प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे हे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय समस्यांची उत्तम जाण असणारे गाढे अभ्यासक व तलस्पर्शी विचारवंत म्हणून मराठी विचारविश्वाला परिचित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सामाजिक समरसता मंच या क्षेत्रांतील ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणूनही ते ओळखले जातात. प्रभावी वक्ते, हिंदुत्वाचे भाष्यकार व उच्च शिक्षणक्षेत्रातील जाणकार अशीही त्यांची ख्याती. आतापर्यंत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे.त्यानिमित्त अलीकडेच त्यांचा पुण्यात भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचा हृद्य परिचय करून देणारा हा लेख...
अनिरुद्ध भालचंद्र देशपांडे हे माझे संघ व संघ परिवारातील सुमारे ५०हून अधिक वर्षांचे सहकारी व परममित्र. अत्रे आणि देशपांडे ही दोन्ही कुटुंबे चाळीसगावची. दोघांचेही वैचारिक गोत्र एकच! आडनावे भिन्न असली, तरी कौटुंबिक गोत्रही एकच! कुळधर्म व कुळाचारही सारखेच. बदामीची शाकंभरी देवी ही आमची कुलदेवता. त्यामुळे आमचे अनेक पिढ्यांचे संंबंध. प्रत्येक सणावाराला एकमेकांकडे जाणे-येणे अगदी स्वाभाविक. अनिरुद्ध यांच्या वडिलांना सर्वजण ‘अण्णा’ म्हणत. त्यामुळे ते आमचेही अण्णसाहेब देशपांडेच होते. चाळीसगावच्या सुप्रसिद्ध आ. बं. विद्यालयाचे ते मुख्याध्यापक. दरवर्षी दसरा व मकरसंक्रांतीला माझ्या आजोबांना नमस्कार करायला ते न चुकता येत. पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्राला दोन्ही घरातील सुवासिनी एकमेकांकडे वाण घेऊन जात, ही कुलरिती. अण्णांना तीन मुलगे. बाळ, मुकुंद व माधव. मुकुंदा आणि मी एकाच वेळी चाळीसगाव महाविद्यालयात शिकत होतो. तो विज्ञान शाखेत आणि मी कला शाखेत. माधव माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान, तर बाळ पाच वर्षांनी मोठा. मी चाळीसगाव येथील महाविद्यालयात उशिराने म्हणजे ऑगस्ट महिन्यात प्रवेश घेतला, तो अण्णांच्या मध्यस्तीमुळे. ज्याला मी ‘माधव’ या घरगुती नावाने ओळखत होते, त्याचे खरे नाव अनिरुद्ध होते, हे मला कळायला १९७३ साल उजाडले! आम्ही दोघे ‘अभाविप’मध्ये एकत्र काम करत होतो, म्हणून ते समजले. तर असे हे आमचे कौटुंबिक भावबंध अनौपचारिक आणि उत्कट.
माझ्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी देशपांडे सर आवर्जून उपस्थित असत. मग तो माझ्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा समारंभ असो, माझ्या वडिलांच्या स्मृतीव्याख्यानाचा समारंभ असो वा त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने पुण्यात आयोजित केलेल्या कौटुंबिक स्नेहसंमेलनाचा असो. माझ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विवेकानंद’ या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपूर्ण प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली. पुढे दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मी ‘दत्तोपंत ठेंगडी द्रष्टा विचारवंत’ या ग्रंथाचे संपादन केले होते. त्याच्या प्रकाशनासाठी रा. स्व. संघाचे विद्यमान सहकार्यवाह दत्ताजी होसबाळे व देशपांडे सर आवर्जून उपस्थित होते. तो आमच्या नातेसंबंधाचा उत्कर्षबिंदू.
शिक्षण
अनिरुद्ध हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी. ‘एम. कॉम’च्या परीक्षेत ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात सर्वप्रथम आले व ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यानंतर पुण्यातील गरवारे महाविद्यालयात त्यांनी आपली देदीप्यमान शैक्षणिक कारकीर्द सुरू केली. काही वर्षांनंतर त्यांनी पुण्याच्या ख्यातनाम बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण क्षेत्रातील आपल्या कारकिर्दीला नवे वळण दिले. तेथेच प्राध्यापक, उपप्राचार्य व प्राचार्य म्हणून कार्यरत राहून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे ते आजीव सदस्य झाले व त्या विख्यात शिक्षणसंस्थेला शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. पुणे विद्यापीठातही वेगवेगळ्या समित्यांवर काम करत आपल्या व्यवस्थापन कौशल्याचा परिचय करून दिला. आपल्या कार्यकाळात त्यांनी आपल्या महाविद्यालयासाठी प्रतिष्ठेचे ’छअअउ’ मानांकन मिळवून दिले. त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याने प्रभावित होऊन ‘विद्यापीठ अनुदान मंडळा’ने त्यांची बंगळुरु येथील आपल्या ’छअअउ’ समितीवर नेमणूक केली. त्या नात्याने त्यांनी देशातील विविध विद्यापीठांना व ख्यातनाम महाविद्यालयांना भेटी देऊन, देशातील शैक्षणिक स्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन केले. नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात जे नवे शैक्षणिक धोरण आखण्यात आले, त्याला आकार देण्यात या अनुभवांचा त्यांना खूप फायदा झाला.
अर्थशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन या ज्ञानक्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व पाहून केंद्र सरकारने अनेक आंतराराष्ट्रीय शिष्टमंडळे व समित्यांवर त्यांची नेमणूक केली. विशेषतः गॅट व डंकेल प्रस्तावाच्या विरोधात व भारताच्या बाजूने त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत ज्या ताकदीने बाजू मांडली, त्याची दखल केंद्र सरकारनेही घेतली. या परिषदेत त्यांनी मांडलेले विचार मूलभूत स्वरूपाचे व देशहिताचे होते.
पुढे मोदी यांच्या कार्यकाळात जे नवे शैक्षणिक धोरण विकसित करण्यात आले, त्यातही सरांचे योगदान मोलाचे होते. त्याची कृतज्ञतापूर्वक दखल या धोरणाच्या ‘मसुदा समिती’चे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन यांनी आपल्या ५०० पानी अहवालात घेतली आहे.
प्रचलित शिक्षण व्यवस्था, शिक्षणाचे माध्यम, प्राचीन भारतीय शिक्षणविचार व शिक्षणप्रणाली यांचा समृद्ध वारसा आणि आधुनिक शिक्षण प्रणाली हे सरांच्या अभ्यासाचे व चिंतनाचे विचार राहिले आहेत. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लखलखित शैक्षणिक कारकिर्दीत पडलेले दिसते.
प्रचलित शिक्षणपद्धती व शिक्षणरचना याबद्दल त्यांच्या मनात अस्वस्थता होती. यात ज्ञान आणि प्रज्ञा त्यातील फरकाचे आकलन दिसत नाही, असे त्यांचे निरीक्षण होते. बुद्धीच्या, ज्ञानाच्या सुयोग्य उपाययोजनासाठी प्रज्ञेची आवश्यकता असते. प्रज्ञा विकसित होण्यासाठी त्याला तत्त्वज्ञानाची बैठक असावी लागते. "आजच्या शिक्षणव्यवस्थेत ज्ञानार्जनाला जेवढे महत्त्व दिले जाते, तेवढे प्रज्ञा विकासाला दिले जात नाही,” ही त्यांची खंत होती. "का शिकायचे, शिक्षणाचा उद्देश काय, याची दृष्टीच विद्यार्थ्यांना दिली जात नाही. ही आजच्या शिक्षणव्यवस्थेतील खरी समस्या आहे,” असे त्यांचे अनुभव व अभ्यास याआधारे मत बनले होते. "विषय, त्याचा अभ्यासक्रम, शिकविण्याइतकेच विद्यार्थ्यांला प्रज्ञाचक्षू दृष्टी देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट, ध्येय असले पाहिजे,” असे त्यांना वाटतो. नवीन शैक्षणिक धोरणात याचे प्रतिबिंब पडावे, या भूमिकेतून त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत व त्या धोरणकर्त्या समितीने स्वीकारल्या आहेत. हे अतिशय महत्त्वाचे व या क्षेत्रातील सरांचा अधिकार अधोरेखित करणारे आहे.
अभाविप
१९६३-६४ या शैक्षणिक वर्षात चाळीसगाव महाविद्यालयात प्रा. अशोक गजानन मोडक नावाचे तरुण, तरतरीत प्राध्यापक रूजू झाले. त्यांचे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयावरील प्रभुत्व विलक्षण होते. त्यांचे शिकवणे मंत्रमुग्ध करणारे व विद्यार्थ्याला दृष्टी देणारे होते. अध्यापनाइतकीच रा. स्व. संघावर त्यांची निष्ठा होती. प्रा. यशवंतराव केळकर यांच्या तालमीत तयार झालेले ते ‘अभाविप’चे सक्रिय कार्यकर्ते होते. उत्तर महाराष्ट्रात ‘अभाविप’चे कार्य रुजवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांंच्या सहवासाने, संपर्काने, सहज संवादाने व सलगी देण्याने अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे सोने झाले. ते संघ व ‘अभाविप’च्या परिघात, विचारविश्वात ओढले गेले. मी स्वतः जसा त्याचा लाभार्थी आहे, तसेच देशपांडे सरही आहेत. त्यांच्यामुळे अनिरुद्ध प्रथम संघाशी व पुढे ‘अभाविप’शी जोडले गेले ते कायमचेच. मात्र, अशोकराव यांचे श्रेय नाकारतात. नुकताच मोडकसरांना ‘चतुरंग’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला, तेव्हा त्यांना अभिनंदनाचा फोन केला. त्यावर अशोकराव म्हणाले, "माझी शैक्षणिक कारकीर्द चाळीसगाव महाविद्यालयात सुरू झाली. तेथे मला तुमच्यासारखे, अनिरुद्धसारखे असंख्य विद्यार्थी मिळाले. त्याचे फलित म्हणजे मला ‘चतुरंग’चा मिळालेला हा ‘जीवनगौरव पुरस्कार’ आहे, अशी माझी श्रद्धा आहे.” ज्यांच्या परिसस्पर्शाने आमचे वैचारिक व व्यावहारिक जीवन उजळून निघाले, त्या अशोकरावांची ही प्रतिक्रिया ऐकून मन भरून आले. देशपांडे सरांचीही प्रतिक्रिया यापेक्षा वेगळी नसेल. ज्या काळात श्रेय लाभण्यासाठी माणसे धडपडताना दिसतात, त्या काळात श्रेय नाकारणारे गुरूजन भेटावेत, हे आमचे भाग्य!
अनिरुद्धजींच्या जीवनात संघविचारांचे जे बीज पेरले गेले, त्याचा आज केवढा दाट वृक्ष झाला आहे, हे आपल्या डोळ्यासमोर आहे. प्रथम संभाजीनगर व नंतर पुणे येथे प्रा. द. मा. मिरासदार व प्रा. पुणतांबेकर यांच्या संपर्कात व सहवासात अनिरुद्ध आले व कार्यकर्ता म्हणून घडत गेले. हे ही जमिनीवरील वास्तव आहे. पुढे पुणे महानगर व एकूणच महाराष्ट्राच्या ‘अभाविप’च्या जडणघडणीचे ते शिल्पकार बनले. याचे श्रेय या सर्व महानुभवांनाही जाते. येथूनच पुढे ‘अभाविप’चे प्रांताध्यक्ष डॉ. बापूसाहेब केंदूरकरांनंतर महाराष्ट्राचे प्रांत प्रमुख अशा जबाबदार्या त्यांच्याकडे आल्या. त्यांनीही आपल्या वैचारिक नेतृत्वाने व संघटन कौशल्याने मिळालेल्या संधीचे सोने केले. प्रांत टीम बैठक, प्रांत कार्यकारिणी, प्रांत अभ्यास वर्ग, अधिवेशने यातील त्यांच्या उपस्थितीने व मार्गदर्शनाने महाराष्ट्रासारख्या खडकाळ प्रदेशात ‘अभाविप’च्या संघटनात्मक बांधणीचा विस्तार झाला.
आपल्यावर आलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी सरांनी प्रांतभर प्रवास केला. त्यावेळी समाजजीवनाचे त्यांना जे व्यामिश्र दर्शन झाले, त्यामुळे त्यांचे सामाजिक भान अधिकाधिक परिपक्व होत गेले. सामाजिक परिस्थितीचे त्यांचे आकलन, त्यावरील त्यांचे तलस्पर्शी चिंतन यांमुळे त्यांच्या वैचारिक मांडणीचे सूतपोतच बदलून गेले. त्यातून पुढे ‘अभाविप’च्या कार्यात सर्वस्पर्शी कामाचा आयाम जोडला गेला. संपर्कात येणार्या प्रत्येक व्यक्तीतील कार्यकर्त्याचा शोध ते घेत. ओबडधोबड दगडात अंतदृष्टी असलेल्या मूर्तिकराला, शिल्पकाराला जशी सुबक सुंदर मूर्ती दिसते, तशी प्रत्येकात कार्यकर्त्याची मूर्ती सरांना दिसते आणि ‘लहळीशश्रश्रळपस र्ेीीं ींहश र्ीपशीीशपींळरश्र’ या पद्धतीने कार्यकर्तेपण ते शिलपून काढतात. संपर्क, संवाद, सहवास आणि आत्मीय व्यवहार या माध्यमातून त्यांनी कार्यकर्ता विकासाला त्यांनी नवी दिशा दिली.
रा. स्व. संघ
‘अभाविप’च्या जबाबदार्यांतून मुक्त झाल्यावर ते रा. स्व. संघाच्या कार्याशी जोडले गेले. पुणे महानगर कार्यवाह ते अ. भा. संपर्कप्रमुख असा त्यांचा संघकार्यातील प्रेरणादायी प्रवास आहे. आपली अखिल भारतीय स्तरावरील जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेकदा त्यांनी देशभर प्रवास केला. आपल्या संपर्कातून व संवादातून अनेक गणमान्य व्यक्तींना त्यांनी संघकार्याशी जोडले. समाजातील सज्जनशक्ती, ेळिपळेप-ारज्ञशीी संघटित झाले पाहिजेत, हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून, त्यांनी आपल्या संघटन कौशल्याचा उपयोग करून घेतला. देशातील अनेक संघशिक्षा वर्गातून त्यांनी प्रभावीपणे अनेक विषयांची मांडणी केली. असे असले, तरी व्यक्तिशः माझे असे मत आहे की, संघरचनेत बौद्धिक विभागाची जबाबदारी ते अधिक समर्थपणे पार पाडू शकले असते. त्यांचा पिंड प्रामुख्याने वैचारिक स्वरूपाचा आहे. त्याला व्यामिश्र अनुभव, वाचन, अध्यायन तलस्पर्शी चिंतन याची जोड आहे. ‘अभाविप’मध्ये कार्यरत असताना ’लरींलह ींहशा र्ूेीपस’ अशा तरुणाईशी हार्दिक संबंध जोडून, त्यांचे वैचारिक भरणपोषण करण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. दुसरे म्हणजे, काही वर्षांपूर्वी संघाने हाती घेतलेला ‘ज्ञानसंगम’ हा बौद्धिक-वैचारिक कार्यक्रम व त्यातील सरांचा सहभाग, पुणे विद्यापीठ परिसरात झालेल्या ‘ज्ञानसंगम’ या राष्ट्रीय चर्चासत्राचे संपूर्ण आयोजन, आरेखन सरांनी ज्या पद्धतीने केले होते, हे त्यांचा त्या उपक्रमातील सहकारी म्हणून मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्यांच्या वैचारिक पिंडाचा त्या विभागात अधिक प्रभावी उपयोग होऊ शकला असता. समाजावर त्याचा अधिक प्रभाव पडून संघातील व समाजातील बौद्धिक वातावरण अधिक समृद्ध व बहुआयामी झाले असते. अर्थात संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व किंचितही कमी होत नाही, हे निश्चित!
व्यक्तिमत्त्व
देशपांडे सरांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. ते जसे उत्तम प्रभावी व अभ्यासू वक्ते आहेत, तसे ते उत्तम खेळाडूही आहेत. चौफेर वाचन, चिंतन, मनन, अध्ययन व व्यापक अनुभव यांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळाच आकार मिळाला आहे. संघटनात्मक काम करीत असताना त्यांना सामाजिक प्रश्नांचे भान आले. त्यातून भविष्यकालीन समाज संघटनेची दूरदृष्टी त्यांना लाभली. त्याचा परिणाम म्हणजे, त्यांचे भारदस्त व विचारांना खाद्य पुरविणारे वक्तृत्व. त्यांची व्याख्याने, बौद्धिक वर्ग, चिंतन व अन्य संघटनात्मक बैठकांतील त्यांचा अर्थपूर्ण व अनुभवसंपन्न सहभाग यांमुळे महाराष्ट्र त्यांना विचारवंत, संघचिंतनाचा भाष्यकार, संघटन प्रक्रियेची सखोल जाण असणारा कार्यकर्ता व भविष्याचे भान असणारा चिंतक म्हणून ओळखतो. मात्र, ते जेवढे चिंतनशील वक्ते आहेत, तेवढे आपल्या विचारांना स्थायी रूप देणारे लेखक का झाले नाहीत, हे मला न उलगडलेले कोडे आहे. त्यांची वैचारिक लेखनाची क्षमता किती मोठी आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल, तर आपण त्यांनी माझ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विवेकानंद’ या ग्रंथाला लिहिलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना अवश्य वाचावी. जोडीला त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी त्यांच्या भाषणांचे संकलन असलेले ‘आवर्तन समाजचिंतनाचे’ हा ग्रंथ अवश्य वाचावा. म्हणजे माझे म्हणणे आपल्याला सहज पटेल.
सरांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. साफल्याचे क्षण ते अनुभवत आहेत. त्यांना उत्तम आरोग्य लाभो व त्यांच्या हातून चिंतनशील लेखन उदंड मात्रेत होवो, अशी अपेक्षा व्यक्त करतो. ‘जीवेम् शरद शतम्|’ त्यांना पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा!

No comments:
Post a Comment