Total Pageviews

Sunday 29 March 2015

SAINA NEHWAL INDIAN OPEN-सुपर सायना

सुपर सायना-निखिल भुते हरयाणातील ढिंडार या छोट्याशा गावात १७ मार्च १९९० ला जन्मलेली सायना, लहानपणीची काही वर्षे तेथे बागडून हैदराबादला गेली. सायनाच्या नसानसांतून खेळ वाहतोय्. बॅडमिंटन तर तिला वारसाहक्काने मिळाले आहे. तिचे आईवडील दोघेही बॅडमिंटनपटू आहेत. आई उषा नेहवाल यांनी तर राज्य पातळीवरील स्पर्धा गाजवल्या आहेत. बॅडमिंटनचे असे बाळकडू मिळाल्यानेच सायना नेहवालने सध्या महिला बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेत भारताचे नाव जगभरात उज्ज्वल केले आहे. हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. वयाच्या आठव्या वर्षी रॅकेट हाती घेतलेल्या सायनाने कसून सराव केला. यासाठी तिला दररोज ५० किलोमीटर प्रवास करावा लागत असे. २००३ मध्ये तिने झेकोस्लोव्हिया कनिष्ठ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. २००४ मध्ये राष्ट्रीय कनिष्ठ अजिंक्यपद पटकावले. २००५ मध्ये पुन्हा या पदकावर नाव कोरले. २००६ व २००७ मध्ये राष्ट्रीय वरिष्ठ अजिंक्यपद जिंकले. अशा प्रकारे २००३ पासून २०११ पर्यंत सायनाने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. १८ सुवर्ण, १ रजत, २ कांस्यपदके पटकावली. २०११ या वर्षभरात जगभरातील महिला बॅडमिंटनपटूंच्या तुलनेत पारितोषिकांच्या माध्यमातून सर्वाधिक रक्कम मिळवणार्‍या क्रमवारीत सायना तिसर्‍या क्रमांकावर आहे. मागील वर्षभरात तिने तब्बल २२ लाख रुपयांचे पुरस्कार जिंकले आहेत. ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी ती देशातील पहिली बॅडमिंटनपटू आहे! अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व पद्मश्री पुरस्काराने गौरवलेल्या सायनाने आता जागतिक पातळीवर नंबर एकचे स्थान प्राप्त करून इतिहास रचला आहे. लहान वयातच क्रीडाक्षेत्रात कमावलेले नाव, हे सायनाने कसून केलेल्या सरावाचे फळ आहेच; पण या प्रवासात आगेकूच करण्यात तिला मदत करणार्‍या प्रायोजकांचा विचार केला, तर याबाबतीत सायनाच्या नशिबानेही तिला चांगली साथ दिली आहे. २००४ मध्ये भारत पेट्रोलियमने तिला उपव्यवस्थापक म्हणून आपल्या समूहात सामावून घेत तिला प्रायोजक म्हणून सहकार्य केले. २००५ मध्ये मित्तल चॅम्पियन्स ट्रस्टने तिचे प्रायोजकपद स्वीकारून, कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्याचे तिला स्वातंत्र्य दिले. २००९ मध्ये डेक्कन चार्जर्स या कंपनीशी तिने १ कोटी रुपयांचा करार केला आहे. सौंदर्य व प्रतिभा यांचा सुरेख संगम असलेली सायना जाहिरातक्षेत्रातही चमकते आहे. आज देशातील तसेच परदेशातील अनेक नामांकित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या सायनाला आपली राजदूत म्हणून नेमण्यासाठी उत्सुक आहेत. अशा या फुलराणीने उत्तरोत्तर यश मिळवावे, हीच शुभेच्छा...! घरोघरी घडाव्या सायना क्रीडाक्षेत्र आणि भारतीय महिला या दोन गोष्टींचा विचार करता, आजही आपण बरेच मागे असल्याचे दिसून येते. क्रीडा प्रकार कुठलाही असो, भारतीय महिला या सर्वच प्रकारांमध्ये अद्याप आघाडी घेऊ शकल्याचे दिसून येत नाही. आजदेखील महिला क्रीडापटूंची, काही मोजकी- बोटावर मोजण्याइतकी- नावेच आपल्याला आठवतात. यामागे असलेली सामाजिक, मानसिक कारणं आपल्याला माहीत आहेत. महिलांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून केलेली प्रगती डोळे दिपवणारी असली, तरी पुरुषी मानसिकतेची झापडं लावलेल्या समाजाने स्त्रीचे त्यांच्या बरोबरीने असलेले अस्तित्वच पूर्णत: मान्य केलेले नाही, हेच खरे! अन्यथा आज केवळ एकट्या सायना, कोनेरू हम्पी किंवा मेरी कोमवर सव्वाशे कोटी भारतीयांच्या नजरा खिळल्या नसत्या! चूल आणि मूल हे समीकरण बाजूला पडलंय्, महिला आता नोकरीसाठी घराबाहेर पडताहेत, संसारात आर्थिक वाटा उचलताहेत, आदी गोष्टी समाज हळूहळू स्वीकारू लागला असतानाही, नोकरीवर जाणार्‍या पत्नीवर आळ घेऊन तिचा खून केल्याच्या घटनाही आपण रोज ऐकत, वाचत असतोच की! मग, आपला समाज दुतोंडी वागतोय् का, की आपण अद्यापही द्विधा मन:स्थितीत आहोत, याबाबत मंथन होणे आवश्यक आहे. मेरी कोम, सायना नेहवाल, कोनेरू हम्पीसारख्या महिला क्रीडापटू खर्‍या प्रेरणास्रोत आहेत. शालेय जीवनामध्ये जवळपास प्रत्येकच मुलीच्या आयुष्यात समाविष्ट होणारा खेळ वा क्रीडा हा घटक नववी-दहावीला येताबरोबर नाहीसा होऊन जातो. तिसरी-चौथीपासून केवळ नववीपर्यंतचा हा खेळाचा तिच्या आयुष्यातील प्रवासच तिच्यातल्या सायना, कोनेरू, मेरीला घडविणारा काळ असतो. मात्र, आपण तिच्या मनातील त्या प्रेरणेलाच मारून टाकतो. ‘आता तू मोठी झाली...’ म्हणत खेळणे-बिळणे सारे काही बंद होऊन जाते. कशा घडणार सायना, मेरी, पी. टी उषा या समाजात? जिथे उगवत्या वयातच या फुलराणींना कोमजून टाकण्यात येते? खेळणे किंवा एखाद्या क्रीडा प्रकारामध्ये रुची असणे केवळ शाळेपुरते मर्यादित असते, दहावीचे वर्ष लागले की सारे काही थांबवायचे, असे समीकरणच आपण स्वीकारून टाकले आहे का? तसे असेल तर शासनाने कितीही युवा-क्रीडा धोरण आखले आणि कितीही प्रमाणात योजना दिल्या, तरी त्यातून महिला क्रीडापटू घडणे शक्य नाही. आज इतर क्षेत्रांमध्ये महिला समोर जात असताना आणि त्यांना समाज स्वीकारत असताना, क्रीडापटू म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यास आपण मागे पडू नये.

No comments:

Post a Comment