Total Pageviews

Wednesday, 12 March 2025

NAVBHARAT बलोची लिब्रेशन आर्मी का पाकिस्तानमे ट्रेन हायजॅक बलुचिस्तान को...

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतामध्ये एका रेल्वेगाडीचे अपहरण होणे आणि त्यातील प्रवाशांच्या सुटकेसाठी पाकिस्तानी सुरक्षा दलांना २४ तासांपेक्षा अधिक काळ झगडावे लागणे या दोन्ही बाबी या विशाल प्रांतातील ठसठस आणि अस्वस्थता दर्शवतात. क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसला एका बोगद्यात थांबवून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी तिचा ताबा घेतला. रेल्वेगाडीतील २० पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आणि जवळपास २०० प्रवाशांना ओलीस ठेवले. ही घटना मंगळवारी घडली आणि बुधवारी प्रवाशांच्या सुटकेसाठी पाकिस्तानी लष्कराने सुरू केलेल्या कारवाईत ५७ बंडखोर मारले गेल्याचा आणि जवळपास १००हून अधिक प्रवाशांची सुटका केल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला. विविध दाव्यांतील तथ्यता पडताळणे अवघड आहे. पाकिस्तान किंवा बलुच सरकारी माहितीस्राोत विश्वासार्ह नाहीत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे (बीएलए) दावे तपासून पाहणारी स्वतंत्र यंत्रणा नाही. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना मुळातच पाकिस्तान किंवा बलुचिस्तानमध्ये मर्यादित प्रवेश असतो, त्यामुळे त्यांच्याकडून आकड्यांविषयी फार तपशील मिळू शकत नाही. कारवाई थांबेल कधी आणि कशी हेही अनिश्चित आहे. बंडखोर कितीही मोठ्या संख्येने उपस्थित असले तरी लष्कराच्या वाढत्या रेट्यासमोर कधीतरी ते हार जाणारच. मात्र इथे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे, कारण शरीराला स्फोटके बांधलेले आत्मघातकी बंडखोर प्रवाशांच्या सोबत बसलेले आहेत. त्यांना संपवण्यासाठी प्रवाशांच्या जीविताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या कोंडीच्या मुळाशी वर्षानुवर्षे अनुत्तरित राहिलेला बलुचिस्तानच्या अस्मितेचा आणि अनास्थेचा मुद्दा आहे. बलुचिस्तान हा क्षेत्रफळाच्या बाबतीत पाकिस्तानातील सर्वांत मोठा प्रांत. पंजाब, सिंध आणि खैबर-पख्तुनख्वा या इतर तीन प्रांतांच्या तुलनेत अधिक संसाधन समृद्धही. पण या समृद्धीचा फायदा कधीही स्थानिक बलुच जनतेला मिळाला नाही. पाकिस्तान लष्करात पंजाबींचे प्राबल्य. राजकारणातही पंजाब आणि सिंध प्रांतीयांची चलती, त्यातही पंजाबी अधिक प्रस्थापित. बलुचिस्तान किंवा पूर्वीच्या कलात प्रांताचे पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही या देशात सर्वार्थाने एकात्मीकरण, एकजिनसीकरण होऊ शकले नाही. धर्माच्या नावाखाली सर्वांना एका छताखाली आणण्याचा हट्टाग्रह राबवला गेला. त्यातून स्वतंत्र भाषा, स्वतंत्र संस्कृतींची गळचेपी झाली. बांगलादेशाची निर्मिती या अंतर्विरोधी अस्वस्थतेतूनच झाली. बलुचिस्तान त्याच मार्गावर आहे. पण बांगलादेशचा तुकडा पडल्यामुळे सावध झालेला पाकिस्तान बलुचिस्तानला विलग होऊ देणार नाही. त्यासाठी एकच मार्ग पाकिस्तानातील विविध पक्षीय राजकारणी वर्षानुवर्षे आचरतात. तो मार्ग आहे दडपशाहीचा. यातून स्थानिक जनतेचे समाधान कधीही होणार नाही याची त्यांना पर्वा नाही. ही दडपशाही किती टोकाची असावी? २००६ मध्ये बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री आणि बलुच आंदोलनाचे नेते नवाब अकबर बुगटी यांना पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत ठार मारले गेले. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे दहशतवादी किंवा बंडखोराप्रमाणे मारण्यापर्यंत या दडपशाहीची मजल जाऊ शकते. पण यातून काहीही साधले नाही. आज जवळपास २० वर्षांनीही बलुचिस्तान धगधगत आहे. उलट बलुच हल्ल्यांची तीव्रता आणि वारंवारिता अधिक वाढलेली दिसते. त्यावरही पाकिस्तानी राजकारण्यांची पळवाट ठरलेली. या आंदोलनाला भारत, इराण किंवा अफगाणिस्तानची फूस आहे हा नेहमीचा दावा. सारा दोष एकदा का ‘परकीय शक्तीं’च्या माथी मारला की उत्तरदायित्वातून मोकळे होता येते. ताज्या हल्ल्याबद्दल भारताकडे बोट दाखवण्याचे प्रकार सुरू झाले आहेतच.

No comments:

Post a Comment