comment