२०२० मध्ये गलवान खोऱ्यात चीनने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी चिनी सैन्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर पुन्हा चिनी सैन्याने तवांगमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्याचा सुगावा आधीच भारताला लागला आणि पुन्हा चीन तोंडावर आपटला. भारतीय जवानांनी भीमपराक्रम करत चिनी सैन्यांना हाकलून लावलं. मात्र, आता सॅटेलाइटच्या माध्यमातून समोर आलेल्या छायाचित्रांमुळे भारतानं अधिक सतर्क राहायला हवं, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, चीनकडून तिबेटच्या ल्हासा, लडाखच्या जवळील होटान आणि हिमाचल प्रदेशाजवळील न्गारी गुनसा येथे वेगाने बांधकामे सुरू असल्याचे उघड झाले आहे.
चीन हवाई हल्ल्याच्या तयारीत ?
चीनने सुरू केलेली तयारी बघता, तो हवाई हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ रनवे, शेल्टर, इमारतींचे बांधकाम सुरू आहे. रनवेजवळ वेगवेगळ्या प्रकारचे बांधकाम करण्यात येत असल्याचे सॅटेलाइटने टिपलेल्या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. पूल आणि रस्ते तयार केले जात आहेत. चीनचा हा मोठा कट असून, तिन्ही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. चीनकडून तयारी सुरू असल्याचे उघड झाले असले तरी, भारतानं सतर्क राहायला हवं, असे जाणकार सांगत आहेत.
No comments:
Post a Comment